Categories
प्रतिसाद

समतावादी वारीने धारकर्‍यांना नाकारले…पण पुरोगाम्यांना स्वीकारले…!

जुलै - २०१७

गेल्या महिन्यात वारी आणि वारीत सहभागी कुणी व्हायचं यावर गदारोळ होईल अशा काही घटना घडल्या…! शिवप्रतिष्ठान या संघटनेचे लोक हातात तलवारी घेऊन वारीत घुसले आणि वारकर्‍यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला म्हणून मोठा गदारोळ एकीकडे घडला; तर दुसरीकडे ’एक तरी वारी अनुभवावी’ असे आवाहन करून दिनांक 23 जून रोजी जेजुरी ते वाल्हे यादरम्यान ‘अंनिस’सह अनेक पुरोगामी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी वारीमध्ये सहभाग नोंदवला…!

पण अर्थातच…या दोन्ही घटनांवरून सोशल मीडियात चर्चेला उत आला…!

वारीत कधीच यापूर्वी अशा धारकर्‍यांची गरज भासलेली नाही, कोण कुणाला प्रमाणपत्र देईल तो भाग फार महत्त्वाचा नाही. कोणत्याही जातीबद्दलही ही तक्रार नाही, आताच अशा धारकर्‍यांची गरज का वाटावी? बहुसंख्य खरे वारकर्‍यांनी कधीही तलवारी आणून वारी केलेली नाही. आपण वारीचा इतिहास अवश्य पाहा. त्यामुळे आजच्या काळात कारण नसताना कोणत्याही व्यक्तीने अशी शस्त्रे बाळगून वेगळेपण दाखवण्याची गरज वाटत नाही, असे मला वाटते. समतेसाठी तलवारी नकोत.

अर्पिता माने

विविध पुरोगामी संघटनांनी संत, समाजसुधारकांचा वसा आणि वारसा सोबत घेऊन विवेकी मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद करण्यासाठी जेजुरी ते वाल्हेपर्यंत वारीमध्ये सहभाग नोंदवला…यावेळी डॉ. हमीद दाभोलकर सरांनी दिंडी मधल्या एका बेवारसपणे फिरणार्‍या मनोरुग्णास स्वतःकडे असलेला शिल्लक शर्ट देऊन समुपदेशन करत त्याच्या नातेवाईकांपर्यंत पोचवले.

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपूले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेचि जाणावा

या तुकारामांच्या अभंगाचा

पुरेपूर प्रत्यय आला…

निशांत शिंदे

संतविचारांचा वारसा हा पुरोगामी विचारांचाच वारसा आहे हे मनोमन जाणून सामान्य वारकर्‍यांच्या भूमिकेतून वारीत सामील होत आहोत. हे नाते एक दिवसाच्या वारीपुरते न राहता आपापल्या गावातील वारकर्‍यासोबत संवादी नाते जोडण्याची प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे. मुळ संतविचार जो निरर्थक कर्मकांडांच्या आणि जन्माधिष्ठित उच्च – नीचतेच्या विरोधातील विद्रोही हुंकार आहे, तो त्याच मूळ रुपात समाजापर्यंत पोचविण्याचे काम आपण सतत आणि नम्र भावनेने करत राहिले पाहिजे.

– सतीश शेवाळे

मुक्ता दाभोलकर म्हणतात की, नरेंद्र दाभोलकरांचे विचार तुकारामांपासून आलेले आहेत. म्हणजे नरेंद्र दाभोलकर निरीश्वरवादी नव्हते का?

आता नाव बदलून विठ्ठल श्रद्धा समिती नाव करा…!

नितीन जोशी

यंदाच्या वारीमध्ये निर्मल वारीच्या निमित्तानं संघही सहभागी झाला होता आणि वारीत कर्मकांड नाही असं सांगत अंनिसही सहभागी झाली होती…

संघ आणि अंनिस या एकमेकांना अस्पृश्य मानणार्‍या संघटनांनाही एकाच वेळी आपल्यात सामील करून घेऊ शकणं, ही वारीची आणि नामदेव महाराजांनी सुरू केलेल्या

’सोशल इंजिनिअरिंगची’ खरीखुरी ताकद!!

