Categories
पुस्तक परिचय

रिचर्ड डॉकिन्सच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद करताना…

ऑक्टोबर - २०१९

जादूई वास्तव या पुस्तकातील मनोगताचा संपादित अंश

अंनिसच्या त्रिदशवार्षिक परिषदेत माझे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद काही खास आहे. रिचर्ड डॉकिंन्सचं, ‘द मॅजिक ऑफ रियॅलिटी’ हे पुस्तक मी वाचलं आणि थक्क झालो. वाचल्यावाचल्याच याचा अनुवाद करायचं मी मनोमन ठरवलं. आज ‘जादूई वास्तव’च्या रूपाने हा भावानुवाद आपल्या हाती देत आहे.

विज्ञानाच्या सृष्टीबद्दल विस्मयकारी माहिती देणारी अशी कितीतरी पुस्तकं असतात. पण अद्भुताच्या अनुभूतीबरोबरच विज्ञानाच्या विचारपद्धतीवर इतकं झकास भाष्य करणारं पुस्तक विरळा. म्हणून हे भाषांतर.

प्रत्येक प्रकरणाची सुरुवात मिथककथांनी, पुराणकथांनी होते. मग त्या त्या नैसर्गिक घटीतामागचं विज्ञान समजावून सांगितलं जातं. ह्या विश्वाचे नियम समजावून घ्यायला ह्या धार्मिक कथा किती कुचकामी आहेत हे आपोआपच स्पष्ट होत जातं. प्रकरणाच्या शेवटी येते एक उंचउंच तान. वैभवशाली, तर्कशुद्ध, नवनवोन्मेषशाली विज्ञानाची महती गाणारी. आपला विस्मय इथे टिपेला पोचलेला असतो. ह्या तुलनेत दैवी, धार्मिक, पौराणिक ज्ञान; कचकड्याचं, तर्कदुष्ट, शेवाळलेलं वाटायला लागतं. एकेका प्रकरणापाठोपाठ आपला दृष्टीकोन विशाल होत जातो. म्हणून हे भाषांतर.

आणखी एका तंत्राचा इथे खुबीदार वापर केला आहे. भाकडकथा, पुराणकथा, धार्मिककथांची इथे विपुल उदाहरणे आहेत. पण ती निव्वळ एकाच धर्माची नाहीत. ख्रिश्चन, ज्यू आणि अनेक ठिकाणच्या आदिवासी कथा इथे येतात. ह्या कथातलं हास्यास्पद तर्कशास्त्र, अचाट आणि (काहीवेळा) आचरट कल्पना बघून आपल्याला त्यातला फोलपणा लगेच लक्षात येतो. आपलं मन हे लगेच स्वीकारतं. ‘अरे, ‘ही’ लोकं किती वेडगळ कल्पना उराशी बाळगून आहेत!’, हे तात्काळ पटतं आपल्याला. मग हलकेच जाणीव होते, ‘अरे, आपल्याही प्रथा, परंपरा अशाच तर आहेत! आपण आणि आपल्या कल्पना, इतरांच्या लेखी मूर्ख आणि रानटी आहेत!!’ ‘जोर का झटका धीरे से लगे’, हे तत्व मला भावलं. म्हणून हे भाषांतर.

वैज्ञानिक विचारपद्धतीचे अनेक गुण डॉकिन्स इथे आपल्याला सोदाहरण दाखवून देतो. ‘जे ठाऊक आहे ते अंतिम आहे’ असा विज्ञानाचा दावा नाही, हे तो आवर्जून सांगतो. ‘माहित नाही’ असं सांगायला विज्ञानाला ओशाळवाणं वाटत नाही, हेही सांगतो. उलट अज्ञान हे विज्ञानाला आव्हान वाटतं हे तो पटवून देतो. काही ठिकाणी अमुक एक संकल्पना, ‘मलाही नीट समजली नाहीये’, अशी स्पष्ट, प्रांजळ कबुलीही देतो. अंतिम सत्य गवसल्याचा दावा करणार्‍या धर्मशास्त्रापेक्षा हे किती तरी प्रामाणिक आहे. हा प्रामाणिकपणा वाचकांना स्पर्शून जाईल अशी खात्री वाटते. म्हणून हे भाषांतर.

विज्ञानातल्या मूलभूत संकल्पना तर इथे आहेतच पण सहसा विज्ञान शिक्षण आणि विद्यार्थी ज्याच्या वाट्याला जात नाहीत, अशा विज्ञानाच्या वैचारिक बैठकीबद्दल इथे डॉकिन्स बरंच काही बोलला आहे. त्यामुळे तुम्ही कुणीही असा, हे पुस्तक रंजक आणि उद्बोधक दोन्ही ठरेल अशी खात्री वाटते. म्हणून हे भाषांतर.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष साथी अविनाश पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे. समितीच्या वार्तापत्राचे संपादक प. रा. आर्डे आणि राहुल थोरात यांनी यातील लेख आधी क्रमशः प्रसिद्ध केले, त्याला मिळालेला उत्साही प्रतिसाद माझा उत्साह शतगुणित करून गेला. प्रकाशन विभागाचे मच्छिंद्रनाथ मुंडे सर, मिलिंद जोशी, मित्रवर्य डॉ. हमीद दाभोलकर या सार्‍यांचे मनःपूर्वक आभार.

पुस्तकाचे नाव – जादूई वास्तव

मुळ लेखक – रिचर्ड डॉकिन्स

भावानुवाद – डॉ. शंतनु अभ्यंकर

प्रकाशक – विवेक जागर महाराष्ट्र अंनिसचे प्रकाशन

पृष्ठे – 210

किंमत – 250/-

पुस्तकासाठी – संपर्क 94224 11862