Categories
अधिवेशन

धर्मसत्ता आणि राजसत्तेचे विलगीकरण करण्यासाठी भारतीय विवेकवाद समजून घेऊया… -अविनाश पाटील

सप्टेंबर- २०१९

सत्र 2 रे

महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘भारतीय कसावर आधारित विवेकवादाचे व्यापकत्व’ या विषयावर बीजभाषण केले. या सत्राचे अध्यक्ष शामरावअण्णा पाटील हे होते. स्वागत राजेश देवरूखकर, प्रास्ताविक गजेंद्र सुरकार, सूत्रसंचालन बबन कानकिरड यांनी केले; तर वक्त्यांचा परिचय सुधाकर काशीद यांनी करून दिला. सत्राचे आभार अमोल चौगुले यांनी मांडले. अविनाश पाटील यांनी केलेले बीजभाषण

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्तीसाठी उपस्थित असणार्‍या सर्व सहकारी बहीण-भावांना मनापासून झिंदाबाद !!!!

संघटनेची तीस वर्षे पूर्ण होणे ही आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंददायी अशी मानाची घटना आहे. संघटनेच्या वाटचालीत आपण सर्व भागीदार असणे हे तिच्या वर्तमान आणि भविष्यकालीन वाटचालीसाठी मानाची, प्रोत्साहनाची बाब आहे. आपल्या सर्वांच्या अथक परिश्रमातून आजचा हा संमेलनाचा दिवस पार पडतो आहे.

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या अतिशय कल्पक आणि कष्टातून सुरू झालेले आपले संघटन आज तीस वर्षांचा टप्पा पूर्ण करते. महाराष्ट्रातील जनमानसात एक ओळख निर्माण करण्यामध्ये आपण संघटना म्हणून यशस्वी झालो आहोत. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे अनेक लोक डॉ. दाभोलकर यांच्यामुळे आपल्या संघटनेशी जोडले आहेत. आपल्या भविष्यकालीन कामाच्या दृष्टीने आपली वैचारिक दिशा काय असायला पाहिजे? यावर खरं तर आपण चर्चा केली पाहिजे. आपल्या वर्तमानाचा आढावा घेताना भविष्याचीही दिशा काय असावी, आपल्या संघटनेच्या वाटचालीचे टप्पे काय होते, ते आपण लिखित स्वरूपात कार्यकर्त्यांना उपलब्ध करून ठेवले आहे.

देवांच्या आणि धर्माच्या नावावर चालणार्‍या शोषणाच्या नकारासाठी व त्याच्या उच्चाटनासाठी, एवढाच सुरुवातीला आपल्या चळवळीचा मर्यादित उद्देश होता; पण मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये तो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व्यवहार असेल कुठल्याही जीवनाच्या व्यवहाराशी संबंधित अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार आपण अंगीकारून, त्यातून आपली चळवळ वाढत गेली. आपण फक्त बाबा-बुवांच्या चमत्कारांना आव्हान देण्यामध्येच, त्यांचा भांडाफोड करण्यामध्येच अडकून पडलो नाही, म्हणून आजपर्यंतचा व्यापक वैचारिक मोठा परिक्षेत्र गाठण्याच्या दिशेने वाटचाल करू शकलो. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रवासात शास्त्रीय ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने विकसित होत जाणे म्हणजे सर्व नाकारणे; पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, भूत-भानामती नाकारणे, म्हणजे तुमचा हा विचार नकाराचा आहे – अशी एक टीका आपल्यावर होत असताना, त्याची सकारात्मक बाजू म्हणजे आपण शास्त्रीय बाजू मांडण्याची सुद्धा सुरुवात केली. वैज्ञानिक दृष्टिकोन हादेखील आपण जीवनाच्या विविध क्षेत्रात अंगीकारण्याची गरज आहे. केवळ देवाधर्माच्या नावावर चालणारी अंधश्रद्धाच नव्हे, तर एक वैचारिक, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा समाज घडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहून शास्त्रीय विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण सर्व रुढी, परंपरा तपासू लागलो. अंधश्रद्धा निर्मूलनापासून सुरू झालेला प्रवास शास्त्रीय दृष्टिकोनापर्यंत विकसित केला. पुढे तो धर्मचिकित्सेपर्यंत आपण घेऊन गेलो.

