Categories
जादुई वास्तव

विविध प्रकारचे प्राणी निर्माण कसे झाले?

मे - २०१७

प्रकरण 3

ही जीवसृष्टी कशी निर्माण झाली ते सांगणार्‍या कितीतरी लोककथा, मिथककथा आहेत. जीवसृष्टीची वैशिष्ट्ये कशी निर्माण झाली हे सांगणार्‍या तर कितीतरी कथा. खारीच्या पाठीवर रेघा का, मोराला पिसारा कुठून आला, पोपटाचा रंग हिरवा कसा झाला या सार्‍यांचा खुलासा करणार्‍या कथाच कथा आहेत. पण इतक्या प्रकार-प्रकाराचे आणि आकार-उकाराचे प्राणी कसे अस्तित्वात आले ते सांगणार्‍या कथा फारशा नाहीत. ज्यूंची ‘टॉवर ऑफ बॅबल’ म्हणून एक कथा आहे. इतक्या विविध भाषा कशा निर्माण झाल्या ते यात सांगितलं आहे. पण जीवांच्या विविधतेबद्दल अशी कथा सापडत नाही. ज्यू कथेनुसार, कोणे एके काळी जगातली सर्व माणसं एकच एक भाषा बोलत होती. आपापसातल्या उत्तम संवादामुळे सर्वांनी मिळून एक उंचच उंच मनोरा बांधायचं ठरवलं. अगदी स्वर्गापर्यंत पोचणारा मनोरा! हे लक्षात येताच देवाची पाचावर धारण बसली. एकमेकांची भाषा समजत असेल तर आज मनोरा बांधताहेत, उद्या काय करतील याचा नेम नाही. मग देवाने चक्क प्रत्येकाला वेगवेगळी भाषा दिली. संवाद थांबला, अर्थात मनोरा होऊच शकला नाही. पण तेव्हापासून देश-प्रदेशागणिक वेगळीच भाषा बोलली जाऊ लागली आणि परमुलखातल्या लोकांचं बोलणं, आपल्याला मुलखाचं परकं, अर्थशून्य वाटू लागलं.

सजीवांच्या उत्क्रांतीची आणि भाषांच्या उत्क्रांतीची जातकुळी एकच आहे. त्यामुळे भाषांसारखीच सजीवांबद्दल अशी काही उत्क्रांती कथा आहे की काय अशी मला उत्सुकता होती. पण एवढे तर्‍हेतर्‍हेचे प्राणी का? किंवा एवढं जैववैविध्य का? या प्रश्नाचं उत्तर देणारी कथा मला तरी आढळली नाही. आपल्या आसपासचे वेगवेगळे प्राणी, पक्षी आपल्याला अगदी सहज ओळखता येतात, अगदी बारकाव्यांसहित. 1920 साली, अर्न्स्ट मायर या जर्मन शास्त्रज्ञाने, न्यू गिनी मधील पक्ष्यांची सूची तयार केली. सखोल संशोधनाअंती त्यानी 137 जाती नोंदवल्या. पण तिथल्या स्थानिक भाषेत त्यातल्या 136 पक्ष्यांना वेगवेगळी नावं होती हे पाहून तो अचंबित झाला!

पुन्हा एकदा कथाकथनाकडे वळूया. उत्तर अमेरिकेतील होपी लोक असं मानतात की, त्यांच्या कोळीण देवतेनं (जाळं विणणारा कीटक कोळी, जाळ्यात मासे पकडणारा नाही) आणि ‘तवा’नी (म्हणजे सूर्यदेवाने) मिळून द्वंद्वगीत गायला सुरुवात केली, परिणामी पृथ्वी आणि त्यावरील जीवसृष्टी निर्माण झाली. कोळीणदेवीने मग सूर्याकडून ‘कल्पने’चे धागे घेतले आणि त्यातून मासे, पक्षी असे सगळे प्राणी विणून काढले.

