Categories
परिसंवाद

भूतकाळाला वर्तमानाशी जोडताना… -
रोमिला थापर

वार्षिकांक - २०१५

सुप्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांच्या Frontline (18 Sept, 2015) पाक्षिकासाठी Linking the Past And The Present या शीर्षकाखाली दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर हिस्टोरिकल स्टडीज मधील ‘एन्शियंट हिस्ट्री’ या विषयाचे प्राध्यापक रणबीर चक्रवर्ती यांनी घेतलेल्या प्रदीर्घ मुलाखतीतील काही भागांचा राजीव देशपांडे यांनी मराठीत केलेला स्वैर अनुवाद आम्ही ‘फ्रंटलाईन’ या पाक्षिकाच्या सौजन्याने देत आहोत.

रोमिला थापर, जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मानद प्राध्यापिका, आपल्या चिकित्सक अभ्यासामुळे; विशेषत: प्राचीन भारतासंदर्भातील बहुमोल संशोधनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविल्या गेलेल्या भारतीय इतिहासकारांतील एक महत्त्वाच्या इतिहासकार. ज्याला ‘इंडियालॉजी’चा अभ्यास म्हटले जायचे, त्या अभ्यासाची दिशा सामाजिकशास्त्रांसह प्राचीन भारतीय इतिहासाकडे वळविणे त्यांच्या अविरत प्रयत्नांमुळेच शक्य झाले. या उपखंडाच्या इतिहासाच्या अभ्यासाशी असलेली त्यांची अविरत बांधिलकी त्यांनी केवळ आपल्या व्यक्तिगत अनुभवांच्या शिदोरीवर अवलंबून न ठेवता भूतकाळाची सतत तपासणी करत, त्याचा योग्य अर्थ लावत प्राचीन इतिहास, सामाजिकशास्त्र, सामाजिक आणि सांस्कृतिक मानववंशशास्त्र, विविध सामाजिक आणि मानवी शास्त्रे, भूगोल आणि राज्यशास्त्र या सारख्या सामाजिक आणि मानवीशास्त्रांच्या सहाय्याने अधिक सचोटीने, गांभीर्याने अभ्यासत राखली आहे. परिणामी, प्राचीन/प्रारंभिक भारताचा अभ्यास म्हणजे केवळ राजे-रजवाड्याची वंशावळ आणि सणावळीचा तपशील असा न राहता भूतकाळाचे सर्वसमावेशक, चिकित्सक अवलोकन असा झाला. या सगळ्या धाडसी घडामोडीत त्यांनी वारंवार आपल्याला इतिहासशास्त्रातील बदलांबद्दल जागते केले, इतिहासकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे विश्लेषण केले, इतिहासकारांच्या इतिहास मांडणीच्या पध्दती, त्यांचे इतिहासाच्या अभ्यासासंदर्भातील दृष्टिकोन या सर्वाचा वर्तमानाशी असलेल्या संबंधांकडे त्यांनी योग्यरित्या निर्देश केला. भूतकाळातील एखादी विशिष्ट गोष्ट आजच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीवर कसा प्रभाव टाकते, हे त्यांनी उलगडून दाखवले.

प्रा.थापर यांनी आपली पीएच.डी. 1958 साली स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज्, युनिर्व्हसिटी ऑफ लंडन येथून प्रा. ए. एल. बाशम यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. त्याच वेळेस त्यांचा मौर्य काळावरील प्रबंध आला. ‘अशोका अँड द डिक्लाईन ऑफ मौर्याज्’ या पुस्तकात त्यांनी सम्राट अशोक आणि त्याचा सत्ताकाळ यांचा अगदी मूलभूत साधनांच्या सहाय्याने चिकित्सकपणे अभ्यास करीत सामाजिक-आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक अंगाने आढावा घेतला. या त्यांच्या कामाचा प्रभाव प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासावर पडला. भारताच्या अगदी प्रारंभीच्या सामाजिक इतिहासाच्या अभ्यासात भर घालण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी आपल्या लिखाणातून केले. ‘एन्शियंट इंडियन सोशल हिस्ट्री’ आणि ‘इन्टरप्रिटिंग अर्ली इंडिया’ ही त्यांची त्यातील महत्त्वाची पुस्तके आहेत. प्रा. थापर यांची अगदी प्रारंभिक राज्यव्यवस्थेसंबंधीच्या अभ्यासातील रूची कायमच राहिली आणि 1980 मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘फ्रॉम लिनिइज टू स्टेट’ आणि ‘द मौर्याज् रिव्हिजिटेड’ या पुस्तकांमुळे इतिहासाच्या संशोधनाचे एक नवेच दालन खुलले गेले. हे त्यांचे काम भारतातील प्रारंभिक राज्य व्यवस्था प्रस्थापित होत असतानाच्या काळातील गुंतागुंतीच्या सामाजिक-राजकीय-तात्त्विक घटकांना उजेडात आणणारे होते. जरी त्यांचा भर प्रारंभिक भारताच्या सामाजिक इतिहासाकडे होता, तरी त्यांनी भारताच्या आर्थिक इतिहासावर (अरण्य, कामगार गट आणि व्यापार व्यवस्था) भरपूर लिहिले. अलीकडच्या दशकात त्यांनी सांस्कृतिक इतिहासाच्या लिखाणावर भर दिलेला आहे (अर्थात, हल्लीच्या उत्तर आधुनिकतावादी आणि वसाहतवादोत्तर अभ्यासाचा जो कल आहे त्यासारखा हा सांस्कृतिक अभ्यास नव्हे) हे त्यांच्या ‘शाकुंतल अँड सोमनाथ : मेनी व्हॉईसेस ऑफ अ हिस्ट्री’ यावरून दिसून येते. त्याचप्रमाणे त्यांच्या कामाचा आणखी एक भाग आहे तो म्हणजे इतिहास-पुराण परंपरा विरुद्ध (vis-a-vis) आधुनिक इतिहास शाखा. प्राचीन भारताला इतिहासाच्या जाणिवेची कमतरता होती, या युरोप केंद्रित मताचा प्रतिवाद त्यांनी कौशल्याने हाताळला. त्यांचे सर्वात जास्त वाचले गेलेले पुस्तक म्हणजे, ‘अर्ली इंडिया: फ्रॉम द ओरिजिन्स टू एडी 1300’, प्राचीन भारताच्या इतिहासाचा अधिकारवाणीने घेतलेला आढावा. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या आधीच्याच ‘हिस्ट्री ऑफ इंडिया : व्हॉल्यूम वन’ या पुस्तकाचा विस्तार होता. नंतरच्या या पुस्तकात त्यांनी नवीन दुरुस्त्या केल्या, नवीन भर टाकून पुस्तकाचा विस्तार केला (ज्याचे वर्णन आत्मचरित्रात्मक असे त्यांनीच उमदेपणाने केले आहे.). त्यावरून नवीन माहिती, विवेचनाचे नवीन नमुने आणि नवा दृष्टिकोन अंतर्भूत करण्याबाबतची त्यांची तत्परताच यातून दिसून येते. यातून प्रा. थापर आपली भूमिका पारखून घेण्यासाठी नेहमीच तत्पर असत, हेच दिसून येते. आपल्या विषयाशी त्यांची असलेली पक्की बांधिलकीच यातून स्पष्ट होते आणि इतिहासकारही बदलू शकतो, हेही दिसून येते आणि इतिहास या विषयाचा जिवंतपणाही या मुद्द्यातून सिध्द होतो. इतिहासाचा दुर्बोधपणे, दुराभिमानाने आणि धर्मांधतेने अर्थ लावणार्‍यांच्या विरोधात सडेतोडपणे टीका करणार्‍या प्रा. रोमिला थापर यांना भारतात आणि परदेशात इतिहासाच्या क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल ‘क्ल्यूज जीवनगौरव’ पारितोषिकासह (2005) अनेक शैक्षणिक पारितोषिकांनी गौरविले गेले आहे. त्या ‘इंडियन हिस्ट्री सोसायटी’च्या अध्यक्ष म्हणून 1983 साली निवडल्या गेल्या. त्यांना ‘स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज् (लंडन)’ आणि ‘लेडी मार्गारेट हॉल (ऑक्सफर्ड विद्यापीठ)’ चे मानद सभासदत्व दिले गेले आहे.

सांची स्तुप(मध्य प्रदेश)- सम्राट अशोकाने या स्तुपाचे बांधकाम चालू केले असे मानले जाते.

भूतकाळ -दूरचा असो व/वा निकटचा असो; वर्तमानाशी तो कसा दृढपणे जोडला गेलेला असतो, याची चर्चा सविस्तरपणे या मुलाखतीत प्रा. थापर यांनी केलेली आहे. वर्तमानकाळातील परिस्थिती कशी आणि कोणत्या पातळीपर्यंत भूतकाळातल्या विशिष्ट काळाचा अभ्यास करण्याच्या निवडीवर प्रभाव टाकते अथवा निश्चिती करते, हेही प्रामुख्याने यातून स्पष्ट झालेले आहे. त्यांची विधाने इतिहासाच्या अभ्यासाबद्दलची जागरूकता आणि संवेदनशीलता निर्माण करतात, जी इतर अनेक अभ्यासशाखांबरोबरच व्यावसायिक तज्ज्ञतेतून आणि काटेकोरपणातून येतात, एखाद्या हौशी इतिहासकाराने अचानक केलेल्या चढाईसारखी ती येत नाहीत. भारताच्या विविधांगी परंपरांवर आघात करीत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावाखाली भूतकाळ एका साच्यात बसविण्याचे जे प्रयत्न चालू आहेत, त्याबद्दल त्यांनी निःसंदिग्धपणे इशारा दिलेला आहे. वर्तमानाची सर्वसमावेशक समज विकसित करण्याच्या दृष्टीने भूतकाळाची माहिती होण्यासाठी नवनवीन प्रश्न उपस्थित करण्याचे त्यांनी दिलेले सततचे प्रोत्साहन या मुलाखतीतून जाणवेल.