आपण संघटना म्हणून, संघटनेचा विचार म्हणून वर्तमान आणि भविष्याचे विधान म्हणून ज्या-ज्या गोष्टी करतो, मांडतो, विचार करतो, त्याबाबत आपल्या कार्यकर्त्यांमध्ये त्याच्या विषयीच्या आकलनाचा विचार विकसित करण्याची गरज आहे. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सुरू झालेला प्रवास शास्त्रीय दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांच्या संदर्भात जागर करण्यापर्यंत तो आपण नेला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर जगभरातून आपल्या कार्याबद्दल उत्सुकता म्हणून लोकांनी आपले काम जाणून घेतले. आपण करीत असलेले काम हे किती विवेकवादी आहे, हे संपूर्ण जगाने मान्य केले.

देशातील आणि देशाबाहेरील विवेकवादाचा धांडोळा घेत असताना त्याच्याकडे आपण अनुभव आणि आदर्श म्हणून बघावयास हवे. जगभरातील आणि आपल्या देशातील विवेकी लोकांचं मत आहे की, देव आणि धर्म नाकारल्याशिवाय जगातील अंधश्रद्धा दूर होणार नाहीत, ही भूमिका महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नाही- हे मी पुन्हा-पुन्हा नोंदवू इच्छितो. विवेकवाद्यांनी, पुरोगाम्यांनी माणसाचं व्यक्तिमत्त्व समजून घेत असताना फक्त त्याच्या विचारांना आवाहन करण्याचा प्रयत्न केला. व्यक्ती ही विचार आणि भावना यांचे मिश्रण आहे. मानवाच्या भावनेचा पगडा हा धर्मव्यवस्थेने घेतलेला आहे. धर्मव्यवस्थेतील हितसंबंध, त्याचे शोषण, त्याची गुलामगिरी ही त्या धर्माचाच भाग आहे, असे त्याला वाटते. आपण त्याची चिकित्सा करतो. त्याला नाकारतो, त्याच्या विरोधात भूमिका घेतो. लोकांना विचारांच्या पातळीवर हे स्वीकार्ह वाटते; पण व्यवहाराच्या पातळीवर हे नाकारण्याचे धैर्य होत नाही. तो आत्मविश्वास त्यांच्या जीवनात नाही. ते नाकारण्याचे धाडस करू शकत नाही. त्यांच्यामध्ये भावनेचा भाग महत्त्वाचा ठरतो.

मानवामध्ये भावनेचा भाग हा मोठा आहे. मनुष्याला प्राणी म्हणून आपण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याचा मेंदू हा एक तृतीयांश प्राण्याचा आहे, ज्यामध्ये जगण्याची गरज म्हणून त्याला भूक, झोप, लैंगिक भावना, मृत्यूचं भय या चार भावना सुरक्षित करण्यासाठी, आपलं अस्तित्व जपण्यासाठी, त्याने त्याच्या भावनिकतेला जपण्यासाठी रूढी – परंपरा – धार्मिक विधी या जपून ठेवल्या आहेत. माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील मोठा भाग म्हणजे भावना. या भावनेला आवाहन करायला आपण कमी पडलो. त्याच्यावर फुंकर घालण्यात आपण कमी पडलो. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावित करण्यामध्ये केवळ भावनेच्या नव्हे, तर व्यवहाराच्या बदलाच्या कृतीच्या पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करण्यात आपण कमी पडलो. आज आधुनिक मेंदूबाबतच संशोधन असं सांगतं – माणसाचा मेंदू हा भावना आणि विचारांचे मिश्रण आहे. म्हणून माणसाच्या भावना आपण ओळखल्या पाहिजेत. डाव्या – पुरोगामी लोकांनाही आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असं वाटू लागलं की, आपण नवीन धर्म नावाची एक व्यवस्था लोकांना द्यावी. अशा स्वरूपाचे प्रयत्न अनेकांनी केले. महात्मा फुलेंनी सत्यधर्म घ्यावासा वाटला. डॉ. बाबासाहेबांना बुद्ध धम्म घ्यावासा वाटला. त्याही आधी आणि नंतर अनेकांना बरेच प्रयोग करावेसे वाटले. आधुनिक काळाशी सुसंगत धर्म आपल्याला देता यावा, यासाठी संविधान हा पायाभूत आपला धर्मच आहे, हे अधिक समजूतदार विचाराने समजून सांगण्याची गरज आहे.

