Categories
अंधश्रद्धा

आफ्रिकेतील अंधश्रद्धा

एप्रिल - २०१८

मागच्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात होणार्‍या ‘ग्लोबल मुव्हमेंट फॉर मेंटल हेल्थ’च्या द्विवार्षिक बैठकीला उपस्थित राहण्याचे मला आमंत्रण आले होते. जगभरातील मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्था-संघटनांची ही शिखर संस्था आहे. आफ्रिकेत जायची संधी मिळाली आहे तर तिचा उपयोग करून तेथील “अंधश्रद्धा आणि विवेकवादी चळवळीची सद्य:स्थिती” याचा देखील अभ्यास करायचे असे मी जातानाच ठरवले होते.

आफ्रिकेतील अंधश्रद्धांचा अभ्यास सुरू करायला मला विमानतळावर उतरल्या नंतर फार वेळ वाट पाहावी लागली नाही. जोहान्सबर्गमध्ये उतरून हॉटेलकडे जात असताना रस्त्यावर सुटाबुटातील आध्यात्मिक बाबांचे बोर्ड नजरेस पडू लागले. येशूची ठराविक पद्धतीने प्रार्थना केली, तर तुमचे कसे कल्याण होईल असे सांगणारे हे बोर्ड होते. आपल्या कडचे बाबा, बुवा आणि माँचे फोटो आणि हे फोटो यामध्ये फरक असेल, तर तो एवढाच की, जोहान्सबर्गचे हे आध्यात्मिक बाबा सुटाबुटात होते. या आध्यात्मिकबाबांच्या दाव्यांच्यामध्ये मात्र आपल्या येथील दाव्यांच्या पेक्षा फार काही फरक नव्हता. तुम्हाला मन:शांती हवी आहे का? कुटुंबात प्रश्न आहेत का? व्यवसायात यश हवे आहे का? तर मग अमुकतमुक व्यक्तीच्या प्रवचनास या! अशा स्वरुपाचे ते बोर्ड होते. दक्षिण आफ्रिका हा देखील भारतासारखा विकसनशील देशांच्या वरच्या टप्प्यात असलेला देश आहे. त्या पार्श्वभूमीवर तिथे देखील नव्याने तयार झालेला उच्च-मध्यमवर्ग आहे, जो अशा स्वरुपाच्या आध्यात्मिक बुवावाजीला एकदम सुपीक जमीन पुरवतो. त्यामुळे आफ्रिकेतही या स्वरुपाच्या बुवांचे पीक जोमाने येत असेल तर त्यात फारसे नवल नाही. पुढच्या आठवड्याभराच्या वास्तव्यात आमच्या गाडीचा ड्रायव्हर, हॉटेलमधील कर्मचारी, मीटिंगला आलेले आफ्रिकन देशांच्या मधील प्रतिनिधी अशा अनेक जणांशी ‘आफ्रिकेतील अंधश्रद्धा’ याविषयी संवाद साधण्याची संधी मिळाली आणि असे लक्षात आले की, आपल्याकडील आदिवासीबहुल भागात असलेली विच (डाकीण) ही संकल्पना आफ्रिकेत देखील मोठा परिणाम साधून आहे. वन्य जीवांशी असलेला तेथील जनजीवनाचा जवळचा संपर्क पाहता विच (डाकीण) ही केवळ माणसांच्या नाही तर प्राण्यांच्या रुपामध्ये देखील येते असे तेथे समजले जाते. ‘घाना’ नावाच्या आफ्रिकेतील देशातील मनोरुग्णालयात काम करणारा एक तरुण मनोविकारतज्ज्ञ तिथे माझा मित्र झाला.त्याच्या अनुभवाप्रमाणे मानसिक आजार आणि अंधश्रद्धा यांचा आपल्याकडे दिसून येतो, तसा जवळचा संबंध तेथे देखील दिसून येतो. त्याच्या रुग्णालयात येणार्‍या बहुतांश रुग्णांना आधी कुठल्यातरी स्थानिक मांत्रिक-तांत्रिकांच्याकडे नेऊन आणलेले असते. अशा लोकांना आफ्रिकेतील काही भागात विचडॉक्टर (डाकिणीचे डॉक्टर) म्हटले जाते.

‘वुडू’नावाची आफ्रिकेतील जीवनशैली अंधश्रद्धांशी खूप जवळून संबंधित आहे. या जीवनशैलीमध्ये आत्मा, भूत, प्रेत अशा अनेक मिथकांचा मोठा प्रभाव आहे. या गोष्टींचा कोप झाल्याने वाईट गोष्टी होतात आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंत्रिकाच्या कडून त्यावरती उतारा मिळू शकतो, असे तिथले लोक समजतात.

आपल्याकडे ज्याप्रमाणे तथाकथित उच्चवर्गीय आणि कनिष्ठवर्गीय यांच्या अंधश्रद्धा वेगवेगळ्या असतात, तसेच आफ्रिकेत देखील श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्या अंधश्रद्धा वेगवेगळ्या दिसून येतात. आफ्रिकेतील श्वेतवर्णीय लोकांच्या मध्ये आध्यात्मिक बुवाबाजीचा जोर दिसतो, तर कृष्णवर्णीय लोकांच्या मध्ये ‘विच’, ‘वुडू’ असे प्रकार जास्त दिसतात.

