वैचारिक व नैतिक सामर्थ्य सर्वश्रेष्ठ –अशोक धिवरे
शारीरिक सामर्थ्यापेक्षा, वैचारिक व नैतिक ताकद श्रेष्ठ आहे. ही ताकद निर्माण व्हावी यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर आग्रही होते. ही ताकद वाढावी यासाठी अंनिसच्या मुखपत्राने आपले सामर्थ्य वापरावे अशी मौलिक सूचना माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी केली. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षपदावरून त्यांनी आपले विचार मांडले.
अशोक धिवरे हे महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष आहेत. प्रथमपासून ते अंनिसला वैचारिक व कृतीशील पाठबळ देत आहेत. हल्लीच्या मार्केटिंगच्या जमान्यात विचार घेण्यासाठी लोक तयार नाहीत. भारताची राज्यघटना हा प्रचलित धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ आहे. लोकांना ही घटना समजावून देण्याची मोहीम तीव्र केली पाहिजे. दाभोलकरांनी लोकांना प्रश्न विचारायला शिकविले. ही विचाराची मशागत करण्याचे कार्य वार्तापत्राने चालू ठेवावे असा मौलिक सल्ला मा. धिवरे साहेबांनी या प्रसंगी दिला.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रासाठी महाराष्ट्र अंनिसने नवीन कार्यालय विकत घेतले. संपादकीय विभाग, संगणक विभाग व सुसज्ज ग्रंथालय यांनी परिपूर्ण असलेल्या या कार्यालयाचे मा.धिवरे सरांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. या प्रसंगी सांगली शहरातील अंनिसप्रेमी तसेच सांगली जिल्हा व महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. या समारंभाला ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर व महाराष्ट अंनिस ट्रस्टच्या विश्वस्त शैला दाभोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ.दाभोलकरांचे सुपुत्र हमीद व कन्या मुक्ता हेही आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे वार्तापत्राचे प्रकाशक राहुल थोरात व त्यांच्या सहकार्यांनी स्वागत केल्यावर, संपादक आर्डेसरांनी वार्तापत्राच्या वाटचालीचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला. उद्घाटनाचा दिवस होता गुरूवार दि.26 जून 2014. या दिवशी अमावास्या होती. शाहू महाराजांचा हा जन्मदिवस. शाहू महाराज हे परिवर्तनाच्या व समतेच्या चळवळीचे अग्रदूत होते. ज्याला स्वत:चे भविष्य कळत नाही तो दुसर्याचे भविष्य काय सांगणार असा रोखठोक सवाल त्यांनी दरबारात आलेल्या ज्योतिषाला करून त्याची कानउघाडणी केली होती. शाहू जन्मदिन व अमावास्या यांच्या संयोगाचा दिवस आम्ही जाणीवपूर्वक निवडला असे सांगून आर्डेसर प्रास्ताविकात पुढे म्हणाले,
अंनिस ही ज्ञानाधारित व प्रेमाधारीत जनचळवळ आहे. सूर्याने चंद्राचा प्रकाशित केलेला भाग पृथ्वीकडे असेल तर पौर्णिमा होते व अंधारातील भाग पृथ्वीकडे असेल तर अमावास्या होते. याचा मानवी भवितव्याशी संबंध जोडणे ही निखालस अंधश्रद्धाच आहे. अंनिस ही कृतीशील संघटना असल्याने निर्भयपणे वाटचाल करणार्या मनोभावाला बळ देणारी विचारधारा आहे. म्हणून वार्तापत्राच्या कार्यालयाचे अमावास्येला हेतुपूर्वक उद्घाटन घडवून आणले.
महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष व विश्वस्त यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आर्डेसरांनी वार्तापत्राच्या प्रगतीचा आलेख श्रोत्यासमोर मांडला. वार्तापत्राच्या यशस्वी वाटचालीसाठी माजी संपादक डॉ.प्रदीप पाटील व सर्व सहकारी यांच्या मदतीचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. परिवर्तनासाठी शस्त्रापेक्षा प्रबोधन अधिक सामर्थ्यशाली असते. या दृष्टीने वार्तापत्राचे महत्व अंनिसच्या चळवळीला पुढे नेण्यासाठी वादातीत आहे असे सांगून विचारांनी प्रतिवाद करणार्या अहिंसावादी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना शस्त्राने संपविले गेले याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करून प्रा.आर्डे यांनी अंनिस वार्तापत्राची प्रबोधनाची वाटचाल अखंडपणे चालू ठेवण्याची श्रोत्यांना ग्वाही दिली.
महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी वार्तापत्राचे आजी व माजी संपादक व कर्मचारी यांची त्यागमय आदर्शाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. भविष्यकाळात वार्तापत्राला जोडून हे कार्यालय माहितीकेंद्र व्हावे व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणारे इ-लर्निंग सेंटर व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर या अंनिसच्या उपाध्यक्षा आहेत. त्याचे अंनिसला सतत मार्गदर्शन असते. माणसे जोडण्याच्या डॉ. दाभोलकरांच्या भावकौशल्याचा गौरव करून त्यांनी चळवळीतील कार्यकर्त्यांना वैचारिक परिपूर्णता आणण्याचा सल्ला दिला. कृती तर हवीच पण ती सखोल विचारावर आधारीत असावी. मुक्ता दाभोलकर यांनी वार्तापत्र सामान्य माणसे वाचतात हे चांगले लक्षण आहे असे सांगून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी ऐंशी लाख रूपयाची फसवणूक झालेल्या एका गृहस्थाच्या फोनचा उल्लेख करून श्रोत्यांना अवाक् केले. वार्तापत्रात पैशाचा पाऊस पाडण्याच्या बुवाबाजीवर जी कृती झाली त्याचे रिपोर्टिंग वाचून हा फोन मुक्ताला आला होता.
या प्रसंगी वार्तापत्राचे माजी संपादक डॉ. प्रदीप पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. दाभोलकरांबरोबरच्या वैचारिक चर्चेचा भावपूर्ण उल्लेख करून त्यांनी आपल्या घरात वार्तापत्राच्या कार्याला व विकासाला संधी देण्यात मला धन्यता वाटते अशी भावना व्यक्त केली.
राहुल थोरात यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. उपसंपादक राजू देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. ‘हम होंगे कामयाब’ या गीताने या समारंभाची सांगता झाली.