जो पाश्चात्य विचारप्रवाह विवेकी विचारांचा स्रोत मानला जातो, त्या पाश्चात्य विचार प्रवाहात धर्मसत्ता आणि राजसत्तेचे विलगीकरण झाले पाहिजे, असा लोकशाहीच्या जन्माच्या आधीपासून हा विचार मांडण्यात आलेला आहे. हा विचार आजच्या काळात अधिक प्रभावीपणे अंगीकारण्याची गरज आहे. भारतीय विचारपरंपरेची ज्याच्यामध्ये आधुनिक विचार प्रवाह आले आहे, त्यांनी धर्म आणि देव यांच्या विचारांवर फुली मारल्याशिवाय समाज विवेकी होणार नाही, ही भूमिका घेतली. ती इतिहासाच्या कसोटीवर तपासली तर यशस्वी होऊ शकत नाही. अशा भूमिकांचाही पुनर्विचार करण्याची गरज मला वाटते. या विचारांना भारतीय परंपरेत काय धागेदोरे, कोणता वारसा आहे, हा शोधण्याचा प्रयत्न केला तर चार्वाकापासून ते बुद्ध, महावीर, चक्रधर, बसवेश्वरांनंतर संत समाजसुधारकांपासून वारकर्‍यांपर्यंतचा संप्रदाय, भक्तिसंप्रदाय या सर्वांचा मतितार्थ काय आहे, तर डॉ. दाभोलकर त्याला कोट करताना म्हणायचे, त्यांनी ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री केला.

ईश्वरकेंद्री असणारी भक्ती ही मानवातच धर्म बघा….. काम हाच ईश्वर आहे. त्याला शोधण्यासाठी कुठे जाण्याची गरज नाही. तीर्थ धोंडा पाणी…. अशा स्वरुपात मतितार्थ सांगण्याचा विचारवसा आपण नीट समजून घेतला नाही, त्याच्याकडे पाठ फिरवली तो नीट समजून घेतला नाही. त्याच्याबाबत विद्वेषी राहिलो. त्यामुळे आपण त्याच्याकडे पाठ केली व लोकांनी आपल्याकडे पाठ केली. त्यामुळे आज सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपण अल्पसंख्याक ठरलो. याचे महत्त्वाचे कारण आहे. आपण समाजाशी संवाद साधताना त्यांची भावनात्मक गरज ओळखू शकलो नाही. म्हणून लोकांनी सुद्धा जनसमुदायाने आपल्यासोबत येण्याचं नाकारलं. भविष्यात हे बदलण्यासाठी आपल्याला विवेकवाद हवाच आहे. तो अंगीकारायचा आहे … इतरांचाही मानवतावादी दृष्टिकोन समजून घ्यायचा आहे, समूह संवादी भूमिकेतून जोडून घ्यावे लागणार आहे. यासाठी भारतीय कसावर आधारित असणारा वसा आणि वारसा नीट समजून घ्यावयास हवा, असे मला वाटते. चार्वाकापासून संतपरंपरेपर्यंत आणि महाराष्ट्रातील समाज सुधारकांची जी परंपरा इतर राज्यांपेक्षा आपल्याला मोठ्या प्रमाणावर लाभली आहे, त्या परंपरेलाही समजून घेतले पाहिजे. म्हणूनच आपण फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, त्याला दीडशे वर्षांची विवेकी परंपरा लाभलेली आहे. लोकहितवादी, आगरकर, गाडगेबाबांपर्यंतचा विवेकी परंपरेचा आपण स्वीकार करतो. वारसा समाजसुधारकांचा – विवेकी विचारांचा आपण अंगीकारतो. धर्माची चिकित्सा करताना त्याला कालसुसंगत करण्याचे प्रयत्न, ईश्वरकेंद्री धर्म मानवकेंद्री करण्याचे प्रयत्न त्या-त्या काळातील समाजसुधारकांनी केले आहेत. अनेकांनी धर्मांतर करून काही नवे धर्मपंथही तयार केले; पण समाज विवेकी होण्यासाठी ते कितपत योग्य ठरले? याचेही साक्षेपी मूल्यमापन व्हायला हवे, असे मला वाटते.