तुमच्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या ‘द पास्ट अँड प्रेझेंट’ या पुस्तकातून भारतातील इतिहासाच्या शिक्षणाबद्दल आणि भारतात इतिहासाकडे बघण्याचा जो एक सर्वसाधारण दृष्टिकोन आहे, त्याबद्दलचा नाराजीचा सूर उमटल्याचे जाणवते. तुम्हाला त्याबाबत फारशी आशा दिसत नाही. पण तुम्ही अगदी निराशही नाही आहात; त्याबद्दल तुम्ही स्पष्टपणे लिहिले आहे. या परिस्थितीबद्दल तपशीलवार सांगाल?

गेल्या काही दशकाच्या भारतातील इतिहासाच्या वाटचालीची दिशा काय आहे, याबद्दलचा हा तुमचा प्रश्न आहे. इतिहास वाचला आणि शिकविला जाण्याच्या किंवा त्यासंबंधी चर्चा करण्याच्या दोन पातळ्या आहेत. माझ्या मते, शिकविणार्‍या विद्वान इतिहासकारांची एक पातळी आहे आणि त्या इतिहासकारांपैकी काही इतिहासकार जे चांगल्या विद्यापीठात आणि महाविद्यालयात शिकवतात, त्या पातळीवर लिहिला जाणारा इतिहास प्रभावी आहे. पन्नास वर्षांपूर्वी आम्ही ज्या स्थितीत इतिहास शिकवायचो आणि त्या दिवसात ऐतिहासिक लेखनाला दिशा देण्यासाठी ज्या पध्दतीचा संघर्ष आम्हाला करायला लागायचा, त्या तुलनेत आजचा बदल बराच प्रभावी आहे. ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्याबाबत मी समाधानी आहे; पण हा बदल सार्वत्रिक नाही. इतिहास उत्कृष्टपणे शिकविणारी जी केंद्रे आहेत, त्यापासून अनेक विद्यापीठे अजूनही कित्येक योजने दूर आहेत. अर्थात, अनेक इतिहासकार इतिहासाला केवळ सामाजिक शास्त्र म्हणूनच मान्यता देत नाहीत, तर इतिहासाला बौध्दिक पाया म्हणूनही मान्य करतात; हेही नसे थोडके! हा दृष्टिकोन असाच पसरत जाईल, अशी आपण आशा करू या.

अर्थात, दुसर्‍या बाजूने ज्या प्रकारे इतिहास लोकांसमोर आणला जातो, त्याबद्दलच्या माझ्या भावना अगदी उलट्या आहेत. हे मी सर्वसामान्य माणूस ज्या प्रकारच्या लोकप्रिय इतिहासाशी संबंधित असतो, त्या संदर्भात बोलत आहे. यात एकतर कालबाह्य झालेला इतिहास किंवा जो इतिहासच नाही, तो शंभर वर्षांपूर्वीच्या पध्दतीने शिकविला जातो. सतत निरर्थक प्रश्न विचारले जातात, भूतकाळाबद्दल सवंगपणे मतप्रदर्शन केले जाते. यातून इतिहासाबद्दलचे सर्वसाधारण अज्ञानच दिसून येते. जे व्यावसायिक इतिहासकार नाहीत, ते लोक या लोकप्रिय इतिहासाचा प्रसार करीत असतात. शाळा आणि कॉलेजात ज्या प्रकारे इतिहास शिकविला जातो, त्या संदर्भात काहीतरी करणे आपल्याला भाग आहे. आपण अजूनही पूर्णत: कालबाह्य झालेली इतिहासाची माहिती आणि ती शिकविण्याची पध्दती वापरत आहोत. आपला सारा भर तारखा आणि घटना यावरच. इतिहासाचा वापर माहितीच्या सांगाड्यासारखा फक्त घोकंपट्टीसाठी. कोणीतरी म्हटले आहे, विद्यार्थ्यांना दिलेल्या इतिहासाच्या नोटस् बघितल्यावर टेलिफोन डिरेक्टरीचीच आठवण येते; एका बाजूला टेलिफोन क्रमांक आणि दुसर्‍या बाजूला लोकांची नांवे.

गुजरातमधील धोलविरा येथील हरप्पा कालखंडातील(३००० BCE-१५०० BCE) नगर अवशेष

लोकांना अजूनही इतिहास म्हणजे भूतकाळाबद्दलची फक्त माहिती, असे वाटते. इतिहासाचे संशोधन करताना हा दृष्टिकोन फारच संकुचित आहे. आपण हे ठसवले पाहिजे की, माहीत असलेल्या स्रोतातून माहिती गोळा करण्या बरोबरच विविध नवीन स्रोतांचा शोध घेतला पाहिजे. भूतकाळासंदर्भातील माहिती, अतिशय काळजीपूर्वक छाननी करून व मिळालेल्या पुराव्याची विश्वासार्हता तपासून इतिहास समजण्यासाठी आणि तो स्पष्ट करण्यासाठी उपयोगात आणण्याची कार्यवाही केली पाहिजे. माहिती मिळविण्यासाठी भूतकाळाचे उत्खनन करण्याचे हे जे दोन कंगोरे आहेत, ते आणि नंतर भूतकाळात काय घडले, याचे विवेचन करणे त्यालाच आज आपण ‘ऐतिहासिक पध्दत’ असे म्हणतो. आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो, तेव्हा आम्हाला हे काही शिकविले जायचे नाही. कारण या संदर्भात फारसा विचार झालेला नव्हता. पण आज हे अत्यंत गरजेचे आहे.

वाईट म्हणजे ही पध्दत विद्यार्थ्यांना कशी शिकवावी – ती माध्यमिक शाळेपासून शिकवावी की पदवी कॉलेजातून शिकवावी, यावर फारसा भर दिला जात नाही. या सगळ्यात लक्षात घ्यायचे म्हणजे, पुरावा आणि माहिती गोळा करणे हे पहिले पाऊल, तर दुसरे पाऊल त्या माहितीची विश्वासार्हता तपासणे आणि गोळा केलेली माहिती इकडून-तिकडून सहज म्हणून जमा केलेली नाही किंवा कोणाच्या तरी कल्पनेतील नाही, ही खात्री त्या माहितीबद्दल करून घेणे. घटना जेथे घडत असतात तेथील घटनांचे परस्पर संबंध काय आहेत? ब ही घटना अ या घटनेचा परिणाम आहे काय? जर घटना एकाच जागी; पण थोड्या थोड्या वेळानंतर घडल्या आहेत, तर दोन घटनांमध्ये काही संबंध आहे काय? म्हणून हे परस्परसंबंध हा घटक बौध्दिक, तार्किक विश्लेषणासाठी महत्त्वाचे ठरतात. जोपर्यंत जमविलेल्या माहितीचे चिकित्सक मूल्यांकन होत नाही, तोपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या प्रशिक्षित इतिहासकार पुढचे पाऊल उचलत नाहीत. या सगळ्या खेळात कल्पनाशक्तीला वाव नसतो. मात्र लोकप्रिय इतिहासात बौध्दिक, तार्किक विश्लेषणाच्या ऐवजी कल्पनाशक्तीला महत्व मिळते.

या सर्व पायर्‍या पार पडल्यानंतर मग तुम्ही निवेदन तयार करू शकता-ज्याला आमच्या भाषेत ‘ऐतिहासिक सर्वसाधारण विधान’ म्हणतात. म्हणून ऐतिहासिक माहितीला सत्याचे अंग बनविण्याच्या प्रक्रियेसाठी विश्लेषण करण्याची, तर्कशुध्दतेची आणि विवेकाची गरज ही गेल्या काही दशकातील इतिहास संशोधनात भासू लागली आहे. ही प्रक्रिया अस्तित्वात होती; पण काही चांगल्या इतिहासकारांपुरतीच. आज तिची गरज इतिहासाच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. पण ती अतिशय काटेकोर असल्याने सर्वच विद्यार्थी काही त्यासाठी पात्र ठरणार नाहीत.

कर्नाटकातील कालबुर्गी जिल्ह्यातील सान्नत्ती येथील बौद्ध ठिकाण
मौर्य साम्राज्याचे जे चार शिलालेख सापडले त्यापैकी एक.

म्हणजेच, तुम्हाला असे सुचवायचे आहे, आपण ऐतिहासिक माहितीतून समज येण्यासाठी विश्लेषण करण्याची, माहिती गोळा करण्याची जी प्रक्रिया पार पाडतो, ती प्रक्रिया अतिशय जिकिरीची आहे आणि त्यासाठी खास प्रशिक्षण देण्याची गरज आहे. केवळ हौशीपणा त्यासाठी कामाचा नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या इतिहासाच्या जाणिवेत आणि इतिहासकारांनी कष्टाने मिळविलेल्या ऐतिहासिक माहितीचे बुद्धिनिष्ठतेने पध्दतशीरपणे दिलेले स्पष्टीकरण यात फारच मोठी तफावत आढळते.

