‘न्यूरोसायकॉलॉजिया’ नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार मेंदूतील एक भाग, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स, योग्य काम करेनासा झाल्याने धार्मिक मूलतत्त्ववाद निर्माण होतो. मेंदूच्या या भागाला धक्का पोचल्याने माणसाच्या आकलनातील लवचिकता आणि विचारासंबंधीची उदारमनस्कता कमी होते. कुतूहल व सृजनशीलतेवर परिणाम होऊन अपरोक्षरित्या धार्मिक मूलतत्त्ववाद वाढीस लागतो.
समाजात पसरलेल्या, खर्या समजल्या जाणार्या, पारलौकिक घटना आणि व्यक्तिरेखा म्हणजेच माणसाच्या धार्मिक श्रद्धा होत. धार्मिक श्रद्धा या सप्रयोग सिद्ध होऊ शकणार्या विश्वासाहून वेगळ्या असतात. नवनवीन पुरावे आणि तर्क जसजसे पुढे येतात, तसतसा माणसाचा विश्वास बदलत जातो; धर्मश्रद्धांचे तसे होत नाही. नवीन शास्त्रीय पुरावे पुढे आले, तरी धार्मिक श्रद्धा स्थितीवादाशी निगडित आणि अपरिवर्तनीय राहतात. माणसांच्या गटागटांतील चाली-रीती ठराविक आणि एक साच्यातील होतात, त्यात एक सुसंगतता आणि अनुमानक्षमता येते.
धार्मिक मूलतत्त्ववाद वर्षानुवर्षे चालत आलेल्या धर्मग्रंथातील चालीरीती आणि कल्पना यांच्यावर भर देतो. धर्माच्या विधायक चिकित्सेला, सामाजिक प्रश्नांना उत्तेजन देत नाही. मूलतत्ववाद्यांचे गट त्यांच्या श्रद्धांना, त्यांच्या जीवनपद्धतीला प्रश्न विचारणार्यांना विरोध करतात. त्यांच्याहून भिन्न पारलौकिक श्रद्धा असणार्यांना, त्याचप्रमाणे वैज्ञानिक विचारसरणीला ते आक्रमकपणे विरोध करतात. आपल्या संपूर्ण विश्वकल्पनेला या लोकांकडून धोका संभवतो, असा मूलतत्ववाद्यांचा समज असतो. जगभरातल्या लोकांच्या वर्तनावर धार्मिक श्रद्धांचा फार मोठा प्रभाव असतो. म्हणून धार्मिक मूलतत्त्ववादाला मानसशास्त्र आणि मज्जातंतूशास्त्राच्या दृष्टिकोनातून समजून घेणे आवश्यक ठरते.
धार्मिक मूलतत्त्ववादाशी निगडित मज्जातंतूशास्त्र आणि आकलनविषयक कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील जॉर्डन ग्राफमन यांनी एक संशोधक गटाकरवी संशोधन केले. त्यासाठी त्यांनी व्हिएतनाम युद्धातील सहभागी व्यक्तींचा असा गट निवडला की, ज्यांच्या मेंदूच्या विशिष्ट भागाला इजा झाली होती. त्यापैकी 119 बाधित तर 30 जण इजा न झालेले सामान्य लोक होते. सिटीस्कॅनद्वारे त्यांचे धार्मिक मूलतत्त्ववादासंबंधी सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील बहुतांश ख्रिश्चन निघाले, तर 32.5 टक्के जणांचा खास कुठला धर्म नव्हता. आधीच्या संशोधनावर आधारित संशोधकांनी असे भाकीत केले की, मेंदूचा प्रिफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग धार्मिक मूलतत्त्वावादाबाबत महत्वाचा घटक ठरेल. कारण त्याचा संबंध आकलनाच्या लवचिकतेशी आणि मोकळेपणाने विचार करण्याशी असतो. या दोन्ही बाबींचा आणि मेंदूच्या विशिष्ट भागाला झालेल्या हानीचा परस्परसंबंध वेगवेगळ्या चाचण्या करून प्रस्थापित केला गेला. त्यातून संशोधकांना मेंदूच्या या भागाला झालेली हानी आणि धार्मिक मूलतत्त्ववाद यांचा अपरोक्ष संबंध सिद्ध करता आला.
संशोधनातील हे निष्कर्ष महत्त्वाचे ठरतात. मेंदूला झालेली हानी ही मानसिक अवस्थेमुळे असो वा नशा आणि दारूमुळे किंवा अनुवंशिक कारणाने; त्यामुळे बाधित व्यक्ती धार्मिक मूलतत्त्ववादाची शिकार बनते हे खरे. माणसाची आकलनशक्ती आणि मज्जातंतूंची अवस्था यांचा धार्मिक मूलतत्त्ववादाशी असलेला हा संबंध अभ्यासल्याने एक दिवस धार्मिक मूलतत्त्ववादाचा प्रतिरोध करण्यासाठी काही उपाय सापडू शकतील.
-Bobby Zarian, Raw Story.