विवेकाच्या परंपरेत एक बलदंड वारसा आपल्याला मिळाला आहे. तो वारसा समजून घेण्याची आज गरज आहे, तो वारसा फुली मारण्याचा नाही, तो कालसुसंगत करण्याचा आहे. माणुसकीचा दृष्टिकोन जपून, मानवी संबंधांचा ओलावा जपून, मानवाला विवेकी बनविण्यासाठी प्रवृत्त करण्याचा आहे. त्यामुळे आपल्या विवेकी मांडणीतील उपक्रमातील नकारात्मकता काढून मानवी संबंध जोडण्याचे प्रयत्न जेवढे वाढवू, तेवढा भारतीय कसावर आधारित विवेकवाद वाढेल. याबाबतची एक भूमिका देश-विदेश पातळीवरची भूमिका घेऊन भारताचा विवेकवाद हा नकारात्मकता सांगत नाही, तर तो सकारात्मकता सांगतो. हा तो व्यापक विचार आहे. आपला विवेकवाद माणूस म्हणून, माणसाचं अस्तित्व आहे हे मान्य करतो आणि मग त्याच्या बदलासाठी त्याला भावनात्मक प्रवृत्त करतो. तो मध्यममार्गी भूमिका घेतो. कुठलीही कडवी डावी किंवा उजवी भूमिका न घेता वेळ जाऊ देण्याची संयमी भूमिका घेतो.

आपण माणूस बदलतो, यावर विश्वास ठेवणारे लोक आहोत. आपल्या वर्तनामध्ये आणि भविष्यामध्ये आपल्या भारतीय विवेक परंपरेला जेवढे आपण समजून घेऊ, काळाच्या कसोटीवर तपासून घेऊ, भविष्याच्या व्यवहारांमध्ये तिचा अंगीकार करू, तेव्हाच सर्व स्तरातील समूहाशी आपला विवेकी संवाद व सहभागातून सामर्थ्य मिळवण्यासाठी उपयुक्त होईल – असे मला वाटते. आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भविष्याची ही अशी दिशा असावी, अशी माझी इच्छा, अपेक्षा आहे.

सत्र 3 रे

मुलाखतकृतिशीलता, उपयुक्तता व कालसुसंगतता

अधिवेशनाच्या या सत्रात महाराष्ट्र अंनिसची कृतिशीलता कशी उपयुक्त आणि कालसुसंगत होती याबद्दल बोलले, महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे आणि संजय बनसोडे आणि त्यांना बोलते केले, ज्येष्ठ कार्यकर्ते परेश शहा आणि तरुण कार्यकर्ते कुणाल शिरसाठे यांनी. या सत्राचे सूत्रसंचालन आणि परिचय हरिदास तम्मेवार यांनी केला. तर स्वागत उषा शहा आणि आभार अशोक निकम यांनी मानले.

मुलाखतीला सुरुवात करताना परेश शहा म्हणाले, युक्रांद, दलित पँथर, समाजवादी युवक दल, छात्र युवक संघर्ष समिती ज्या काळात कार्यरत होती, त्या काळात ‘अंनिस’ सुरू झाली पण या संघटनांचा जोर ओसरत गेला, मात्र आपण विविध उपक्रम, संघर्ष, आंदोलने यांच्या माध्यमातून सातत्य आणि कालसुसंगता राखत परिवर्तनशील राहिल्याने आपली उपयुक्तता सर्व पातळीवर सिद्ध होत राहिली.

