Categories
युवा मानस

सातारा येथे युवा संवाद शिबीर संपन्न

जून – २०१४

महाराष्ट्र अं.नि.स.च्या युवा विभागामार्फत सातारा येथे युवा कार्यकर्ता संवाद शिबीर घेण्यात आले. दि.13 व 14 मे रोजी ‘तारांगण’, शाहुनगर, सातारा येथे हे शिबीर संपन्न झाले. शिबिराच्या पहिल्या दिवशी अं.नि.स. काय आहे, ती युवकांसाठी कोणते उपक्रम राबवते आणि हे शिबीर घेण्यामागील हेतू काय या गोष्टी एका पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केल्या गेल्या. त्यानंतर उपस्थित युवा कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेकडून असलेल्या अपेक्षा सांगितल्या. त्यामध्ये मीडियाचा योग्य वापर करणे, सभासद नोंदणी वाढवणे, संपर्काचे ठिकाण जाहीर करणे, तरूणांपर्यंत पोचण्यासाठी प्रत्येक शाखेला उपक्रम देणे, व्यक्तिमत्व विकास शिबीरे घेणे इ.बाबी सांगितल्या. त्यानंतर अंनिसचा कार्यकर्ता असण्याची ओळख वाढवण्यासाठी काय करायला हवे यावर चर्चा झाली. त्यामध्ये चमत्कार शिकून सादर करणे, उपक्रमात सातत्य ठेवणे, नेतृत्वगुण विकास शिबीरे घेणे, वैचारिक स्पष्टता येण्यासाठी विशेष प्रयत्न करणे, शाखेतील कुणीतरी पालकत्वाची भूमिका घेणे, सभासद नोंदणीचे फॉर्म भरून घेतल्यानंतर एस.एम.एस./पत्र पाठवून कार्यक्रमांचे अपडेट्स देत राहणे, विशेष मासिक सभा घेणे, कार्यकर्त्यांच्या घरी सभा घेणे इ. बाबी सुचवण्यात आल्या. या चर्चेदरम्यान नवीन कार्यकर्ते मिळवणे, टिकवणे आणि त्यांना कामात सहभागी करून घेणे या बाबी करण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच युवा विभाग सक्षम करण्यासाठी विभागाचा कोअर गु्रप करण्याची संकल्पना मांडण्यात आली. या संपूर्ण चर्चेचे समन्वयक अविनाश पाटील हे होते. आणि मार्गदर्शक अविनाश पाटील, हमीद दाभोलकर, माधव बावगे हे होते.

14 मे रोजी सकाळी 9 वाजता शिबिराची सुरवात झाली. शाखा पातळीवर काम करताना तरूणांना येणार्‍या अडचणी आणि मर्यादा हा चर्चेचा विषय होता. या अडचणींवर मात करण्यासाठी उपाय सुचवण्यात आले. त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये मैत्री निर्माण करणे, साप्ताहिक बैठकीला अध्यक्ष नेमून चर्चा भरकटणार नाही याची काळजी घेणे. बैठकीचा ठरवून दिलेला साचा पाळणे, इ.उपाय सुचवण्यात आले. त्यानंतर युवकांकडून अंनिसचे काम प्रभावीपणे होण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये एन.एस.एस.चा उपयोग करून घेणे, विवेकवाहिनी सक्षम करणे, संघटनेची माहिती आणि संपर्क सांगणारे हँडबिल शाखापातळीवर छापून घेणे, अंधश्रद्धा निर्मूलन विषयावरील चित्रपट महोत्सव, शॉर्टफिल्म स्पर्धा घेणे, युवकांसाठी प्रशिक्षणे घेणे. त्यामध्ये चमत्कार, अंनिसची ओळख, वैचारिक स्पष्टता यांचा समावेश असावा. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन करावे

असे सुचवले गेले. या चर्चेचे समन्वयक अविनाश पाटील होते. मार्गदर्शक अविनाश पाटील, हमीद दाभोलकर, माधव बावगे होते.

त्यानंतर प्रशांत पोतदार यांनी चमत्कार कसे सादर करावेत याविषयी मार्गदर्शन केले. चमत्कार सादर करताना येणार्‍या अडचणी आणि त्यावर कशी मात करायची याविषयी त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यानंतर शैला दाभोलकर यांनी जीवन कौशल्य विकास या विषयावर सुंदर मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ.हमीद दाभोलकर यांनी अंनिसचा युवा विभाग कार्यक्षम करण्यासाठी काय करता येईल याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली व त्याबाबत मार्गदर्शन केले. चर्चेतून युवा विभागाची उद्दिष्टे निश्चित केली. युवा विभाग सक्षम करणे हे व्यापक उद्दिष्ट ठरविण्यात आले. त्याचबरोबर युवा कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक स्पष्टता निर्माण करणे, नवीन कार्यकर्तेमिळवणे, टिकवणे, त्यांना कृतीशील करणे, जास्तीत जास्त शाखांमध्ये युवा विभाग कृतीशील करणे, महिला व विविध जातीधर्मातील कार्यकर्त्यांची संख्या वाढवणे, युवा विभागाचा प्रभाव वाढवणारा समन्वय गट स्थापन करून सक्षम करणे ही उद्दिष्टे ठरवण्यात आली. याप्रमाणे युवा समन्वय गट स्थापन करण्यात आला. या गटाच्या सदस्यांना आपापल्या विभागातील शाखा आणि जिल्ह्याच्या युवा कार्यवाहांशी संपर्क करण्यास सांगितले.

ठरवलेल्या उद्दिष्टांपैकी पहिले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैचारिक स्पष्टता प्रशिक्षण शिबीरे घेण्याचाही निर्णय घेण्यात आला. शेवटी युवा विभागाचे कार्यवाह कृष्णात कोरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

वाघेश साळुंखे