Categories
शाखा वार्ता संविधान

आटपाडी तालुक्यात भारतीय संविधानाचा जयघोष

जानेवारी - २०१६

भारतीय संविधान हाच आपला खरा धर्मग्रंथ. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यापासून भारतीय समाज अजूनही खूप दूर आहे. ही मूल्ये साकारून नवा सुंदर भारत घडविण्यासाठी संविधानाचा गजर आणि आचार व्हायलाच हवा. आटपाडी सारख्या ग्रामीण भागात संविधानाचा गजर घुमला याचे श्रेय फुले, शाहू, आंबेडकर विचारमंच आटपाडी यांना द्यायला हवे.

20 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2015 या कालावधीत या संविधान जनजागृती सप्ताह आटपाडी परिसरात साजरा झाला. संविधान सप्ताहाचे उद्घाटन सांगलीचे महापौर विवेक कांबळे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानात भारतातील सर्व मानवजातीच्या विकासाची मूल्ये असल्याने भारतीय संविधान हाच देशाचा मुख्य ग्रंथ आहे. भारतीयांचे सगळे मूलभूत अधिकार संविधानाने सुरक्षित ठेवले आहेत. या समारंभाचे प्रास्ताविक स्वागताध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश मोटे यांनी तर आभार प्रा.नागेश चंदनशिवे यांनी मानले.

दि.21 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाची प्रक्रिया व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या विषयावर ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत अ‍ॅड.के.डी.शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष सर्जेराव पाटील व सूत्रसंचालन विजय पवार सर यांचे होते. संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉ.आंबेडकरांचा लौकिक असला तरी याच संविधानाच्या माध्यमातून अनेक वर्षे अस्थिर असलेल्या समाजाला स्थिरता देण्याचे काम आंबेडकरांनी केले, अशी भावना शिंदे सरांनी व्यक्त केली.

रविवार दि.22 रोजी या अभियानांतर्गत काढलेल्या रॅलीचे गोपीचंद पडळकर यांनी झरे येथे स्वागत केले. राजेंद्र खरात यांचे हस्ते रॅलीचा प्रारंभ झाला. रॅलीमध्ये संविधानाचा रथ, 395 कलमांचे फलक लावले होते. ही रॅली विठलापूर, दिघंची, गोमेवाडी, करगणी या मार्गाने फिरून राजारामबापू पाटील हायस्कूलच्या मैदानावर तिची सांगता झाली. आयोजन रामदास नाईकनवरे, सुरेश मोटे, दीपक खरात, दीपक पक्षाळे, अक्षय बनसोडे, सुनील भिंगे, बालाजी वाघमोडे आदींनी केले होते.

दि. 22 ला सायंकाळी भारतीय संविधानातील महिला सबलीकरण व वर्तमान स्त्री स्वातंत्र्य या विषयावर चर्चा झाली. अध्यक्ष होत्या सुष्मिता मोटे मॅडम आणि सूत्रसंचालन केले रत्नमाला सावंत यांनी. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.दीपा श्रावस्ती मॅडम म्हणाल्या, भारतीय स्त्रीला ब्राम्हणी व्यवस्थेने क्षुद्र ठरविले होते. तिला परंपरेच्या जोखडात बंदिस्त केले. आंबेडकरांनी या जोखडातून भारतीय स्त्रीची सुटका केली. स्त्री सन्मानित होऊ लागली पण आजच्या स्त्रियांना संविधानाचा आणि सावित्रीबाई फुलेंचा विसर पडू लागलाय, अशी खंत सुषमाताई मोटे यांनी व्यक्त केली.

सोमवार दि.23 नोव्हेंबर 2015 रोजी भारतरीय संविधानातील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्त्वे या विषयावर राहुल कदम (जिल्हा कोषागार अधिकारी) यांनी प्रमुख वक्ते म्हणून विचार मांडले.

भारतीय संविधानाच्या निर्मितीमुळेच भारतातील लोकांना स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, न्यायाचा हक्क आणि अन्य हक्क मिळाले. संविधान नसते तर न्यायावर आधारीत समाजरचना अवघड झाली असती असे कदमसाहेब म्हणाले. या प्रसंगी रवी माडगुळकर यांनी संविधानाने भारतातील विषमता नाकारुन सर्वांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली ही क्रांती होय असे सांगितले.

मंगळवार दि.24 नोव्हेंबर 2015 रोजी प्रा.रामदास नाईकनवरे यांनी देशात असलेल्या धार्मिक मूलतत्त्ववादाला आवरण्यासाठी भारतीय संविधानच अंतिम उपाय असून संविधानाची 100 टक्के अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी परखड भावना व्यक्त केली.

देशात आणि राज्यात जातीधर्माच्या नावाखाली अनेक अन्याय अत्याचार आणि अनिष्ट घटना घडल्या आहेत. अशा अन्यायाविरोधात संविधानाचा वापर करून जनतेला न्याय देण्याची गरज असल्याचे प्रा.नाईकनवरे यांनी स्पष्ट केले. ‘अंनिस’चे सुनील भिंगे यांनी धर्मचिकित्सा करणार्‍या विचारवंतांची हत्या करणार्‍यांचा निषेध केला. डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉ.गोविंद पानसरे हे धार्मिक मूलतत्त्ववादाचे बळी असून देशात असहिष्णुता घोंगावत असल्याची भीती भिंगे सरांनी व्यक्त केली.

दीपक खरात, आटपाडी