Categories
जात पंचायत

संदीप… मरते नहीं!

मे - २०१७

भावकी, जातपंचायत, खापपंचायत यासारख्या जाचक गोष्टी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातून अजूनही नष्ट झाल्या नाहीत. विशेषत: कोकणात भावकीच्या प्रथेने मानवतेकडे जाणारे अनेक संवैधानिक मार्ग रोखले आहेत. शासनाच्या पातळीवर याविषयी कायदे झाले, विशेषत: जादूटोणाविरोधी विधेयकामुळे भावकीच्या दडपशाहीतील अंधश्रद्धा कमी झाली; परंतु भावकीतले सामंती वर्चस्व मात्र कमी झाले नाही. आपल्या देशात एकीकडे संविधान जागृतीचा नारा चालू असताना दुसरीकडे कोकणात भावकीच्या जाचात अडकलेले तरुण दिसतात.

संदीप पवार हा कोकणातील भावकीच्या प्रथेविरोधी लढतो आहे. गोवा महामार्गावरचे खेरशेत हे चिपळूण तालुक्यातील अत्यंत छोटे गाव. हे साधारणपणे तीनशे उंबर्‍यांचे असावे. त्यात तीस घरे दलितांची. संदीपच्या लहानपणी त्याच्या वडिलांचे निधन झाल्याने तो आपल्या मामाच्या आसर्‍याने खेरशेतमध्ये वाढला, शिकला. संदीपची पत्नीही इथलीच. मामाच्या मुलीशी लग्न करून तो आता मुंबईत राहत आहे. त्याचे शिक्षण दहावीपर्यंतचे. त्याचे गावातील मित्रही साधारणपणे असेच शिकलेले. कुणी पाचवी, कुणी सातवी, तर कुणी दहावी झालेले. संदीप, रमेश, विकास, संजय, महेश, सचिन ही सारी कदम वस्तीतील दलित मुलं… ती खेरशेतमध्ये वाढली, शिकली आणि मुंबईत जाऊन हाताला मिळेल, ते काम करू लागली. आज त्यांच्यातले अनेक जण मुंबईत रखवालदार, ऑफीसबॉय, वेटर म्हणून काम करतात. ही मुलं कमी शिकलेली असली, तरी त्यांच्या सामाजिक समज पीएच.डी. झालेल्या प्राध्यापकालाही मागे टाकेल, अशी आहे.

संदीपने मुंबईत या मित्रांना एकत्र करून ‘तथागत सेवा संघ’ काढला. हे सर्व असंघटित कामगार आहेत. ते सामाजिक जाणिवेने कधी मुंबईत, तर कधी खेरशेतमध्ये एकत्र जमू लागले. आपल्या प्रश्नाबद्दल चर्चा करू लागले. दोन वर्षांपूर्वी संदीपचा फोन आला. बहुधा त्याने वर्तमानपत्रातील माझा लेख वाचला असावा. पुढे त्याचा संपर्क वाढला, फोन वाढले आणि भेटही झाली. ही सारी मुलं एकत्र येऊन रावसाहेब कसबे यांचे ‘झोत’ वाचतात, उत्तम कांबळे यांची पुस्तके वाचतात. त्यांना सुर्व्यांच्या कविता माहीत आहेत. बाबूराव बागूल, शरद पाटील, भाई वैद्य, कॉ. पानसरे ही माणसं त्यांनी जमेल तेवढी वाचली आहेत आणि त्यांची शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर ठाम निष्ठा आहे. संदीप आणि त्याचे मित्र एक दिवस नारायणगावात आले. आम्ही दिवसभर गप्पा मारल्या. त्यांच्याशी केलेल्या चर्चेतून गावातील भावकीने त्यांना दिलेल्या जीवघेण्या वेदना समजल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श सांगणार्‍या दलितांनी खेरशेत गावात बौद्धांची भावकी उभी करावी, ही गोष्ट प्रागतिक महाराष्ट्राला धक्कादायक आहेच; पण कोकणातल्या अनेक खेड्यांत आता दलितांच्या भावक्या जाचक बनल्या आहेत, असे दिसते. विशेषत: गेल्या तीन-चार वर्षांपासून या भावक्या अधिक सक्रिय झाल्याचेही दिसते.