उत्तर अमेरिकेतल्याच पुएब्लो आणि नवाजो टोळ्यांमध्ये थोडीशी उत्क्रांतीसारखी कल्पना मांडणारी कथा आहे. सजीव सृष्टी ही, एखाद्या कोंबासारखी, टप्प्याटप्प्यांनी वाढत गेली, असं हे लोक मानतात. पहिल्या, म्हणजे लाल जगातून, कीटक वर चढले, ते दुसर्‍या, म्हणजे निळ्या जगात पोचले. तिथे आधीच पक्षी राहत होते. पण आता तिथे जागा पुरेना तेव्हा हे दोन्ही गट आणखी वरच्या, म्हणजे पिवळ्या जगात आले. इथे माणसं आणि अन्य प्राणी होते. पण इथेही गर्दी झाली आणि शेवटी सगळेच चौथ्या, म्हणजे काळ्या-पांढर्‍या, दिवस-रात्रीच्या जगात आले. देवदयेनं इथल्या चलाख लोकांना शेती करता येत होती. त्यांनी या पाहुण्यांनाही ते तंत्र शिकवलं आणि ते सारे सुखाने नांदू लागले.

यहूद्यांच्याही दोन निर्मितीकथा आहेत. त्यात जैववैविध्याची नोंद घेतली गेली आहे; पण या विविधतेचं कारण त्यातही सांगितलेलं नाही. एका कथेनुसार सारी सृष्टी देवाने सहा दिवसात निर्माण केली. पैकी पाचव्या दिवशी मासे, देवमासे, समुद्रातले आणि हवेत विहरणारे सारे जीव त्याने जन्माला घातले. सहाव्या दिवशी माणूस आणि अन्य भूचर निर्माण केले. इथे सजीवांची प्रजा आणि प्रकार यांचा ओझरता उल्लेख आहे. भाषाही मोठी ओघवती आणि रसाळ आहे; पुढे देवाने शब्द उच्चारले ‘जलांमध्ये जीवजंतूंचे थवेच्या थवे उत्त्पन्न होवोत आणि पक्षी पृथ्वीच्या वर आकाशात विहार करोत.’ त्यानुसार सागरातील प्राणी, जलचर, पक्षी निर्माण झाले. देवाने त्यांना आशीर्वाद दिला, ‘फलद्रूप व्हा. वृद्धी पावा.’ हे पाचव्या दिवशी घडले. मग देवाने शब्द उच्चारले, ‘गुरेढोरे, सरपटणारे प्राणी, जमिनीवरील प्राणी, वन्यपशू जे अस्तित्वात येवोत’ आणि तसेच घडले. मग देवाने जमिनीवरील माती घेऊन त्याचेच प्रतिरूप असा मानव निर्माण केला आणि जलचर, पक्षी, पशू व सरपटणार्‍या प्राण्यांचे अधिपत्य त्याला दिले. मानवाच्या नाकपुड्यातून त्याच्यात आत्मा किंवा ‘प्राण’ फुंकला आणि आशीर्वाद दिला, ‘फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. जलचर, पक्षी, पशू यांच्यावर अधिकार गाजवा. प्रत्येक वनस्पती, प्रत्येक फळझाड तुमचे अन्न होईल. प्रत्येक पशू, प्रत्येक पक्षी; तसेच सरपटत जाणारे प्राणी यांना अन्न म्हणून मी हिरवी वनस्पती देत आहे.’ हे सर्व सहाव्या दिवशी घडले.

अनेक प्रकारचे प्राणी आहेत एवढ्यावरच हे कथन थांबतं, ते का आहेत, याचा पत्ता लागत नाही.

दुसर्‍या मिथकाप्रमाणे माणसाच्या करमणुकीसाठी देवाने हे जीव जन्माला घातले. सुरुवातीला त्या रमणीय नंदनवनात फक्त अ‍ॅडमच होता, एकटा जीव; पण नंदनवनात एकटा राहणारा अ‍ॅडम खूप कंटाळला होता, तेव्हा एकटेपणा वाईट, असा विचार करून देवाने सर्व भूचर आणि विहंग बनवले आणि आणले त्याच्या समोर त्यांना तो काय नावे देतो हे पाहण्यासाठी.’

खरंच, इतक्या प्रकारचे जीव का बरं आहेत?

