सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्कार होण्याच्या काळात शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आता तरी बहुतेक बुवा–बाबा शालेय विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना आवरणे हेही काम आहेच. पाठ्यपुस्तके बदलण्याच्या निमित्ताने याचा विचार शिक्षक, पालक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केलाच पाहिजे.
समाजाच्या विकासात शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे. आजपर्यंतच्या ज्ञानाचे संचित पुढच्या पिढीला पोचवण्याचे काम शिक्षण करत असते. समाजातले सर्व गोष्टींचे व्यवस्थापन शासन करते; औपचारिक शिक्षण हा त्यातलाच एक भाग आहे.
सत्ताधारी वर्ग शासनाच्या माध्यमातून स्वत:चे हितसंबंध सांभाळत असतोच, या हितसंबंधांचा परिणाम औपचारिक शिक्षणावरही होत असतो. सत्ताधारी वर्गाचा दृष्टिकोन राबवण्यासाठी इतिहास आणि भाषा यांचा वापर सर्वाधिक होतो.
लोकमत तयार करण्याचा महत्त्वाचा मार्ग म्हणूनही शिक्षणव्यवस्थेकडे पाहिले जाते. अलिकडच्या काळात स्वच्छता, पर्यावरण, प्रदूषण, लोकसंख्या, एड्स अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मागोमाग पालकांचे प्रबोधन करण्याचे कामही शिक्षणव्यवस्थेने केले आहे.
या वर्षी दहावीच्या अभ्यासक्रमाबरोबर आठवी आणि पहिलीचाही अभ्यासक्रम बदलला आहे. त्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके जुने शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वीच बाजारात आली आहेत. देशात भाजप/संघाचे राज्य आहे. खालपासून वरपर्यंत त्यांनी प्रमुख पदावर संघनिष्ठांना बसविले आहे. ते त्यांचा अजेंडा राबवत आहेत. त्याचा प्रभाव काही राज्यातल्या पाठ्यपुस्तकांवर पडल्याची उदाहरणे प्रसिद्ध झाली आहेत. दहावीच्या पाठ्यपुस्तकावरही अशी टीका सुरू आहे; पण ती टीका बाजूला ठेवत या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्याच्या अनुषंगाने हा लेख लिहिला आहे. त्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक आणि तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.
घटनेचे प्रतिबिंब पाठ्यक्रमात दिसावे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांत दिसावे, अशी अपेक्षा असते. पाठ्यक्रम ते उद्दिष्ट ठेवून केला जातो; पण घटनेतील मूलभूत तत्त्वे, वैज्ञानिक दृष्टिकोन, समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, समाजवाद इत्यादी रुजवण्यात शिक्षणव्यवस्था कमी पडल्याचे लक्षात आले, तेव्हा मूल्यशिक्षण आले. समतोल आहार मिळत नसेल, तर व्हिटॅमिनच्या गोळ्या वेगळ्या खायला देतात, तसे मूल्यशिक्षण पाठ्यक्रमाबाहेरून दिले गेले. पाठ्यपुस्तक हे एक साधन असते. त्यातील पाठ्यक्रम कितीही पुरोगामी असला, तरी तो राबवणारे शिक्षकही पुरोगामी हवेत. माणसांचा स्वभाव ‘जुने ते सोने’ समजणारा असतो. त्यात त्यांना सुरक्षितता वाटते. शिक्षकही याला अपवाद नाहीत.
नोकरदार शिक्षकांना या चर्चेत सहभागी होण्यावर मर्यादा आहेत. शासकीय धोरणावर टीका केली, तर नोटीस मिळेल, अशी भीती त्यांना वाटते. अशावेळी इतरांनी ते कार्य करणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तकांच्या गुण-दोेषांची चर्चा तटस्थ वृत्तीने केली पाहिजे. पाठ्यपुस्तकाला पूरक असे साहित्य विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपलब्ध करून दिले पाहिजे.
