Categories
अधिवेशन

विवेकी वाटचालीची त्रिदशकपूर्ती

सप्टेंबर- २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्रिदशकपूर्ती राज्यस्तरीय अधिवेशन मुंबईत संपन्न

9 ऑगस्ट 1989 रोजी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करण्यात आली. त्या स्थापनेला तीन दशके होत असताना 9 ऑगस्टला घेण्यात आलेली ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवाद’ हे विषयसूत्र असलेली आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईतील मुलुंड या उपनगरातील मुंबई महानगरपालिकेच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात मोठ्या उत्साहात यशस्वीपणे पार पडली. परिषदेच्या परिसराला ‘विवेक नगरी’ असे नाव देण्यात आले होते तर सभागृहातील विचारमंचाला ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार मंच’ असे नाव देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी उत्सवी पार्श्वभूमीवर 10 ऑगस्टला सकाळी 10 वाजता शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर विचार मंचावरून चळवळीच्या गाण्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन दिवसांच्या अधिवेशनाला उत्साहात सुरुवात झाली.

उद्घाटन सत्राची सुरुवात डॉ. दाभोलकरांच्या अभिवादन गीताने झाली. हे अभिवादन गीत इस्लामपूरचे खंदे गायक कार्यकर्ते विजय नांगरे यांनी भावपूर्ण गायले. त्यानंतर शाहीर शिंदे यांनी दाभोलकर यांच्यावरील रचलेला पोवाडा अगदी जोशात सादर केला. या दिवशीच्या प्रत्येक सत्राच्या अगोदर पनवेल शाखेच्या पाटेकर मॅडम व सहकारी, सोलापूर शाखेच्या शालिनीताई ओक आणि सहकारी, भिवंडी शाखेचे विनोद म्हात्रे आणि सहकारी, नागपूर शाखेचे गौरव आळणे आणि सहकारी यांनी चळवळीची गाणी सादर केली. पालघर शाखेचे अनिल करवीर, अण्णा कडलासकर आणि सहकारी यांनी ‘शर्मिंदा है’ हे भावपूर्ण हिंदी गीत सादर केले.

उद्घाटन सत्राच्या वेळेस विचारमंचावर अधिवेशनाचे उद्घाटक व प्रमुख वक्ते आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते गजानन खातू, महाराष्ट्र अंनिसचे उपाध्यक्ष व सत्राचे अध्यक्ष महादेवराव भुईभार, डॉ. सुरेश खुरसाळे आणि कार्याध्यक्ष अविनाश पाटील व महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष गिरीश शहा व ज्येष्ठ कार्यकर्त्या वंदनाताई शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव नंदकुमार तळाशीलकर यांनी त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने होणार्‍या राज्य अधिवेशनास आलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत अधिवेशनाची पार्श्वभूमी मांडली. गेल्या 30 वर्षांतील; विशेषत: गेल्या पाच वर्षांतील संघटनेच्या कामांचा आढावा घेत ते म्हणाले, 25 वर्षांच्या रौप्यमहोत्सवाला दु:खाची किनार होती. डॉ. दाभोलकरांच्या शहीदत्वामुळे, कसे होणार, काय होणार, या प्रश्नांना सामोरे जात असताना आपण त्रिदशकपूर्तीचा टप्पा गाठला आहे. ‘अंनिस’ विचारांचे संघटन चालवणारी संघटना आहे, जी प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून संघर्ष करते. हा संघर्ष दशकांचा नाही तर शतकांचा आहे, असे प्रतिपादन करताना हा संघर्ष आपल्याला सतत कार्यरत ठेवावा लागेल, असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र अंनिसची ताकद नेमकी काय आहे, हे स्पष्ट करताना तळाशीलकर यांनी संघटनेची कुठलीही राजकीय ताकद नसताना, संघटनेचा साधा एक आमदार आणि नगरसेवक नसताना आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत दोन कायदे तयार करण्यास शासनाला भाग पाडल्याचे सांगून इतर राज्यांनी हे कायदे बनवण्यासाठी तयारी दर्शवलेली असल्याचे आणि कर्नाटक सरकारने हा कायदा देखील केला असल्याचे सांगत तळाशीलकर यांनी प्रचंड पाऊस व नद्यांना आलेले पूर यामुळे रस्ता आणि रेल्वे वाहतुकीत प्रचंड अडथळे असूनही या अडथळ्यांना न जुमानता राज्याच्या विविध जिल्ह्यांतून अधिवेशनासाठी मोठ्या संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांचे; तसेच विविध राज्यांतून व परराष्ट्रांतून आलेल्या प्रतिनिधींचे स्वागत केले.

