(धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज, धर्मचिकित्सेला आक्षेप आणि विश्वनिर्मिती याबद्दलची थोडीफार माहिती मागील तीन लेखात दिलेली आहे. सत्याचा शोध हा धर्म व विज्ञान यांचा कळीचा मुद्दा आहे. परमेश्वराबद्दलचे सत्य व त्याच्या नावाने होत असलेल्या व्यवहाराची सत्यासत्यता व विज्ञानातील सत्यान्वेषण याविषयी थोड्याशा विस्ताराने या लेखात मांडणी केली आहे.)
वयाच्या 15 – 16 व्या वर्षी, बाल्यावस्थेतून शैशवावस्थेत जात असताना काही विशिष्ट संप्रेरकांच्या स्रावामुळे बहुतेकांच्या चेहर्यावर पुटकुळ्या दिसू लागतात. त्यावरील इलाजासाठी डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांनी तुमच्या शरीरात अशुद्ध रक्त असून 1-2 लिटर रक्त काढून टाकल्यास या पुटकुळ्या जातील असा सल्ला दिल्यास आपण त्याला वेड्यात काढून दुसरीकडे इलाज शोधायला जाऊ. परंतु कुठल्याही रोगावर अक्सीर इलाज म्हणून 100-150 वर्षांपूर्वी सर्रासपणे रक्त बाहेर काढले जात होते, हे सांगूनही खरे वाटणार नाही. अशा प्रकारची प्रथा वैद्यकीय उपचार म्हणून त्यापूर्वीच्या शेकडो वर्षे प्रचलित होती. परंतु अलिकडील वैद्यकीय संशोधनानंतर काही अपवादात्मक परिस्थिती सोडल्यास अशा प्रकारचा अघोरी उपचार कुणीही करत नाहीत. त्यामुळे रोगाच्या मुळाशी जाण्यासाठी व सत्य शोधण्यासाठी संशोधनाचा – म्हणजेच विज्ञानाचा – वापर गेल्या शतकभर करण्यात आला. त्यामुळे सत्याचा शोध हा विज्ञानाचा कणा राहिला. परंतु एके काळी सत्याच्या शोधाची जबाबदारी धर्मावर होती व धर्म जे काही सांगेल ते सत्य असे मानण्यात येत होते. कारण धर्माची इमारत परमेश्वराच्या अस्तित्वाच्या संकल्पनेवर उभी होती आणि परमेश्वरच सर्वांचा तारक (व मारक) आहे, यावर सर्वांचा विश्वास होता.
धर्माचे बहुतेक सर्व व्यवहार परमेश्वराच्या पवित्र अस्तित्वाशी निगडित असतात. त्याचे अस्तित्व हे अतिमानवी संकल्पनेत सामावलेले असते. सत्यशोधनाच्या (वैज्ञानिक) निकषात परमेश्वर हा कधीच बसत नाही, यावर जगातील सर्व धार्मिकांचे एकमत आहे. तुम्ही तुमच्या प्रयोगासाठी ईश्वराला साधन बनवू नका, हा धार्मिकांचा इशारा धर्माविषयी कुठलाही प्रयोग करून त्याची सत्यासत्यता पडताळण्यास मनाई करणारा आहे. कारण त्यांच्या मते ईश्वरी व्यवहार अपौरुषेय असतात. ईश्वराची इच्छा असल्यास तो एखाद्या व्यक्तीद्वारे त्या व्यवहाराचा प्रत्यय देऊ शकतो, अन्यथा नाही. ईश्वराला मनोमनी वाटल्यास त्याची अगाध लीला नेमकी काय आहे ते सर्वसामान्यांना समजू शकेल. त्यामुळेच ईश्वरी व्यवहाराची चौकशी करू नये आणि त्या व्यवहाराची सत्यासत्यता शोधण्याचा वृथा प्रयत्न करता कामा नये, असे धार्मिकांना वाटत असते.