प्रत्येक पाठ्यपुस्तकात सुरुवातीला भारतीय संविधानाची उद्देशिका, राष्ट्रगीत, प्रतिज्ञा यानंतर प्रस्तावना आणि शिक्षकांसाठी थोडक्यात माहिती दिली आहे. पाठ्यपुस्तकात उद्देशिका, राष्ट्रगीत आणि प्रतिज्ञा दिली आहे. याचा अर्थ प्रत्येक विषयाचे अध्यापन करण्यापूर्वी या तीन बाबींची माहिती विद्यार्थ्याला दिली पाहिजे. इतर विषय शिक्षकांनी हे समजावले असेल, असे समजून आपली जबाबदारी टाळतात. मात्र तसे होऊ नये. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, स्वातंत्र्य, समानता, बंधुता इत्यादी शब्दांचा अर्थ मनात रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांना दिली आहे. ती सुसंधी समजली पाहिजे. संविधानाबद्दल प्रेम असणार्या कार्यकर्त्यांनी याबद्दल आग्रह धरला पाहिजे. परीक्षेत यावर प्रश्न नसल्याने या महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत शिक्षक/पालक कोणीच गंभीर असत नाही. त्यापुढे प्रस्तावनेमध्ये पाठ्यपुस्तकाची थोडक्यात ओळख आणि ‘शिक्षकांसाठी’ शीर्षकाखाली शिक्षकांना मार्गदर्शन आणि अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
मराठी–कुमारभारती
प्रस्तावनेमध्ये मराठी कुमारभारती पाठ्यपुस्तकाचे उद्दिष्ट ‘भाषा विकासाबरोबरच विचारक्षमता, अभिव्यक्ती कौशल्ये आणि सृजनशीलता यांच्या विकासासाठी उपयुक्त’ असे नोंदवण्यात आले आहे. ‘शिक्षकांसाठी’ शीर्षकाखाली शिक्षकांनी – स्वत:च्या सृजनशीलतेने, कल्पकतेने विविध भाषिक कृतींची रचना करावी, विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रेरित करावे. विद्यार्थ्यांची निरीक्षणक्षमता, विचारक्षमता व कृतिशीलता यांना संधी द्यावी,’ अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पुढे श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन आणि अध्ययन कौशल्य विकसित व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना अपेक्षित क्षमता नोंदवल्या आहेत. पद्याला चाली लावता याव्यात, विरामचिन्हे समजावीत, शुद्धलेखन, वाक्प्रचार, म्हणी कळाव्यात- शब्दकोश पाहता यावा इत्यादी क्षमतांबरोबर – सामाजिक समस्यांबाबत चिकित्सक विचार करून विचार मांडावेत आणि विविध प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित होणार्या चर्चा, संवाद ऐकून त्यामधील सत्यता पडताळून पाहून त्याबाबत स्वत:चे मत निश्चित करण्याची क्षमता यावी, अशीही अपेक्षा आहे.
या क्षमता विकसित करण्याचे खास प्रयत्न केले, तर निदान पुढची पिढी तरी ‘चुनावी जुमला’ आणि वस्तुस्थिती यामध्ये फरक करू शकेल. शिक्षकांना यासाठी स्वत:ची सृजनशीलता वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘चिकित्सकवृत्ती’ हे उद्दिष्ट ठेवले, तरी पाठ्यक्रम त्याला योग्य असावा लागतो. सध्याच्या पाठ्यक्रमाचा वापर कसा केल्यास चिकित्सक वृत्ती वाढेल, या दृष्टीने या पाठ्यक्रमात कोणती भर घालावी इत्यादींची चर्चा व्हायला हवी.
इतिहास व राज्यशास्त्र
या पाठ्यपुस्तकात ‘उपयोजित इतिहास’ दिला असून इतिहासाच्या ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्यवाढीसाठी उपयोग होतो, ही बाब प्रस्तावनेत नोंदवली आहे. राज्यशास्त्राच्या भागात लवकरच मतदार होणार्या विद्यार्थ्यांसाठी निवडणूक प्रक्रिया, भारतीय संविधानाची वाटचाल, राजकीय पक्षांच्या भूमिका, चळवळी यांची माहिती आहे.
