Categories
अधिवेशन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा भविष्यवेध

सप्टेंबर- २०१९

रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2019

सत्र 1 ले

राज्य अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संघटनेच्या गेल्या तीस वर्षांचा आढावा घेतला गेला. संघटनेची वैचारिक उपक्रमाच्या पातळीवरील विस्ताराच्या दृष्टीने झालेली वाटचाल मांडली गेली. पहिल्या दिवसाच्या या ऊहापोहाला पुढे घेऊन जाणारे दुसर्‍या दिवसाचे पहिले सत्र होते. पुढील सहा वर्षांचा, म्हणजे 2025 पर्यंतचा संघटनेचा भविष्यवेध मांडणारे हे सत्र विशेष होते. विशेष म्हणजे चळवळीचा भविष्यवेध मांडणारे सारे चळवळीचे भविष्य असणारे युवा होते. या सत्रात वक्ते म्हणून विनायक सावळे, कृष्णात स्वाती, आरती नाईक हे सहभागी झाले. सत्राचे अध्यक्ष म्हणून समितीचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप पाटकर होते.

सत्राचे प्रास्ताविक राज्य युवा कार्यवाह योगेश्वरी पाटील हिने केले. यानंतर उपस्थितांचा थोडक्यात परिचय व स्वागत विष्णू होनमोरे यांनी केले.

विद्यार्थी दशेपासून कार्यरत असलेले व सध्या संघटनेचे राज्य सरचिटणीस असलेले विनायक सावळे यांनी संघटना बांधणी, प्रशिक्षण, प्रकाशन, मानसमित्र इत्यादी विभागाविषयी मांडणी केली. ‘संघटना चालवताना संघटनेला तातडीचं काय हे बघावं लागतं आणि त्याचवेळी ध्येयाचा मार्ग बरोबर आहे की नाही, हेही पाहावं लागतं. ही शतकांची लढाई आहे, या शतकाच्या लढाईतील आपण मधली कडी आहोत, म्हणून संघटनाच अशी करायला हवी की ती काही शतके टिकेल,’ याकडे त्याने लक्ष वेधले. यासाठी त्याने तीन प्रकारची प्रशिक्षणे सांगितली, एक प्राथमिक, दुसरे जिल्हा पदाधिकारी होण्यासाठी, तर तिसरे राज्य पदाधिकार्‍यांसाठीचे. त्याचबरोबर प्रशिक्षणाचे फॉर्मही बदलायला हवेत. ऑनलाईन प्रशिक्षण, हवे ज्याला हवे तेव्हा प्रशिक्षण, प्रशिक्षणाची आधुनिक पद्धत, चांगली टीम ही प्रशिक्षण विभागाची पुढील वाटचाल त्यांनी मांडली.

‘संघटना प्रकाशनाचा विभाग स्वतंत्रपणे सक्षमपणे चालवू शकते. प्रकाशनासाठी उत्तम लेखक, उत्तम संपादन, उत्तम बांधणी, आकर्षक कव्हर, वितरण, मार्केट या गोष्टी आवश्यक आहेत. यातील वितरण व्यवस्था सोडून बाकी सर्व संघटनेकडे आहे. पुढील काळात हा विभाग अधिक सक्षमपणे काम करू शकतो. ‘मानसमैत्री’ विभागासाठी थ्री टायर सिस्टीम आवश्यक आहे. पहिलं म्हणजे टीम उभी करणं, दुसरं टीममार्फत प्रशिक्षण देणं आणि प्रशिक्षित लोकांनी समाजात जाऊन काम करणं. भावनिक प्रथमोपचार देण्याचं व मानसिक आजार ओळखण्याचं काम या टीमने करावं, यासाठी प्रयत्न असतील. केवळ विचारांनी संघटन चालत नाही. विचार आणि भावना एकत्र केल्या तरच संघटन चालते, आपण ते प्रयत्न करतो,’ असे त्यांनी विचार मांडले. ‘मतभेद असले तरी बोलत राहू या, हातात हात घेऊन पुढे जाऊ या,’ असे शेवटी आवाहन केले.

राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी युवा सहभाग विभाग, सोशल मीडिया विभाग, वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, विवेकवाहिनी, विज्ञानबोध वाहिनी या विभागांच्या संदर्भाने मांडणी केली.

‘एखादी संघटना किती प्रमाणात समकालीन प्रश्न हाताळते, त्यावर तिचे समकालीनत्व व भविष्य ठरतं,’ असे ते म्हणाले. प्रत्येक शाखेचं वय तरुण म्हणजे सरासरी 38 राहण्यासाठी प्रत्येक शाखेमध्ये 15 ते 20 महाविद्यालयीन कार्यकर्ते हवेत, त्यासाठी नवे मार्ग शोधले पाहिजेत. ‘विवेकवाहिनी’ ही तरुणांना आकर्षित करणारं वेगळं अंग आहे. प्रत्येक शाखेत एक तरी ‘विवेक वाहिनी’ असायला हवी. ‘विवेक वाहिनी’चेही वेगवेगळे पर्याय पाहायला हवेत, सातारा, पनवेल येथे वेगवेगळ्या कॉलेजेसची एकच शहर विवेकवाहिनी चालते. दहिसर येथे ‘मैत्री कट्टा’ सुरू झाला, त्यातून नवीन शाखा सुरू झाली. ‘मैत्री कट्टा’, ‘युवा कट्टा’ असे उपक्रमही युवांना जोडण्यासाठी करायला हवेत. जोडीदाराची विवेकी निवड, महिला विभाग, सांस्कृतिक असे वेगवेगळे उपक्रम घेऊन तरुणाईला सोबत घ्यायला हवं.

सोशल मीडिया विभागाचा प्रभावी वापर व्हायला हवा. ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, वेबसाईट, यू-ट्यूब ही माध्यमे काळजीपूर्वक वापरली तर संघटनेची वाढ-विकास व्हायला मदत होईल. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पांतर्गत ‘विवेक वाहिनी’ प्रमाणेच शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘शालेय विवेक वाहिनी’ सारखा उपक्रम राबवणं गरजेचं आहे. संघटनेतील किमान शंभर ते दीडशे शिक्षकांमार्फत अशी ‘शालेय विवेक वाहिनी’ चालवता येईल. शिक्षण विभागामार्फत दरवर्षी विज्ञान प्रदर्शने होतात. त्यामध्ये लोकसंख्या शिक्षण विभागात सामाजिक विषयांवर प्रकल्प मांडता येतात. याकडेही वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाचाच भाग म्हणून पाहायला हवं व त्यात सहभाग घ्यायला हवा. विज्ञानबोध वाहिनी उपक्रमांतर्गत अनेक उपक्रम चालतात. समितीचे एक विज्ञान केंद्र असायला हवे. त्यातून ‘हसत-खेळत विज्ञान’ मांडता येईल. हे एक प्रबोधन केंद्र व पर्यटन केंद्र म्हणून सुद्धा होऊ शकेल.

भविष्यातील उपक्रम मांडतानाच अखेरीस त्यांनी, ‘सामूहिक नेतृत्व’ ही संकल्पना आपण स्वीकारली आहे. सामूहिक नेतृत्व म्हणजे नेत्याने सांगितलं आणि आपण केलं असं नको, प्रत्येकाने नेत्याच्या भूमिकेतून काम केलं पाहिजे. संवाद, चिकित्सा, लोकशाही ही मूल्ये आपल्यामध्ये रुजवण्याची गरज आहे, असेही सांगितले.

आरती नाईक यांनी जातिअंत विभाग, महिला सहभाग, बुवाबाजी संघर्ष, कायदे विभाग, सांस्कृतिक विभाग या विभागाविषयी मांडणी केली.