मुळात ईश्वरी सत्य शोधण्यासाठी साक्षात्कार व्हावा लागतो व अशा प्रकारचा साक्षात्कार वा अनुभूती काही निवडक भक्तांनाच मिळू शकते व तेही ईश्वराच्या कसोटीत उतरल्यानंतरच! त्यामुळे धार्मिकांची भाषा विज्ञानाप्रमाणे गणितीय भाषा नसून गूढ, फक्त त्यांनाच समजेल अशी, द्वयर्थी असते. म्हटलं तर हो वा नाही तर नाही व तेही सांगत असताना सर्वांना समजणार्या गद्य स्वरूपात न सांगता क्लिष्ट, किचकट अशा पद्य स्वरूपात सांगत असल्यामुळे त्यात सत्याचा अंश किती व कल्पनेचा भाग किती हे कधीच कळत नाही. खरे पाहता सत्याच्या शोधात धर्म व विज्ञान हे एकाच गटातील संशोधकासारखे माहितीचे देवाणघेवाण करणे अपेक्षित आहे. दोघांनी मिळून चिकित्सा, विश्लेषण वा निष्कर्षाप्रत पोचणे यास हरकत नसावी. परंतु ते तसे होताना दिसत नाही. कारण विज्ञान हे उपलब्ध वस्तुस्थितीवर आधारलेले असते व धर्म श्रद्धेच्या जोरावर. धार्मिकांचा इंद्रियगम्य अनुभवापेक्षा अतींद्रिय अनुभूतीवर विश्वास असतो. धार्मिकांची श्रद्धा कुठल्याही ज्ञात नैसर्गिक नियमांना अव्हेरून पुढे जात असते. जरी त्या श्रद्धा नैसर्गिक नियमांच्या विरोधात गेल्या तरी त्यांना त्यांची पर्वा नसते. काहींच्या मते धार्मिकांच्या श्रद्धा वरवरून तरी त्या समंजस असतात हेही नाकारता येत नाही.
एखाद्या गोष्टीचा तपास/चिकित्सा करताना विज्ञान व्यक्तिनिरपेक्ष दृष्टीने त्यासंबंधी प्रयोग करत असते. परंतु धर्मात मात्र सापेक्षतेचाच बडिवार असतो व व्यक्तिप्रामाण्य व शब्दप्रामाण्य यांना जास्त महत्त्व दिले जात असते. त्यासाठी ईश्वरचरणी लीन होण्याची, चमत्कार समजून घेण्याची व ईश्वरी लीलाविषयी आश्चर्यचकित होण्याची कुवत हवी. त्यामुळे धार्मिक ज्ञान फार धोक्याचे असू शकते, कारण हे ज्ञान पूर्णपणे तुमचे जीवन बदलू शकते, तुमच्या बुद्धीला व विचारस्वातंत्र्याला धक्का देऊ शकते.
याविरुद्ध विज्ञानाच्या व्यक्तिनिरपेक्षतेमुळे मिळविलेले ज्ञान पिढ्यान्पिढ्या संग्रहित होत जाते. न्यूटनसारख्या प्रतिभावंताच्या विश्वाबद्दलच्या कल्पनेत या 300 वर्षांत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. कल्पना टोकदार झाल्या आहेत व वस्तुस्थितीशी सुसंबद्ध आहेत. परंतु धर्मामध्ये त्या-त्या व्यक्तीच्या वास्तवाचे भान तिच्या अनुभूतीवर पूर्णपणे अवलंबून असते. त्यामुळे भूतकाळाचे परिणाम वर्तमानकाळावर होत नाहीत. ज्याप्रमाणे मोठमोठ्या कलावंतांबरोबरच त्यांची कला अस्तंगत होत जाते, त्याचप्रमाणे धार्मिकांची अनुभूती त्यांच्याबरोबरच नष्ट होते. एकविसाव्या शतकातील अनुभूती विसाव्या किंवा त्याअगोदरच्या अनुभूतीपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही. प्रत्येक अनुभूती ही एक स्वतंत्र आयडेंटिटी असते. एकमेकांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही. विज्ञान मात्र पूर्वजाच्या खांद्यावर उभारून जगाकडे बघत असते. त्यात एक दूरदृष्टी असते व चुका सुधारण्यासाठी तेथे वाव असतो.