‘शिक्षकांसाठी’ या मथळ्याखाली “इतिहास केवळ राजे- रजवाड्यांचा, थोर योद्ध्यांच्या पराक्रमाचा यांची नोंद करून इतिहासाची अभ्यास पद्धती, इतिहासलेखन याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, व्यवसाय वृद्धीसाठी याचा उपयोग व्हावा; नवे शिकण्याची ऊर्मी निर्माण व्हावी,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
आपल्या देशाला सर्वांत मोठा धोका जातवादी-जमातवादी-धर्मवादी राजकारणापासून आहे. या राजकारण्यांचे महत्त्वाचे शस्त्र म्हणजे अर्धसत्य इतिहासाचे ज्ञान. जनतेच्या अर्धवट ज्ञानाचा वापर करून द्वेषभावना वाढवणे, दंगली घडवणे, फूट पाडणे, जनतेच्या मुख्य प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवणे या गोष्टी सत्ताधारी करत असतात. इतिहासाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन विकसित करता आला, तर याला आळा बसेल. त्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात खूपच संधी आहेत.
पहिल्या प्रकरणात इतिहास लेखनाची परंपरा, इतिहास संशोधन पद्धती सांगून झाल्यावर आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये नमूद करण्यात आली आहेत. 1) ही पद्धत शास्त्रशुद्ध असून तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. 2) हे प्रश्न मानवकेंद्रित असतात म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा-कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. 3) या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते. 4) मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे, मानवजातींच्या वाटचालींचा वेध इतिहासात घेतला जातो.
ही पद्धत व्यवस्थित समजली, तर पुराणातल्या भाकडकथांना सत्य समजण्याची चूक विद्यार्थी करणार नाहीत. पुराणातली प्लॅस्टिक सर्जरी, अग्निबाण, इंटरनेट आणि विमानेही व्यवस्थित जमिनीवर उतरतील. पुढे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखनाची चर्चा करताना युरोपातील रेने देकार्त, व्हॉल्टेअर, हेगेल, रांके, मार्क्स, फुको आणि भारतातील अलेक्झांडर कनिंगहॅम, जेम्स मिल, जॉन मार्शल, विल्यम जोन्स, मॅक्स मुल्लर, वि. का. राजवाडे, वि. दा. सावरकर, दामोदर कोसंबी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ताराबाई शिंदे यांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. तो ठळकपणे व सविस्तर परिचय व्हावा म्हणून साहित्य उपलब्ध केले पाहिजे. हीच परिस्थिती पुढील प्रकरणांची आहे. राज्यशास्त्रामध्ये संविधानाची वाटचाल, मताधिकार, लोकशाही विकेंद्रीकरण, माहितीचा अधिकार, राखीव जागा, अल्पसंख्याक व महिलासंबंधी कायदे, संविधानाची मूलभूत चौकट, निवडणूक प्रक्रिया, देशातले प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय चळवळी – त्यामध्ये आदिवासी, स्त्री, कामगार, शेतकरी, पर्यावरण, ग्राहक इत्यादी भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने, यांची चर्चा आहे.
संविधान बचाव आणि इतर सामाजिक चळवळींना शिक्षकांना मदत करण्याची संधी या विषयामध्ये आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान
या विषयाची भाग 1 व 2 अशी दोन पाठ्यपुस्तके आहेत. विज्ञानाच्या माहितीबरोबरच शोध, संशोधक यांचीही माहिती विद्यार्थ्यांना यातून मिळणार आहे. ‘निरीक्षण चर्चा,’ ‘करून पाहा’, ‘डोके चालवा’, ‘शोध घ्या’, ‘विचार करा’ अशा कृतींनी विचार प्रक्रियेला चालना देण्याचे आवाहन प्रस्तावनेत केले आहे.