सर्व प्राणिमात्रांना नावं ठेवण्याचं. त्याचं बारसं करण्याचं अ‍ॅडमचं काम, त्या कथेकरी यहुद्यांच्या कल्पनेपेक्षा कितीतरी किचकट होतं. आजवर दोन कोटी जीवजंतूंचं जीवशास्त्रीय ‘बारसं’ झालं आहे आणि अजून यांच्या काही पट बाकी आहेत!

दोन प्राणी हे एकाच जातीचे आहेत हे कसं ठरवलं जातं? नर-मादी त्यांच्या बीजपेशींचे मिलन आणि पुढे जनन, असा मामला असेल तर काम सोप्पं आहे. याला लैंगिक पुनरुत्पादन (Sexual reproduction) म्हणतात. ज्या प्राण्यांच्या नर-मादी मिलनातून संतती प्राप्त होते ते एकाच जातीचे समजले जातात. यातही काही काठावरची, धड ना इकडे धड ना तिकडे, अशी मंडळी आहेत. घोडा आणि गाढव यांच्या संकरातून खेचर जन्माला येतं, पण ते वांझ असतं. म्हणूनच संकर शक्य असूनही घोडा आणि गाढव वेगवेगळ्या जातीतील समजले जातात. घोडे आणि कुत्री मात्र सरळसरळ दोन जातींची आहेत. ते मिलनाचा प्रयत्नही करत नाहीत आणि केलाच तर फलनिष्पत्ती शून्य असेल. अगदी वांझोटी संततीही त्यांना होणार नाही. पण ‘अल्सेशियन’ आणि ‘लॅब्रेडॉर’ हे मात्र ‘कुत्रे’च आहेत. दोन्हींचा संकर संभव आहे. संतती संभव आहे. आणि होणार्‍या संततीसही पुढे प्रजोत्पादन संभव आहे.

जीवशास्त्राने प्रत्येक जीवाला एक शास्त्रीय नाव दिलेलं आहे. हेच ते ‘जीवशास्त्रीय बारसं.’ हे नाव दोन लॅटिन शब्दांचं मिळून बनलेलं असतं आणि छापताना तिरक्या टाईपात छापलेलं असतं. तसा दंडक आहे. पहिला शब्द हा त्या-त्या जीवाची ‘प्रजाती’ (Genus) दर्शवतो, आणि दुसरा ‘जाती’ (Species). जाती हा प्रजातीतला उपप्रकार आहे. म्हणजेच प्रजाती हा अनेक जातींचा समूह आहे. यांची ही नावं अगम्य वाटली तरी अर्थवाही असतात. माणसाचं शास्त्रीय नाव आहे केो Homo sapiens (माणूस हुशार), हत्तीला म्हणायचं Elephas maximus (हत्ती मोठ्ठा). यात Homo, Elphas या प्रजाती आहेत आणि sapiens, maximus या जाती आहेत. वाघोबाला म्हणायचं Panthera tigris. सिंह आहे anthera leo, बिबट्या आहे Panthera pardus तर जग्वार आहे Panthera onca. आपल्या Homo या प्रजातीतली ‘माणूस’ (Homo sapiens) ही एकमेव जाती आज शिल्लक आहे. होमो ईरेक्टस (Homo erectus) आणि होमो हॅबिलीस (Homo habilis) हे आपल्या प्रजातीचे, पण अन्य जातीचे जीव. एके काळी हे होते. आज नष्ट झाले आहेत. त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे आपल्याला जीवाष्मांच्या रूपात आढळतात. मानवसदृश अन्य जीवांचेही जीवाश्म सापडतात. हे तर ‘होमो’ या प्रजातीतही धरता येत नाहीत. त्यांची ‘ऑस्ट्रेलोपीथेक्स’ ही भिन्न प्रजात आहे. ऑस्ट्रेलोपिथेक्स या प्रजातीच्या आफ्रिकानस (africanus) आणि अफेरेन्सीस (aferensis) या दोन जाती. नावातल्या ‘ऑस्ट्रेलिया’चा सध्याच्या ऑस्ट्रेलिया देशाशी सुतराम संबंध नाहीये. ऑस्ट्रेलिया म्हणजे ‘दाक्षिणात्य’. ऑस्ट्रेलिया देशाच्या नावाचं मूळ हे आहे.