पुढील काळात, नात्यातील कोंडी सोडवण्यासाठी प्रेमात पडतानाच्या संवादशाळा वाढवणे आवश्यक आहे. जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमाच्या माध्यमातून आपण ‘सहजीवन’, ‘नात्यातील सुरेल संवाद’, ‘समतेच्या वाटेवरून सहजीवनाचा प्रवास’, असे शब्द व विवाहाचा वेगळा दृष्टिकोन समाजात रुजवू पाहतोय. जातिव्यवस्थेच्या विरोधात पुढे येणार्‍या तरुणांचे संघटन उभारणे, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्याशी संवादाची वेगळी माध्यमे निवडणे आवश्यक आहे. आजची तरुणाई लग्नाविषयीचा वेगळा दृष्टिकोन समजून घेऊ पाहतेय, हे लक्षात घेऊन या विषयावरची वेबसाईट सुरू करणे गरजेचे आहे. यावर्षी पनवेलला अभिनव पद्धतीने परिचय मेळावा घेतला. भविष्यात अशा परिचय मेळाव्यांची संख्या वाढवणे आवश्यक आहे.

जातपंचायतीचा प्रश्न, डिसऑनर किलिंग, जोडीदाराची निवड अशा प्रश्नांमध्ये महिलांचेच शोषण अधिक होते. चळवळीतील महिला सहभाग वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्यापासून सुरुवात करायला हवी. स्त्रीचं दुय्यमत्व कमी करण्यासाठी लिंगसमभाव कार्यशाळांच्यावर भर द्यायला हवा. बुबाबाजीचा भांडाफोड ही आपली ओळख आहे. हे काम करत असतानाच छद्मविज्ञान, मिडब्रेन अ‍ॅक्टिव्हिशन, आरोग्याच्या क्षेत्रातील बुवाबाजी, विज्ञानाची भाषा वापरून होणारी बुवाबाजी समजून घेतली पाहिजे, त्याचं कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं. आतापर्यंत समितीने जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा हे दोन कायदे करून घेतले आहेत. त्याचा उपयोग कसा करता येईल, याचं प्रशिक्षण सर्वांना द्यायला हवं. तसेच हितचिंतक वकिलांची टीम बांधणं गरजेचं आहे. सांस्कृतिक अभिव्यक्ती हे चळवळीचं महत्त्वाचं अंग आहे. प्रत्येक शाखेतून सांस्कृतिक अभिव्यक्ती व्हायला हवी. ज्याला सांस्कृतिक अंग नाही, असा कार्यकर्ताही त्यात सहभागी होऊ शकतो. हे सर्व उपक्रम युवकांना आकर्षित करणारे आहेत.

या सत्राचा अध्यक्षीय समारोप महा. अंनिसचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर यांनी केला. चळवळीतील तरुणाईने बोलण्याची स्वतःची नवीन शैली विकसित केली आहे, याचे कौतुक केले. नव्या ‘ट्रोल’ संस्कृतीचं टेन्शन न घेता नव्या राजकीय परिस्थितीत नवी माध्यमे निवडीत काम करावे लागेल, ‘ऑनर किलिंग’चा विचार करताना सांस्कृतिक दहशत, जातीसंबंधीचे सर्व विषय नव्याने हाताळायला हवेत, विकासाच्या नावाने, श्रम व निसर्ग यांची होणारी लूट, यांचाही विचार करायला हवा.