निरीक्षण, तर्क, अनुमान, तुलना करणे, प्राप्त माहितीचे उपयोजन करणे यासाठी प्रयोगकौशल्य आवश्यक आहे. म्हणून प्रयोगकौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न करण्याचे शिक्षकांना आवाहन केले आहे. विषयाच्या पाठ्यक्रमामध्ये, मानवी उत्क्रांतीपासून प्राण्यांचे वर्गीकरण, पेशीविज्ञान, पुनरुत्पादन असे जीवशास्त्रातले, तर न्यूटनच्या गतीविषयक नियमांपासून उष्णता, विद्युतप्रकाश, भिंगे, अवकाश मोहिमा आणि मूलद्रव्यांच्या वर्गीकरणापासून रासायनिक अभिक्रिया, धातूविज्ञान, कार्बनी संयुगे असे भौतिक, रसायनशास्त्रातील ज्ञान आहे.
भूगोल
नैसर्गिक घटनांचे स्पष्टीकरण भूगोलातून मिळते; निरीक्षण, आकलन, विश्लेषण, चिकित्सक विचार ही कौशल्ये भूगोलात महत्त्वाची असल्याचे प्रस्तावनेत नमूद केले आहे.
शिक्षकांसाठी महत्त्वाची सूचना दिली आहे – सदर पाठ्यपुस्तकातील पाठ वर्गात वाचून शिकवू नयेत आणि मूल्यमापनासाठी कृतिप्रवण, मुक्तोत्तरी, बहुपर्यायी, विचारप्रवर्तक प्रश्नांचा वापर करावा. पाठांतरावर आधारित प्रश्न विचारू नयेत.
आदर्श क्षेत्रभेट
पहिला पाठ ‘क्षेत्रभेट’ आहे. उदाहरणादाखल उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्गपासून रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे क्षेत्रभेटीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांचे वर्णन चर्चा स्वरुपात दिले आहे.
मुलांनी भूरचना, जलाशय, वनस्पती, मृदा, शेती, मानवी वस्त्या-वसाहती, दुर्ग, विद्युतनिर्मिती, घरे इत्यादींची माहिती घेतली आहे. सरसकट धार्मिक स्थळांच्या यात्रा दरवर्षी घडवणार्या आणि सहलीतून गुलाल, कुंकू, लॉकेट आणि फोटो आणणार्या शिक्षकांच्यासाठी हा वेगळा अनुभव आहे. पुढे भारत व ब्राझील यांचा प्राकृतिक रचना, हवामान, वनस्पती, प्राणी, लोकसंख्या, मानवी वस्ती, अर्थव्यवस्था, व्यवसाय, पर्यटन, वाहतूक, संदेशवहन इत्यादीबाबत तुलनात्मक अभ्यास आहे.
गणित भाग 1 व 2
गणिताच्या अध्ययनातून व्यावहारिक गणिती ज्ञान मिळावे, आणि त्याचबरोबर ‘गणिती दृष्टिकोन’ निर्माण व्हावा, अशी अपेक्षा असते. गणिती दृष्टिकोन निर्माण झालेला विद्यार्थी, आकडेवारीमागील मतितार्थ समजेल, आपले विचार कमीत कमी व नेमक्या शब्दांत मांडेल, पुराव्याशिवाय केलेल्या भोंगळ विधानापासून दूर राहील, काटेकोर नियोजन करेल अशी वृत्ती होय.
दहावीसाठी गणिताची दोन पुस्तके व दोन पेपर आहेत. भाग 1 मध्ये बीजगणित-आलेख, अर्थनियोजन व सांख्यिकी ही मुख्य क्षेत्रे असून अर्थनियोजनात जी.एस.टी. या नव्या करप्रणालीची ओळख करून दिली आहे, तर भाग दोन मध्ये भूमिती, त्रिकोणमिती, निर्देशक भूमिती व महत्त्वमापन ही मुख्य क्षेत्रे आहेत.
