राज्यात पावसाचा पत्ता नाही मात्र पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात चक्क पैशाचा पाऊस पडायचा.
नव्यानंच निर्माण झालेला पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा. दुर्गम भाग, शिक्षण, आरोग्य व्यवस्थेची दयनीय अवस्था, कुपोषण अन् दारिद्र्य अन् हाताला काम नाही. अशा परिस्थितीत अडचण आली…. तर आधार एकच भगत वा मांत्रिक! पालघर जिल्ह्यात जवळपास 1000 च्या वर भगत… मांत्रिकांची सत्ता चालते. मन:शांती वा गॅरंटीने घरात सुखाची बरसात करणारे(सुखाचे होलसेल विक्रेते?) संप्रदायवाले वेगळेच.
5 ऑगस्टला टी.व्ही.वर बातमी झळकली…. विक्रमगड तालुक्यातील साखरे गावात मानवी कवट्या व मानवी हाडाचे सांगाडे, नोटांची बंडले, तलवारी व विस्फोटके सापडल्याची…. पैशाचा पाऊस पाडणारी टोळी मिळाल्याची. पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याची.
मुंबईपासून 90 कि.मी.अंतरावर असलेल्या विक्रमगड, जि.पालघर मधील साखरे गावातील तुकाराम डंबाळे हा 10 वी नापास पण बेरकी तरूण. नोकरी नाही तर पुण्याला स्पर्धा परिक्षेची तयारी करतो असे सांगत 2-3 वर्षेगावाबाहेर राहिला. मग परत आल्यावर राजकारण्यांशी ओळखी काढून मानवाधिकार आयोगाचे तालुकाध्यक्ष पद मिळवले. माहितीच्या अधिकाराची भीती घालत लोकांकडून धमकावत पैसे उकळू लागला. पण यातही जम बसला नाही मग काय करावे? तुकारामने झटपट श्रीमंतीचा मार्ग शोधला. पैशाचा पाऊस पाडण्याचा…. दुनिया झुकती है….. बस्स झुकानेवाला चाहिए!
साखरे गावातील विठ्ठल मंदिरामागे जंगलात एक कौलारू झोपडे उभारले….. सोबत कुटुंबातील एकनाथ व प्रभू डंबाळेंना घेतले. नाशिक, पालघर, डहाणू, वसईपासून शेजारच्या गुजरात राज्यातील वापी, संजाण भागात एजंट नेमले. सुरवातीला एक लाखाची रक्कम आणा. रात्री ही रक्कम ज्या ठिकाणी पैशाचा पाऊस पाडायचा त्या झोपडीत गिर्हाईकांसह आणायची…. शेणाने सारवलेल्या जमिनीवर वाघाचे कातडे अंथरलेले. समोर देवीची मूर्ती व मानवी कवट्या व हाडाचे सांगाडे, त्यावर गुलाल अबीर व फुले उधळलेली! बाजूला तलवारी व जिलेटिन या विस्फोटकांचा साठा- बाजूला हवन कुंड पेटलेले.
ही पूर्वतयारी झाली की, आता आलेल्या गिर्हाईकांकडून पैसे ताब्यात घ्यायचे…. पुडकी बांधून वा नोटांची बंडले समोर ठेवायची. पुजेला…. मंत्रोपचारासाठी तुकाराम….. तर हातचलाखीने काही नकली नोटांची बंडले त्यात मिसळून मग काही पैसे घेऊन साथीदार झोपडीच्या वर कौलातून नोटा फेकण्यास सुरवात करी….. पाऊस….. पैशाचा पाऊस…. गिर्हाईक खुश….. आ… हा… हा… याची डोळा पैशाचा पाऊस….? धन्य तुकाराम…. डंबाळे बाबा!
अर्धे पैसे कौलातून टाकल्यावर अचानक एक लाल रंगाची नोट पडायची…. अपशकुन….. अरिष्ट….. आता… पैसे बंद-पाऊस बंद. पैसे येणे थांबायचे. गिर्हाईक अस्वस्थ झाले की सांगायचं. दोन व तीन महिने लागतील पुन्हा हा असा पाऊस पडायचा. जास्त मचमच नको अन्यथा तलवारीचा धाक दाखवून पळवायचे… पुन्हा दुसरे सावज… असा हा प्रकार अनेक वर्षेचाललेला.
