Categories
युवा मानस

अमृता, प्रणय आणि तुम्ही …

ऑक्टोबर - २०१८

प्रिय मित्रमैत्रिणींनो,

मागच्या आठवड्यात प्रणय आणि अमृताची बातमी वाचली आणि मनाचा तळ ढवळला गेला, असे वाटले.

तेलंगणातील ही घटना. प्रणयकुमार हा दलित तरुण आणि अमृता वर्शिणी ही उच्च जातीतली, धनाढ्य घरची मुलगी. दोघांचे प्रेम होते आणि अमृताच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. आपल्या धनाढ्य बिल्डर वडिलांच्या धमक्यांना न घाबरता अमृताने प्रणयशी लग्न केले, ही गेल्या जानेवारीतली घटना. अमृताच्या वडिलांनी हा प्रकार जिव्हारी लावून घेतला आणि प्रणयच्या खुनासाठी एक कोटी रुपयांची सुपारी दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या आणि अमृताच्या देखत प्रणयचा खून झाला. या घटनेने देशभरात संतापाची आणि विषण्ण हतबलतेची भावना व्यक्त झाली. केवळ जातीच्या बाहेर लग्न केले म्हणून एखादा बाप स्वत:च्या मुलीच्या आयुष्याचे असे कसे धिंडवडे काढू शकतो. हा प्रश्न कुणालाही अस्वस्थ करणाराच आहे.

काही महिन्यांपूर्वी जेव्हा महाराष्ट्र शासनाने आंतरजातीय लग्नांना पाठिंबा देणारा सक्षम कायदा करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा अंनिसने आंतरजातीय-धर्मीय लग्नाच्या अनुषंगाने कायदा कमिटीशी संवाद साधला होता. कायद्याचे आणि शासनाचे पाठबळ आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना किती महत्त्वाचे ठरते, ते आपण जाणतोच. त्याचबरोबर हेदेखील आपण समजून घेतले पाहिजे की, केवळ कायदा केला म्हणून समाजातील एखादा प्रश्न पूर्णपणे सुटू शकत नाही. त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अनुकूल समाजमन तयार करणे हेदेखील खूप महत्त्वाचे असते. खासकरून जात आणि धर्माशी संबंधित गोष्टी बदलण्यासाठी तर खूप सातत्यपूर्ण प्रबोधन आणि संवाद साधावा लागतो. त्या अनुषंगाने आपण आज बोलूयात, असे मला वाटते.

खरे तर या संवादाची सर्वांत जास्त गरज कुणाला असेल, तर ती आपल्या पालक आणि नातेवाईकांना! बरोबर ना?

जेव्हा-जेव्हा मी तरुण मुला-मुलींशी जोडीदाराची निवड, प्रेम आणि आकर्षण या अनुषंगाने बोलतो, तेव्हा सगळ्यांचे एकच म्हणणे असते की, ‘आम्हाला हे सगळे मान्य आहे. या गोष्टी तुम्ही आमच्या पालकांना सांगा.’

खरे आहे! खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या संदर्भात, मुलांचे पालक काय भूमिका घेतात, यावरून त्या लग्नाचे पुढे काय होणार ते ठरते. आपण थोडा विचार केला तर आपल्या सहज लक्षात येईल की, अशा प्रकरणांच्या मध्ये बहुतांश वेळा मुलीचे वडील, चुलते किंवा भाऊ हे हिंसा करणारे किंवा घडवून आणणारे असतात. प्रणय आणि अमृताच्या प्रकरणातही देखील प्रणयच्या खुनाची सुपारी अमृताच्या वडिलांनीच दिली. सिनेमा हा समाजमनाचा आरसा असतो, असे आपण मानतो. त्या न्यायाने ‘सैराट’मधील खून करणारा देखील आर्चीचा भाऊच होता. हे पालक असे का वागत असावेत?

अमृताचे पालक – खासकरून वडील हे प्रणयचा खून करण्यापर्यंत अचानक पोचत नसतात. आपल्या मुलीला जणू स्वत:ची संपत्ती मानणे, जातीचा आणि स्वत:च्या प्रतिष्ठेचा खोटा दंभ, मुलांच्या वरती आपली मते लादणे, अशा अनेक विचारप्रक्रिया आणि प्रवृत्तीमधून हे आकाराला येत असते. अशावेळी कुटुंबातील इतर व्यक्तींची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. अमृताच्या वडिलांनी केलेले प्रणयच्या खुनाची सुपारी देण्याचे नियोजन, अमृताच्या घरातील कोणालाच माहीत नसेल, अशी शक्यता जवळजवळ नाही. तिची आई आणि इतर नातेवाईक यांनी थोडे डोळे उघडे ठेवून भान राखले असते, तर तिच्या वडिलांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज त्यांना नक्कीच येऊ शकला असता. त्या भीषण कृत्यापासून त्यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न करता आला असता.