श्याम देशपांडे

भिडे गुरुजी, काय चाललंय हे? अडथळा देणं शोभतं? वारीमध्ये तलवारी नाचवणे ही कुठली संस्कृती? आमची वारी अध्यात्मिक आहे. तिला गालबोट लागेल असे करू नका, खूप वर्षांचा इतिहास आहे वारीला…!

अभिषेक गोंगाने

अं.नि.स.ने सुरुवातीपासूनच स्वीकारलेला हा संत-समाजसुधारकांच्या परंपरेचा सम्यक विद्रोही वारसा समाजातील प्रत्येक घटकाला समजला तर प्रबोधनाचे काम आणखी सोपे होऊन जाईल..!

‘अंनिस’तर्फे चालणारे कार्य महत्त्वाचे आहे ……कार्याला पूर्ण पाठिंबा आणि विचारांना समर्थन ..

सुशांत मोराळे

वारीत भक्तिभावाने, उत्सुकतेने, अभ्यास म्हणून कुणीही जावे; पण पुरोगामी म्हणून सामील होणे म्हणजे काय, ते मला कळलेले नाही. वारीने भारतीय प्रबोधनाची दिशा चुकवली, असे माझे मत आहे. साने गुरुजी हे खरेच आस्तिक होते. समाजमनाच्या या कोपर्‍याशीही त्यांचे नाते होते. आपले आहे का? आज अचानक आपण लोकांशी जुळवून घेण्यासाठी वारीत सामील झालो तरी लोकांचा त्यावर कसा विश्वास बसावा? बरं, आपण एकच वर्ष हा उपक्रम करणार, दुसर्‍या वर्षी आपल्याला जनांशी नाते जोडण्याचा दुसरा मार्ग दिसणार! सातत्याअभावी लोकांत हसेच होणार व सातत्य ठेवले तर वारीच्या गर्दीत थोडी भर पडणार! यातून साधणार काय?

रवी ठाकूर

वारीला संरक्षण द्यायला सरकार खंबीर आहे, नंग्या तलवारी घेऊन प्रदर्शन करणे हे चुकीचे नाही वाटत?

तन्मय कांबळे

गाडगेबाबांनी आयुष्यभर वारी केली; पण एकदाही विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाहि, पण चंद्रभागेच्या तिरावर वारकर्यांची सेवा करून चंद्रभाग तीर स्वच्छ करत राहिले.

आता सांगा…वारीला जाऊन गाडगेबाबा विठ्ठलाचे दर्शन घेत नाही म्हणजे काय ते वारकरी नाहीत का ?

तरी सुध्दा गाडगेबाबा संतपदाला गेले, कसे काय?

धनंजय भोसले

स्वतःच्या तत्त्वाला तिलांजली देणारी अंनिस वारीमध्ये सहभागी होणार ! संत सुधारणावादी म्हणजे पुरोगामी होते, असे सांगून समाजाची दिशाभूल करणार्‍या अंनिसच्या या नाटकांना भुलू नका ! ईश्वराला न मानणार्‍या अंनिसवाल्यांना अखेर दिखाऊपणासाठी का होईना, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणे भाग पडले ! नास्तिक अंनिसच्या विचारधारेचा हा घोर पराभवच ! संतांनी अंधश्रद्धेला विरोध केला म्हणून सांगणारे पुरोगामी संतांनी अनन्य भक्तिभावाने साधना केली, हे जाणीवपूर्वक लक्षात घेत नाहीत, हे लक्षात घ्या !