संदीप आणि त्याचे मित्र शहरात गेले. कामधंदा करू लागले. जात, धर्म आणि गावगाड्याच्या सामंती वर्चस्वाविरोधी गावात प्रबोधन करू लागले. हे प्रबोधन वर्गवर्चस्वात रुतलेल्या भावकीला कसे पटेल?…. मग भावकीने संदीप आणि त्याच्या मित्रांना वाळीत टाकले. कुणाचा भाऊ, कुणाची आई, तर कुणाच्या मामाचे निधन झाले, तरी भावकीने संदीप आणि त्याच्या मित्रांना गावात येऊ दिले नाही. बौद्ध वस्तीतील इतर दलितांनी त्यांच्या घराशी असलेले संबंध तोडले. बोलणे थांबवले. एवढेच नव्हे, तर एकमेकांकडे पाहणेही टाळले. भावकीचा जाच भावाभावात अशी उभी रेष मारून गेला. वस्तीतले सारे दलित हे उपेक्षितच… पण गावकुसाबाहेर राहूनही नवे गावकुस तयार करणारा दलित समाज परिवर्तनापासून दूर राहणार, हे नक्कीच.

कोकणात गावकीचा फार जुना शाप आहे. खरे तर गावात एकोपा निर्माण करण्यासाठी सुरू झालेली ही गोष्ट असावी. गावकीच्या प्रमुखाला मानकरी म्हणतात. हा प्रमुख बहुधा मराठा उच्चवर्णीय जातीचा असतो. मानकर्‍यांचा मान एकाच कुटुंबात वंशपरंपरागत एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे जात असतो. खेरशेतमध्ये आप्पा जाधव मानकरी आहेत. न्यायनिवाडा करणे, गावातल्या सर्व विधिकार्यात पहिला मान घेणे, तंटा-भांडणे मिटविणे, मंदिराची तिजोरी सांभाळणे, अशा अनेक प्रतिष्ठेच्या गोष्टींत जातवर्चस्वाची झुल पांघरून हा मानकरी मिरवत असतो. गावात प्रत्येकाने त्याच्या मर्जीप्रमाणे वागावं, ज्याच्या त्याच्या पायरीनं राहावं, कुणी प्रतिप्रश्न करू नये, अन्यायाला प्रतिकार करू नये, सारं काही मानकर्‍यांच्या मर्जीप्रमाणं चालावं, अशी त्याची अपेक्षा असते. जणू काही आख्खा गावगाडा आपल्याच मर्जीत ठेवून समांतर न्यायव्यवस्थेचे प्रतीक बनलेला हा मानकरी कोकणात अनेक गोष्टींत दलाली मिळवतो, हे कसा नाकारता येईल?

गावातल्या राजकीय पुढार्‍याला आपल्या सोयीनं मदत करणारा मानकरी लोकशाहीच्या तत्त्वांना किती सहज पायदळी तुडवतो. गावकीचा मान शाबूत राहावा म्हणून राजकारण्यांच्या पुढे लाचार होतो. बुद्धीचा अथवा सम्यक विचारांचा कोणताही अंश डोक्यात नसताना केवळ सत्तेची खुर्ची असते म्हणून मुजोरी करणारे मानकरी कोकणात गावोगावी आहेत. खरे तर कोकणचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास झाला नाही, यास तिथल्या रूढी, परंपरा, विधी आणि अंधश्रद्धा जशा कारणीभूत आहेत, तसे कोकणात गावागावांत दिसणारे मुजोर मानकरी आणि तत्त्वशून्य भावकीचे अध्यक्षही जबाबदार आहेत, असेही म्हणता येईल.