जवळचे नातेवाईक, शेजारी, मित्र-मैत्रिणी यामध्ये महत्त्वाची मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकतात. अशा प्रसंगी समुपदेशकासारखी भूमिका पार पाडणारे हे नातेवाईक आणि मित्रमंडळी अशा प्रसंगी खूप महत्त्वाचे असतात. वातावरणातील तणाव हलका करणे, दोन्ही बाजूंशी संवादाची शक्यता निर्माण करणे, टोकाच्या निर्णयापासून कुटुंबीयांना परावृत्त करणे, अशा अनेक गोष्टी हे लोक करू शकतात. प्रणयच्या पालकांच्या सारखी भूमिका घेणार्‍यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी स्वत:च्या मुलाला त्याची जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य तर दिलेच; पण त्याच्या निर्णयाच्या पाठीशी ते ठामपणे उभे राहिले. प्रणयच्या निर्घृण खुनाच्या नंतरदेखील अमृताने आपल्या सासरच्या घरीच राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्येच आपण सारे काही समजून घ्यावे. आता तुम्ही म्हणाल, याचा आमच्याशी काय संबंध? माझ्या मते खूप जवळचा संबंध आहे. प्रणयचे पालक आणि अमृताचे पालक ही दोन टोके धरली, तर आपल्या सर्वांचे पालक या दोन्ही टोकांच्या मध्ये कुठेतरी असणार आहेत, हे आपण समजून घ्यायला हवे. या पार्श्वभूमीवर जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य जर तुम्हाला हवे असेल, तर सध्याच्या समाजव्यवस्थेमध्ये आपल्यातील बहुतांश जणांना ते सहजासहजी मिळणार नाही, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. ते स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न म्हणून आपल्या पालकांशी, नातेवाईकांच्याबरोबर, मित्रमंडळीमध्ये संवाद आणि चर्चा सुरू केली पाहिजे. अमृता आणि प्रणयची माहिती तुमच्या पालकांना नसेल, तर ती गप्पागोष्टींमध्ये सांगून त्यांना हे आपण विचारायला हवे की, त्यांना कोणाचे पालक योग्य वाटतात? आणि त्याची कारणे काय?

त्यांना हेदेखील विचारायला पाहिजे की, ‘समजा, अमृताचे कुटुंब आपले कौटुंबिक स्नेही असते, तर आपण तिच्या पालकांना काय सुचवले असते?’ आपल्या आजूबाजूलादेखील अनेक ‘प्रणय’ आणि ‘अमृता’ आहेत. त्यांना आपण पाठबळ देणार, त्यांचे पाय मागे ओढणार की, कुंपणावर बसून केवळ बघत राहणार? या प्रश्नांची उत्तरं आपल्यातील बहुतांश लोक काय देतात यावरून आपल्या समाजात, अमृता आणि प्रणयसारख्या शोकांतिका होतच राहणार की आपण त्या थांबवणार, हे ठरणार आहे.

तुमचे आई-बाबा जर हे सर्व समजून घेऊन तुम्हाला स्वातंत्र्य देण्याच्या बाजूचे असतील, तर त्यांना या गोष्टी दुसर्‍यांशी मोकळेपणाने बोलायला सांगा. त्यांच्या मित्र-मैत्रिणींशी, इतर पालकांशी, अगदी जर ते फेसबुक वापरत असतील, तर त्यांना जाहीर सांगायला सांगा की, ‘माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या जोडीदार निवडीच्या स्वातंत्र्याला मी शक्य तेवढी मदत करीन आणि त्याविषयी माझे मत त्यांच्यावर लादणार नाही आणि अन्य जातीतील किंवा धर्मातील जोडीदार कुणी निवडला तर त्याच्याप्रति हिंसेचा वापर करणार नाही.’

तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल, तर मी एक टीप देतो. जेव्हा तुम्हाला आई-बाबांच्याकडून नवा मोबाईल विकत घेऊन हवा असतो आणि ते द्यायला तयार नसतात, तेव्हा तुम्ही काय-काय आयडिया करता, ते आठवून पाहा- त्या लाडीगोडी करण्याच्या एक-दोन ट्रिक इथेदेखील वापरून बघायला काय हरकत आहे? कदाचित आई-बाबा रागावतील किंवा तुमचाच असा काही विचार आहे का, असादेखील त्यांना संशय येईल; पण हे लक्षात ठेवा की, जोपर्यंत घराघरांच्या मध्ये हा संवाद होत नाही आणि अमृताच्या वडिलांनी केले ते योग्यच केले, असे मनातल्या मनात आणि खासगीत बोलणारे आवाज कमी होत नाहीत, तोपर्यंत केवळ कडक कायदा हे खोट्या प्रतिष्ठेचे बळी थांबवू शकणार नाही.

तुमच्याकडून थोडी जास्त मागणी करतो आहे; पण तुमच्या-आमच्यातील अमृता आणि प्रणयच्या साठी आपण तेवढे तरी करायला नको का? तुमच्या पालकांशी संवाद कसा झाला, ते आम्हाला जरूर कळवा! जे पालक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना पाठबळ देऊ इच्छितात किंवा ज्यांनी पूर्वी असे पाठबळ दिले आहे, अशा लोकांचे अनुभव देखील आम्हाला समजून घ्यायला आवडतील. अंनिसच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमामध्ये आपण सामील होऊ शकता.

व्हॉटस्अ‍ॅप क्र. ः 8424041159/9594094785