धार्मिकांच्या मते, माणूस व परमेश्वर यांच्यात दैवी संबंध असतो. हा संबंध अतिसंवेदनशील असण्याची शक्यता असते. धार्मिकांच्या वैयक्तिक अनुभवावर त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव असतो. ख्रिश्चन असल्यास त्यांना ख्रिस्तच भेटतो, बुद्ध नाही. हिंदू असल्यास राम, कृष्ण दृष्टांत देतील, अल्ला वा झरतुष्ट्र नाही. येथे परंपरा पुढे नेण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेला महत्त्व दिले जात असते. परंपरेशी जोडलेला शिष्य चुकूनसुद्धा गुरूविरुद्ध शब्द उच्चारत नाही. परंतु असे काही विज्ञानाच्या बाबतीत म्हणता येत नाही. गाइड म्हणून आइन्स्टाइनसारख्या वैज्ञानिकाच्या हाताखाली पी.एचडी. करणारा विद्यार्थी गाइडच्यापेक्षा वेगळे मत मांडून गृहितक सिद्ध करू शकतो. त्यामुळे धार्मिकांना मिळणार्या संधींना मर्यादा पडतात. साक्षात्कारींची संख्या कमी असते व त्यांचा अनुभव सहज सोप्या भाषेत सांगताही येत नाही.
मुळात प्रत्येक धर्माचा सत्य वेगवेगळाच असतो. हिंदू धर्मात सत् या गुणविशेषाला प्राधान्य दिलेले असून त्याच्या मते जे डोळ्यांना दिसते, वा कानाने ऐकलेले असते किंवा बुद्धीने समजून घेतलेले असते तेच फक्त सत्य असते. उपनिषदांत सत्य म्हणजे वास्तव आणि अस्तित्वाचे भान. हे फक्त ऋषिमुनींना समजते व त्यासाठी आत्मा व ईश्वर यांचा आधार घेतला जातो. ख्रिश्चन धर्मात ऐतिहासिक घटना, अनुभूती व बायबलमधील लिखित पुरावे सत्याच्या जवळ जाण्याची साधनं आहेत. सामान्यपणे धर्मगुरूंच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या अस्तित्वाचे भान देत असतो व त्यालाच अंतिम सत्यं म्हणण्याची प्रथा रूढ झाली आहे. बौद्ध धर्मात दुःख, हाव, निर्वाण, अष्टांगमार्ग ही चार उदात्त सत्य आहेत. जैन धर्मामध्ये अनेकांतवाद याला महत्त्व असून त्यांच्या मते ते एकच सत्य असते आणि ते जाणून घेण्यासाठी फार मोठी तपश्चर्या करावी लागते. अनेक वेळा धर्मग्रंथात नमूद केलेल्या काही रूढी, परंपरा मानवतेच्या दृष्टिकोनातून चुकीच्या व अन्यायकारक असतात. परंतु त्या दुरुस्त करण्यास कोणीही पुढे येत नाही. ख्रिश्चन समाजाला गुलामी प्रथा अमानुष आहे, आणि दयाळू परमेश्वर पापी कृत्यांना मरणोत्तर शिक्षा देत नाही हे समजण्यास 1800 वर्षे लागली. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य (अ)व्यवस्था अजूनही आहे तशीच आहे व उलट वेगवेगळ्या स्वरूपात वृद्धिंगत होत आहे. देवाची पूजा, प्रार्थना करत असल्यास मृत्यूनंतर स्वर्गसुख मिळते यावर हिंदूधर्मीयांचा अजूनही विश्वास आहे.