सुधाकर वाडेकर

पुरोगामी, विवेकवादी व अंनिसवाले लोक जेव्हा वारीत भाग घेतात, तेव्हा माझ्या मनाला यातना होतात… कारण… अध्यात्मिक मार्गाने कोणाताच प्रश्न सुटत नाही; उलट बिकट होतात. विवेकवादी म्हणवून घेणारे लोक तिथे जाऊन जागृतीचा कार्यक्रम करतात यावर माझा विश्वास नाही… आस्तिकतेच्या झिंगामध्ये त्यांचं म्हणणं कोठे लुप्त होत असेल, याची खात्री नाही… असो…

सुनील पाटील

सहिष्णुतांच्या वारीत तलवारी घेऊन नंगा दंगा करणारे हे ’अतिरेकी’ आहेत. त्यांचा किडा सरकारनं ठेचलाच पाहिजे… नाहीतर काळ सोकावणार आहे ….!!!!!

ऋषभ कोरे

शिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना किंवा आदरणीय भिडे गुरुजींना वारीमध्ये येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. शिवाजीनगर पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालून हे गुन्हे वापस घ्यायला पाहिजेत व भिडे गुरुजींचा अपमान केल्याबद्दल पोलिसांनी त्यांची माफी मागायला हवी…

प्रकाश काटकर

वारी ही मनाच्या शांततेसाठी, सदाचारी जीवन बनवण्यासाठी, या वारीत धारकरी कसे? तलवारी घेऊन चालणार्‍या संघटना वारीत नसाव्यात, माणसे सुखी व्हावीत यासाठी वारी आहे…

वैशाली टेके

शिवाजी महाराजांनी वारीला धारकर्‍यांचे संरक्षण दिले होते. ती परंपरा प्रतीकात्मक मानून महादजी शिंदेंनी चालू ठेवली होती.तीच पुढे संभाजी भिडे गुरुजींनी चालू ठेवली. ती फक्त प्रतीकात्मक आहे आणि मागील 5-6 वर्षांपासून चालू आहे. तेव्हा कुणी काही नाही बोलले; मग आताच काय झालं…?

प्रतीक मेटे

तलवारीचा धाक कोणाला दाखवताय तुम्ही? वारकर्‍यांना !

म्यानबंद करा त्या तलवारी उपसल्यात माझ्या वारकर्‍यावर

तुकोबारायाची शिकवण आम्ही विसरलो नाय, नाठाळाच्या माथी हाणू काठी…!

अनिल पोखरकर

’जादूटोणीविरोधी कायदा’ करायच्या वेळेस काही सनातनी लोकांनी वारकर्‍यांचे नाव वापरून कायद्याविरुद्ध खोडसाळ प्रचार केला होता…

तो अत्यंत गैर होता… हेही गेल्या चार वर्षांत सिद्ध झाले आहे… अंनिसची देव-धर्मविषयक भूमिका ही भारतीय संविधानाला सुसंगत अशीच आहे…

अनिकेत माळी

या सर्व कॉमेंट्सच्या पार्श्वभूमीवर विचार करणं आवश्यक आहे…!

जात-धर्म, स्त्री-पुरुष या भेदांच्या पलिकडे जाऊन संतांनी कर्मकांड नाकरून समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख आणि मानवकेंद्री केला…

एकंदरीतच संतांच्या तत्त्वज्ञानाची मांडणी ही जातिअंताच्या दिशेने जाणारी आहे…विठ्ठल हा असा एकमेव देव, ज्याच्या हाती शस्त्र नाही… हिंसेपेक्षा मानवतेची… करुणेची… आपुलकीची शिकवण देणार्‍या या परंपरेत नंग्या तलवारी घेऊन घुसखोरी करणे निश्चितच आक्षेपार्ह आहे…भेदाभेद असो भ्रम अमंगळ असा पुकारा करणार्‍या वारीने हातात तलवारी घेऊन धार्मिक विद्वेषाचे किडे प्रसवू पाहणार्‍यांची उसन’वारी’ वेळीच थांबवून त्यांना योग्य जागा दाखवली…हे बरेच केले…!