सत्य हे बदलू शकते, असं विज्ञानाने सांगितलं आहे. सत्यच जिथे स्थिर नाही अशा विज्ञानाकडे जायचं कसं, हा सामान्यांचा प्रश्न आहे. उपभोग वृत्तीतून माणसं कधी संतुष्ट होतील? मनातील असुरक्षितता कधी संपेल की नाही? हे अंनिसच्या कामासमोरील प्रश्न आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान अविवेकी हातात असताना हे सगळे प्रश्न सुटतील का? हे समजून घ्यावं लागेल. ‘येणार्‍या नवीन जगात देव नसेल; पण नवीन सुपरमॅन तयार झालेला असेल आणि रॅशनॅलिस्ट अल्पसंख्याक झालेले असतील. जुन्या जाती निरर्थक ठरून नवीन जाती, वर्ग निर्माण होतील’ हा धोकाही त्यांनी मांडला. बुवाबाजी वेगळ्या रुपात असेल, मानवतावाद खंगत आहे. आपण प्रेरक दिग्दर्शकाच्या भूमिकेत असायला हवं, कृतिशील, संघर्षाचे कार्यक्रम घेऊन काम करायला हवं. शस्त्रापेक्षा शास्त्र आपल्याकडे आहे, त्याचा वापर करूया, असं ते म्हणाले. उद्दिष्टे व्यवहारी स्वरुपात वापरायला हवीत, मीडियाचा प्रभावी वापर करायला हवा, आरोग्यविषयक अंधश्रद्धा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यावर खूप काम करायला हवं. यासाठी त्यांनी काही प्रकल्प सुचवले जसे – निरामय प्रकल्प, पर्यावरण व आरोग्य रक्षणासाठी प्रकल्प, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, जीवनदृष्टी प्रकल्प, जाणता ग्राहक उपक्रम. व्यसनमुक्ती, नेटनेटके उपक्रम (नेटसंदर्भात) राबविणे गरजेचे आहे. असे काही उपक्रम, काही अपेक्षा, काही नवी उद्दिष्टे, नवे प्रश्न घेऊन भविष्याची वाट चालणं गरजेचं आहे, अशी डॉक्टरांनी मांडणी केली.

पनवेलची युवा कार्यकर्ती प्रियांका हिने खुमासदार शैलीत या सत्राचे आभार मानले. सर्व वक्त्यांचा भविष्यवेध एकेका वाक्यात मांडून तरुणाईला यातून भविष्यात चळवळ पुढे नेण्यासाठी नेमकेपणाने काय मिळाले, हे सांगून व युवा हा भाविष्यवेध पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, हे आश्वासन सर्व युवांच्या वतीने तिने दिले. या सत्राचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कार्यकर्त्या शालिनीताई ओक यांनी केले.

सत्र 2 रे

मानवतेच्या विकासासाठी विवेकवादाचे योगदान

वक्ते प्रा. राम पुनियानी

अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी दुपारच्या सत्रात प्रा. डॉ. राम पुनियानी यांचे ‘मानवतेच्या विकासासाठी विवेकवादाचे योगदान’ या विषयावर भाषण झाले. प्रा. डॉ. राम पुनियानी हे मुंबईतील आयआयटीमध्ये माजी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी होते; तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय-धार्मिक सलोखा यावर ते सातत्याने व्याख्याने देत असतात. धर्मनिरपेक्षता, समान नागरी संहिता, घटनेतील मूल्य, काश्मीर प्रश्न, हिंदू-मुस्लिम एकता या विषयांवर त्यांनी असंख्य लेख लिहिले आहेत. त्यांच्या या धर्मांधांच्या विरोधातील निभीर्र्ड मांडणीमुळे त्यांना सातत्याने धर्मांधांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात, तरीही अतिशय सुलभतेने हे सर्व विषय ते आपल्या लेखातून आणि व्याख्यानातून मांडत असतात.

