Categories
परिसंवाद

असहिष्णुतेशी लढताना…

वार्षिकांक - २०१५

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे आणि कलबुर्गी यांचे खून, उत्तर प्रदेशातील दादरी प्रकरण, हरियाणातील छोट्या दलित मुलांची हत्या, गांधींचा खुनी नथुराम गोडसे याचा गौरव, कोणी काय खावे, कोणी काय प्यावे, कोणी काय कपडे घालावेत याबद्दलचे फतवे, इतिहासाचे विकृतीकरण आणि या सगळ्याबद्दलची अत्यंत असंवेदनशील, अविवेकी वक्तव्ये यावरून आजची भारतीय परिस्थिती निश्चितच ‘असहिष्णू’ म्हणावी अशीच आहे.

या असहिष्णुतेला विरोध म्हणून देशातील साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, बुद्धिवादी यांनी आपले पुरस्कार ‘वापस’ केले आहेत; तर राजकीय पातळीवर बिहारी जनतेने त्याला ‘मुँहतोड’ उत्तर दिले आहे. त्याचबरोबर दुसर्‍या बाजूला प्रचंड महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी हे प्रश्न सर्वसामान्य जनतेला तितक्याच तीव्रतेने भेडसावत आहेत. त्या विरोधातही क्षीणपणे का होईना; पण संघर्ष चालूच आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही रोमिला थापर, डॉ. एजाज अहमद, राम पुनियानी आणि किरण मोघे यांचे लेख या विभागात देत आहोत. डॉ. एजाज अहमद यांनी जमातवाद, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद या संकल्पनांची चर्चा करीत नव्वदोत्तरी काळात सर्वच धर्मातील जमातवादी शक्ती भारताच्या बदलत्या आर्थिक चित्रातून अधिक भडक का व कशा झाल्या, याचे समर्पक विवेचन या अनुवादित लेखात केले आहे.

सध्या भारताच्या विविधांगी परंपरांना नाकारत ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’च्या नावाखाली भूतकाळाला एका साच्यात बसविण्याचे काम जोरात चालू आहे. आपल्या प्रदीर्घ मुलाखतीत रोमिला थापर यांनी त्याबद्दल नि:संदिग्ध इशारा दिला आहे. वर्तमानाची सर्वसमावेशक समज विकसित करण्याच्या दृष्टीने इतिहासाची माहिती व्हावी व नवनवीन प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रोत्साहन या मुलाखतीतून निश्चितच मिळेल. किरण मोघे यांनी हिंदुत्ववाद आणि नवउदारवादीबाजारवादी आर्थिक धोरणे यांच्यात मूलभूतरित्या अंतर्विरोध कसा नाही, हे स्पष्ट करत या प्रक्रियेत स्त्रियांचा वापर कसा केला जातो, याचे विवेचन केले आहे. जसा ‘हिंदू धर्म आणि हिंदुत्ववाद’ यात फरक आहे, तसाच फरक ‘इस्लाम धर्म आणि इस्लामवादी दहशतवादी’ यांच्यातही आहे. या ‘इस्लामवादी दहशतवादा’चे पडद्यामागचे राजकारण काय आहे, याचे विवेचन डॉ. राम पुनियानी यांनी केले आहे.

संकलन : राजीव देशपांडे