तुमचे म्हणणे तंतोतंत बरोबर आहे. माझा निर्देश संपूर्ण इतिहासाकडेच होता; परंतु त्यातही प्राचीन भारतीय इतिहासाबाबत हा मुद्दा फारच गुंतागुंतीचा आहे. त्याच्या स्रोतांच्या व्याप्तीबद्दलचा विचार करा, प्राचीन भारतीय इतिहासाची केवळ डझनभर पुस्तके वाचून तुम्ही त्यातले तज्ज्ञ नाही बनू शकणार. तुम्हाला स्रोतांची माहिती हवी आणि त्याचे विश्लेषण कसे करायचे, याचीही माहिती हवी. हे स्रोत काय आहेत आणि त्या काळी वापरल्या जाणार्‍या कोणत्या भाषेत होते? हे तुम्हाला माहीत हवे. उदाहरणार्थ, तुम्हाला मौर्य राजांच्या शिलालेखावरील भाषेची माहिती हवी, जी प्राकृत आहे. तुम्हाला कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्र’ सारखे जे संस्कृत भाषेत लिहिलेले ग्रंथ आहेत त्यामुळे संस्कृत भाषेचीही माहिती हवी. तुम्हाला पुरातत्त्वशास्त्राचीही थोडीफार ओळख हवी. पुरातत्त्वशास्त्र आजकाल फारच तांत्रिक बनत चालले आहे. वैज्ञानिक पध्दती आणि माहितीवर आधारित होऊ लागले आहे. पुरातत्त्वशास्त्राच्या संशोधनात विज्ञानाचा इतका वापर केला जातो की, काही वेळा आजचे काही अहवाल मलाही समजत नाहीत. कारण त्यासाठी वैज्ञानिक प्रशिक्षणाची गरज असते. त्यानंतर भाषेचा प्रश्न आहेच. स्रोत ज्या भाषेत आहेत केवळ ती भाषा येऊन उपयोगाचे नाही. भाषेतल्या बदलांचे परीक्षण करताना भाषेचे नियम माहीत असले पाहिजेत. विविध शब्दसमूह, व्याकरण आणि शब्दोच्चार, याचे भान असले पाहिजे आणि भाषा कशी आणि का समाजापासून दुरावली आहे किंवा परस्परसंवादी आहे, याची माहिती असली पाहिजे.

आज ज्या संदर्भात बरेच बोलले जाते, त्याबद्दलचे एक उदाहरण तुम्हाला सांगते, आम्ही जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा आम्हाला सांगितले जायचे फक्त इंडो-आर्यन हीच ऋग्वेदाची भाषा आहे. पण आज तुम्ही असा दावा करू लागाल तर सर्वच वैदिक विद्वान या दाव्याशी सहमत होणार नाहीत. कारण भाषाशास्त्रानुसार ऋग्वेदात जरी इंडो-आर्यन भाषेचा प्रभाव असला तरी द्रविडी भाषांचे काही घटक सापडले आहेत. यामुळे इतिहासकारांचा जो स्रोत आहे, त्याबद्दलच्या दृष्टिकोनात काही बदल होतो काय? तो होतो. कारण कोणी असे म्हणू शकत नाही, लोक बोलत असलेली ती एकच भाषा या ग्रंथात वापरात आणलेली आहे. आता इतिहासकाराने म्हटले पाहिजे, ठीक आहे, त्या भाषिक विभागाला लागू नसणारी इतर भाषिक वैशिष्ट्ये जर दिसून येत असतील आणि द्रविडी भाषा इंडो-आर्यन भाषेपेक्षा वेगळी भाषा आहे. याचा अर्थ, त्या काळात एक भाषा बोलणार्‍यांचा दुसरी भाषा बोलणार्‍या दुसर्‍या भिन्न भाषिकांच्या जवळिकीचा हा परिणाम आहे. पण यामुळे ऋग्वेद काळाला एक अतिशय चित्तवेधक अशी ऐतिहासिक किनार प्राप्त होती. ती ही, या काळात केवळ ऋग्वेद ही एकमेव संस्कृती नव्हती, तर जरी ऋग्वेद संस्कृतीचे वर्चस्व असले तरी इतरही संस्कृती अस्तित्वात होत्या. त्यामुळे इतिहासकारांनी इतर संस्कृती उघड केल्या पाहिजेत.

गुजरातमधील खिरसारा येथील उत्खननात हरप्पा कालखंडातील करड्या
खनिजापासूनचा शिक्का. हरप्पा संस्कृती साक्षरतेबाबत खूपच पुढारलेली होती.

या कालखंडाबद्दलच्या अभ्यासाचे पुरावे इतर अनेक प्रकारच्या स्रोतांतून पुढे आले आहेत, जे काही दशकापूर्वी माहीतही नव्हते. उदाहरणार्थ, जलविज्ञानाच्या सहाय्याने नद्यांचा अभ्यास चालू आहे. त्यातही सरस्वती नदी चर्चेचा विषय बनली आहे. सरस्वती नदीच्या अस्तित्वाबद्दल ना निश्चित माहिती आहे, ना तिच्या इतिहासाबद्दल. तिच्या पाण्याचा पुरवठा मान्सूनकडून व्हायचा की ग्लेशियरपासून व्हायचा? यमुना आणि सतलज नद्यानी सरस्वती नदीचे पाणी खेचल्याने ‘सरस्वती’ नाहीशी तर झाली नाही ना? इतरही जनुकशास्त्रासारखे अनेक स्रोत आहेत, जे या इतिहासावर प्रकाश टाकू शकतात. आता जनुकशास्त्राचे अहवालही चर्चेत येऊ लागले आहेत. एका विशिष्ट काळात त्या भागात स्थलांतरित लोक आले होते का? की तेथील लोकसंख्येची रचना नेहमीच स्थिर राहिली आहे? हे सर्व पुराव्यांचे वादग्रस्त कंगोरे आहेत आणि मी त्याकडे निर्देश करीत आहे कारण पुराव्यात नेहमीच विभिन्नतेचा आणि वादग्रस्ततेचा भाग असतो. त्यामुळे ऐतिहासिक प्रश्नांची उत्तरे कधीच ‘हो’ किंवा ‘नाही’ मध्ये देता येत नाहीत. (इतिहासात वस्तुनिष्ठ प्रकारच्या प्रश्नांना स्थान का नाही, याचे हेही एक कारण आहे.) त्यामुळे इतिहासकारांना त्याच्या स्पष्टीकरणासाठी त्यांच्या तर्कावर अवलंबून राहावे लागते. मग पुराव्यात बदल झाला तर त्यांच्या स्पष्टीकरणातही बदल करावा लागतो. 19व्या शतकात एखाद्या बाबतीत केलेला वाद-प्रतिवाद 21व्या शतकात वेगळ्या पध्दतीने करावा लागेल. ऐतिहासिक स्पष्टीकरणाला विशिष्ट काळात त्या विषयाच्या उपलब्ध असलेल्या माहितीची मर्यादा असते आणि ही स्पष्टीकरणे त्यामागील हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने रंगवलीही जातात.

विविधतेला नकार

आपण आता व्यापक मुद्द्याकडे वळूया. सर्वसामान्य लोक इतिहासाच्या अभ्यासाबाबत प्रशिक्षित नसतात. त्यांच्यापुढे विशिष्ट गट, विशिष्ट धार्मिक प्रवृत्ती, विशिष्ट वांशिक अस्मिता यांनी मांडलेला एकसाची इतिहास असतो, जो धोकादायक आणि चुकीचाही असतो. आपल्याला हे माहीत आहे की, भूतकाळात घडलेल्या घटना काही एकाच पध्दतीने, एकसाची घडलेल्या घटनांचे प्रतिनिधित्व करीत नसतात. तुमचे म्हणणे आहे, ऋग्वेद हे काही फक्त इंडो–आर्यन नाहीत. ते केवळ एकाच भाषेत रचले गेले नाहीत..त्यात विविध भाषांचा; पर्यायाने विविध संस्कृतींचा समावेश आहे.

सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर ज्या दाव्यांचा प्रचार केला जातो. आहे, त्याच्या तपशिलात मी जात नाही. मी तज्ज्ञांच्यात जे मतभेद आहेत, त्याकडे वळते. प्राचीन भारताचा अभ्यास करणार्‍या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञांचे ठामपणे सांगणे आहे, आर्यांची भाषा इराणमार्गे मध्य आशियातून भारतात आली असण्याची शक्यता आहे. पण भारतात हल्ली विविध लोकांकडून ज्या मताचा प्रचार केला जातो आहे ते मत असे आहे की, आर्य भाषा बोलणारे सर्व मूळचे इथलेच आहेत. काहींचा तर असा दावा आहे की, हरप्पा संस्कृतीचे निर्मातेही आर्यच होते. म्हणजे ते असे सुचवत आहेत, मूळच्या भारतीय संस्कृतीत आर्यांव्यतिरिक्त इतर घटकच नव्हते, या दाव्याचा विविध कारणांसाठी मी स्वीकार करू शकत नाही.

पावित्रीकरण

आर्यवादाचे पावित्रीकरण करायचे, एकाच स्रोताचा वापर करीत त्या प्रश्नांमधील गुंतागुंत बाजूला सारत प्रत्येक गोष्टीचे सरलीकरण करायचे! हे स्पष्ट आहे, दोन्ही दृष्टिकोनात तीव्र मतभेद आहेत आणि आपल्या दृष्टिकोनाच्या समर्थनार्थ दोन्ही बाजूंनी दिलेले पुरावे असमान आहेत. जे सुचविले गेले आहे, ते आमच्यापैकी काहीजणांना भाषिकदृष्ट्या आणि पुरातत्त्वशास्त्रीयदृष्ट्या योग्य वाटत नाही. ऋग्वेदचा कालखंड हरप्पा संस्कृतीनंतर आहे. त्यामुळे साहजिकच ऋग्वेदात आधीच्या संस्कृतींचे प्रतिबिंब पडत नाही, असा आमचा दावा आहे. हरप्पा संस्कृतीच्या वस्त्या ओमानमध्ये होत्या आणि त्यांचे मेसोपोटेमियाशी संबंध होते, या कशाचेच प्रतिबिंब ऋग्वेदात पडत नाही. तिसर्‍या सहस्रकाच्या शेवटी आणि दुसर्‍या सहस्रकाच्या सुरूवातीला हरप्पा संस्कृती, शेजारी असलेल्या समकालीन विविध बिगरहरप्पा संस्कृतींबरोबर नांदत होती. ऋग्वेदाच्या रचनेचा काळ सर्वसामान्यपणे ख्रिस्तपूर्व 1500-1000 असा मानला जातो. या काळातील विविध संस्कृतींचे (पेन्टेड ग्रेवेअर संस्कृती, ब्लॅक अँड रेड वेअर संस्कृती, मेगालिथिक आणि इतरही) अस्तित्व ऋग्वेदात जाणवते. त्या वेगवेगळ्या संस्कृती होत्या. ती काही एकच संस्कृती नव्हती. जसजसे आर्यभाषिक पसरत गेले, तसतसा त्यांचा संबंध या वेगवेगळ्या संस्कृतींशी आला व ते त्यांच्यामध्ये वसून गेले.