कोकणात अनेक दलित जातींत या भावक्या आहेत. धर्माचरण करणार्‍या जातींनी त्या जोपासल्या आहेत. अगदी मातंग, चर्मकार, मुस्लिम, बौद्ध, कुणबी अशा प्रत्येक जातींच्या भावक्या वेगवेगळ्या आहेत. सारे काही चालते ते जातिव्यवस्था बळकट करण्यासाठी! अंधश्रद्धा पसरविण्यासाठी, धर्माचा विळखा घट्ट करण्यासाठी आणि गावकीचे सरंजाम कायदेकानून पाळण्यासाठी या भावक्या काम करतात. अशा भावक्यांच्या विरोधी संदीप आणि त्याचे मित्र काम करतात. समाजाला जागृत करतात. माणसांना हक्क आणि कर्तव्यांची जाणीव करून देतात. समता आणि संविधान रुजवतात.

देशीवादी सरंजामी जातव्यवस्थेने उभी केलेली गावकी आणि जातीचा आधार घेऊन लाचार बनलेली दलितांची भावकी, या दोन्ही गोष्टी पुरोगामी महाराष्ट्रासाठी चांगल्या नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये धर्मांतर केले. त्याची फलश्रुती म्हणून गावगाड्यातल्या दलितांनी गावकीची घाणेरडी कामे नाकारली. दवंडी देणे, मेलेले जनावर ओढणे, मैला काढणे, अशी दुर्गंधी देणारी कामे नाकारून दलितांनी नवा स्वाभिमान जागृत केला. पण हा स्वाभिमान सर्वच दलितांनी बाळगला असे नाही. व्यवसायाला जोडलेल्या काही महारेतर जाती गावगाड्याची चाकरी करून आपला मतलब साधण्यात धन्यता मानतात, हेही नाकारता येत नाही. एकीकडे परिवर्तनवादी असल्याची हाकाटी पिटायची, दुसरीकडे नोकरीत, शिक्षणात आणि राजकारणात आरक्षणाचा फायदा घ्यायचा आणि निर्णायक क्षणावर बाबासाहेबांना सोयीने विसरायचे, असे खोटारडे वर्तन करण्यात काही माणसे खूप पटाईत आहेत. ती कुठेही दिसतात. अशा मतलबी माणसांनी कोकणातील भावकी संघटना टिकवण्याचा प्रयत्न केला आहे.

संदीप पवार हा कोकणातला तरुण गेली दहा वर्षे लढतो आहे. भावकीत वाळीत टाकण्याचा शाप झेलतो आहे. त्याला त्याचेच मित्र मिळत गेले. सारे मित्र अशिक्षित, असंघटित, दारिद्य्राचे चटके झेलणारे, पण विचारांनी मात्र गर्भश्रीमंत! गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहूंच्या क्रांतिकारी विचारांची प्रचंड मोठी संपत्ती संदीप आणि त्याच्या मित्रांकडे आहे. संदीपने द्रोह केला… गावकीच्या अध्यक्षांना जाब विचारण्याचा. संदीपने द्रोह केला… गावकीच्या मानकर्‍यांना समतेचे तत्त्वज्ञान सांगण्याचा… सामंती गावकी आणि तत्त्वशून्य भावकी या दोन्हींच्या दृष्टीने संदीप आणि त्याचे साथीदार देशद्रोही आहेत. देशद्रोही, राष्ट्रद्रोही या व्याख्या शिरजोरांनी सोयीने ठरविलेल्या की, यातून न्याय-अन्यायाचे तीन-तेरा वाजणार, हे उघड आहे. सत्तेत असणार्‍या राजकारण्यांनी, खुर्चीचे गुलाम बनलेल्या बिनचेहर्‍याच्या धटिंगांनी किंवा सत्तेला आपल्या सोयीने फिरविणार्‍या दलालांनी कुणाला देशद्रोही म्हणायचे आणि कुणाला देशभक्त, हे आपापल्या सोयीने ठरवून टाकले की, समाजात हजारो संदीप निर्माण होणार, हे नक्की. पण व्यवस्थेने नाडलेला संदीप मात्र एकटा नाही. तो उभा आहे ताठ मानेने… एका हातात संविधान घेऊन आणि दुसर्‍या हाताची मूठ क्रांतीसाठी उभारून!…. उद्याच्या स्वाभिमानी बदलासाठी. गावकीत आणि भावकीत संदीपला मान नाही. त्याचा सम्यक विरोध नाकारणारे गल्लोगल्ली उभे आहेत. कधी निषेधाच्या पाट्या हातात घेऊन, तर कधी दंडुक्याचा धाक उगारून. खरंच! संदीपचा निषेध करण्याचा अधिकार या मंडळींना आहे?…. नक्कीच नाही.