विज्ञानाचा संबंध वस्तुस्थितीशी असतो व धर्माचा फक्त त्यांच्या श्रद्धेशी. विज्ञानाला घटनेच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्यात रस असतो व ते सत्य विज्ञानविश्वात मान्यता पावते. तद्विरुद्ध धार्मिक सत्य एखाद्या प्रभावी व्यक्तीचा साक्षात्कार असू शकतो व सामान्याला त्याचे वास्तव समजून न घेताही थोडी फार दिशा मिळू शकते. यासंबंधातील प्रा. य. ना. वालावलकर यांचा हा परिच्छेद उद्बोधक ठरेलः
विज्ञानवादी, विज्ञानप्रेमी लोक वारंवार एकत्र जमून,
सत्य ते सत्य ते गुरुत्वाकर्षण। धन्य तो न्यूटन। संशोधक।
न्यूटनने शोधिले गतीचे नियम। म्हणोनिया नाम।
अमर तयाचे॥
‘असले अभंग गात नाहीत. कारण वैज्ञानिक तत्त्वे, निसर्गनियम त्यांच्या बुद्धीला पटलेले असतात. तंत्रज्ञानाद्वारे अनुभवाला आलेले असतात. इस्रोने अनेक वेळा उपग्रहांचे प्रक्षेपण यशस्वीपणे केले ते न्यूटनच्या नियमांच्या आधारे, हे त्यांना ठावूक असते. म्हणून न्यूटनच्या नियमांची सत्यता वादातीत आहे, हेही ते जाणतात. जे बुद्धीला पटलेले असते ते पुन:पुन्हा आळवण्याची, घोकण्याची आवश्यकता नसते. निसर्गनियम सत्य मानणारी आपल्यासारखी माणसे आहेत का, हे जाणून घ्यायची त्यांना आवश्यकता वाटत नाही. कारण ती सत्यता व्यक्तिनिरपेक्ष असते. म्हणून ते वारंवार एकत्र जमून विज्ञानाची आणि वैज्ञानिकांची स्तोत्रे गात नाहीत.’
एक मात्र खरे की, विज्ञान हे फार मोठ्या प्रमाणात निसर्गप्रक्रियेला समजून घेण्यास यशस्वी झालेले असून त्यामुळे ज्ञानात भर पडत गेली आहे. विज्ञानाला निसर्गातील तथाकथित चमत्कारांचा उलगडा झालेला (व होत) असून त्यासंबंधी आणखी वेगळे काही सांगण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही. विसाव्या शतकाच्या प्रारंभी काही वैज्ञानिकांना अणुंची रचना म्हणजे काही निरीक्षणांचे स्पष्टीकरण करणारे मॉडेल असे वाटत होते. परंतु आज निसर्गातील सर्व वस्तूंच्या मुळाशी क्वार्क, ग्लुऑन, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन इत्यादी मूलकण आहेत, याला मान्यता मिळाली असून (आतापर्यंत तरी) याबद्दल जास्त करण्यासारखे राहिलेले नाही, असे वैज्ञानिकांना वाटते. डार्विनच्या सिद्धांतातसुद्धा सुरुवातीच्या काळात काही गोष्टींचे स्पष्टीकरण मुद्देसूदपणे दिलेले नव्हते. परंतु जनुकशास्त्रातील अभूतपूर्व प्रगतीमुळे डीएनए व म्युटेशन या संकल्पनांमधून त्या गोष्टीबद्दल समाधानकारक मांडणी करता येऊ लागली.
विज्ञानातील प्रयोगांचा सुसंबद्ध अर्थ शोधत असताना सैद्धांतिक गोंधळ होऊ शकतो, हे मान्य करायला हवे. त्यामुळे प्रयोगातून सिद्धांत किंवा सिद्धांतातून प्रयोग या चक्रात अडकून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु संशोधनातून हा तिढा सुटू शकतो, यावर वैज्ञानिकांचा विश्वास असतो.
