Categories
शाखा वार्ता शिबिर

अंबरनाथ येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न

जुलै - २०१७

महाराष्ट्र अंनिस, अंबरनाथ शाखेतर्फे दिनांक 28 मे 2017 रोजी आयोजन महात्मा गांधी विद्यालय, अंबरनाथ कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे येथे करण्यात आले. सकाळी 9.30 च्या सुमारास शाहीर शिंदे यांच्या चळवळ गीतांनी व अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मच्छिंद्र मुंडे यांनी (बुवा) इच्छेनुसार जळणारा कापूस श्री. वाघ यांना जाळायला लावला. आधी तो कापूस काही जळेना. मग मुंडे (बुवा) यांनी इच्छा व्यक्त करताच तो कापूस व्यवस्थित जळू लागला व त्याचबरोबर शिबिराचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले.

पहिले सत्र श्रीप्रसाद खुळे, कार्याध्यक्ष डोंबिवली शाखा यांनी ‘अंनिसची चतुःसूत्री व वैचारिक भूमिका’ यावर सादर केले. मधल्या वेळेत ‘अंनिस’चे एक एकनिष्ठ व जुने साथी श्री आगाशे यांनी ‘नेत्रदान’ या विषयावर महत्त्वपूर्ण माहिती उपस्थितांना दिली. दुसरे सत्र उत्तम जोगदंड, सचिव, कल्याण शाखा यांनी ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’ या विषयावर घेतले. अंनिसला अभिप्रेत असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे व्यवस्थित विश्लेषण त्यांनी केले. तिसरे सत्र जगदीश संदानशीव यांनी ‘फलज्योतिष शास्त्र का नाही?’ या विषयावर घेतले. विनोदी शैली व उपस्थितांच्या मनाला भिडणार्‍या भाषेत त्यांनी आपले तडाखेबंद व्याख्यान सादर केले.

सुरेखा भापकर, कार्याध्यक्षा, ठाणे जिल्हा यांनी ‘अंनिसचे विविध उपक्रम’ या विषयावर घेतले. अमोल चौगुले, विनोद जगताप, स्वप्नील शिरसाठ यांनी काही प्रयोग सादर केले. त्यानंतर राजू कोळी यांनी अंधश्रद्धेच्या चिरफळ्या उडवतांना उपस्थितांना हसविले. ‘अंनिस’च्या ध्येयधोरणांच्या पूर्तीसाठी झपाटून काम करणे याचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे व म्हणूनच ते सर्वांगाने यशस्वी झाले आहे.

उत्तम जोगदंड सचिव, कल्याण शाखा