5 ऑगस्ट 2015 ला साखरे गावाजवळच्या हनुमाननगरातील काशिनाथ कांबळी या वृद्धाचा मृत्यू झाला होता. या आदिवासीमध्ये मृतदेहाचे दफन केले जाते. गावकरी जेव्हा पिंजाळ नदीच्या काठी अंत्यविधी साठी गेले तेव्हा 8 ते 10 खड्डे स्मशानात दिसले व आपल्या नातेवाईकांचे मृतदेह गायब झाल्याचे आढळले. कोणी केले हे…. काय हा प्रकार… आश्चर्य… गावकरी हादरले… पण चर्चा करता करता कळाले की, आपल्याच गावातील डंबाळे कुटुंब जादूटोणा करते… त्यांचे तर काम नसेल?
गावकरी पोहोचले तुकाराम डंबाळेंच्या झोपडीवर… तिथले दृश्य पाहून सर्वांची बोबडी वळाली. हवन चालू होते. काही गिर्हाईके पैशाच्या पावसाची वाट पहात होती. कवट्या… हाडाचे सांगाडे पाहून त्यांनी डंबाळे कुटुंबियांना जाब विचारला… गावकर्यांचा रूद्रावतार पाहून तुकारामच्या आईने 50 हजार रूपये देते पण पोलिसांत जाऊ नका असे विनवले. पण आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहांची अशी विटंबना पाहून या अघोरी प्रकाराविरूद्ध गावातील माजी सरपंच मधुकर वनमाळी… लक्ष्मण चौधरी…. मारूती वाघेला यांनी आवाज उठवायचाच असे ठरवले. सर्वांनी तात्काळ विक्रमगड पोलीस स्टेशन गाठले. पो.नि.सुनील नंदावळकरांनी लगेच कारवाई केली. पोलिस पाहून मुख्य आरोपींनी पळ काढला. पण 4 जण हाती लागले. बनावट नोटा, तलवारी, वाघाचे कातडे, तंत्र-मंत्र, जादूटोणा करण्याचे साहित्य, मानवी कवट्या, जिलेटिन हे जप्त करण्यात आले. फरार आरोपींचा शोध चालू आहे. जादूटोणा विरोधी कायदा, वन्यजीव संरक्षक कायदा, विस्फोटक पदार्थ बेकायदेशीर बाळगण्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
जादूटोणा…. नरबळी… व इतर अमानुष व अघोरी प्रथा विरोधी कायदा होऊन 2 वर्षेझाली तरी सरकारने हा कायदा लोकांपर्यंत पोहोचवावा म्हणून कुठे जाहिरात दिलीय वा राज्यातील प्रत्येक पोलिस स्टेशनला कायद्याची प्रत दिलीय, प्रत्येक जिल्ह्यात दक्षता अधिकारी नेमून ती माहिती लोकांपर्यंत पोहोचवली असे दिसत नाही. म्हणूनच झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी अघोरी कृत्य करण्याचे प्रकार वाढताना दिसतात. महाराष्ट्रभर सर्वेक्षण केले तर गावागावात देवदेवस्की.. बुवाबाजी.. मंत्रतंत्र करणारे हजारो बाबा, बुवा, भगत…. अम्मा… आढळतील. प्रश्न आहे तो सरकारने इच्छाशक्ती दाखवून या कायद्याचा वापर करून महाराष्ट्रातील जनतेचे शोषण थांबवण्याची.
याच आठवड्यात विक्रमगड तालुक्यातील आलोंडे गावातील ‘जादूटोणा करणे व सर्व रोगांवर हमखास उपचार’ करण्याचा दावा करणार्या किसन रामा लहांगे या भगतावर 85 गावकर्यांनी सामुहिक तक्रार दिल्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
10 ऑगस्टला तुगे, ता.वाडा, जि.पालघरच्या कांतीलाल देशमुख व त्याचा भाऊ नंदकुमार देशमुख हे दारू सोडवणे… इतर सर्व आजार मंत्रशक्तीने व हमखास बरा करण्याचे औषध देतात म्हणून ड्रग्ज अॅण्ड मॅजिक रेमिडीज अॅक्ट 1954 व जादूटोणा विरोधी कायदा” अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे… कार्यकर्ते वैभव पालवे यांनी कळवले आहे.
–दिपक भाते