विज्ञानात नम्रता असल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा प्रेस्टीज इश्यू तेथे केला गेला नाही. विज्ञान जे आहे, जे घडते त्याबद्दलच फक्त स्पष्टीकरण देते. त्याचा अर्थ काय होईल, त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, त्यातून मूल्यवृद्धी होईल की नाही इत्यादी प्रश्न (काही काळ तरी) बाजूला ठेवून ते पुढे जात असते. विज्ञानाचा हा (सत्याचा) शोध व्यक्तिनिरपेक्ष, प्रयोग करणार्यांच्या स्थळ-काळांशी संबंध नसलेला व पुन्हा पुन्हा प्रत्यय देणारा असतो. विज्ञानातील प्रश्न विचारणे, पूर्वपीठिका तपासणे, गृहितक तयार करणे, त्याची वैधता तपासणे, विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे, अधिक परीक्षणांनी निष्कर्षाला पुष्टी देणे व मान्य/अमान्य करणे या शिस्तीमुळे सत्य तावून सुलाखून बाहेर पडते. सिद्धांतांची व्याप्ती वाढत जाऊन इतर अनेक गोष्टींचे स्पष्टीकरण देण्यास कामी येऊ शकते. डार्विनच्या सिद्धांतामुळे निसर्गात आढळणार्या जीवाष्माचे गूढ संपले. पॉल डिरॅक यांनी शोधलेल्या इलेक्ट्रॉन्सच्या समीकरणातून इलेक्ट्रॉन्सच्या चुंबकीय गुणांचा शोध लावता आला. कल्पना व वास्तव यांच्यातील अन्योन्य संबंध प्रस्थापित करण्यात वैज्ञानिक यशस्वी होत गेले. अनेक गोष्टींचे ज्ञान सामान्यांच्या आवाक्यात आले. विज्ञानातील गणितावर आधारलेले काही मॉडेल्स वास्तवातही असू शकतात, हे लक्षात येऊ लागले. आयस्यनबर्गचे क्वांटम जग व न्यूटोनियन जग यात कुठलाही द्वंद्व नाही, हे लक्षात येऊ लागले. प्रकाशाच्या किरणात कणही असू शकतात व हे किरण तरंगाप्रमाणेही जाऊ शकतात, याबद्दल कुणाच्याही मनात संशय नाही.
विज्ञानातील सत्य सुरुवातीला काही गृहितकावर आधारलेली असते आणि हे गृहितक काही प्रयोगानंतर, तार्किकदृष्ट्या, पुराव्यानिशी सिद्ध झाल्यानंतर ते नव्हतेच असे म्हणण्याचे धाडस कुणीही करणार नाही. जसजसे ज्ञानात भर पडत जाते, तसतसे नवीन प्रश्न विचारले जातात व त्या प्रश्नांची उत्तरं शोधत असताना विज्ञानाची प्रगती होत असते. परंतु यात कुठेही अंतिम वा शाश्वत सत्यांचा दावा केला जात नाही. क्वांटम मेकॅनिक्सच्या शोधामुळे न्यूटोनियन मेकॅनिक्स बाद झालेले नाही. याच न्यूटोनियन मेकॅनिक्सचा वापर करून मंगळावर यान पाठवणे शक्य आहे. सापेक्षतावाद वा क्वांटम मेकॅनिक्स वा उत्क्रांतवाद यापूर्वीच्या सिद्धांतांना चपखलपणे सामावून घेतात. त्यामुळे भविष्यातील संशोधनाचे एखादे ब्लॅक बुक विज्ञानाकडे नाही किंवा असे केल्यास अमुकअमुक सापडेल हे सांगणारा एखादा संगणकीय प्रोग्रामही विज्ञानाकडे नाही. विज्ञानातील सत्य शोधण्यासाठी उत्सुकता हवी, जिज्ञासा हवी, प्रयत्नांची पराकाष्ठा हवी व शेवटपर्यंत पोचण्याची जिद्द हवी.
विज्ञान असो की धर्म, तर्क असो की श्रद्धा, वास्तव व वस्तुस्थितीवर विश्वास ठेवायला हवा व आहे ते मान्य करण्याची खिलाडी वृत्ती हवी.
(पुढील लेखात ’आत्मा : एक संकल्पना’ याची मांडणी केली जाईल.)
लेखक संपर्क : 9503334895