गावकीत आणि भावकीत गमवलेली पत विचारांच्या हिमतीवर मिळवण्यापेक्षा सत्तेच्या मस्तीत शोधणं हे या मंडळींना जास्त सोयीचं आहे. त्यामुळे जातिव्यवस्थेने बरबटलेल्या भारतीय समाजात रोज नवेनवे संदीप निर्माण होतील, नाडले जातील, गावाबाहेर काढले जातील, त्यांना नोकरीत त्रास होईल, सत्तेचा जाच होईल, पण कोंबडं झाकून ठेवलं, तरी ते आरवतंच ना! डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचं ऊर्जास्थान काळजात घेऊन वावरणार्‍या तमाम संदीप आणि त्याच्या प्रागतिक साथीदारांना एक दिवस क्रांतिकारी सलाम केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. कारण व्यवस्था खोटी आहे, संदीप मात्र सच्चा कार्यकर्ता आणि निष्ठावान माणूस आहे.

दोन महिन्यांपूर्वी संदीपचा मुंबईहून फोन आला. गावातल्या भावकीला तो वैतागला होता. तो म्हणाला की, दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्येचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत म्हणून माझ्या गावातल्या भावकीत म्हणजे दलित वस्तीत निषेधसभा घ्यायची आहे. काही मोठी माणसं गावात आल्याशिवाय समाजात प्रबोधन होणार नाही, असे सांगून निषेध सभेसाठी संदीपने फोनवरच अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, उदय भट, भीमराव रासकर आणि माझीही तारीख घेतली. अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर गावात येणार म्हणून गावकीतले पुढारी चपापले. उदय भट कम्युनिस्ट पार्टीचे नेते, भीम रासकर महिला राजसत्ता आंदोलनाचे प्रमुख, अशी सारी बडी मंडळी कार्यक्रमाला येणार म्हटल्यावर संदीपचा त्रास वाढला.

भावकीच्या अध्यक्षाने भावकीने कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून फर्मान काढले. आपल्या मोजक्या; पण निष्ठावान साथीदारांसह संदीपने हा कार्यक्रम घ्यायचे नक्की केले. वस्तीतील प्रत्येक जण या मुलांकडे शंकेने पाहायचा. निमंत्रण पत्रिका छापणे, तालुक्याच्या गावी जाऊन माणसांच्या भेटीगाठी घेणे, अशी सर्व कामे या मुलांनी केली. संदीपकडे कार्यक्रमाला जागा नव्हती. एका परिचिताच्या घराशेजारी मोकळी जागा मिळाली. संदीपने भव्य स्टेज उभारला. अगदी शहराला शोभावा, असा साज निर्माण केला. कार्यक्रमाचा माहोल तयार झाला. फ्लेक्स, बातम्या यांची पूर्ण तयारी झाली. हळूहळू माणसं जमू लागली, काही जातपंचायतीच्या भीतीनं दूरवर जाऊन बसली. काही तरुण मुलंही मदत करत होती. ती संदीपच्या रुपानं नवा नायक पाहत होती.

