एका घरातील महिलेने शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून घरात सुख-शांती नसल्याचा समज कुटुंबियांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे मृत महिलेची समाधी बांधण्यासाठी व तिच्या आत्म्याची शांती करण्यासाठी सहावर्षीय बालकाचा नरबळी देण्यात आल्याची घटना कळंब (जि. उस्मानाबाद) पोलिसांनी उघडकीस आणली आहे.

कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा 26 जानेवारी रोजी शाळेत ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून परत घरी आला होता. नंतर तो दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर गेला. मात्र तो परत न आल्याने सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर त्याच्या आईने कृष्णा हा बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानंतर दुसर्या दिवशी कृष्णाचा मृतदेह गावातील गोवर्धन टेकाळे यांच्या शेतात आढळला. कृष्णाच्या डोक्यावर रुमण्याने वार केल्याचे निदर्शनास आले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी नरबळीतून हा प्रकार झाल्याचा संशय आल्याने तपासाची चक्रे फिरवून 4 फेबु्रवारी रोजी पुणे येथील तांत्रिक लखन चुडावकर व गावातील अन्य दोघांना अटक केली होती. तेव्हापासून पोलीस हे खबर्याकडून माहिती घेत होते. संशयित म्हणून 9 एप्रिल रोजी गावातीलच बळी दिलेल्या मुलाची आत्या द्रौपदी पोळ (वय 42) हीस पोलिसांनी अटक केली होती. दुसर्या दिवशी साहेबराव इंगोले यास अटक केली. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर चौकशीदरम्यान हा प्रकार नरबळीचा असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील नेवते करीत आहेत.
बालकाचा नरबळी देणार्या आरोपीला कठोर शिक्षा करावी! – अंनिस कळंब शाखेची मागणी!
कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील कृष्णा इंगोले या बालकाचा नरबळी देणार्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कळंब शाखेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात समितीच्या वतीने पोलीस निरीक्षकांना रविवार दि. 16 एप्रिल रोजी निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, 26 जानेवारी 2017 रोजी पिंपळगाव (डोळा) येथील सहावर्षीय कृष्णा इंगोले या बालकाचा भोंदूबाबासह गावातील अन्य दोघांनी नरबळी दिल्याची घटना घडली. अंधश्रद्धेतून व अघोरी मानसिकतेतून मांत्रिकाच्या सांगण्यावरून हा नरबळी देण्यात आला. या प्रकाराचा महाराष्ट्र अंनिस निषेध करते. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून, साक्षीपुराव्याचा पाठपुरावा करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी; तसेच प्रबोधनात्मक कार्यात समिती सहकार्य करेल. निवेदनावर समितीचे राज्य सरचिटणीस प्रा. किरण सगर, कळंब शाखेचे सचिव प्रा. बालाजी राऊत, कार्याध्यक्ष किसन लोंढे, संतोष लिमकर, प्रा. जगदीश गवळी, प्रा. साजेद चाऊस, अरविंद शिंदे, विश्वनाथ सावंत, प्राजक्ता पाटील, प्रा. अनिल जगताप, बी. आर. आवाड, विक्रम मायाचारी, अॅड. शकुंतला फाटक, प्रा. सुरेश धावारे यांच्या सह्या आहेत.
– प्रा. किरण सगर