Categories
संतविचार

अनुभव मंटप – शरणांचा पंचांगावर प्रहार

मे - २०१७

जातिव्यवस्थेशी झुंजणारे महात्मा बसवण्णा यांच्या पुरोगामी वचनांची ओळख वाचकांना या सदरातून करून देत आहोत

भारतीय संस्कृती म्हणजे फक्त वैदिक संस्कृती असा आभास निर्माण करून भारतीय संस्कृतीचे नित्य स्तोत्रपठण करणार्‍यांनी इथल्या बहुसंख्य भारतीय समाजाला ज्ञानापासून वंचित ठेवून त्यांचे निरंतर शोषण करण्यासाठी ज्या असंख्य युक्त्यांची शृंखला तयार केली, त्यातील एक मुख्य कडी म्हणजे पंचांग होय. अगदी जन्मापासून तर मृत्यूनंतरच्या क्रियाकर्मांपर्यंत पंचांगांचे मानवी जीवनावर नियंत्रण आहे. भारतीय समाज स्वप्रयत्नांपेक्षा पंचांगावर अधिक विश्वास ठेवतो; परिणामी यातून दैववाद बळावतो आणि आपल्यातील विवेकनिष्ठा व विज्ञाननिष्ठा यांचा खून दररोज होतच असतो. शतकानुशतके होणारी ही विवेकाची, बुद्धीची, माणुसकीची हिंसा थांबविण्यासाठी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णांनी विवेकनिष्ठ लढा दिला, जो आजही भारतीय समाजाला दिशा देणारा आहे.

महात्मा बसवण्णांनी भारतीय समाजाच्या हृदयभूमीत समता, स्वातंत्र्य, कायक, विवेक, दासोह, सत्य, अहिंसा अशा उत्तम, उदात्त नि महोन्नत विचारांचे बीजारोपण करीत असतानाच स्वर्ग-नरक, पाप-पुण्य, शकून-अपशकून, तिथी, वार, नक्षत्र, शुभमुहूर्त, शुभाशुभ दिशा यांचा समुच्चय असलेले पंचांग-तृणाचे समूळ उच्चाटन आपल्या आचार-विचारांनी केले आहे.

तिथी व वार यातील शुभाशभुता :

प्रत्येक पंधरवड्यात येणार्‍या प्रतिपदा, द्वितीया, तृतीया… चतुर्दशी यांना तिथी म्हणतात. यातील काही तिथी शुभ, तर काही तिथी अशुभ मानल्या जातात, याचे विवरण पंचांगात असते. वार म्हणजे आठवड्यातील रोजचे दिवस होत. काही विशिष्ट तिथी व काही वार श्रेष्ठ ठरवून त्यादिवशी धार्मिक व कौटुंबिक संस्कार पार पाडले जातात. देवपूजेसाठीही वार व तिथी ठरलेल्या आहेत. अशा दिनभक्ताचे खंडन चेन्नबसवण्णांनी केले आहे. ते म्हणतात-

सोमवार, मंगळवार, शिवरात्री म्हणून व्रते करणार्‍या भक्तांना

मी कसे लिंगभक्तांच्या समान लेखू हो?

दिन श्रेष्ठ की, लिंग श्रेष्ठ?

दिन श्रेष्ठ म्हणून व्रत करणार्‍या

पंचमहापातक्यांचे तोंड पाहू नये.

कूडलचेन्नसंगय्या, अशांचे तोंड पाहू नये.

(चे. व. क्र. 175)

सात वार आणि अठरा कुळ असल्याचे संदर्भ वैदिक ग्रंथात मिळतात; परंतु शरणांना हे मान्य नाही. या संदर्भात चेन्नबसवण्णांनी व्यक्त केलेले विचार पाहा –

वार सात आणि कुळ अठरा असे म्हणतात,

हे आम्ही, नव्हे असे म्हणतो.

रात्र एक वार, दिवस एक वार,

भवी एक कुळ, भक्त एक कुळ,

हे एवढेच आम्ही जाणतो पाहा,

कूडल चेन्नसंगमदेवा. (चे. व. क्र. 1556)

याशिवाय सकाळ, माध्यान्ह, संध्याकाळ, अशी वेळ पाहून त्रिकाळ पूजा करणार्‍यांना चेन्नबसवण्णा प्रश्न करतात, ‘अष्टमी, नवमी या काल्पनिक गोष्टी शरणास कशाला?’ एकूणच शरणांनी तिथी आणि वार यात शुभाशुभ पाहणे, हे निरर्थक असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.

पंचांग म्हणजे काय?