डॉ. राम पुनियानी यांनी, डॉ. दाभोलकर यांनी या संघटनेची स्थापना करून जे कार्य उभे केले आहे, ते कौतुकास्पद आणि महत्त्वपूर्ण आहे, देशाच्या वैज्ञानिक विकासासाठी त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे, हे भाषणाला सुरुवात करताना नमूद करून ते म्हणाले, “अंनिसचे हे अधिवेशन ज्यावेळी या देशात अशा शक्ती सत्तेत आहेत, ज्या विकासाच्या मार्गाला समाप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशावेळी होत आहे, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.” विकासाच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना त्यांच्या दृष्टीने विकास म्हणजे एक यात्रा आहे, जी समानतेच्या दिशेने जात आहे, हे ठळकपणे स्पष्ट केले. समाजातील जाती-धर्मात, स्त्री-पुरुष, दलित-सवर्ण यांच्यात जी असमानता आहे, ती दूर करून समानतेच्या दिशेने विकास करण्यावर माझा विश्वास आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, समाजात जी असमानता आहे, तिचे मूळ भारतात असलेल्या ब्राह्मण्यवादामध्ये आहे. त्यामुळे ब्राह्मण्यवादाच्या विरोधात आपण बोलायला हवे. कारण ब्राह्मण्यवाद हा असमानतेच्या पायावर उभा आहे. भारतीय समाजात चार्वाक -लोकायत परंपरा, ज्यांनी वेद हे ब्रह्मवाक्य आहे, हे नाकारले. त्यामुळे लोकायत – चार्वाकला नास्तिक म्हणून संबोधण्यात आले. बुद्धाची क्रांती समतेच्या, समानतेच्या दिशेने होती. शंकराचार्य यांची प्रतिक्रांती मनुस्मृतीवर आधारलेली आहे. असमानतेच्या, सामंतशाहीच्या दिशेने आहे. विवेकवाद आणि वैज्ञानिकवादाचा मार्ग सोपा आणि सरळ नव्हता. त्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली, हे आपण समजून घेतले पाहिजे. या समाजात अन्याय, दु:ख, असमानता, विषमता, शोषण आहे, ते सत्य आहे आणि ते दूर करायचे असेल, तर आपल्याला या समस्या समजून घ्याव्या लागतील. जर एखादी समस्या दूर करायची असेल, तर समस्येच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आपल्याला त्या समस्या दूर करता येणार नाहीत, असे त्यांनी विचार मांडले.

विवेकवाद आणि लोकशाहीची मूल्ये कित्येक वेळा समांतर चालत असतात. त्यामुळे विवेकवादाची चळवळ ही लोकशाहीची चळवळ आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आरएसएसचे संघचालक के. सुदर्शन यांनी भारतीय संविधान विदेशी मूल्यांवर आधारित आहे, ते बदलले पाहिजे आणि त्या जागी भारतीय संस्कृतीवर आधारित घटना असायला हवी, असे म्हटले. याचाच अर्थ मनुस्मृती यायला हवी, जी मनुस्मृती असमानता, भेदभाव यावर आधारित आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता-समानतेच्या मूल्यांवर आधारित संविधान आणले, त्या संविधानासाठी आपण पुढे यायला हवे, असे स्पष्ट करून इतिहासात हिंदू- मुस्लिम लढाया झाल्या नाहीत, तर साम्राज्य वाढवण्याच्या दृष्टीने झालेल्या राजा-राजांमधील लढाया होत्या, हा इतिहास आपण समजून घेतले पाहिजे. सध्या सत्तेत असणार्‍या लोकांकडून; ज्यात पंतप्रधान आणि मंत्री आहेत, त्यांच्याकडून जो अवैज्ञानिक इतिहास मांडला जातोय. त्याचाही त्यांनी समाचार घेतला.

विवेकवादी विचार केल्यामुळे सामाजिक बदलाची प्रक्रिया पुढे जाते, ही भूमिका दाभोलकर, पानसरे सातत्याने मांडत असत आणि त्यामुळेच त्यांची हत्या झाली. पण व्यक्ती मारून विचार मरत नाहीत, हे त्यांनी ठामपणे नमूद केले.

आपल्या भाषणाच्या अखेरीस त्यांनी द्वेषाचे राजकारण जे सध्या सुरू आहे, त्याविरोधात आपण उभे ठाकून मानवतेच्या दिशेने राजकारण करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले व पुन्हा एकदा अंनिसचे अभिनंदन करताना अंनिस ही अशी एक संघटना आहे, जी धर्मांध राजकारणाला मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण करू शकते आणि एक विवेकवादी, विचार करणारा समाज निर्माण करू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त करून अंनिसला पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देत आपल्या भाषणाचा समारोप केला.

या सत्राचे सूत्रसंचालन सुनीता देवलवार, तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत नितीन सेठ, शुभदा निखार्गे, सारिका देहनकर, कल्पना बोंबे यांनी केले. या सत्राचा अध्यक्षीय समारोप डॉ. सुरेश खुरसाळे यांनी केला. आभार प्रदर्शन तुषार शिंदे यांनी केले.