हरप्पा संस्कृतीतील गावात प्रामुख्याने लिखाणाची माहिती असलेली आधुनिक शहरी संस्कृती नांदत होती; तर ऋग्वेदी समाज हा ग्रामीण कृषी संस्कृतीचा; शहरी संस्कृतीशी अनभिज्ञ आणि निरक्षर होता. हा महत्त्वाचा फरक ऋग्वेदाचे निर्माते आणि हरप्पा संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांत होता हे आपण विसरता कामा नये.

तामिळनाडूतील शिवगंगा जिल्ह्यातील किझहाडी येथील उत्खननात सापडलेली
काळ्या/लाल रंगातील भांडी. संगम काळ (पहिल्या ते तिसऱ्या शतकातील.)

म्हणजे विशेषत: दक्षिण द्वीपकल्पाच्या मेगालिथिक संस्कृतीत जे घडत होते, त्यांचे प्रतिबिंब यात अभावानेच पडलेले आढळते.

मेगालिथिक संस्कृतीच्या अंगाने सूत्रात नोंद येत नाही पण असूर, दास आणि दस्यू सारख्या विविध गटांची चर्चा मात्र या सुत्रांतूनही येते. या सूत्रांकडे आपण अधिक वस्तुनिष्ठपणे पाहूया, ऋग्वेदात दोन वर्णांचा उल्लेख येतो- आर्य आणि दास. मग हे दास कोण होते? जी कर्मकांडे आणि परंपरा हे लोक पाळतात, त्या वेगळ्या आहेत, ते वेगळ्या देवतांची पूजा करतात आणि वैदिकांपेक्षा वेगळी भाषा बोलतात, त्यांची वसतिस्थानेही वेगळी आहेत, त्यांच्यांकडे संपत्ती आहे, त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या संपत्तीबद्दलच्या व्यक्त झालेल्या असूयेचे वर्णनही ऋग्वेदात येते. त्यामुळे काही तज्ज्ञांच्या मते, त्यांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळेच आपण विचारले पाहिजे, ते कोण होते? आणि त्यांना मिथकातून बंदिस्त का केले गेले?

मग दासी-पूत्र ब्राम्हणांचे काय? त्यांना प्रथम नाकारले गेले; पण त्यांनी आपल्या शक्तीची प्रचिती दिली, मग त्यांना ब्राम्हण म्हणून स्वीकारण्यात आले. एका अर्थाने ही संज्ञा विरोधाभासी आहे. दासी-पूत्र (गुलाम स्त्रीचा किंवा खालच्या दर्जाच्या अथवा संस्कृतीतील स्त्रीचा मुलगा हा त्याचा शब्दश: अर्थ) ही संज्ञा ब्राम्हणाच्या स्थानाला धक्का पोहोचविणारीच आहे. वैदिक सूत्रे देव आणि असूर यांच्यात सातत्याने चाललेल्या तंट्यांची नोंद करतात. एका पातळीवर ही मिथके आहेत, हे बरोबरच आहे. मिथके जरी समाजाचे वस्तुनिष्ठ वर्णन करीत नसली, तरी त्यांनी समाजातील समज – गैरसमजापासून पूर्णपणे फारकत घेतलेली नसते. मिथके निर्माण करणार्‍यांचे त्यांचे स्वत:चे असलेले समज – गैरसमज त्यात दबकत दबकत घुसतातच. म्हणून त्यात आम्ही आणि ते यावर जर जास्तच आग्रही भर दिलेला असेल, तर हे स्पष्ट आहे की तेथे एकापेक्षा जास्त संस्कृती असणार. त्यामुळेच वैदिकांचा काळ, हरप्पानंतर ते ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील शहरी संस्कृतीच्या ऐतिहासिक शहरांपर्यंत मानावा, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. जर संस्कृतींच्या आदानप्रदानतेच्या अंगाने बघायचे ठरवले तर समाजा-समाजात देवाणघेवाणीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्याचे दिसून येईल; पण जर फक्त एकाच संस्कृतीच्या अंगाने बघायचे ठरवले, तर या सर्व संधी वगळल्या जातील. उदाहरणार्थ, वैदिकांची सूत्रे ही अनेक संस्कृतींचा मिलाप नसून तो एकाच संस्कृतीच्या उत्क्रांतीचा आलेख आहे, असा दावा करणे शक्य आहे? पाच हजार वर्षांनंतरच्या असंख्य ऐतिहासिक घडामोडींनंतरही आपल्याकडे वेगवेगळ्या संस्कृती आजही आहेत.

बारोर (राजस्थान) येथे मिळालेला करड्या खनिजापासूनचा बटन शिक्का.

नक्कीच, ही काही एकमेव अगर एकखांबी संस्कृती निश्चितच नाही. तिच्यात अनेक विविध संस्कृतीचा सहभाग आहे. पण असा एकसाचीपणाचा दावा करून आमची संस्कृतीच श्रेष्ठ असल्याचा दुराभिमानी दावा केला जातो.

आर्य स्थानिकच होते आणि ते भारताबाहेरच्या जगात गेले आणि त्यांनी संस्कृती युरोपात नेली, हा फार लोकप्रिय दावा आहे. त्याचा शोध 19व्या शतकात लावला गेला आणि त्या दाव्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे. कर्नल हेन्री स्टील ओल्कॉट या थिओसॉफिक सोसायटीतील अमेरिकन लेखकाने त्याचे प्रथम विवरण केले. हे थिओसॉफीस्ट काही काळासाठी आर्य समाजाच्या निकट होते. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचा आर्य तिबेटातून आले आहेत, असा विश्वास होता.

या अशाच मांडण्यांतून भारताच्या प्रारंभिक इतिहासाबद्दल होणार्‍या या ऐतिहासिक वादांना पुरेसा दारूगोळा मिळवून दिला आहे. हे वाद चालू झाले 19व्या शतकात. आजही ते त्या चाकोरीतून बाहेर पडू शकलेले नाहीत. आर्यांच्या मुळातून साकारणार्‍या युरोपिय वर्चस्वाची चर्चा; ज्याला ‘वंशविज्ञान’ म्हटले जायचे, त्याचा भाग म्हणून केली जात होती, असा तो काळ होता हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यापैकी काही मांडण्या 20 व्या शतकात ज्या आर्यवादामुळे युरोपला विध्वंसक अवस्थेला नेले, त्याच विध्वसंक दिशेला नेणार्‍या होत्या. इतिहासाच्या मांडण्या आणि कडवा राष्ट्रवाद आणि अस्मितेचे राजकारण यांच्या हातमिळवणीचे अनेक घातक परिणाम भोगावे लागतात. त्यासाठीच अशा मांडण्यांसंदर्भात चर्चा उपस्थित करणे आवश्यक आहे.

वेगवेगळी मते बाळगणार्‍या तज्ज्ञांची मते आणि पुराव्याच्या आधारे त्यांच्या मतांना असलेले महत्त्व याआधारे इतिहासाच्या दृष्टीने विवादास्पद असणार्‍या प्रश्नांची हाताळणी केली पाहिजे. वाईट हे आहे की, आर्य हा मुद्दा इतका राजकीय झाला आहे की, आर्यांच्या भारतीय मुळासंदर्भात किंवा त्याचाच उपसिध्दांत असलेल्या आर्य संस्कृतीच्या महानतेबद्दल कोणी प्रश्न उपस्थित केला की, त्याच्यावर वर्तमानपत्रासह सोशल मीडियातून आणि इंटरनेटवरून विखारीपणे शत्रुत्वाच्या भावनेने असा हल्ला चढविला जातो की, ज्यामुळे इतिहासावरील चर्चांची संभाव्यताच संपुष्टात येते.

जेव्हा आपण या दुराभिमानी घोषणांकडे बघतो, तेव्हा त्यांना प्रत्येक गोष्टीचा एकसाची, नीटनेटका इतिहास एकसंघपणे सादर करण्याची इच्छा दिसते. त्यातून विभिन्नतेची भीती दिसते? एकसाचीपणाच्या कसोट्यांना न उतरणारे काही दिसले, तर ते फेकून देण्याची प्रवृत्ती आपल्या राजकीय संस्कृतीत वाढत असल्याचे तुम्हाला जाणवत आहे?

मला वाटते, भूतकाळाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची भीती म्हणजे भूतकाळाकडे सरळसोट, एकसाची, आक्रमक संस्कृती म्हणून पाहण्यापेक्षा वेगवेगळ्या संस्कृतींचे एकमेकांशी असलेले गुंतागुंतीचे संबंध म्हणून पाहावे लागणे, ही ती भीती आहे. त्यातच भर म्हणून ही भीती असे सुचविते की, जगभरातील इतर संस्कृतींप्रमाणे आपली संस्कृतीही मूळची बहुविध संस्कृती आहे आणि ती गेली अनेक शतके उत्क्रांत होत आहे आणि होत राहणार आहे, हे मान्य करण्याचा आत्मविश्वास आपल्यात नाही. इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात विशिष्ट संस्कृती उत्क्रांत पावताना दिसते आणि प्रत्येक कालखंडात एकापेक्षा अधिक संस्कृतींना महत्त्व असतेच. त्यामुळे त्यांच्या उत्क्रांतीत वेगळेपणाचे अथवा समन्वयाचे प्रमाण किती आहे आणि तसे का आहे तसेच संस्कृतींचे एकमेकांशी असलेले संबंध याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्यानंतरच आपल्याला समान वैशिष्ट्ये निश्चित करता येतील. इतिहासकार म्हणून आपल्याला हे समजले पाहिजे की, एकाचवेळी एकापेक्षा जास्त संस्कृती अस्तित्वात असतात. याचा अर्थ, आपण विचारले पाहिजे दोन्ही संस्कृतीत संवाद आहे काय आणि त्यांचा परस्परसंबंध काय? आज आपल्याला या प्रश्नांबद्दल उत्सुकता आहे. पण जेथे असे लोक असतात ज्यांचा राष्ट्रवाद हा एकाच आक्रमक संस्कृतीवर आधरित असतो आणि जे त्यांची ही संस्कृती म्हणजेच देशाची राजकीय ओळख मानतात, अशा ठिकाणी आपला समाज विविध संस्कृतींचा बनलेला असल्याने आपल्याला संकटाला सामोरे जावे लागते.