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत चोखोबा, संत रोहिदास, संत सेनामहाराज, संत गोरोबा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज…या आणि अशा सर्व संतमांदियाळींनी

आपल्या अभंगातून आणि कीर्तनातील शिकवणुकीतून वेळोवेळी निरर्थक कर्मकांडावर कठोर प्रहार केले आहेत…

‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’, असे म्हणत कर्म हीच भक्ती ही साधी-सोपी; पण अतिशय महत्त्वाची शिकवण संतांनी रुजविली…कर्मकांडात आणि अंधश्रद्धेच्या अंधरातच सामान्य लोकांना ठेवू इच्छिणार्‍या प्रस्थापित सनातनी व्यवस्थेविरुद्ध याच संतपरंपरेने बंड पुकारून सामान्य जनतेला तिमिरातून तेजाकडे नेण्याचा प्रयत्न केला…! वारकरी संप्रदाय हा संतांनी प्रस्थापित सनातनी व्यवस्थेशी केलेला विद्रोह आहे… अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम महाराष्ट्रात प्रथम सुरू करणारे दाभोलकर नाहीत, तर ते काम संतांनीच सुरू केले आहे…कधीच उपवास न केलेले आणि कर्मकांड नाकारणारे गाडगे महाराज हे वारीमध्ये सहभागी होऊन लोकांचे प्रबोधन करीत असत…! संतांचे हेच काम पुढे नेण्याचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे..!

मात्र… एका बाजूला कठोर बुद्धिप्रामाण्यवादी वा निरीश्वरवादी, तर दुसर्‍या बाजूला लोकांच्या श्रद्धेच्या गैरफायदा घेऊन राजकारण करणारी मंडळी…अशा दोन्ही मंडळींनी पुरोगाम्यांच्या या वारीवर टीका केलेेली दिसतेय..!

‘या रे या रे लहान थोर… भलती याती नारी-नर…’ असं म्हणत देव आणि भक्त यांतील मध्यस्थ नाकारून जात-धर्मच नव्हे, तर लिंगभेदाच्या पलिकडे समाजाला नेऊ पाहणारी ही परंपरा आहे…!

संतपंरपरेची नाळ इथल्या सगळ्या आधुनिक समाज परिवर्तनाच्या चळवळीशी जोडली गेली आहे…ती अधिक दृढ करणं… आज काळाची गरज आहे… आजवरच्या पुरोगामी चळवळीची परिभाषा ही पाश्चात्य राज्यक्रांतींच्या भाषेच्या पठडीतील राहिली…पण हीच मानवी मूल्ये याच मातीत होती आणि आहेत; पण चळवळींनी तिला दुर्लक्षित केले…हे नक्कीच नाकारता येणार नाही…! समाजवाद्यांचे…पुरोगाम्यांचे गुरुजी असलेल्या ज्या साने गुरुजींनी 10 दिवस उपोषण करून पंढरीचा पांडुरंग दर्शनासाठी सर्वांना खुला केला…त्यांच्या लढ्याविषयीही फारशी आस्था गेल्या 70 वर्षांत दाखवली गेली नाही…या घटनेच्या पार्श्वभूमीवर अलिकडे काही उपक्रम राबवले गेले आणि आताही राबवण्याचा प्रयत्न होतोय.

वारीमध्ये सार्वजनिक अस्वच्छता होते, प्रशासनावर ताण पडतो, वारीमुळे कुठे जातिभेद कमी झाले…? हे आणि असे प्रश्न निश्चितपणे विचार करण्यासारखे आहेत…किंबहुना म्हणूनच तर आपल्याला आपल्याच उज्ज्वल संचिताविषयीची उदासीनता झटकून स्वच्छतेचा, जातिनिर्मूलनाचा, अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार भक्कम करण्यासाठीचे आणि वारीला समता संगराचे रूप पुन्हा एकदा लाभण्यासाठीचे प्रयत्न व्हायला हवेत…

विनायक होगाडे

लेखक संपर्क ः 9011560460