Categories
अभिवादन

मेहरून्निसा दलवाई यांना अभिवादन

जुलै - २०१७

प्रख्यात मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरून्निसा दलवाई यांचे दु:खद निधन झाले. महाराष्ट्र अंनिसचे त्यांना भावपूर्ण अभिवादन! त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘मी भरून पावले’ या आत्मवृत्ताचा परिचय आम्ही वाचकांना करून देत आहोत.

‘मी भरून पावले आहे’ लेखिका मेहरून्निसा दलवाई! मेहरून्निसा म्हणजे हमीद दलवाईंच्या पत्नी! हमीद यांनी 1970 साली ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना केली. 1975 साली ते किडनीच्या विकाराने आजारी पडले आणि 1977 साली निधन पावले. पाच-सहा वर्षांच्या अवधीमध्ये त्यांनी मंडळाच्या कार्याचा भक्कम पाया घातला. त्यांच्या अकाली निधनाने धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी चळवळीची अपरिमित हानी झाली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीने त्यांच्या कार्याची धुरा खांद्यावर घेतली. मुल्ला-मौलवी आणि कट्टरपंथीय मुस्लिमांचा रोष पत्करून मंडळाचे कार्य सुरू ठेवले. त्याचा इतिहास म्हणजे ‘मी भरून पावले’ हे आत्मचरित्र आहे.

मेहरून्निसा काही साहित्यिक नव्हेत, लेखिका किंवा टीचरही नाहीत. त्यांचे शिक्षण उर्दूतून झाले, त्यामुळे मराठीचे ज्ञान नाही. पण अशा अनंत अडचणींवर मात करून हे आत्मचरित्र साकार झाले.

मुस्लिम महिलेचे हे मराठीतील पहिले आत्मचरित्र असावे, हे आत्मचरित्र त्यांनी लिहिलेले नाही. त्यांनी आपले निवेदन टेप केले. ते आहे तसे लिहून काढण्यात आले. भाषाशैली तशीच ठेवून सरिता पदकी यांनी त्याचे संपादन केले. त्यामुळे याला ‘बोल पुस्तक’ म्हणावे लागेल.

आत्मचरित्राची विभागणी आठ प्रकरणांत केली आहे. पहिल्या प्रकरणात त्यांचे बालपण आणि नोकरीपर्यंतचा प्रवास, दुसर्‍यामध्ये हमीद दलवाईंची भेट आणि विवाह, तिसर्‍यामध्ये दलवाईंची पती म्हणून ओळख, चार ते सहामध्ये किडनी फेल या आजाराशी झुंज, तर सात आणि आठमध्ये हमीद यांच्या मृत्यूनंतर मेहरुन्निसांनी उचललेली जबाबदारी यांचे वर्णन आहे.

लेखिकेची मातृभाषा उर्दू! पतीच्या आग्रहाखातर आणि महाराष्ट्रात राहत असल्याने वयाच्या तिशीला त्यांनी मराठी भाषा आपली मानली आणि बोलायला शिकल्या. त्यामुळे हे एक भाषेचे वेगळेच रसायन आहे. लेखिकेचा जन्म पुण्याचा 1930 सालचा! त्यांचा सांभाळ आजीने केला. आई-वडील मुंबईला राहात. त्याकाळी त्यांची आत्या बी. ए. बी. टी. होऊन उर्दू ट्रेनिंग कॉलेजची प्रिन्सिपॉल बनली होती, तर काका-काकू दोघेही बी.ए. बी.टी. टी. डी. (लंडन) शिक्षण घेतलेले. त्यांचा आंतरधर्मीय विवाह होता. त्यांच्या मुलाचे लग्न मुस्लिम पद्धतीने मुसलमान मुलीशी, तर दोन मुलींची लग्ने हिंदू मुलांशी झाली. म्हणजे एकूणच मेहरून्निसांचे कुटुंब पुरोगामी विचारांचे होते. घरी धर्माचा पगडा नव्हता. जबरदस्ती नमाज पठणाचा प्रश्न नव्हता, वातावरण मोकळे होते.

इंटरफेल झाल्यानंतर त्यांना खादी कमिशनमध्ये नोकरी मिळाली. त्या मुंबईला आईवडिलांकडे राहू लागल्या. इथे त्यांना भेटायला हमीद दलवाई आले. त्यांच्या मित्राने हे सारे सुचविले. त्यांनी स्पष्ट शब्दांत मागणी घातली. “मला नोकरी नाहीए, तुम्हाला सांगतो की, राहायला जागाही नाहीए. अडचण आहे. घरात भावंडं खूप आहेत आणि गरीब आहोत आम्ही. तुमच्याबद्दल ऐकलं आणि मला वाटलं की, ही मुलगी आपल्याला लग्नाला योग्य आहे. माझ्या मनात लग्न करायचे आहे, तुमच्या मनात काय आहे?”