हिंदूवाद आणि हिंदुत्व

सांस्कृतिक राष्ट्रवाद, संस्कृतीचे राष्ट्रीयकरणच केल्याचे सूचित करीत नाही काय? दुसर्‍या शब्दात, असा दावा केला जातो, येथे फक्त एकाच पध्दतीची संस्कृती आहे, प्रत्येक गोष्ट एकसाची आहे.

वसाहतपूर्व काळात संस्कृतीचा जो अर्थ अस्तित्वात होता, त्यात सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या उभारणीची मुळे असण्यापेक्षा वसाहतवादाने संस्कृतीचा जो अर्थ लावला त्यात आहेत. मौर्यांनी त्यांची संस्कृती म्हणून काय मानले आणि गुप्त, चोल आणि मोगल यांच्या काळात संस्कृतीच्या संकल्पना कशा वेगळ्या होत्या, हे असे काहीसे आहे, ज्याचा आपण विचार करत नाही कारण याची पुनर्रचना सोपी नाही. वसाहतवाद्यांच्या रचनेतून आलेल्या पारंपरिक संस्कृतीला कितपत मान्यता द्यायची, याचा विचार सर्वच पूर्व-वसाहतींनी केला पाहिजे. ही गोष्ट काही भारतापुरतीच खरी नाही, तर इंडोनेशिया वगैरेमध्येही असेच घडले आहे. पेरू आणि मेक्सिकोसारख्या देशात तर या गोष्टी ठळकपणे जाणवतात कारण तेथे स्पॅनिश लोकांनी मोठया प्रमाणावर जुने पुरावे नष्ट केले आहेत.

परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या असतात किंवा एखाद्या विशिष्ट प्रसंगाने त्यांची सुरुवात होते, हे आपल्याला पहिल्यापासून माहितीच आहे. त्यामुळे आजच्या समकालीन परंपरा या प्राचीनच आहेत, अगदी हजारो वर्षांपासून चालत आलेल्या आहेत, असा आग्रह धरणे अवघड आहे आणि या परंपरांकडे वरवर पाहिले, तरी त्या अधून-मधून खंडित झालेल्या किंवा त्यात बदल झालेलाही आढळून येतो. 1955 मध्ये मी केरळमध्ये ‘अग्नीचयना’ या वैदिक कर्मकांडाच्या विधीला हजर होते. हे कर्मकांडाचे विधी बरेच दीर्घ काळ चालणारे असतात व मुख्यत: नंबुद्री ब्राम्हण ते करतात. त्यांचे वैदिक ग्रंथांचे पठण चालू होते. एखाद्याला वाटेल, तेथे चालू असलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला मान्यच असेल. पण तेथे देशातील व परदेशातील वैदिक केंद्रातून आलेल्या वैदिक विद्वानांच्यात कर्मकांडे कितपत अधिकृत आहेत आणि वैदिक ग्रंथांतील शब्दांचा योग्य उच्चार कसा करायचा. यावर कर्मकांडाचे विधी चालू असलेले जवळजवळ दोन आठवडे आणि त्या नंतरही वादविवाद चालू होते.

हीच गोष्ट संज्ञांच्या इतिहासालाही लागू होते. एखाद्याने संस्कृत, प्राकृत आणि पाली भाषेतील ग्रंथातील आर्य या संज्ञेचा अर्थ आणि ओळख इतिहासात कशाप्रकारे बदलत गेली आहे याचा पाठपुरावा केला तर त्याला जी माहिती मिळेल, तिचा तंतोतंत मेळ 19 व्या शतकात आर्य संकल्पनेचा जो अर्थ लावलेला आहे त्याच्याशी बसणार नाही. असे विचारले पाहिजे की, आर्य म्हणून कोण, कोणाला संबोधले गेले आहे आणि का? ही संज्ञा कशी वापरली गेली आहे? पाली ग्रंथात उच्च पदावर पोहोचलेल्या उदा. बौध्द भिक्खूसारख्या काही सामजिक विभागांसाठी त्यांचा मूळ वंश काय आहे, त्यांची जात काय आहे किंवा पूर्वी ते कोणता व्यवसाय करीत या गोष्टी विचारात न घेता आर्य ही संज्ञा वापरली गेली आहे; तर याच लोकांना विष्णू पुराणात नास्तिक असे म्हटले व त्यांच्यावर फसवणूक करणारे अशी कठोर निर्भत्सना करत त्यांना निकालात काढले आहे. वसाहतवाद्यांनी प्रचलित केलेली मते हीच जणू काही प्राचीन मते आहेत असे मानण्याची आज रीतच बनून गेली आहे. एतद्देशीय आर्यवादाबद्दल बोलायचे तर हे धर्माधारित राष्ट्रवादाचेच अनुषंगिक उत्पादन आहे. हे सर्व हिंदू संस्कृतीच्या पायाचा शोध घेण्यासाठी आहे.

एकमेव संस्कृतीचे हे वेड काही फार जुने नाही. गुप्त कालखंडानंतरच्या शिलालेखातील ‘प्रशस्ती’ या विभागात राजघराण्यांच्या कौतुक करण्यार्‍या पूर्वपरंपरा आणि इतिहास दिलेला आहे. त्यांच्या पूर्वजांचा आणि समाजाचा इतिहास वेगवेगळा आहे आणि त्याला विविध स्रोतांकडून अधिकृतता प्राप्त झालेली आहे. धर्माधारित राष्ट्रवाद संस्कृतीतील विविधतेपासून दूर जातो. तो एखाद्या धर्माची संस्कृती स्वीकारतो आणि त्याला राष्ट्राची मध्यवर्ती संस्कृती बनवतो. सार्‍या जगभरातील राष्ट्रवादाचे हे नमुनेदार वैशिष्टय आहे; मग तो राष्ट्रवाद वसाहतवादविरोधी असो, धार्मिक, भाषिक किंवा वांशिक असो. राष्ट्रीय चळवळी एकाच संस्कृतीचे प्रभुत्व मानण्याकडे वळतात मग तीच संस्कृती राष्ट्रीय बनून जाते.

धर्माधारित राष्ट्रवाद एकच धर्म, भाषा, संस्कृती आणि तत्सम इतर गोष्टी यांच्या महानतेला अधोरेखित करतो. राजकीय संघटन करण्यासाठी याची उभारणी जाणीवपूर्वक केली जाते. हिंदुत्व हे त्याचे उदाहरण आहे. विविध विद्वानांनी नमुद केलेले आहे, हिंदूवाद आणि हिंदुत्व एकसारखे नाही. हिंदू हा धर्म आहे आणि हिंदुत्व ही राजकीय विचारसरणी आहे. हिंदुत्व ही आधुनिक विचारसरणी आहे. हिंदूवादाचे काही कंगोरे त्यात आहेत; पण त्यात लक्षणीय फरक आहे. 20व्या शतकात ही कल्पना अस्तित्वात आली. हिंदू लोकांचे हिंदू राष्ट्रासाठी संघटन करावयाचे, हा तिचा उद्देश होता. धर्मावर आधारित विचारसरणी निर्माण करायची तर धर्माच्या मूलभूत तत्त्वांची पुनर्रचना करणे गरजेचे असते. या रचनेची आखणी धर्मातील अभिजन आणि धर्माच्या अनुयायातील प्रतिगामी भावनांची पाठराखण करणारेच नेहमी करतात. प्रादेशिक निश्चिती, एकच संस्कृती आणि एकच वांशिक मूळ, एकच धर्म आणि एकच भाषा याविषयी हिंदुत्व भाष्य करते. हिंदूंची पितृभूमी आणि पुण्यभूमी सारखीच, त्यांचे पूर्वज आणि धर्म सारखेच; बाकी सर्व बाहेरचे. मध्ययुगीन धर्मांच्या प्रमाणे एकच एक पवित्र ग्रंथ, ऐतिहासिक आणि एकसाची धर्मकल्पना, धर्मगुरूकेंद्रित संघटना या गोष्टी केंद्रस्थानी ठेवत धार्मिक बाजूची पुनर्रचना करायची; ज्यामुळे सामाजिक आणि राजकीय संघटन बांधणे सोपे होईल. म्हणून मी त्याला संघटित हिंदूवाद म्हणते.

तसेच भूतकाळाला रंगविताना राष्ट्रीय संस्कृतीने बहुसंख्य लोकांशी निगडित असलेल्या महाकाव्यांना पुढे आणले. पण या महाकाव्यांची रचना अनेक प्रकारे केली गेली आहे. मग प्रश्न असा उभा राहिला, कोणती एकच रचना योग्य? रामायणाच्या बाबतीत भारतात तर हा प्रश्न तीव्रतेने भासतो. रामायणाच्या अनेक रचना अनेक अंगाने रंगविल्या गेल्या आहेत, तर काही परस्परविरोधी रचनांची निर्मिती शतकानुशतके होत राहिली आहे. धार्मिक राष्ट्रवादाला एकच एक रचना अधिकृत म्हणून दाखवणे भाग होते आणि असे प्रयत्न इतिहासकारांना स्वीकारार्ह नव्हते. रामायणाच्या अनेक रचना दक्षिण-पूर्व आशियातील सांस्कृतिक ओळखीच्या अविभाज्य घटक आहेत. पण त्या वाल्मिकी रामायणाच्या रचनेशी लक्षणीयरित्या विसंगत आहेत. एखाद्या विभागातील एखाद्या समाजासाठी पवित्र मानली गेलेली रामायणाची एखादी रचना विविध कारणांमुळे इतरही समाजाला भावली, तर तो समाज त्या रचनेची अगर त्यातील काही भागाची त्यांच्या परिस्थितीनुरूप फेरमांडणी करत असे. काही लोकांच्या श्रध्दा एखाद्या विशिष्ट रचनेच्या पावित्र्याशी निगडित असतीलही पण याचा अर्थ असा नव्हे की, इतर रचनांचा अभ्यास रद्दबातल करावा.

