खरं सांगायचं तर आता बरंच मोकळं-मोकळं वाटतंय… अशा सद्गदित शब्दांत निर्मला लोकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या जटामुक्तीनंतर परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, सातारा येथे बोलत होत्या.
यावेळी जटामुक्त महिलेबरोबर मुलगी रूपाली ही होती. ती म्हणाली, आईची 21 वर्षांपूर्वी केसं चिकट झाली आणि घरच्यांनी जटा आल्याचे घोषित केले. तेव्हापासून जटाचे ओझे हळूहळू वाढत गेले. अलिकडे आईला मानदुखी, डोकं जड वाटणे, लोकांत, समारंभात मिसळता न येणे या समस्या जाणवायच्या. मणक्याचा त्रासही सुरू झाला. पट्टाही लावायला सुरू केले. या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी जटामुक्ती करण्याचा निर्णय घेतला व अमलात आणला. आता आईला मोकळं वाटतंय. यासाठी आईची मानसिक तयारी करण्यसाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. गौरी देशपांडे मॅडम यांची महत्त्वपूर्ण मदत झाली. परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्रातील समन्वयक उदय चव्हाण यांनी केलेले सहकार्य तर मोलाचे आहे. याबद्दल त्या भरभरून बोलत होत्या.
परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र, सातारा येथे समन्वयक उदय चव्हाण, सातारा म. अं. नि. स. कार्याध्यक्ष अॅड. हौसेराव धुमाळ, युवा कार्यकर्ता शार्वेय पारसनीस यांनी निर्मलाताई लोकरे यांना जटामुक्त केले.
यापूर्वीही त्या आल्या होत्या; पण तेव्हा त्यांची मानसिक तयारी झाली नव्हती. आज मात्र ठामपणे जटा काढण्यासाठी आग्रही दिसल्या. त्यांचा हा निर्धारच त्यांना जटामुक्त करण्यास उपयुक्त ठरला. आम्ही फक्त त्यांना मदत केली, एवढेच. अशा सहज भावना उदय चव्हाण यांनी व्यक्त केल्या. या जटामुक्तीच्या कार्याबद्दल म. अं. नि. स. चे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार, सातारा जिल्हा प्रधान सचिव वंदना माने, जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जाधव यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.