अनेक मिळत्याजुळत्या जातींची एक फॅमिली’ (कुटुंब) बनते. ‘Felidae’ ही मार्जार फॅमिली. यात आहेत सिंह, बिबटे, चित्ते, वाघ आणि (वाघाची मावशी) मांजरे, वगैरे. अनेक फॅमिली मिळून बनते एक ‘ऑर्डर’ (गण). कुत्रं, मांजर, अस्वल, मुंगूस, तरस हे सारे कार्निव्होरा या ऑर्डर’चे पण वेगवेगळ्या फॅमिलीतील प्राणी. ‘प्रायमेट’ ही सुद्धा एक ऑर्डरच आहे. यात ‘एप्स’ आहेत (आपण एप्सचा उपप्रकार म्हणून आहोत), माकडे आहेत, लेमूर माकडे आहेत; असे भिन्न भिन्न फॅमिलीतील भिन्न भिन्न प्राणी आहेत. अनेक ऑर्डरचा मिळून ‘क्लास’ (प्रगण) होतो. सर्व सस्तन प्राणी हे ‘मॅमेलिया’ या क्लासचे आहेत.

मूळ खोडाला काही फांद्या, त्या फांद्यांना आणखी काही फांद्या, त्यांना आणखी काही… अशी ही एखाद्या झाडासारखी रचना आहे. हा वंशवृक्षच आहे, सर्व जीवांचा. प्रत्येक फांदीच्या टोकाला एक एक जाती आहे. टोकापासून जाती, प्रजाती, फॅमिली, ऑर्डर, क्लास अशा फांद्यांवरून खाली खाली आपण या वृक्षाच्या खोडापाशी पोचतो. हे खोड म्हणजे पृथ्वीवरचे सर्व सजीव.

डेरेदार वृक्षाला फांद्याच फांद्या असतात. थोड्याशाच फाटाफुटीनंतर प्रचंड फांद्या तयार होतात. फांद्याफांद्यांची रचना ही झपाट्याने वाढत जाते. उत्क्रांती हा असाच फांद्याफुटीचा खेळ आहे. डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पेसीज’ या जगप्रसिद्ध पुस्तकात एकच चित्रं होतं, फांद्या फुटलेलं झाड. त्याच्या नोंदवहीतही त्यानं असंच चित्रं काढलं होतं आणि वर लिहिलं होतं, ‘मला असं वाटतं…’. काय म्हणायचं होतं त्याला? घरातल्या पोरांच्या गोंगाटामुळे, त्याला लिहिता लिहिता अचानक मधेच थांबावं लागलं का? का चित्रात जे दाखवलं, ते शब्दात कशाला लिहायचं, असं त्याला वाटलं?… आपल्याला आता कधीच कळणार नाही. एका महान शास्त्रज्ञाची अप्रकाशित वही आपल्याला बघायला मिळते, एवढंच फक्त समाधान.

हा वंशवृक्ष निर्माण झाला तो अगदी गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून. पण सोपं करून सांगा म्हणाल तर…. कल्पना करा, युगायुगांपूर्वी एका जातीपासून दोन भिन्न जाती निर्माण झाल्या. दोनाच्या चार, चाराच्या आठ, मग 16, 32, 64, 128, 256, 512…! पाहिलंत अगदी फटाफट तुम्ही कोटी जातीपर्यंत पोचाल. हे सगळं फटाफट वगैरे ठीक आहे, पण मुळात एकाच्या दोन जाती निर्माण व्हाव्यातच का? एका भाषेपासून जशा अनेक भाषा निर्माण होतात, तसंच काहीसं हे आहे. म्हणजे कसं ते पाहूया.

दूर-दूर जाताना : नव्या नव्या भाषा आणि जाती जन्मतात कशा?