‘शिक्षकांसाठी’ सूचना देताना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन प्रात्यक्षिकांसह करावे आणि विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करण्यास उत्तेजन द्यावे, याची नोंद करण्यात आली आहे.
थोडक्यात म्हणजे प्रत्येक विषयामध्ये संविधानातील तत्त्वे रुजवण्यावर भर दिला आहे. शिक्षकांनी आपल्या कृतीतून समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, समाजवाद, लोकशाही याबद्दल आदर कसा निर्माण होईल, हे पाहावे. या प्रत्येक तत्त्वाची सखोल माहिती घ्यावी. बर्याचदा या तत्त्वांचा नेमका अर्थ ठाऊक नसतो. उदाहरणार्थ, वैज्ञानिक दृष्टिकोन. काहीजण विज्ञानाचा वापर-उपयोजन किंवा विज्ञानाची आवड-रुची यांची दृष्टिकोनाशी गल्लत करतात. माहिती आवडीने वाचणे किंवा वैज्ञानिक उपकरणांचा वापर करणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे. विज्ञान शिकलो; पण वैज्ञानिक दृष्टिकोन आला नाही, अशी प्रचिती आपल्याला नेहमी येते. त्यावर मात कशी करायची, ही खरी समस्या शिक्षकांपुढे आहे. यावर उपाय सुचवले गेले पाहिजेत. वैज्ञानिक दृष्टिकोनाची स्पष्टीकरणे पुढीलप्रमाणे आहेत. 1) अपुर्या माहितीवरून निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. 2) भोळसर समजुतीवर विश्वास ठेवू नये. 3) पूर्वग्रहदूषित दृष्टी न ठेवता नवीन कल्पनांचा विचार करावा. 4) प्रयोगाने सिद्ध झालेल्या गोष्टींवरच विश्वास ठेवावा. 5) प्रयोगाने सिद्ध झाल्यास आपली मते बदलण्याची तयारी ठेवावी. 6) पुरेसा आधार नसेल, तर ग्रंथातील थोरांचे, वडीलधार्यांचे, पुढार्यांचे, बहुमताचे स्वीकारू नयेत, ते तपासावेत. 7) कार्यकारणभावाचा संबंध शोधून घटनेचा अभ्यास करावा. 8) आपली मते वारंवार पडताळून पाहावीत. 9) समोरच्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. 10) खरे ते माझे म्हणावे, माझेच खरे हा आग्रह सोडावा.
विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये पाठ्यपुस्तकांचे महत्त्व मोठे आहे. सामाजिक मूल्यांची ओळख, विविध उपक्रमांची आवड, सवयी अशा गोष्टी घडण्याचा शालेय शिक्षणाचा काळ. पुढच्या काळात विद्यार्थी वेगळ्या विश्वात वावरू लागतात. त्यांना पुढील जीवनाचे, व्यवसाय-उद्योगाचे वेध लागतात. गांभीर्य लोप पावते.
योग्य नागरिक घडणे याच काळात शक्य आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बरोबर पालकांनीही पाठ्यपुस्तके आणि अध्यापनाबद्दल जागरूक असले पाहिजे. “बोर्डाच्या परीक्षेत किती गुणांचा प्रश्न येणार?” यावर या मूल्यांचे महत्त्व मोजू नये.
सामाजिक कार्यकर्त्यांनी संस्कार होण्याच्या काळात शिक्षणाकडे लक्ष द्यावे. आता तरी बहुतेक बुवा-बाबा शालेय विद्यार्थ्यांना टार्गेट करत आहेत. त्यांना आवरणे हेही काम आहेच. पाठ्यपुस्तके बदलण्याच्या निमित्ताने याचा विचार शिक्षक, पालक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी केलाच पाहिजे.
वरील लेखातून पाठ्यपुस्तकांची तोंडओळख करून दिली आहे. आता चिकित्सक अभ्यास करून उपक्रम सुचवण्याचे काम वाचकांचे आहे. वार्तापत्राकडून त्यांचे स्वागत आहे.
– अनिल चव्हाण
संपर्क : 9764147483