माझ्या हॉटेलच्या व्यवस्थापकाशी गप्पा मारताना त्याने मला आफ्रिकेतील अनेक छोट्या-मोठ्या अंधश्रद्धा सांगितल्या. त्यांचे आपल्याकडील अंधश्रद्धांशी असलेले साम्य चकित करणारे आहे. ‘रात्रीच्या वेळी नखे कापू नयेत’, ‘काळे मांजर आडवे गेले तर अपशकुन होतो’, इथपासून ते गरोदर स्त्रीच्याविषयीच्या अनेक रीतिरिवाजांच्यामध्ये अंधश्रद्धा आहेत.‘प्राण्यांना स्त्री गरोदर असल्याचे कळते’ किंवा ‘गरोदर स्त्रीने झूमध्ये जाऊ नये’ अशा काही अंधश्रद्धा आहेत. ‘तोकोलोशो’ नावाच्या, उंचीने अगदी छोट्या असलेल्या एका काल्पनिक प्राण्याविषयी एक गंमतशीर अंधश्रद्धा आहे. दुसर्‍याचे वाईट करायचे असेल, तर आफ्रिकन मांत्रिक या ‘तोकोलोशो’चा आधार घेतात. तो रात्रीचाच घरी येतो आणि आपल्यावर काळी जादू करतो, असा समाज आहे. त्याला नामोहरम करण्यासाठी झोपण्याच्या दिवाणाच्या खाली वीट ठेवून त्याची उंची वाढवणे इतक्या साध्या उपायाने देखील त्याला आपल्यापासून दूर ठेवता येते.

मी साऊथ आफ्रिकेत असताना एक आणखी गंमतशीर गोष्ट घडली, ज्यामुळे भारताची प्रकर्षाने आठवण झाली. केपटाऊन हे साऊथ आफ्रिकेतील मोठे शहर आहे. तेथे गेली काही वर्षे अगदी तुरळक पाऊस पडला आहे. संपूर्ण केपटाऊनवर दुष्काळाचे मोठे सावट आहे. ते इतके तीव्र आहे की, आमच्या मीटिंगला आलेला केपटाऊन मधील एक मनोविकारतज्ज्ञ घरातील कपडे धुण्यासाठी म्हणून एका मोठी पिशवी भरून जोहान्सबर्गला घेऊन आला होता.

गंभीर बाब अशी की, दुष्काळ निवारण्यासाठी शास्त्रीय प्रयत्न करण्याचे सोडून तेथील राजकारण्यांनी एका धर्मगुरूला प्रार्थना करण्यासाठी बोलावले होते आणि केपटाऊनच्या लोकांना तेथील लोकप्रतिनिधींनी या प्रार्थनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. आपल्याकडे दुष्काळ पडल्यावर होणार्‍या प्रार्थना आणि यज्ञ यांच्यापेक्षा यामध्ये काहीच फरक नव्हता. असलाच तर फरक एवढाच होता की, केप टाऊनमध्ये या अवैज्ञानिक गोष्टीला विरोध करायला ‘अंनिस’ नव्हती!

या पार्श्वभूमीवर साऊथ आफ्रिकेतील विवेकवादी कामाची चौकशी करायचा प्रयत्न केला. देव-धर्माचे अस्तित्व नाकारणारे काही छोटे-छोटे ब्लॉग आणि सोशल मीडिया गट मला दिसले; पण अंधश्रद्धेच्या विरोधात तळागाळात जाऊन कामं करणारे कोणतेही संघटन मला तिथे दिसून आले नाही किंवा माहिती देखील मिळाली नाही. जे गट होते त्यांचे फक्त सोशल मीडियाकेंद्री काम होते. सभासद देखील हाताच्या बोटावर मोजण्याएवढे होते. त्यातील काही संघटनांना मी संपर्क केला; पण माझे तिथले वास्तव्य फारच कमी काळाचे असल्याने भेट होऊ शकली नाही. थोडा अभ्यास आणि वाचन केल्यावर माझ्या असे ध्यानात आले की, तिथल्या चिकित्सावादी परंपरेवर देखील युरोप आणि अमेरिकेतील चिकित्सावादी परंपरेचा मोठा परिणाम आहे; पण जशी आपल्याकडे संत आणि समाजसुधारकांची परंपरा आहे, तशी तिथे देखील मुळच्या आफ्रिकन लोकांच्या मधील एक चिकित्सक परंपरा आहे.

एकूणात काय, तर इतक्या दूरच्या देशात देखील आपल्यासारखेच अंधश्रद्धाचे आणि अविवेकाचे वातावरण दिसून आले. दिसून आले नाही ते ‘अंनिस’ सारख्या संघटनेचे अस्तित्व! त्यामुळे जसे आपल्या संघटनेला बाहेरच्या राज्यातून मागणी येत आहे, तशी मागणी बाहेरच्या देशांच्या मधून येऊ लागली, तर नवल नाही!