बॅबेलच्या मनोर्‍याची गोष्ट जरी खरी नसली तरी इतक्या विविध भाषा का आणि कशा, याचा शोध उद्बोधक आहे. साधारण सारख्या प्राण्यांची जशी एक ‘फॅमिली’ कल्पिली आहे, तसंच साधारण सारख्या भाषांची मिळून एक भाषिक फॅमिली निर्माण होते. हिंदी, मराठी, बंगाली गुजराथी या जशा भाषाभगिनी आहेत, तशाच स्पॅनिश, इटालियन, पोर्तुगीज, फ्रेंच याही आहेत. या युरोपीय भाषांना रोमन्स भाषा म्हटलं जातं. ‘तो’ रोमन्स नाही हं, रोमन लोकांच्या भाषेतून उगम पावलेल्या म्हणून या रोमन्स भाषा. प्रेमाला या भाषांमध्ये, ती ‘आमो’, ‘अमोते’, ‘ता आमी’, ‘जे तिमी’ असे शब्द आहेत. प्राचीन लॅटिन आणि अर्वाचीन स्पॅनिश, असा दोन्हीमध्ये, ‘ते आमो’ असा एकच शब्द आहे.

केनिया, युगांडा अथवा टांझानियात प्रेमात पडाल तर स्वाहिली भाषेत म्हणाल, ‘नाकुपेंडा’. मोझांबिक, झांबिया किंवा मालावीत (बालपणी मी मालावीतच होतो) ‘न्डीमकूकोंडा’, म्हणजे निस्सीम प्रेम. दक्षिण आफ्रिकेत बांटू टोळ्यांच्या भाषेत ‘न्डीनोकुडा’, ‘न्डीयाकुथंडा’ किंवा झुलू भाषेत ‘न्गीयाकुथंडा’ म्हणजे निरतिशय प्रेम. बांटूंची भाषा ही रोमान्स भाषांपेक्षा खूपच भिन्न आहे आणि ही दोन्ही भाषाकुळे भारतीय भाषा कुळापेक्षा भिन्न आहेत. भाषेसाठी जसा आपण घराणं, कुटुंब, कुल या अर्थी शब्द वापरतो तसाच तो आपण सजीवांच्या वर्गीकरणासाठीही वापरतो. या लेखकाचे जसे डॉकिन्स कुल किंवा भाषांतरकाराचे जसे अभ्यंकर कूळ तसेच मार्जारकूळ, श्वानकूळ वगैरे.

शतकानुशतके भाषांचा प्रवाह कसा कसा वाहत आणि बदलत गेला याची सहज कल्पना करता येते आपल्याला. कोकणातला माणूस हा विदर्भातल्या माणसापेक्षा वेगळीच मराठी बोलतो. एवढंच कशाला, आजोबांची भाषा नातवाला काहीशी परकी वाटते. दोन पिढ्यांचंच हे अंतर; पण ‘भाषां-तर’ केवढं तरी.

वर्षत सकळ मंगळी। ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।

अनवरत भूमंडळी। भेटतु भूता॥

हे पंचवीस-तीस पिढ्यांपूर्वी लिहिलं गेलेलं ‘पसायदान’ समजावून घ्यायला, आपल्याला कोणाची तरी मदत घ्यावी लागते. एका मुलाने तर मला छातीठोकपणे सांगितलं होतं की हे मराठी नाहीच हे संस्कृत आहे! इतकं ते आपल्याला अ-मराठी वाटतं.

थोडक्यात, भाषा ही प्रवाही असते. ती बदलत राहते. असं म्हणतात की दर बारा मैलावर भाषा बदलते. त्यात अगदी स्थानिक असे काही शब्द, संदर्भ येतात. वेगवेगळ्या ठिकाणी तीच भाषा कमी अधिक बदलत रहाते. शब्द बदलतात तसे हेल बदलतात, उच्चार बदलतात. ‘पुलं’च्या ‘ती फुलराणी’ या नाटकाच्या पहिल्याच प्रसंगात, एक भाषातज्ज्ञ निव्वळ लोकांच्या बोलण्यावरून त्यांची गावं ओळखतो आणि सगळ्यांना चकित करून सोडतो. मराठीत कोल्हापुरी, कोकणी, अहिराणी, वैदर्भी, पुणेरी अशा बोली आहेतच. त्यातही एखादा पक्का कोकण्या, समोरचा माणूस हा मालवणचा का महाडचा हेही निव्वळ हेलावरून ओळखू शकेल.

(उत्तरार्ध पुढील अंकात)

मराठी अनुवाद डॉ शंतनु अभ्यंकर

संपर्क : 98220 10349