प्रचलित पंचांगतज्ज्ञांच्या मते, पंचांग म्हणजे योग, नक्षत्र, करण, तिथी व वार या पाच अंगांची माहिती होय. आपण सुशिक्षित असूनही पंचांग पाहण्यासाठी ज्योतिषाकडे जातो. सहजासहजी आपल्या मुलांना एक चॉकलेट घेऊन न देणारा बापही ज्योतिषासमोर तो म्हणले तेवढी दक्षिणा हसतहसत ठेवतो आणि त्या ज्योतिषाचे वाक्य म्हणजे सकल कार्यसिद्धी समजून त्यास पंचांग पाहण्याची विनंती करतो. पंचांग या शब्दाचा खरा अर्थ त्या ज्योतिषालाही कळाला नाही नि त्याच्याकडे जाऊन विचारणार्‍यालाही कळाला नाही, असे म्हणून पंचांग शब्दाचा खरा अर्थ आमचे शरणकाय सांगतात पाहा –

पंचांग म्हणजे काय सांगतो ऐका हो बंधूंनो,

पंच म्हणजे पाच; अंग म्हणजे शरीर

पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पाच मिळून शरीर झाले

त्या देहामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यांची मस्ती मोडणेच पंचांग.

सत्व, रज, तम यांचा अहंकार तुडविणेच पंचांग.

आणवमल, मायामल, कार्मिकमल यांना

न शिवणेच पंचांग.

आपुल्या पत्नीव्यतिरिक्त परस्त्रीस न स्पर्श करणेच पंचांग.

आपुल्या इष्टलिंगाव्यतिरिक्त अन्यत्र हात

न जोडणेच पंचांग.

जातिसुतक, जननसुतक, उच्छिष्टसुतक,

मरणसुतक, रजसुतक

या पंचसुतकांचे निवारण करणारेच पंचांग….

(व. सि. सा. व. क्र. 1523)

बसवादि शरणांनी सांगितलेल्या पंचांगाचा अर्थ लक्षात घेऊन आपण नीतिमान, चारित्र्यसंपन्न आणि अंधश्रद्धांतून मुक्त व्हावे, यासाठीच हा अट्टाहास.

पंचांग पाहिलेल्यांचे काय झाले?

पंचांगावर अत्यंत श्रद्धा ठेवून, त्याप्रमाणेच कार्य केल्यावरही अपयश का आले? अनेक देवदेवतांची फजिती का झाली? अशा काही पुराणप्रसिद्ध लोकांची उदाहरणे देऊन शरणांनी खालील वचनात पंचांग पाहणार्‍या मनोवृत्तीचे विडंबन करून आम्हाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे-

पंचांग ऐकलेल्या दक्षब्रह्माचे मुंडके का उडाले?

पंचांग ऐकलेले पाच पांडव देशोधडीस का लागले?

पंचांग ऐकलेल्या श्रीरामाची पत्नी रावणाने का पळविली?

पंचांग ऐकलेल्या इंद्राचे शरीर जखमांनी भरून का गेले?

पंचांग ऐकलेल्या कामदेव सरस्वतीचे नाक का गेले?

पंचांग ऐकलेला कामदेव जळून भस्म का झाला?

पंचांग ऐकलेले ब्रह्मा, विष्णू, इंद्र वगैरे तेहतीस कोटी देव

तारकासुराच्या छळाला भिऊन सैरावैरा धावून परमेश्वरास शरण का गेले?

……पुन्हापुन्हा शुभ लग्न विचारून लग्न झालेल्या असंख्य लोकांच्या बायका विधवा झाल्याची उदाहरणे पाहून देखील पंचांग विचारणार्‍यांची गत कुत्र्याची विष्ठा

डुकराने हिसकावून खाल्ल्यागत झाली पाहा, नि:संग निराळ प्रभुवे.

(व. सि. सार, व. क्र. 1524)

आजचा दिवसच सर्वश्रेष्ठ

कोणत्याही चांगल्या कामासाठी तिथी, वार, नक्षत्र, शुभमुहूर्त, शुभवेळ पाहण्यात दिवस घालविण्यापेक्षा आजचा दिवसच सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन बसवण्णा करतात.

आज, उद्या नका म्हणू.

आजचा दिवसच ‘शिव शरण’ म्हणणार्‍यास,

आजचा दिवसच ‘हर शरण’ म्हणणार्‍यास,

आजचा दिवसच शुभ,

कूडलसंगमास न चुकता स्मरणार्‍यास. (ब. व. क्र. 174)

आतातरी आपण विचार करणार आहोत का? पंचांग न पाहता आपले कौटुंबिक संस्कार व सोहळे करण्याची मानसिकता सुशिक्षित तरुणांनी तयार केली पाहिजे. स्वत:पासूनच याची सुरुवात झाली, तरच आपण समाज परिवर्तनाची लढाई जिंकू शकतो.

संदर्भ ग्रंथ :

चेन्नबसवण्णनवर वचन संपुट – सं. डॉ. बी. व्ही. मल्लपूर

वचन सिद्धान्त सार – डॉ. फ. गु. हळकट्टी अनुवाद – प्रा. आर. एम. करडीगुद्दी

बसवण्णानवर वचन संपुट – सं. डॉ. एम. एम. कलबुर्गी.

राजू ब. जुबरे

लेखक संपर्क : 08904638908