Categories
प्रासंगिक

…अखेर सत्य जिंकले!

जून - २०१८

‘लढाई दृढ विश्वासामुळेच जिंकली जाते; पैशाने नाही,’ आसारामला जेलची हवा खायला लावणार्‍या वकिलाने खटल्याचा निकाल ऐकल्यावर काढलेले हे उद्गार आहेत. त्या वकिलाचे नाव आहे, पी. सी. सोलंकी. त्यांनी व्यक्त केलेले हे मनोगत…

त्या दिवशी 15 मिनिटांत न्यायमूर्तींनी आपला निकाल वाचून दाखवला. ती 15 मिनिटे माझ्या आयुष्यातील सर्वात तणावपूर्ण होती. एक-एक क्षण एखाद्या पहाडासारखा माझ्या अंगावर येत होता. त्या पीडित मुलीचा आणि तिच्या वडिलांचा चिंताग्रस्त चेहरा माझ्या डोळ्यांसमोर फिरत होता. न्यायमूर्ती जेव्हा निकाल देऊन उठले, तेव्हा लोक माझ्याभोवती माझे अभिनंदन करण्यासाठी गोळा झाले होते. माझा गळा दाटून आला होता. तोंडातून आवाज फुटत नव्हता. मी व्यवसायाने वकील आहे. कोर्टात खटले लढविणे वगैरे माझे कामच आहे. पण जीवनात अशा किती संधी येतात, जेव्हा आपल्याला वाटते आपल्या जगण्यालाही काही अर्थ आहे. त्या क्षणाला मात्र मला वाटले, आपल्या जगण्यालाही काही अर्थ आहे. माझे जीवन सार्थकी लागले.

माझा जन्म राजस्थानच्या एका सर्वसामान्य कुटुंबात झाला होता. वडील रेल्वेत मेकॅनिक. घरात तीन बहिणी होत्या आणि आर्थिक तंगी तर कायमची. आम्ही जातीने शिंपी, मीसुद्धा लहानपणी शिलाई केली होती. आई एका दिवसात 30-40 शर्ट शिवायची. वडील सर्वसाधारण तर आई अशिक्षित; पण दोघांचीही एकच जिद्द होती, मुलांना शिकवायचे, केवळ मुलाला नव्हे तर तिन्ही मुलींनाही. माझ्या तिन्ही बहिणी शिकल्या, तीस वर्षांपूर्वी पदव्युत्तर शिक्षण घेतले व नोकरी केली. माझी एक बहीण नर्स आहे तर एक शिक्षिका. मी वकिली व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या गुरुजींनी सांगितले, ‘वकिली फारच जबाबदारीचा व्यवसाय आहे आणि समाजात त्या व्यवसायाची प्रतिमाही चांगली नाही. पण आपली प्रतिमा आपणच बनवितो आणि आपणच आपला मार्ग निवडतो. नेहमी असेच काम कर की, सर्वांसमोर मान ताठ करून चालता आले पाहिजे. कोणाचीही भीती वाटता कामा नये.’

