महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रौप्य वर्षपूर्ती मागील ऑगस्टमध्ये साजरी केली होती. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनानंतर देखील नेटाने व जोमाने काम करण्याचा आत्मविश्वास आपण कायम ठेवलेला आहे. आता तो आपल्याला गतीमान व प्रभावी करायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या मनांमनात पोचलेला अंधश्रध्दा निर्मूलनाचा विचार आपल्याला भारतात मनामनात पोहचवून संघटीत करावयाचा आहे. मागील 25 वर्षातील संघटीत कार्याचे अधिष्ठान राहिलेल्या चतुःसुत्रीच्या पायाभरणीवर भविष्यातील दशकाच्या चतुःसुत्रीच्या कार्यवाहीसाठी कटिबद्ध व्हायचे आहे, हाच आपला ‘संकल्प 2025’ असणार आहे.
‘महाराष्ट्र अंनिस’ ही समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचा प्रयत्न करणारी संघटना आहे. त्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात कृतीशिल करण्यासाठी ठराविक काल मर्यादेत अनुषंगीक सेवा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न आपला राहिला आहे. असाच प्रयत्न पुढील दशकात संकल्पीत चतुःसुत्रीच्या कार्यवाहीसाठी आपण ठेवणार आहोत. त्यामध्ये अध्यात्मिक बुवाबाजी, फसव्या विज्ञानाबद्दलचे तक्रार निवारण, निरामय मानसिक आरोग्यासाठी ‘मानस मित्र’ सेवा, जातपंचायत तक्रार निवारणासह मिश्र विवाह सहकार्य आणि भारतीय संविधानाच्या मूल्य आशयासह नागरिकत्वाच्या क्षमता विकासाचे कार्यक्रम अंतर्भूत असणार आहेत.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून आपण 26 जानेवारी ते 14 एप्रिल 2016 आणि 14 एप्रिल 2016 ते 2017 दरम्यान ‘बाबासाहेब आंबेडकर’ आणि ‘भारतीय संविधान’ विषयक जोरकस प्रबोधन अभियान महाराष्ट्र अंनिस राबविणार आहे. संविधान बांधिलकी महोत्सव 26 ते 30 जानेवारी 2016 पासून याची आपण सुरूवात करीत आहोत. दलितेतर समुहांपर्यंत बाबासाहेबांचे कर्तृत्व, योगदान, दिशा दिग्दर्शन आणि राज्यातील जनतेपर्यंत भारतीय संविधान अधिक प्रभावीपणे पोचविण्याला आपले प्राधान्य राहणार आहे.
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला 30 महिने, कॉम्रेड गोविंदराव पानरसेंच्या खुनाला 1 वर्ष आणि डॉ. एम. एम. कलबुर्गींच्या खुनाला 6 महिने पूर्ण झाले आहेत. अजूनही खुनाच्या तपासाबद्दल पुरेसे काहीच हाताशी लागलेले नाही. राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीचा फार मोठा अभाव जाणवतो आहे. अशा परिस्थितीत निराश न होता, चिकाटीने व अहिंसक मार्गाने खुनाच्या तपासाचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनतेशी विविध माध्यमातून संवाद करीत राहणे आणि वेगवेगळ्या उपक्रमांतून सरकारवर लोकशक्तीचा दबाव वाढवित राहणे गरजेचे वाटते. ते नव्याने करण्यासाठी आपण कॉम्रेड अॅड. गोविंदराव पानसरेंच्या पहिल्या स्मृतीदिनी – 20 फेब्रुवारीला सर्व जिल्ह्यातून निषेध व संकल्प व्यक्त करण्यासाठी सामुहिकरित्या कार्यक्रम करावयाचे आहेत, त्याच्या तयारीला लागुया!
‘भारतीय कसावर आधारित विवेकवाद’ समाजात रूढ करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे 25 वर्षातील संघटीत कामाचा वेगळेपण व वैशिष्ट्य देशभरातील आणि जगभरातील, धर्मनिरपेक्ष, मानवतावादी, विवेकवादी, व्यक्ती-गट-संस्था-संघटनांना आपल्याकडे आकर्षित करीत आहे. त्याविषयक सुसंवाद करण्यासाठी परराज्यातून मागणी आहे. आपल्यासारखेच कार्य करण्याची इच्छा व्यक्त होत आहे. अशावेळी आपण महाराष्ट्रातील कार्याच्या संचितावर राष्ट्रीय पातळीवर वाढ-विस्ताराचे आव्हान कसे पेलायचे याचाही विचार करावा लागणार आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्याध्यक्ष म्हणून आपणाशी सुसंवाद करण्याचा प्रयत्न ‘कार्याध्यक्ष डायरी’ मधून राहील. तसेच माझ्या कामानिमित्ताने होणार्या फिरस्तीची नोंद ‘भ्रमंती’ मधून तुमच्यापर्यंत दरमहा पोहचविण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्याला आपल्याकडून प्रतिसाद-प्रतिक्रिया व सुचनांच्या रूपाने मिळेल अशी आशा बाळगतो. विवेकाचा आवाज बुलंद करूया!