त्यानंतर ‘मअंनिस’चे प्रधान सचिव माधव बावगे यांनी अधिवेशनाबाबत भूमिका मांडताना त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अंनिसची चळवळ घेऊन जाण्याचे डॉ. दाभोलकर यांचे स्वप्न आपण साकार होताना पाहतोय, याचा आनंद एका बाजूला आहे तर दुसर्‍या बाजूला आपल्यासोबत दाभोलकर नाहीत, याचे दु:ख अशी भावना व्यक्त केली. 9 ऑगस्ट 1989 साली दाभोलकरांनी मूठभर कार्यकर्ते सोबत घेऊन सुरू झालेले काम आज महाराष्ट्राच्या 35 जिल्ह्यांत सुरू आहे. आज 350 शाखांपर्यंत हा विस्तार झालेला आहे. गेल्या तीस वर्षांत संघटनेने 27 मोहिमा आणि 40 परिषदा आयोजित केल्या असल्याचे सांगत इतर राज्यांतूनही संघटनेच्या कामासाठी मोठी मागणी असल्याचे सांगितले. संघटनेची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात असल्याचे सांगत ते म्हणाले, उजव्या शक्तींना वाटले की, नेता संपवला तर संघटन संपेल; परंतु संघटना जोमाने वाढली. दाभोलकरांनी कार्यकर्ते जसे होते तसे घेतले आणि त्यांना घडवले. कार्यकर्त्यांबाबत त्यांचे एक धोरण होते – ते म्हणजे प्रथम कुटुंब, मग नोकरी आणि त्यानंतर अंनिसचे काम. कार्यकर्त्यांचे कुटुंब हे त्यांच्यासोबत आहे म्हणून चळवळ टिकली आहे. या 30 वर्षांत कुठलेही सरकारी अनुदान नसताना व्यक्तिगत लोकसहभागातून ही चळवळ चालत आहे, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

यानंतर अधिवेशनाचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले. विचारपीठासमोर अंधश्रद्धेने, अज्ञानाने व अविवेकाने मरगळेल्या समाजाचे प्रतीक असणारे एक सुकलेले व निष्पर्ण झाड उभे करण्यात आले होते. त्यावर महाराष्ट्र अंनिसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या नावाने एकेक विवेकाचे पान बांधले. हे पान प्रत्येक कार्यकर्त्याने स्वत:च्या कृतीतून या समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचे प्रतीक होते. असे एकेक पान करत हे झाड हळूहळू पूर्ण हिरवेगार दिसू लागले. या कामात आपल्याला मार्गदर्शन करणारे विचारमंचावरील ज्येष्ठ मान्यवर, ज्यांच्या असण्यानेसुद्धा आपला उत्साह वाढतो, त्यांच्या हस्ते या झाडाला फूल लावले गेले. हीच ‘विवेकाची फुले’ लावून कार्यक्रमाचे उद्घाटन केले गेले. या उद्घाटनाची संकल्पना दहिसर शाखेच्या निशा फडतरे आणि सहकारी यांची होती.

या उद्घाटनानंतर त्रिदशकपूर्ती निमित्ताने संघटनेच्या तीस वर्षांच्या कामाचा तपशीलवार आढावा घेणार्‍या ‘विवेक जागर’ या विशेषांकाचे प्रकाशन उद्घाटक गजानन खातू यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकाबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी माहिती दिली. त्यानंतर ‘विवेक जागर प्रकाशन संस्थे’तर्फे प्रकाशित केलेल्या डॉ. दाभोलकरांवर विविध वर्तमानपत्रांतून आलेल्या लेखांचे संकलन असलेल्या ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ या पुस्तकाच्या जन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या जन आवृत्तीबाबत थोडक्यात माहिती कुणाल शिरसाठे यांनी दिली; तसेच त्रिदशकपूर्तीनिमित्ताने गेल्या तीस वर्षांतील संघटनेच्या कामाचा संक्षिप्त आढावा घेणारी ठकसेन गोराणे यांनी संपादित केलेली महाराष्ट्र ‘अंनिस त्रिदशकाची दमदार वाटचाल’ पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली. ठकसेन गोराणे यांनी ही पुस्तिका प्रकाशित करण्यामागची भूमिका विशद करताना संघटनेच्या वाटचालीची माहिती दिली.