लडाख येथील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगच्युक यांची त्रिदशकपूर्ती निमित्त अंनिसला सदिच्छा देणारी चित्रफीत दाखविण्यात आली.

सत्र 3 रे

समारोप

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या दोनदिवसीय राज्य अधिवेशनाच्या समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, महात्मा गांधी फौंडेशनचे प्रमुख आणि महात्मा गांधीचे पणतू मा. तुषार गांधी होते, तर प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, दै. ‘सकाळ’चे माजी संपादक आणि ‘मअंनिस’चे उपाध्यक्ष मा. उत्तम कांबळे हे होते. ‘मअंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषविले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तुषार गांधी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आज आपण एका मोठ्या आव्हानाला सामोरे जात आहोत. मंत्रिमहोदय, खासदार, आमदार ही जनसामान्यांच्या बळावर निवडून आलेली व्यक्तिमत्त्वे वैज्ञानिक द़ृष्टिकोनाशी विसंगत अशी विधाने नित्यनेमाने करत आहेत. तसेच सदर वक्तव्यांचा प्रचार करणारी प्रसारमाध्यमे आणि जाणीवपूर्वक अंधत्व स्वीकारलेल्या भक्तांविरुध्द लढणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. अंधश्रध्दाळू प्रजासत्ताकामध्ये आपण राहत आहोत काय? असा प्रश्न मनाला पडावा, असं आजचं वास्तव आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांचा खून करून विचार संपवण्याचा प्रयत्न प्रखरपणे पुढे रेटला जात आहे. अशा या अविचारी राजकीय अंधश्रध्देविरुध्द लढण्यासाठी ‘मअंनिस’ सारख्या चळवळींची समाजाला नितांत गरज आहे. मुख्य म्हणजे समिती स्वत:च्या पूर्ण क्षमतेने ती गरज पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. इथून पुढील काळात ‘मअंनिस’ने वैचारीक स्वरुपाच्या राजकारणात प्रमुखाच्या भूमिकेतून सक्रिय होण्याची आवश्यकता आहे.

गांधी हत्येबद्दलची चुकीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न होत असून यामागे लोकांची विचार करण्याची दिशाच बदलण्याचा हेतू स्पष्ट होतो. आज शब्दांचा वापरही अंधश्रद्धा पसरविण्यासाठी केला जात आहे. यासाठी अंनिसने राजनैतिक अंधश्रध्देविरुध्द उभे राहण्याची गरज आहे. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल हेतुपूरस्सर द्वेषमूलक विचार प्रसारित करून त्यांना बदनाम केले जात आहे. सरदार वल्लभभाई पटेलांवर अन्याय झाल्याचे भासवून समाजाची दिशाभ्ाूल करण्यात संघपरिवाराची यंत्रणा गुंतलेली आहे. सरदार वल्लभभाई पटेल खरेच जर पंंतप्रधान झाले असते, तर संघपरिवारच त्यांनी नेस्तनाबूत केला असता, हे पटेलांच्या विचारसरणीवरून लक्षात येते; परंतु पंडित नेहरूंचे ‘जगा व जगू द्या’ हे उदारमतवादी धोरण संघ विचारसरणीला फायद्याचे ठरत गेले आहे.