सुशीला मुंडे म्हणाल्या, 30 वर्षे पूर्ण झाल्याची भावना आनंदाची आहे; पण आमचे संस्थापक आमच्याबरोबर नाहीत, याचे दुःख वाटते. चिकाटी, पारदर्शकता यामुळे चळवळ ठाण मांडून आहे. राज्याच्या बाहेर 10-15 राज्यांत चळवळ कार्यरत आहे. पण संघटनेला समाजमान्यता मिळवायला वेळ लागतो, सिद्ध करावे लागते. कुठलीही चळवळ सुरू करताना काही उद्दिष्टे ठरवावी लागतात. ती साध्य करण्यासाठी कार्यकर्ता प्रशिक्षित असणे खूप महत्त्वाचे आहे. प्रशिक्षित कार्यकर्त्याचा वैचारिक पाया पक्का असतो. असे वैचारिकदृष्ट्या पक्के असणारे कार्यकर्ते जेव्हा समर्पित भावनेने काम करतात, तेव्हा संघटना आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने वेगाने वाटचाल करते. आपण लवचिक आहोत. आपण संविधानाच्या चौकटीत काम करतो. आपणाला हे माहिती आहे की, माणूस बदलू शकतो. जेव्हा डॉ. दाभोलकरांनी चळवळ सुरू केली, तेव्हा लोकांनी ती फारशी गंभीरपणे घेतली नाही; पण आज फक्त व्यक्ती नाही, तर समूहाला बदलण्याची ताकद आपल्यात आहे. ती ताकद आपण आपल्या तीस वर्षांच्या वाटचालीतील संघर्ष, विधायक कामे, उपक्रम यातून मिळविली आहे. हीच आमच्या कृतिशीलतेची, उपयुक्ततेची आणि कालसुसंगततेची पावती आहे.

संजय बनसोडे म्हणाले, सतत नाविन्याचा ध्यास घेत आणि कार्यकर्त्यांच्या गुणांनुसार काम देत ही चळवळ पुढे गेली. प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची मजा आहे आणि आम्ही हे सगळे 30 वर्षे करतोय. ‘अंनिस’ वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवणारी संस्था आहे. हे उपक्रम केवळ वैशिष्ट्यपूर्ण नाहीत, केवळ कागदी नाहीत तर ते कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांनाही कृतिशील बनविणारे आणि कालसुसंगत व सामाजिक स्वास्थ्याला उपयुक्तही आहेत.आज आपण माध्यमांच्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायचा प्रयत्न करतोय. आपला ‘विवेक जागर’ हा स्वतंत्र प्रकाशन विभाग आता चालू झाला आहे. सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागाद्वारे आपण विविध उपक्रम राबवितो. रिंगण नाटक हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत चळवळ नेत आहोत. दरवर्षी आपण ‘विवेक शॉर्टफिल्म स्पर्धा’ घेतो. ‘तारांगण’ हा आपला शाळा-शाळांमध्ये होणारा कार्यक्रम थेट शालेय विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन पोचविणारा कार्यक्रम आहे. अंनिसचा कार्यकर्ता आणि कुटुंब एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. डॉ. दाभोलकर म्हणायचे की, कुटुंब चार्जिंग स्टेशन आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.

माधव बावगे म्हणाले, रुळलेली वाट कुणीही चालतं, आम्ही नवीन वाटा निर्माण केल्या. उक्ती आणि कृती एकच असते. भारतीय समाज हा उत्सवप्रिय आहे. जरूर उत्सव करा; पण पर्यावरणरक्षण करा, कमी खर्चात करा आणि अंधश्रद्धांविरोधात करा. आम्ही सर्वांनी डॉ. दाभोलकरांच्या प्रेरणेने संवेदनशील व विवेकपूर्ण असा संवाद साधण्याची शिस्त संघटनेत निर्माण केली. असा संवाद साधण्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते, हे आम्ही कार्यकर्त्यांत रुजवण्याचा प्रयत्न करत असतो.

परेश शहा यांनी आंदोलनातील विविधता सांगितली. अंनिसने जादूटोणाविरोधी कायद्यासाठी थोबाडीत मारा आंदोलन केले, स्वतःच्या रक्ताने दाभोलकर खून प्रकरणाचा तपास पुढे न्या म्हणून पत्रे लिहिली. बकरी ईदच्या दिवशी रक्तदानाचा कार्यक्रम सुरू केला. डॉक्टर म्हणायचे प्रबोधनाला कायद्याची चांगली जोड मिळाली पाहिजे. आम्ही जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा संमत झाल्यानंतर या दोन्ही कायद्याच्या स्वागत परिषदा घेतल्या. त्यानंतर 85 दिवसांची प्रबोधन यात्रा पार पाडली. आजपर्यंत 40 एक गुन्हे दाखल झाले आहेत. कर्नाटकमध्ये सुद्धा जादूटोणाविरोधी कायदा मंजूर झाला. आमच्याशी आता दक्षिण आफिकेतील काही देशांकडून या कायद्याच्या संदर्भात संपर्क होत आहे.