यानंतर अधिवेशन सत्राचे उद्घाटक गजानन खातू यांची ओळख शहाजी भोसले यांनी करून दिली. आपल्या उद्घाटनपर भाषणाची सुरुवात करताना गजानन खातू म्हणाले, “पृथ्वीचे वैशिष्ट्य आहे की, पृथ्वीवर पर्यावरण आहे. डॉ. दाभोलकरांनीही आपल्या समाजात वैचारिक, तर्कनिष्ठ विवेकी पर्यावरण निर्माण केले. त्यामुळे नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील पुस्तकाला ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ हे नाव योग्य वाटते.” महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाशी गेल्या तीस वर्षांपासून मी अप्रत्यक्षपणे संबंधित आहे. 1989-90 साली जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. 1990 चा जागतिकीकरणाचा टप्पा अतिशय महत्त्वाचा होता. त्याच सुमारास महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जन्म झाला. जागतिकीकरणामुळे अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान यात व त्या अनुषंगाने समाजात होत असलेल्या बदलाच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गेल्या तीस वर्षांतील वाटचालीकडे बघितले पाहिजे. या जागतिकीकरणाच्या धोरणाने मुंबईत फक्त गिरण्याच नाहीत, तर मोठमोठे कारखाने बंद झाले आणि त्याजागी टॉवर्स उभे राहिले, शेतीचा वाटा 56 टक्क्यांवरून 13 टक्क्यांवर आला. याच काळात उद्योग बंद पडत चालले, रोजगार कमी झाल्यामुळे जातीसमुदाय आधारित आरक्षणाची आंदोलने वाढू लागली. याच काळात ‘फेक न्यूज’ आणि ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’चा नकारात्मक प्रभाव वाढला. याच काळात भ्रष्टाचारविरोधी, अन्न अधिकाराची, माहिती अधिकाराची आंदोलने सुरू झाली. ही सर्व घुसळण होत असताना अंनिसने विवेकी पर्यावरण निर्माण करण्याचे काम नेटाने केले आहे.

आज ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’च्या आधारावर तरुणांची मते तयार होतात, ही खंत व्यक्त केली. ‘फेक न्यूज’, ‘ट्रोलिंग’ यांचे प्रमाण वाढत आहे, याची चिंता त्यांनी व्यक्त केली. माहिती आंदोलन सुरू झाले, नवनवे दालन उघडले जात आहे, विचार येत आहेत, आजच्या व्यवस्थेने मानवी जीवन कुठे ढकलले आहे ते आपल्याला बघावे लागेल. राजकीय बदलांसाठी सध्या लढाई सुरू आहे. धार्मिक, उजव्या शक्ती वाढत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र अंनिस काम करतेय, हे फारच कौतुकास्पद आहे, असे विचार मांडत असतानाच आजची पुरोगामी चळवळ कुंपणात अडकली आहे. मात्र डॉ. दाभोलकर यांनी हे कुंपण तोडले आणि नवीन लोकांना जोडून घेतले, तरुण कार्यकर्ते निर्माण केले, घडवले हे दाभोलकर यांचे वैशिष्ट्य होते. 30 वर्षांत अनेक आंदोलने झाली; पण नेटवर्क उभे राहिले नाही, राष्ट्र सेवा दल सोडले तर दाभोलकर आणि अंनिसने सक्षम नेटवर्क उभे केले आहे.

अंनिसच्या एकूणच वाटचालीबद्दल बोलताना खातू यांनी विचार आणि आचार याबाबत अंधश्रद्धा हा आचारधर्माचा भाग आहे. लोक आचाराच्या माध्यमातून अंधश्रद्धा पुढे घेऊन जात असतात, असे मत मांडून त्यामुळे चळवळीला पुढच्या टप्प्यावर घेऊन जाण्याच्या दृष्टीने दाभोलकर यांनी एक पुढचे पाऊल टाकले आणि विचारधर्माच्या आधारावर विवेकवादी चळवळ उभी केली, असे प्रतिपादन गजानन खातू यांनी केले.

आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी अंनिसने स्वतःला पर्यावरण चळवळीशी जोडून घ्यायला हवे. कारण पर्यावरण चळवळ आता मानवाच्या रोजच्या जीवनाशी जुडणारी आहे, अशी भूमिका मांडली.

उद्घाटनसत्राचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी अंनिसच्या कामाची थोडक्यात मांडणी केली, ज्यात त्यांनी प्रामुख्याने अंनिसने चमत्कार व बुवाबाजीच्या विरोधात कार्य केलेच; पण नेत्रदान, अवयवदान, देहदान करा अशा प्रकारचे कामही अंनिसने केले आहे, असे प्रतिपादन करत अधिवेशनाच्या उद्घाटनसत्राचा समारोप केला.

उद्घाटनाच्या समारोप सत्राच्या आभार प्रदर्शनाचे काम नरेंद्र राणे यांनी केले, तर संपूर्ण सत्राचे सूत्रसंचालन सुरेखा भापकर यांनी केले.