काही वेळेला इतिहासातील एखादाच कालखंड निवडला जातो आणि त्याचे वर्णन अतिरंजितपणे एकाच वरचढ संस्कृतीचा सर्वोत्तम कालखंड म्हणून केले जाते. ही राष्ट्रीय चळवळीच्या गाभ्याची कल्पना बनते. मग जेव्हा राष्ट्र निर्माण होते, तेव्हा प्रश्न उभे राहतात. ही एकच वरचढ संस्कृती अर्थातच बहुसंख्याकांचीच असते. आता तिला पहिल्यासारखा दर्जा असण्याची गरज नसते. राष्ट्र धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी असते किंवा त्या दिशेने त्याची वाटचाल चालू असते. अशा वेळेस आपण आणि इतर संस्कृतीही समान पातळीची मागणी करतात. पण वरचढ संस्कृतीची भलावण करणारा एक गट त्या संस्कृतीच्या पूर्वीच्या दर्जाचा पाठिराखा असतो. पण इतर संस्कृतीनाही स्थान देत समाविष्ट केलेच पाहिजे. राष्ट्रवादाच्या प्राथमिक पातळीच्या आधी आदिवासी, दलित, मध्यमवर्ग, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारसी यांना राष्ट्रीय संस्कृतीत योग्य ते स्थान दिले गेले नाही. बहुविधता व इतिहासातील त्यांचा वाटा मान्य करावाच लागेल.

हरियाणातील भिराना येथे मिळालेला हरप्पा कालखंडातील करड्या खनिजापासूनचा शिक्का.

विविध राष्ट्रीयत्वे आणि अस्मितांचे राजकारण

अनेक प्रकरणांत एकसाची संस्कृतीचा शोध घेणारी प्रवृत्ती आढळते, जी प्रभावशाली व्यक्तींकडून प्रकट होते किंवा अशांकडून, ज्यांना कोणत्याही प्रकारच्या सत्तेची अपेक्षा असते. ही निखळ राजकीय शक्तीच असते. ही काही सांस्कृतिक संदेश किंवा भावना नसते. तिची घोषणा विशिष्ट प्रकारचा शक्तिशाली गट किंवा ज्यांना सत्तेची आकांक्षा आहे, त्यांच्याकडून केलेली असते. समाजातील एका विशिष्ट समाजगटाचा, ज्यांच्याकडे अतिशय शक्तिशाली आणि प्रभावशाली स्थान काबीज करण्याची क्षमता आहे त्या समाजगटाचा हा दृष्टिकोन अथवा भूमिका असते, हा स्वयंघोषित दावा असतो. तो इतिहासाच्या अभ्यासाला हानिकारक ठरतो.

बरोबर आहे. संकुचितपणामुळे इतिहासाच्या अभ्यासाला हानी पोहोचतेच. पण आमचा काळ त्याला अपवाद आहे आणि अभ्यासाच्या अत्युच्च पातळीवर विविधतेचा शोध घेतला जातो. पण मला असे काही सांगायचे नाही की, इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात आज अस्तित्वात असलेले सर्व समाज शोधले गेले होते आणि त्यांना समान स्थान दिले गेले होते. एकाच समाजाचा इतिहास लिहिणे हाच उद्देश जर नसेल, तर इतिहासकारांनी इतर सर्व समाजांना दुर्लक्षित करीत आपले लक्ष्य फक्त एकाच समाजावर केंद्रित करू नये, असा याचा अर्थ आहे. विविधतेत एकमेकांना जोडणारे दुवे असतातच. 19व्या शतकातील सामाजिक सुधारणांच्या चळवळीत हे दिसून येते. त्याचे कर्ते सारख्याच सामाजिक पार्श्वभूमीतून आले होते व त्यांनी हिंदू धर्माचे स्वरूप बदलण्यासाठी ज्या सुधारणा सुचविल्या, त्या प्रदेशा-प्रदेशानुसार फार काही वेगळ्या नव्हत्या; पण त्या सुधारणांची निवड आणि मांडणी मात्र त्या-त्या प्रदेशाच्या संस्कृतीनुसार होती, हे इतिहासाच्या चित्रात आणले पाहिजे.

19व्या शतकातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींनी भारतीय धर्मांचे हे स्वरूप काही प्रमाणात तरी बदलले. 20व्या शतकात जेव्हा अभ्यासकांनी या बदलाचा अभ्यास सुरू केला तेव्हा त्या सुधारणांना पाठिंबा देणारे जे सामाजिक विभाग होते त्यांच्यातही बदल झाल्याचे त्यांना आढळले, साहजिकच त्यांचे लक्ष उच्च जातींवर केंद्रित झाले, कारण या सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा मोठा परिणाम उच्च जातींवर झाला होता. इतर जातींवरही झाला होता, पण मुख्यत: वरच्या जातींवर तो जास्त होता. त्यामुळे चळवळीच्या प्राथमिक अवस्थेत समाजातील या विभागाकडे चळवळीचे नेतृत्व आपसुकपणे आले. हा विभाग राष्ट्रवादाशी परिचित होता. त्यामुळे वसाहतवाद्यांच्या गच्छंतीनंतर सर्व काही हातात घेण्यासाठी तो तयारच होता. काही इतिहासकारांनी सामाजिक स्तरावर खालच्या बाजूस असलेल्या गटांच्या राष्ट्रवादी भावनांचा शोध घेणे सुरू केले. त्यातूनच तळागाळातील गटांच्या अभ्यासाची सुरुवात झाली. त्याकडे लोकांचे लक्षही मोठ्या प्रमाणावर वेधले गेले आणि दलित, आदिवासींसारखे सामाजिक स्तरावरील अगदी खालचे मानले गेलेले गटही राष्ट्रीय चळवळीत विविध प्रकारे सहभागी झाले होते, हे मान्यही केले गेले.

कोणत्या गटाने राष्ट्रवादाला धार्मिक राष्ट्रवादाकडे वळवत त्याचा संबंध आजच्या अस्मितेच्या प्रश्नांशी जोडला? आणि याला विरोध करीत राष्ट्रवाद धर्मनिरपेक्षच असला पाहिजे अशी मांडणी कोणी केली? असेही इतर प्रश्न विचारले गेले. या सर्वावरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे राष्ट्रवादाचा जो दावा केला जातो, त्यातच किती विविधता आहे आणि इतर वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करायला गेलो, तर राष्ट्रवादाच्या घुमटाखाली काय काय येईल, याची चर्चा अभ्यासकांच्या स्तरावर होत राहते.

पण सर्वसामान्यांच्या स्तरावर याचे प्रतिबिंब पडत नाही कारण राष्ट्रवादाचा चिकित्सक अभ्यास करणार्‍या अभ्यासकांना राजकारणी आणि सर्वसामान्य जनता देशभक्त म्हणून लेखतच नाही. जर धार्मिक राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद यात फरक करायचा, तर आज प्रचलित असलेला धर्मनिरपेक्षतेचा जो अर्थ मानला जातो, त्यापेक्षा धर्मनिरपेक्षतेची नेमकी व्याख्या केली पाहिजे.

या ठिकाणी एका वेगळ्या वैशिष्ट्यामुळे इतिहासाचे संशोधन गुंतागुंतीचे बनते. इतिहास हा राष्ट्रवाद आणि मूलतत्त्ववादाचा अत्यावश्यक घटक असेल तर हे विविध धार्मिक, भाषिक किंवा वांशिक राष्ट्रवाद वेगवेगळ्या इतिहासाचे दावे करण्यास सुरुवात करतात आणि आज अस्मितेच्या राजकारणाची हीच मागणी आहे.

धर्मनिरपेक्षतेची व्याख्या

वसाहतवादानंतरच्या भारतातील धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत विविध संस्कृती आणि बहुविधता यांना मिळालेली मान्यता, हे मूलभूत घटक बनले होते. कारण इतर गटांच्या दुराभिमानी, संकुचित दाव्यांच्या मान्यतेला ओहोटी लागली होती. अर्थात, एक समस्या आहे, आपण धर्मनिरपेक्षता ही संज्ञा कशा प्रकारे वापरात आणतो? भारतीय दृष्टिकोनातून धर्मनिरपेक्षतेबद्दल केवळ धर्माचे सहअस्तित्व इतपतच सर्वसाधारणपणे बोलले जाते. मला वाटते, ते फारच अपुरे आहे. सर्वच पंथानी परस्परांचा आदर करण्याच्या आणि अधिक नेमकेपणाने दुसर्‍या व्यक्तीच्या पंथाचा आदर करण्याच्या गरजेसंदर्भातील अशोकाचे म्हणणे सांगणार्‍या अशोकाच्या शिलालेखांचा उल्लेख नेहमीच केला जातो. त्यामुळे हल्लीच्या काळात असे म्हटले जाते, भारतीय संस्कृती ही अशी संस्कृती आहे, जेथे सर्व धर्म नांदतात आणि सर्व धर्मांचा आदर केला जातो. अर्थात, सर्व धर्मांना समान स्थान असण्याचा ठाम आग्रहही असला पाहिजे. तो जोपर्यंत नसेल तोपर्यंत असे म्हणणे पुरेसे नाही की सर्व धर्मांचे सहअस्तित्व म्हणजे धर्मनिरपेक्षता. जर आपण धर्मांना बहुसंख्य समाज आणि अल्पसंख्य समाज यात विभागले; आणि असे आपण न चुकता विभागतो, तर ही विभागणी समान स्थानाची कमतरताच दर्शविते.