कार्यक्रम सुरू झाला. जमलेल्या लोकांच्या चेहर्‍यावर उत्सुकता होतीच; पण जातपंचायतीची अघोषित दहशत मात्र मोठी होती. आम्ही सारे बोललो… चांगलेच बोललो. मुक्ता दाभोलकरांनी अनेकांना विचार करायला लावले. शेवटी जातवर्चस्व, धर्माचा पगडा आणि रुढी-परंपरेतून आलेल्या अंधश्रद्धा दूर केल्याशिवाय भारतीय समाज सुखी होणार नाही, हे खरेच आहे.

खेरशेत गावात हा समाजप्रबोधनाचा पहिलाच कार्यक्रम होता. त्याच दिवशी भावकीतल्या काही विरोधी लोकांनी मुद्दाम क्रिकेट स्पर्धा भरवल्या होत्या. पण क्रिकेटच्या मनोरंजनापेक्षा अनेकांना संदीप आणि मित्रांनी आपल्या गावात घडवलेले विचारांचे अंजन जास्त महत्त्वाचे वाटले. शेवटी गावात लोकशाही आणण्यासाठी केवळ एका संदीप पवारची गरज नाही, तर प्रत्येक गावात नवे नवे निर्भय संदीप (संदीप पवार – 9930104103) उभे व्हायला हवेत. चला, आपण सारे संदीपला साथ देऊ या!

आपल्या देशात गेल्या काही वर्षांत जी असहिष्णुता वेगाने पसरली आहे, ती माणसाचे माणूसपण खतम करून त्याला वस्तू करायला उभी आहे. आपल्या लेखनावर, भाषणावर, खाण्यावर, पिण्यावर, फिरण्यावर… एकूणच काय, तर आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड मोठा राजकीय दबाव येत आहे. हा दबाव दूर करून विचारस्वातंत्र्याचा अवकाश मोठा करण्यासाठी एकटा संदीप काय करेल? यासाठी आपण कुणीही असो वा कुठेही असो… प्रत्येकाने संदीप बनायला हवे. संदीपला गावकुसाबाहेर टाकले, त्याला मारले, त्याच्या प्रत्येक कामात अडथळा आणला, त्याची मानहानी केली, त्याला दारिद्य्रात लोटले, त्याचे चारित्र्यहनन केले, त्याला तुरुंगात टाकले आणि त्याला देशद्रोही म्हटले, तरी संदीप मरणार नाही. कारण विचार मरत नसतो.

आपण कुणीही असो… संदीप मात्र प्रत्येकाच्या मनात आहे… निर्भीड आणि निर्भय हे त्याचे नाव आहे. आपल्याही अवतीभवती नव्या स्वरुपात भावकी आहे… सरंजामी गावकीही आहे. तिला उद्ध्वस्त करण्यासाठी गरज आहे, ती आपल्या विवेकी आतल्या आवाजाची. कुणी विद्यार्थी आहेत, कुणी शिक्षक, कुणी क्लार्क, कुणी पत्रकार, कुणी डॉक्टर, इंजिनिअर, श्रमिक, मजूर, समाजसेवक, तर कुणी रखवालदार, वेटर, कुणी ड्रायव्हर… आपण कुणीही असो… आपण विचारी आणि समाजभानी असू, तर आपल्याला संदीप आपल्याला नक्की दिसेल. त्याला साथ देऊन, मदतीचा हात देऊन… नक्की दाखवू या की… संदीप मरते नहीं!

शेवटी उदय प्रकाश यांच्या काही ओळी….

मरने के बाद आदमी कुछ नहीं बोलता।

मरने के बाद आदमी कुछ नहीं सोचता॥

लेकीन…

कुछ नहीं बोलने से और कुछ नहीं सोचनेसे

आदमी मर जाता है।”

मोबा. 9766984770