आसारामच्या विरोधात या पीडित मुलीच्या बाजूने खटला लढविण्याचा निर्णय मी जेव्हा घेतला, तेव्हा खूप धमक्या यायला लागल्या, पैशाची लालूच दाखवली गेली. मी खटल्यातून माघार घ्यावी म्हणून हरप्रकारे प्रयत्न केले गेले; पण प्रत्येक वेळेस मला त्या पीडित मुलीचे वडील पहिल्यांदा कोर्टात भेटावयास आले होते त्यावेळची आठवण येई. सोबत ती मुलगीही होती. अतिशय शांत, सौम्य, बुद्धिमान. डोळे गंभीर आणि चेहर्‍यावर वेदना पसरलेली. वडील शांत होते; पण त्यांच्या चेहर्‍यावरही लढाई लढायचीच हा निश्चय स्पष्टपणे दिसत होता. ती पीडित मुलगी आणि तिचे कुटुंब संपूर्ण खटलाभर एक क्षणभरही आपल्या निर्णयापासून विचलित झाले नाहीत आणि त्यामुळेच मी लढाई लढू शकलो. मुलीने अतिशय धीरोदात्तपणे कोर्टात साक्ष दिली. 94 पानांचे तिचे निवेदन आहे. खूप कठीण होते, अनंत अडचणी होत्या; पण ती पर्वतासारखी ठाम राहिली. मुलीच्या आईची साक्ष 19 दिवस चालली. ती माऊली 19 दिवस कोर्टासमोर निग्रहाने उभी राहिली. तिचे निवेदन 80 पानांचे आहे. साक्ष देताना वडील अनावर झाले, रडले; पण बोलत राहिले. त्यांची साक्ष 56 पानांत नोंदविली गेली. एक अगदी सर्वसामान्य कुटुंब इतक्या ताकदवान माणसाविरोधात इतक्या ठामपणे उभे राहिले; मग मी मागे कसा राहीन? 2014 मध्ये ज्या दिवशी वकीलपत्रावर सही केली, त्या दिवसापासून हा खटलाच माझे आयुष्य झाले.

साडेचार वर्षे खटला चालला. या काळात मी रोज कोर्टात गेलो. 8 वेळा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 1000 पेक्षा जास्त वेळा खालच्या कोर्टात सुनावणी झाली. पीडित कुटुंब जितके सर्वसामान्य होते, तितकाच मी सर्वसामान्य होतो. एका बाजूला देशातील राजधानीत बसलेले एकापेक्षा एक जबरदस्त वकील, तर दुसर्‍या बाजूला माझ्यासारखा फाटका वकील. आसारामला जामीन मिळवून देण्यासाठी सर्वांत आधी आले, राम जेठमलानी; पण जामीन अर्ज रद्द झाला. मग आले केटीएस तुलसी; पण आसरामला काहीच दिलासा मिळाला नाही. त्यानंतर आले सुब्रमण्यम स्वामी. त्यांनी न्यायालयात 40 मिनिटे वाट बघितली; पण निकाल आमच्या बाजूने लागला. मग आले राजू रामचंद्रन; पण जामीन अर्ज पुन्हा रद्द झाला. सिद्धार्थ लुथ्राने आरोपीच्या वतीने बाजू मांडली. माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी, सलमान खुर्शीद, सोली सोराबजी, विकास सिंह, एस. के. जैन अशा देशातील अनेक नामवंत वकिलांनी आसारामच्या बाजूने बरीच खटपट केली; पण प्रत्येक वेळी निकाल आमच्या बाजूने लागला. तीन वेळा सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज नाकारला गेला, जवळजवळ सहा वेळा आरोपींनी जामिनासाठी प्रयत्न केले; पण ते अयशस्वी ठरले.

लोक विचारतात, ‘तुम्हाला भीती नाही वाटली?’ मी त्यांना सांगतो, माझी 80 वर्षांची आई आणि 85 वर्षांचे वडील सुद्धा घाबरले नाहीत. जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने असता तेव्हा तुमचे मन, शरीर एका रहस्यमय उर्जेने भारून जाते, सत्यात प्रचंड ताकद आहे. त्यांच्याजवळ धनदौलत होती, शासन त्यांच्या बाजूने होते; पण मी माझ्या आत्मबलावर उभा होतो. माझे सारे कुटुंब माझ्या पाठीशी उभे होते. माझी आई शिकली सवरलेली नाही; पण तिला एवढे समजत होते, या माणसाने वाईट काम केले आहे, त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मला सत्याच्या बाजूने लढताना बघून माझ्या 85 वर्षांच्या बापाच्या म्हातार्‍या डोळ्यात अभिमान तरळत होता. पत्नीला आनंदच होत होता. कारण मी एका मुलीच्या हक्कासाठी लढत होतो.

(पी.सी.सोलंकी आसारामच्या खटल्यात पीडित मुलीचे वकील होते. त्यांच्याशी मनजित कौर बल यांनी मूळ हिंदीतून केलेल्या बातचितीवर आधारित राजीव देशपांडे यांनी अनुवादित केलेला लेख)