अशी ओळख तर झाली. अनेक भेटीतून एकमेकांची ओळख वाढली. त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला; पण त्यापूर्वीच हमीदनी बजावले – ‘मला आज काही नोकरी नाही, उद्या लागेल; पण एक काम करायचं, आज जे घर आहे, संसार जो आहे, तो तुझा. तो कसा चालवायचा ते तू ठरवायचं, मी त्याच्यात दखलसुद्धा देणार नाही. मला समाजकार्य करायचंय, लिहायचंय.’

पुढचा अकरा वर्षांचा संसार वरील तत्त्वानुसारच झाला. आईवडिलांचा विरोध असतानाही मेहरून्निसा विवाहबद्ध झाल्या. अत्यंत दरिद्री परिस्थितीत असलेल्या सासरला त्यांनी आपले मानले, आपलेसे केले, मदत केली.

हमीदच्या आजाराचा काळ त्यांची कसोटी घेणारा होता. एखाद्याच्या इच्छेविरुद्ध त्याला संसारातून कोणीतरी ओढून दूर नेतंय, असे प्रसंग. जीवन आणि मृत्यूचा लपंडाव. या काळात त्यांनी नोकरी, संसार, आजारपण धीटपणे सांभाळले. हमीदनी जोडलेले मित्र-सहकारी मदतीला धावले. ए. बी. शहा, नगरकर, शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञता लेखिकेने व्यक्त केली आहे. त्या म्हणतात, ‘शहासाहेबांनी खूप प्रेम केलं. इतकं प्रेम एखाद्या माणसाला असू शकतं, याची मला कल्पनाच नाही. ते त्यांना आपल्या मुलासारखे समजत.’

रामटेकला पवारसाहेब होते. तिथे गेस्ट हाऊसमध्ये त्यांना राहायची सोय करण्यात आली होती. शरद पवार सकाळ-संध्याकाळ चौकशी करायचे. बायकोला म्हणायचे, “काकींचा चेहरा काही आज बरोबर दिसला नाही, काहीतरी त्रास असेल, जाऊन विचार.”

महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना शरद पवारांनी मनापासून मदत केली आहे. त्याचे प्रत्यंतर लेखिकेने नोंदवले आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांशीही हमीद दलवाईंचे अत्यंत प्रेमाचे संबंध होते.

दलवाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे दहन करण्यात आले. लोकसंघर्षही मोठा आहे. दलवाई दांपत्याने आपले विचार प्रत्यक्ष आचरणात आणले. मुस्लिमांनी त्या-त्या प्रांतांची भाषा शिकावी, असे कॉन्फरन्समध्ये ठरवण्यापूर्वी हमीदनी मेहरुन्निसांना मराठी शिकायला लावले. ते म्हणत – ‘आपल्या रोजच्या जीवनामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये धर्माला फार महत्त्व असते, ते हळूहळू कमी करायचं, धर्माचा प्रभाव आपल्या सार्वजनिक जीवनातून हळूहळू कमी करायचा.’

‘हे आम्ही का करतो? मुसलमानांचे शत्रू आहोत म्हणून करतो काय? मी मुसलमान आहे, मला अभिमान आहे का, हा समाज माझा आहे, मला त्याची चिंता वाटते. समाजाला मदत करावी म्हणून मी काम करते.’

‘आम्हाला वाटतं, धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. जे अन्यायकारक आहे, ते टाकून देण्याची तयारी पाहिजे. आम्ही भारतात राहतो. इथे इतर धर्मांचे लोक राहतात. त्यांना जे कायदे-कानून आहेत, ते आम्हालाही असले पाहिजेत. कायद्याचं संरक्षण आम्हालाही मिळायला पाहिजे.’

‘भारतात राहणार्‍या प्रत्येक धर्माच्या लोकांनी जर आपापला धर्म डोक्यावर घेतला, तर देशाचं काय होईल? म्हणूनच प्रत्येकानं आपला धर्म, आपल्या घरात आणि मस्जिद-मंदिरात ठेवला पाहिजे आणि माणुसकीला एकच धर्म मानला पाहिजे.’

आपल्या मंडळाच्या मर्यादाही लेखिकेला ठाऊक आहेत. त्या म्हणतात, ‘आम्ही जे काम करतो ना, ते लोकांचे विचार बदलण्याचे कार्य करतो. आमची मुस्लिम सत्यशोधक संघटना ही विचारावर चालणारी आहे. मेजॉरिटीवर नाही. त्यामुळे आमच्या मागे संख्या नसणारच!’

शेवटी त्या खंत व्यक्त करतात – ‘दलवाई गेल्यानंतर त्यांच्या सहकार्‍यांनी जितकं जमेल तेवढं मंडळाला पुढं नेण्याचा प्रयत्न केला आहे; पण आम्ही दुसरा हमीद उभा करू शकलो नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आम्ही शेवटपर्यंत कार्य करू याची खात्री देतो.’

दलवाई दांपत्याची तुलना महात्मा फुले व सावित्रीबाई या दांपत्याशी करणे योग्य ठरेल.