सत्र 4 थे

पुरस्कार वितरण कार्यक्रम

10 ऑगस्टला त्रिदशकपूर्ती समारंभात अनिष्ट परंपरा आणि अंधश्रद्धेविरोधात लढणार्‍या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. हा गौरव सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष आणि अंनिसच्या विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते झाला. यात बंजारा समाजातील अनिष्ट रुढींविरोधात काम करणार्‍या जीजा राठोड (जळगाव) यांना ‘भटके-विमुक्त समाज उत्थान कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. प्रवचन-कीर्तन या माध्यमांतून समाजप्रबोधन करणारे शामसुंदर सोन्नर (मुंबई) यांना ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर प्रबोधन पुरस्कार’ने गौरवलं गेलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा जीवनगौरव पुरस्कार यज्ञेश्वर निगळे (गोवा) आणि कॉम्रेड बाबा आरगडे (नेवासा) यांना दिला. नरहरी राऊत स्मृती पुरस्कार सुशीला आणि शिवाजीराव खादीवाले (उदगीर) यांना दिलाय. सुधाकर आठले युवा कार्यकर्ता पुरस्कार आरती नाईक (पनवेल) यांना दिला गेला. सुधाकर आठले ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार मधुकर धंदरे (नागपूर) यांना देऊन त्यांचा गौरव झाला. सावित्रीबाई फुले महिला कार्यकर्ता पुरस्कार निशाताई भोसले (सोलापूर) यांना दिला. शिवाजीराव शिंदे स्मृती शिक्षक कार्यकर्ता पुरस्कार विलास निंबोरकर (गडचिरोली) यांना देऊन गौरविण्यात आलं.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना प्रतापराव पवार म्हणाले, ‘अंनिसचे कार्यकर्ते कौतुकास पात्र आहेत. काम करताना कायद्याची मर्यादा पाळूनही चांगलं काम करता येतं, हे अंनिसने 30 वर्षे समाजाला, देशाला दाखवून दिलं. परिषदेला जमलेली कार्यकर्त्यांची संख्या बघून अंनिसचं काम पुढील अनेक शतकं सुरू राहील, असा मला विश्वास वाटतो.’

या प्रसंगी पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या सत्राचे सूत्रसंचालन संजय बनसोडे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय विजय परब आणि स्वागत भास्कर सदाकळे आणि आभार गणेश शेलार यांनी व्यक्त केले.

सत्र 5 वे

आझादी सांस्कृतिक कार्यक्रम

संध्याकाळी लोकनाद फौंडेशन, अहमदाबाद यांच्या तर्फे आझादी हा सर्वांग सुंदर कार्यक्रम सादर झाला. हा संमोहित करणारा कार्यक्रम विनय महाजन यांनी सादर केला. विनयजी आणि चारूलजी ग्रामीण लोकांमध्ये जाऊन त्यांच्या जीवन उन्नतीसाठी संशोधन करतात. शेतकरी, आदिवासी यांच्यात काम करीत असताना त्यांना जे अनुभव येतात त्यावर ते एकत्रित गाणी रचतात, लिहितात आणि गातात सुद्धा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी सांगितले की, आपल्या देशात दररोज 4 हजार मुले उपासमारीमुळे मरत आहेत आणि त्यावर आधारित त्यांनी गायलेल्या ‘वो 14 नोव्हेंबर थी’ या वास्तववादी गाण्याने वातावरण गंभीर झाले. हाताचा इतिहास सांगताना ‘रहूँं क्यू भुखे पेट रे, के मेरे लिये काम नहीं’ हे गाणे विनयजींनी प्रेक्षकांच्या साथीने गायले. सुरक्षेबाबत बोलताना ते म्हणाले की, हत्यारांमुळे सुरक्षा मिळते, ही अंधश्रद्धा आहे, सुरक्षा हत्यारांमुळे नाही तर आपापसातील संबंधांमुळे येते. आजच्या परिस्थितीत आपण धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने, भाषेच्या नावाने, कधी रंगाच्या नावाने भेदाभेद करतो त्यावर ‘आओ लकिरे मिटा दे’ हे आशावादी गीत पेश केले. शेवटी संविधानाच्या प्रस्तावनेवर आधारित सुंदर गीताने कार्यक्रमाची सांगता झाली आणि मंत्रमुग्ध झालेल्या प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात विनयजींना जोरदार दाद दिली.