दुसरी समस्या आहे, धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेचा प्रत्यक्ष अर्थ काय, याचा शोध. युरोपात व कॅथॉलिक चर्चकडून राजकीय नियंत्रणाचा होत असलेला विस्तार आणि नागरी कामे आणि संस्था, याबाबतचे व कॅथॉलिक चर्चचे अधिकार याबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. चर्चने या संस्था चालविता कामा नये आणि त्या प्रामुख्याने नागरी समाजाने अथवा शासनाने चालविल्या पाहिजेत असे सांगितले गेले. पण हा कंगोरा आपण आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत आणू शकलो नाही कारण आपल्याकडच्या कोणत्याच धर्मात संस्थांवर नियंत्रण ठेवणारे चर्च नव्हते. पण आपल्याकडील सामाजिक संस्थांवर कर्मकांडे आणि जातींद्वारा धार्मिक नियंत्रण ठेवले गेले; विशेषत: उच्च जातींच्या संदर्भात हे घडले.

धर्मनिरपेक्षतेला तिच्या तिच्या जागी ठेवा, अशी वकिली विद्वानांनी केली आहे. याचा अर्थ आहे, धर्माला वगळण्यात आणि समाजाचे धर्मनिरपेक्षकीकरण करण्याला आपल्या समाजात खूपच मर्यादा आहेत. पण मी असे म्हणेन, धर्मनिरपेक्षतेबद्दल जसे म्हटले आहे, तसे धर्मालाच त्याच्या जागी ठेवा आणि फक्त धर्मच राजकारणात, समाजात आणि सामाजिक संस्थात एकमेव वरचढ घटक होणार नाही, याची तजवीज करा. समाजाची अस्मिता खुली असली पाहिजे.

म्हणजे तुम्ही विविध अस्मिता असल्या पाहिजेत, असे म्हणत आहात काय?

मी ‘खुली अस्मिता’ हा शब्द प्रयोग केला. कारण योग्य लोकशाही प्रक्रियेत कायमच्या बहुसंख्य समाजाचा किंवा अस्मितांचा वरचढपणा असता कामा नये. जो मुद्दा चर्चेत आहे त्या प्रत्येक मुद्द्याच्या मागे कोण बहुसंख्येने उभे आहे, हे पाहिले पाहिजे. समजा जमीन सुधारणेसारखा मुद्दा आहे. लोकांचा एखादा गट एकत्र येईल आणि त्या विषयावर बहुमत बनवेल. दुसरा शाळातील शिक्षणासंदर्भातला मुद्दा आहे, त्यासाठी वेगवेगळे गट एकत्र येऊन बहुमत बनवतील. काही वेळा यातील त्यात आणि त्यातील यात असेही होईल; पण दरवेळेस नवीन लोक एकत्र येतील. त्यामुळे बहुमत पूर्वनिश्चित असणार नाही, ते प्रवाही असेल आणि लोकशाहीत ते तसेच असले पाहिजे. जेव्हा एखादा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता, याबद्दल बोलत असतो तेव्हा तो अशा व्यवस्थेबद्दल बोलत असतो, ज्यात विविध अस्मितांचे सहअस्तित्व आहे. पण ते प्रवाही आणि बहुविध आहे आणि जी घटना चर्चेत आहे, त्या घटनेची ती मागणी आहे म्हणून ते एकत्र आलेले आहेत. धर्मनिरपेक्ष समाजात या अस्मिता आक्रमक धार्मिक अस्मितांसारख्या नसतात. जर तुम्ही अजूनही बहुसंख्य समाज आणि अल्पसंख्य समाज याच भाषेत बोलणार असाल, तर तुम्ही धर्मनिरपेक्षतेबाबत बोलू शकणार नाही. ही विसंगती आहे आणि तिला मान्यता देता कामा नये.

जेव्हा आपण धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा दावा करतो, तेव्हा आपली कृती ठामपणे सर्वसमावेशकच असली पाहिजे. पण दुराभिमानी आणि दूर सारणार्‍या धोकादायक प्रवृत्तींची चलती आज दिसते आहे.

धार्मिक समाजाच्या म्हणजे जो समाज धर्माच्या नावाने ओळखला जातो, त्या समाजातून इतर धर्माचे लोक आपसुकपणेच वगळले जातात.

हरप्पाच्या प्राथमिक कालखंडातील सजवलेले लाल
रंगातील भांडे. (राजस्थान-कालीबंगन)

धर्माची व्याख्या

आणि त्याच वेळेस आपण असे मानून चालतो की, आपण महान, पुरातन काळापासून खूपच सुसंस्कृत आहोत आणि आपण भारतीय भलतेच सहिष्णू आहोत. अर्थात, त्याच वेळेस अस्पृश्यता पाळत भारतीयांच्या मोठ्या विभागाला त्यांच्या मूलभूत मानवी अधिकारांपासून, प्रतिष्ठेपासून आपण वंचित करत असतो.

धर्माची व्याख्या करताना माझ्यासमोरही हीच समस्या आहे. जेव्हा एखादा हिंदूची व्याख्या देतो तेव्हा ती सर्वसाधारणपणे उच्च जातींतील लोकांच्या संदर्भात असते. त्या व्याख्येचा आधार अर्थातच त्या गटाच्या ग्रंथातीलच असतो. पण हिंदू असो, शीख असो, मुस्लिम किंवा ख्रिश्चन असो क्वचितच एखादा त्याच्या धर्मातील ग्रंथांशी परिचित असतो, बाकी बहुसंख्य जरी त्या-त्या धर्माचे पाईक असतात तरी फारच कमी प्रमाणात त्या ग्रंथांशी परिचित असतात. त्यांच्यासाठी धर्म ही वेगळीच चीज असते. प्रत्यक्षात ते आपणच निर्माण केलेला धर्मच पाळत असतात. ते पूजत असलेल्या देवतांची निवड त्यांची स्वत:ची असते. जनगणनेत ते त्यांची नोंद भले हिंदू, मुस्लिम अशी करून घेत असतील; पण ते त्यांच्या स्वत:च्या धर्माशी निगडित असतात. इतिहासात हे असे घडत असावे, असे मला वाटते. त्यांचे धर्म आणि श्रध्दा निर्धारित करण्यासाठी ते ग्रंथांवर किंवा चालीरितींवर किती प्रमाणात अवलंबून असतात, याचा धांडोळा जर धर्माच्या इतिहासकारांनी घेतला तर ते खूपच उपयुक्त ठरेल.

धर्माच्या गाभ्याची, सूत्रबध्द धार्मिक मांडणी समाजाच्या वरच्या वर्गाशी निगडित आहे. अगदी अलिकडील काही काळात आपण दलित गटांच्या आकांक्षा आणि सामाजिक स्थिती याबाबत सजग झालेलो आहोत. आपला समाज खूपच सहिष्णू आहे, हे सांगायला आपण आघाडीवर असतो; पण आपण सहिष्णू नाही, आपण अहिंसकही नाही.

राष्ट्रवादाचा उदय होताना जो पारंपरिक परंपरांवर भर देण्यात आला, त्यातून अहिंसा आणि सहिष्णुता या दोन्ही संकल्पनांना घोषणा म्हणून खूपच लोकप्रियता लाभली. त्या घोषणांनाच महान समजले गेले आणि त्यांना मूल्यांचे स्थान प्राप्त झाले व मग त्याचा उपयोग आपल्यावर जे राज्य करण्यासाठी आले होते, त्यांच्यापासून आपली मूल्ये कशी वेगळी आहेत हे दाखवण्यासाठी केला जाऊ लागला. भारतीय अध्यात्मात अहिंसा आणि सहिष्णुता अंगभूतच आहेत पण पाश्चात्यांच्या भौतिकवादी संस्कृतीत मात्र त्याची कमतरता आहे, असा दावा केला जाऊ लागला. पण भारतीय इतिहासात डोकावले आणि त्या-त्या काळात उपखंडात काय चालले होते याचा शोध घेतला तर ज्याप्रमाणे त्या-त्या काळात जगातील इतर अनेक भागात ज्याप्रमाणे असहिष्णुता आणि हिंसक स्पर्धा होती, त्याचप्रमाणे ती भारतीय उपखंडातही होती. आणि हे सर्व अरब, तुर्क, मोगल येण्यापूर्वी! इस्लामपूर्व भारतीय कालखंडातील लष्कराच्या आकाराबाबतचे आकडे जरी अतिरंजित असले, तरी शेजारच्या राज्यांच्या हिंसक लढ्याला तोंड देण्यासाठी बर्‍याच मोठ्या सैन्याची गरज भासत, असे हे दर्शवितात. त्याचबरोबर युध्दाचे गौरवशाली वर्णन करणारे साहित्यही मोठ्या प्रमाणावर आहे.

आपण जेव्हा भूतकाळातील धार्मिक गटांबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला वाटते, हे सर्व गट नीटनेटके, एकसाची गट असावेत. पण ते तसे नव्हते. संख्येने ते बरेच होते. मला जर बरोबर आठवत असेल, तर रामकृष्ण परमहंस देव जेव्हा हिंदू असा निर्देश करीत तेव्हा ते संप्रदायांबद्दलच बोलत. या संप्रदायात स्पर्धा, मिश्रण, संवाद होतच होता. ही संप्रदायांची विविधता लोकप्रिय दृष्टिकोनात दबली गेली आहे. ती विविधतेची प्रतिमा कशा पध्दतीने लोकांपर्यंत घेऊन जाता येईल? या माहितीचा फैलाव होण्यासाठी इतिहासाची काय मदत होईल?