प्रमुख वक्ते उत्तम कांबळे यांनी चौकार आणि षटकारांची बरसात करत अंधश्रध्दा निर्मूलनविरोधी विचार पसरवणार्‍या संस्था आणि संघटनांचा आपल्या मिष्कील शैलीत यथोचित समाचार घेतला. वैचारिक पातळीवर अंनिसचा प्रतिवाद करू न शकणार्‍या संघटना विचारवंतांच्या खुनानंतर महिलांच्या माध्यमातून विषारी प्रचार करत असल्याचे त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. गांधीजीच्या पुतळ्यावर मारलेली गोळी असेल, शबरीमाला मंदिर प्रवेशाला महिलांनीच केलेला विरोध असेल अथवा एखाद्या खासदार साध्वीने दिलेला तथाकथित शाप असेल, अशी वैचारिक तत्त्वांना तिलांजली देणारी कृत्ये घडवून आणण्यात संघीय विचारसरणीचे एक मोठे षड्यंत्र असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. गेल्या तीस वर्षांचा सामाजिक चळवळींचा आढावा घेतला तर प्रत्येक दशकातील परिस्थिती भिन्न स्वरुपाची असल्याचे दिसून येते. असे असले तरीही आपल्या तत्त्वांना कोणत्याही स्वरुपाची बाधा येऊ न देता समितीने आणि कायर्र्कर्त्यांनी कालसुसंगत बदल करत, अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ गतिमान केली. अंनिसमध्ये येणारा कार्यकर्ता सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्वत:च्याच विचारांशी लढून आल्यामुळे समिती कालसुसंगत बदल करण्यात आणि ते वृद्धिंगत करण्यात यशस्वी ठरलेली आहे. अनेक चळवळी आल्या आणि गेल्या, नेत्यांच्या जाण्याने तर त्या संपल्याच; परंतु अंनिस ही एकमेव जनचळवळ आहे की, जी तीस वर्षे टिकली, वाढली; किंबहुना नेत्याच्या जाण्यानंतर ती अधिक जोमाने कार्यरत झाली. प्रवाहाच्या विरोधी लढणार्‍या चळवळीच्या बाबतीत खरं तर हे कल्पनेच्या पलिकडचे आहे. कार्यकर्त्याला आर्थिकद़ृष्ट्या काहीच न देणारी ही फकिरांची चळवळ आज जनचळवळ झालेली आहे. या चळवळीने सुरुवातीला ज्या विषयाला हात घातला, तो विषय कालांतराने जनसामान्यांनी स्वीकारला. निर्माल्य व गणेशमूर्ती दान, सत्यशोधकी विवाह, फटाके विरोधी अभियान, जादूटोणाविरोधी, जातपंचायतीला मूठमाती असे अनेक उपक्रम याची साक्ष देतात. संघटनेचे वय तीस ते चाळीसच्या दरम्यान राहण्यासाठी विचार करणारी तरुण पिढी या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. प्रामाणिकपणे काम करणार्‍यालाच काम सांगण्याची परंपरा असल्यामुळे अंनिसने निर्धाराने वाटचाल करण्याची गरज आहे. अंनिसची भ्ाूमिका समाजामध्ये जागल्याची आहे. आपला नेता गेला, तरी प्रत्येक कार्यकर्ता सरदार बनून लढत आहे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. सामान्य माणसाला प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करून समितीने, त्याला मी बनवले आहे. खोचक असे नर्मविनोदी बोचकारे काढत चळवळीला विरोध करणार्‍यांची त्यांनी हवाच काढली. पूर्वी दूरून पाहणारा; पण वैयक्तिकरित्या क्रियाशील असणारा कार्यकर्ता आज आपणामधील होताना कर्तव्याची जाणीव होत आहे. त्यामुळे ‘तुम्ही करा’ असं न म्हणता ‘आपण करूया’ अशा भ्ाूमिकेतून आपल्याबरोबर असल्याची त्यांनी ग्वाही दिली.