हमने कहा, आजाद है अब, दिल की सुनेंगे यहाँ

राहें बनायें हम ही हमारी, मंजिल चुनेंगे यहाँ

कोई ना छोटा, कोई ना बडा, मिलके चलेंगे यहाँ

अधिकार सबका जीनेका हो, सर ना झुकेंगे यहाँ

हम लोग, We The People

अंनिसचा 30 वर्षांचा विवेकी धांडोळा

यानंतर सांस्कृतिक अभिव्यक्ती विभागातर्फे त्रिदशकपूर्ती निमित्ताने महाराष्ट्र अंनिसचा विवेकी धांडोळा हा नाट्याद्वारे महाराष्ट्र अंनिसचा 30 वर्षांचा प्रवास अतिशय स्तुत्य व अभिनव पद्धतीने मांडला गेला. या प्रयोगात काय नव्हते, नाट्य होते. नृत्य होते. ‘विज्ञानाची पहाट झाली विज्ञानाने माणूस चंद्रावर गेला देई संविधान’ सारखी अर्थपूर्ण गाणी होती, मात्र विजय नांगरे यांनी आर्त स्वरात गायिलेल्या खालील गाण्याने प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी आले.

गोळी बंदुकीची सुटली वेध घेती हाय रे

पडे रक्ताच्या थारोळ्यात माझ्या साथीचे प्रेत रे’

या धांडोळ्यात समितीच्या विविध टप्प्यांतील संघर्ष प्रभावीपणे दाखविण्यात आले, फलज्योतिष, वास्तुशास्त्र यावर मिष्कील भाष्य करणार्‍या नाटिका सादर झाल्या, तर सामाजिक बहिष्कार या विषयावरच्या भेदक नाट्याने प्रेक्षक हेलावले. विजय नांगरे आणि बापू नांगरे या बंधूंच्या दमदार व सुरेल आवाजामुळे हे नाट्य अजून बहरलं. महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष यांनी योगेश कुदळे, संजय बनसोडे, नितीन शिंदे या हरहुन्नरी कार्यकर्त्यांनी खडतर मेहनत करून हा धांडोळा सादर केल्याबद्दल कौतुक केले; तसेच आर.आय.टी. विवेकवाहिनीच्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व समितीतर्फे सर्व कलाकारांचे स्मृतिचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले. शेवटी ‘विवेकाचा आवाज बुलंद करूया’ या घोषणेने कार्यक्रमाची सांगता झाली.

तिसर्‍या दिवशीही इस्लामपूर, डोंबिवली शाखेने; तसेच वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेवर आधारित विविध विषयांवरची गाणी पेश करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. अशा तर्‍हेने बहुतेक सर्व कार्यकर्त्यांनी या सांस्कृतिक अंगाने बहुमोल सहकार्य करून हा त्रिदशकपूर्तीचा आनंद द्विगुणित केला आणि खर्‍या अर्थाने हा सांस्कृतिक जल्लोष दिमाखदारपणे साजरा झाला.

चला, सांस्कृतिक अंगानेही आपण

प्रकाशबीजे रुजवीत जाऊ

आणि नव्या वाटा रुळवीत जाऊ

आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो

वाटा नव्या युगाच्या रूळवीत चाललो

या सांस्कृतिक सत्राचे सूत्रसंचालन विनोद वायंगणकर, तर प्रास्ताविक योगेश कुदळे, स्वागत मुकुंद देसाई आणि आभार प्रियांका खेडेकर यांनी मांडले.