इतिहासाच्या अभ्यासक्रमामधील धर्माचा इतिहास शिकवायचा तर तुम्ही धर्म समाजात कसा कार्य करतो, याबद्दलची वस्तुस्थिती फक्त शिकवू शकाल. नियमाप्रमाणे धर्माचा इतिहास धर्मशास्त्रापेक्षा वेगळा आहे. इतिहास काही फक्त ग्रंथांवरच प्रकाश टाकत नाही. पण धर्मशास्त्राचा आधार मात्र ग्रंथच असतो. इतिहास, धर्माचा प्रत्यक्ष व्यवहार, धर्माची कामगिरी, धर्माला असलेला आश्रय, यावरही प्रकाश टाकतो. त्याचबरोबर इतिहास धर्माच्या पाठिराख्यांचे समाजशास्त्र आणि त्याच्या संस्थांची रचना यांचा अभ्यास करतो आणि धर्माला का पाठिंबा मिळाला, याचे विवेचन करतो. पण हे एक विषय म्हणून आपण शिकवत नाही.

पण आपण हे शिकविले पाहिजे. कारण धर्म आणि समाज यांचे परस्परावलंबित्वाचे स्वरूप धर्म आणि समाज हे दोन्ही समजून घेण्याचा मूलभूत आधार आहे. तशा पध्दतीचा धर्माच्या इतिहासाबद्दलचा अभ्यासक्रम जर शिकविला, तर लोकांना धर्माचे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक कंगोरे लक्षात येतील. धर्म आणि धर्माला समजून घेणे म्हणजे फक्त ग्रंथ आणि अमूर्त मूल्यांपुरते मर्यादित नाही तर राजकारण्यांनी राजदरबारात, अधिकृतता असलेल्या विशेष सामाजिक संस्थांमध्ये, तीर्थक्षेत्रांमध्ये, जमीन मालकी आणि व्यापार यासारख्या आर्थिक बाबींमध्ये आणि हुकूम देण्याचा अधिकार असणार्‍यांकडून धर्म कशा प्रकारे वापरला जातो, हे समजून घेणे होय.

धर्म लोकांच्या जगण्यापासून दूर आणि वेगळा नाही. धर्म म्हणजे अनेकांच्या भावनिक जीवनातील धडधड आहे तर बाकीच्यांच्या जीवनात धर्माला काही फार स्थान नाही. मात्र धर्माच्या राजकीय आणि सामाजिक प्रकटीकरणामध्ये एका धार्मिक गटाची दुसर्‍या धार्मिक गटाशी असलेली वागणूक बर्‍याच वेळेस धर्म निर्धारित करतो. पण राजकीय व सामाजिक प्रेरणांकडे धार्मिक प्रेरणांइतकेच लक्ष दिले पाहिजे. कारण ही वागणूक धर्म वगळता इतर कारणांनीही निर्धारित होते. हे इतिहासात दिसून आलेले आहे. शेवटी सर्व धर्मांनी इतर धर्मांसह समानतेने जगणे शिकलेच पाहिजे आणि स्वत:ला इतरांपेक्षा श्रेष्ठ म्हणवून घेणे थांबवले पाहिजे. जेथे शतकानुशतके धर्म सर्वांत प्रभावशाली राहिला आहे किंवा जेथे आता असे दावे होत आहेत की, त्या धर्मावर भूतकाळात प्रचंड अन्याय झाला तेथे हे सोपे नाही, हे मान्य करावेच लागेल. आधुनिक समाजाला संस्था कशा प्रकारे काम करतात याची असलेली जाण हे संबंध उलगडण्यास योग्य मार्ग काय, हे निश्चित करण्यास मदत करतील, हे मात्र नक्कीच.

उदारमतवादी मूल्यांचा र्‍हास

गेल्या शतकातील अखेरच्या पावशतकात भारतीयांच्यात जे वेगवेगळे दृष्टिकोन, मतभेद आहेत, त्यासंदर्भातील असहिष्णुता वाढत असल्याचे तुम्हाला जाणवत आहे? मी व्यावसायिक इतिहासकारांमधील वादांबाबत नाही बोलत. तेथील वादविवाद सुदृढ आहेत. पण वितंडवादी भारतीय परंपरेबद्दल काय? हल्ली ऐतिहासिक समज असलेला असा वितंडवादी भारतीय हरवला आहे?

नाही. मला जास्त वाईट वाटते, उदारमतवादी मूल्यांच्या होणार्‍या र्‍हासाबद्दल. स्वातंत्र्यानंतरच्या साठहून अधिक वर्षांत उदारमतवाद्यांची संख्या कमीच होत चालली आहे. अक्षरश: ते किरकोळ अल्पसंख्याक म्हणूनच उरले आहेत. हल्ली बहुसंख्य लोक त्यांना सामोरे जावे लागत असणार्‍या प्रश्नांबद्दल चिकित्सकपणे विचार करायलाच धजावत नाहीत. त्यामुळे मला फार अस्वस्थ व्हायला होते. जे-जे त्यांच्यासमोर येते ते मान्य करतात. शिक्षण तरुणांना स्वतंत्रपणे विचार करायला आणि सभोवतीच्या जगाला प्रश्न विचारण्याला प्रोत्साहन देत नाही. जे त्यांना सांगितले जात आहे, त्याला प्रश्न न विचारता किंवा विवेकाने त्यावर विचार न करता ज्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात, त्यावर ते विश्वास ठेवतात आणि हे अतिशय दु:खदायक आहे.

कर्नाटकातील कालबुर्गी जिल्ह्यातील सान्नत्ती येथील शिल्प

वाढती असहिष्णुता

एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या जातात किंवा जाऊ शकतात, या नावाखाली काही ऐतिहासिक संशोधनावर बंदी घातली जाऊ शकते. हा एक अतिशय धोकादायक प्रवाह तयार झाला आहे, तर ही प्रवृत्ती अतिशय घातक आहे.

ही प्रवृत्ती नक्कीच घातक आहे. कारण प्रत्येकाच्या आणि कोणाच्याही भावना वेगवेगळ्या प्रकारे दुखावल्या जाऊ शकतात. आणि हे मूठभर लोक लगेच आम्ही संपूर्ण समाजाच्या वतीने बोलत असल्याचा दावा उच्च आवाजात करतात. समाजातील इतर लोकांना काय चालले आहे, हेच समजत नाही किंवा अनेकजण आपला काहीच संबंध नाही, अशी नुसती बघ्याची भूमिका घेतात किंवा हे गट दहशत माजवून आम्ही तुमच्याच वतीने बोलत असल्याचे भासवून अनेकांना गप्प राहण्यास भाग पाडतात.

पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी, पुस्तके जाळण्याचे प्रकार, यात वाढ होऊ लागली आहे. पुस्तकाचा लगदा बनविणे ही वस्तुतिथी भारतात दिसू लागली आहे.

मुद्दा आहे आपल्या सहिष्णुतेचा. आपण जर खरोखरच सहिष्णू असू, तर आपण याला शांतपणे सामोरे जाऊ. भूतकाळात हे आपण केलेले आहे. जर आपण ब्राम्हण्यवादी ग्रंथांकडे नजर टाकली तर आपल्याला दिसेल की, त्यांच्या ब्राम्हण्यवादी मतांना जर कोणी विरोध केला असेल तर त्यांच्या ग्रंथांतून त्यांनी अतिशय तिरस्कारयुक्त टीका केलेली आहे. त्यांना केवळ नास्तिक किंवा पाखंडी म्हणूनच हिणवले गेलेले नाही, तर सतत त्यांचे उल्लेख महामोहा, फसवा, लबाड, लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारा असे केले आहे. (आजचे हिंदुत्वाचे पाठिराखे असेच आज आमच्यापैकी काही इतिहासकारांना हिणवत आहेत. आम्ही असो अगर नसो, आम्ही मार्क्सवादी असल्याचा ते शिक्का मारत आहेत.) पण जरी अशा शब्दप्रयोगांमुळे अशा व्यक्तींच्या (जैन किवा बौध्द) भावनांना ठेच पोहोचली, तरी त्यांनी विष्णू पुराणासारखे ग्रंथ ज्यात त्यांच्याबद्दल असे शब्द वापरले होत, ते ग्रंथ जाळण्याची अथवा नष्ट करण्याची मागणी केलेली नाही.

आजच्या या वाढत्या वर्चस्ववादी विचारांच्या काळाच्या पार्श्वभूमीवर आपल्या मनाची कवाडे कधीही बंद करू नये, यासाठी तरुणाईला प्रोत्साहन देणार्‍या तुमच्यासारख्या एखाद्या तरी विदुषी आहेत.

ज्ञानप्रसाराला विरोध करणारे नेहमीच वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बघणार आणि त्यांच्याविरोधात जो कोणी उभा राहील, जशी मी नेहमीच त्यांच्या विरोधात उभी राहिले आणि ते केवळ समकालीन वादविवादासाठी नाही, तर पुढील पिढीला त्याचा फायदा व्हावा म्हणून. प्रश्न उपस्थित करण्याची आणि चर्चांची परंपरा पिढ्यामागून पिढ्या चालू राहाणे हे खरोखरच गरजेचे आहे.

या वर्चस्ववादी भूमिकांना वारंवार विचारलेल्या या प्रश्नांतून अनेक इतर कल्पना साकार होतील, ज्याचे समकालीन जग निश्चितच स्वागत करेल.

नक्कीच, प्रश्न विचारण्यावरच ज्ञान अवलंबून आहे, नाही तर आपली मने गोठूनच जातील.

अनुवाद : राजीव देशपांडे

संपर्क : 9969024039

प्रा. रणबीर चक्रवर्ती हे प्राचीन भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विषयातील तज्ज्ञ मानले जातात. प्राचीन काळापासून भारतीय समुद्रावरून होणार्‍या व्यापाराबाबत त्यांचा विशेष अभ्यास आहे. भारतातील आणि भारताबाहेरील प्रतिष्ठित मासिकात त्यांनी बंगालीतून व इंग्रजीतून लिखाण, समीक्षण केलेले आहे. त्यांनी संपादित केलेली आणि लिहिलेली दहा पुस्तके प्रसिध्द आहेत. प्राचीन भारतातील इतिहासाबद्दलची त्यांची तीन पुस्तके बंगालीतून प्रसिद्ध झालेली आहेत. 2011मधील ‘भारतीय इतिहास परिषदे’च्या प्राचीन भारत विभागाचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले होते.