Categories
उपक्रम

सातारा अंनिसची वारीला अविस्मरणीय भेट

जुलै - २०१४

सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील कुमठे गावचे ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज आपल्या अभ्यासू व प्रभावी वाणीने संतांचे विचार किर्तनाच्या माध्यमातून समाजात पोचवण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे संपूर्ण महाराष्ट्रभर करतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज अत्यंत अस्वस्थ झाले आणि जादूटोणा विरोधी कायद्याला वारकरी संप्रदायानेच विरोध केला याचे त्यांना अत्यंत दु:ख झाले. वारकरी संप्रदायातील असूनही त्यांनी डॉक्टरांच्या खुनानंतर सतत जेथे जेथे त्यांचे किर्तन असे तेथे डॉक्टरांचे काम हे संत आणि समाजसुधारकांचेच काम होते असे ठामपणे विरोध पत्करूनही आपल्या किर्तनातून सांगितले. प्रत्येक किर्तनात डॉक्टरांना श्रद्धांजली वाहिली. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावरही त्यांनी किर्तनातून आपला निषेध व्यक्त केला. सतत अंनिसशी संपर्कात राहिल्याने मागील महिन्यात म.अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्यप्रधान सचिव माधव बावगे, डॉ. हमीद दाभोलकर, भगवान रणदिवे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. अत्यंत मनापासून सर्वांचे स्वागत करून स्नेह भोजन दिले आणि यंदाच्या वारीत तुम्ही सर्वजण आमच्या दिंडीला भेट देण्यासाठी या असे आग्रहपूर्वक प्रेमाचे निमंत्रणही दिले. या निमंत्रणाचा स्वीकार आम्ही केला आणि तो दिवस उजाडला. 1 जुलै 2014 डॉ. शैलाताई दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, भगवान रणदिवे आणि मी स्वत: आम्ही इंदापूर(जि.पुणे) मुक्कामी असलेल्या फडतरे महाराजांच्या श्री.जय हनुमान दिंडी क्र.70 ला भेट द्यायला सातार्‍यावरून दुपारी 3 वा. निघालो. या दिवसाचे औचित्यही काही आगळे वेगळे होते. प्रतिवर्षीप्रमाणे सलिम शेख यांच्या नेतृत्वात मुस्लीम बांधव दर वर्षी या दिंडीचे स्वागत करून सर्व वारकरी बंधूंना गोड असे जेवण देतात. हिंदू मुस्लीम एकतेच्या या कृतीशील उपक्रमाचे आम्ही खर्‍या अर्थाने भागीदार ठरलो. ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे महाराज आणि ह.भ.प. रामचंद्र बापू नलवडे महाराज यांनी अंनिसच्या टीमचे शाल, श्रीफळ देऊन अत्यंत मन:पूर्वक स्वागत केले आणि सर्व वारकरी बंधू समवेत संवाद साधण्याची डॉ. हमीद दाभोलकर व प्रशांत पोतदार यांना संधीही दिली. जादूटोणा विरोधी कायदा मागील वर्षी मंजूर होण्याच्या प्रक्रियेत असताना सनातनी व्यक्ती व संस्थांनी जाणीवपूर्वक या कायद्याच्या विरूद्ध वारकरी बांधवांना भडकवण्याचा आणि वारी बंद पडेल असा प्रचार केला होता. जादूटोणा विरोधी कायदा कोणाच्याही देव आणि धर्माविरूद्ध तसेच वारकर्‍यांच्या विरूद्ध तर मुळीच नाही हे डॉ. हमीदने आपल्या मनोगतात ठासून सांगितले. खरे वारकरी अशा अफवांना बळी पडले नाहीत व येथूनही पुढे ते बळी पडणार नाहीत तर कृतीशीलपणे या कायद्याच्या पाठीशी उभे राहतील असे फडतरे महाराजांनी आश्वासन दिले. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार हा संतांचाच विचार पुढे नेण्याचा मार्ग आहे. डॉ. दाभोलकरांना मारून हा विचार संपणार नसून यापुढे अंनिस आणि वारकरी बंधू संयुक्तपणे हा वसा कृतीशील पुढे नेतील आणि त्यांनी तो न्यावा हीच डॉ. दाभोलकरांना खर्‍या अर्थाने कृतीशील श्रद्धांजली ठरेल असे प्रशांतने आपल्या मनोगतात सांगितले. शेवटी दोन मिनिटे उभे राहून दाभोलकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली, नंतर मुस्लिम बांधवांनी तयार केलेल्या जेवणाचा आस्वाद वारकर्‍यांच्या पंक्तीत बसून अंनिसच्या टिमने घेतला. याच भेटीमध्ये आम्हाला सलिम शेख जे राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्तेआणि वारकरी बांधवांना जेवण देण्यासाठी पुढाकार घेणारे एक पूर्ण वेळ कार्यकर्ते आम्हाला घेऊन गेले पिंपरी चिंचवड, पुणे येधून आलेल्या दिंडीच्या सदिच्छा भेटीसाठी. शेषराज साठे व त्यांचे सर्व सहकारी यांनी अंनिस टिमचे मन:पूर्वक स्वागत केले. अंनिसचे काम इंदापूरमध्ये कृतीशील करण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी एक प्रशिक्षण शिबीर घेण्याची विनंतीही त्यांनी केली. ही तर अंनिस टीमसाठी फारच महत्वाची बाब ठरली. असे प्रशिक्षण शिबीर लवकरच आयोजित केले जाईल असे सांगून आम्ही वैष्णव चॅरिटेबल व मेडिकल ट्रस्ट, मुंबई आयोजित प्रतिवर्षी मोफत औषधे व वैद्यकीय उपचार देणार्‍या गाडीतील पूर्णवेळ सहकारी श्रीराम नलवडे, डॉ. नरेंद्र बांगी, डॉ. भाऊसाहेब ठोंबरे, लवंगारे, मधुकर माने, प्रकाश सातव, भारत विठ्ठलदास व त्यांचे सर्व सहकारी यांना भेट देऊन सदिच्छा दिल्या. डॉ. शैलाताई दाभोलकर यांना स्मरणिका देऊन त्यांनीही अंनिसच्या टिमचे स्वागत केले.