‘मअंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ‘मअंनिस’च्या तीस वर्षांच्या वाटचालीचे मूल्यमापन करण्यासाठी त्रिदशकपूर्ती अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरच्या साठ वर्षांच्या वाटचालीमध्ये ‘मअंनिस’ने तीस वर्षांत केलेल्या समाजोपयोगी कामाचा वाटासुध्दा बहुमोल आहे, हे विसरून चालणार नाही. अंनिसचा राजकीय विचार ‘मानवतेसाठी विवेकवाद’ हाच आहे. राजकीयद़ृष्ट्या अत्यंत तुटपुंजे अस्तित्व असलेल्या संघटनेने स्वबळावर आणि जनसामान्यांच्या सहभागाने डॉक्टरांच्या खुनानंतर दोन कायदे संमत करून घेतले, ही समितीची नैतिकता आणि कार्यकर्त्यांची निष्ठा अधोरेखित करते. येणार्‍या काळात कार्यकर्त्यांसाठी निधी व साधनसामग्री कोष निर्माण करण्याचे मोठे काम समितीच्यावतीने हाती घेण्यात येणार आहे. ‘अंधश्रध्दा निर्मूलन’ एवढ्या मर्यादित स्वरुपात सुरू झालेला समितीचा प्रवास कालांतराने वैज्ञानिक द़ृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करत धर्मचिकित्सेपर्यंंतच्या व्यापक परिघापर्यंत कधी गेला, हे कार्यकर्त्यांना समजले देखील नाही. समितीच्या चतु:सुत्रीनुसार समविचारी संघटनांना व्यापक परिवर्तनाच्या दिशेने जोडून घेण्यापर्यंतचा पल्ला गेल्या तीस वर्षांत आम्ही गाठू शकलो, हे चळवळीचे फार मोठे यश आहे. त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा विचार पोचवणे आणि विश्वाला जोडून घेणे हा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्वप्नातील उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. देश-विदेशातील समाजपरिवर्तनासाठी कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांच्या सहभागाने ही परिषद देखील कमालीची यशस्वी ठरलेली आहे, यात तिळमात्रही शंका नाही. समर्पित भावनेने कार्य करणारे कार्यकर्ते आणि त्यांना पाठबळ देणारे हितचिंतक हे समितीचे प्रमुख ऊर्जास्रोत असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

डॉ. दाभोलकरांना गमावल्याची खंत व्यक्त करत समितीने अनेक अडचणींवर मात करत डॉक्टरांचे काम अविरतपणे सुरू ठेवलेले आहे.हे काम अंनत कालापर्यंत सुरूच राहील, याची ग्वाही प्रास्ताविकामध्ये प्रधान सचिव नितीन राऊत यांनी दिली. तीन दिवसांच्या कार्याचा इतिवृत्तांत सादर करत कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाचा त्यांनी शब्दसुमनांनी यथोचित सन्मान केला. महेंद्र नाईक यांनी अत्यंत मोजक्याच; परंतु चपखल शब्दात पाहुण्यांची ओळख करून दिली, तर नंदकिशोर तळाशीलकर यांनी ज्ञात-अज्ञात अशा सहभागी; तसेच मदत करणारे कार्यकर्ते आणि हितिंचतकांचे आभार मानले. प्रधान सचिव विनायक सावळे यांचे लाघवी आणि नेटके सूत्रसंचालन कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी मदतगार ठरले. शाहीर एस. एस. शिंदे यांच्या पर्यावरणविषयक गीताने सुरू झालेल्या समारोप कार्यक्रमाची सांगता प्राचार्य सविता शेटे आणि सहकार्‍यांनी सादर केलेल्या ‘हम होंगे कामयाब’ या गीताने झाली. वैचारिकद़ृष्ट्या संपन्न आणि सांस्कृतिकद़ृष्ट्या रंगतदार ठरलेल्या या दिमाखदार त्रिदशकपूर्ती अधिवेशनाची स्मृती कार्यकर्त्यार्ंना पुन्हा एकदा उभारी देऊन गेली, हे निर्विवाद सत्य आहे.

(आंतरराष्ट्रीय परिषद व त्रिदशकपूर्ती अधिवेशनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचे वृत्तांत डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार, प्रमोद दुर्गा, बी. आर. जाधव, महेंद्र नाईक, अनिल करवीर, राहुल माने, निशिकांत विचारे, विजय खरात, देविदास इंगळे, कुलदीप नांदुरकर यांनी लिहिले असून त्याचे संकलन व संपादन राजीव देशपांडे, राहुल थोरात आणि अनिल चव्हाण यांनी केले आहे.)

(सर्व छायाचित्रे – ज्ञानेश्वर गिराम आणि सिराजभाई)