मास्तरांना पोरांचे निबंध तसे पाठ झाले होते. गेली पंधरा-सोळा वर्ष मास्तरकी करता करता काही ठोकताळे त्यांनी तयार केले होते आणि ते सहसा चुकत नसंत. तुम्हाला आयुष्यात कोण व्हायचं आहे? यावर ते आठवीच्या मुलांना दरवर्षी निबंध लिहायला सांगत. त्यात मुलांनी काय लिहिलं आहे ते मास्तर डोळे मिटूनही सांगू शकत असंत. कारण त्यांचा विषय जसा ठरलेला होता, तसे पोरांचे मुद्देही. अत्यंत वाईट शुद्धलेखन, मराठीची पुरती बोंब, वाईट हस्ताक्षर आणि ठेवणीतली पोपटपंची. मला डॉक्टर व्हायचं आहे, असं पहिलं वाक्य असलं की पुढे, गरीबांची सेवा करायची आहे, आदिवासी भागांत दवाखाना काढायचा आहे, रूग्णसेवा हीच इश्वरसेवा अशा बाता तो विद्यार्थी मारणार हे ठरलेलं. सैन्यात जाणार म्हटलं की पुढे मातृभूमीचं रक्षण वगैरे. सौंदर्य स्पर्धेत सहभागी झालेल्या कमनीय मुली जशा प्रश्नांची उत्तरं सांगायला समजासेवा, मदर तेरेसा यांना वेठीला धरतात तसेच आपले शाळेतले निबंध. पण यावर्षी गण्याच्या निबंधाचं शिर्षक पाहिल्या पाहिल्या मास्तरांनी तो उत्सुकतेने वाचायला घेतला आणि ते वाचतच राहिले-
निबंधाचं शिर्षक होतं- मला साधू व्हायचं आहे’ आणि निबंध होता तो असा –
मला आयुक्शात साधू व्हायला आवडेल. पप्पा आणि मम्मी पर्मिशन देणार नाहीत, हे मला शुअर माहिती आहे, परंतु मला साधू व्हायचं आहे. कारणकी साधूंची मजा असते. मी रोज झीटीव्ही आणि एबीपी चॅनल पाहातो, तेव्हा मला वाटते की आपण शाळा सोडून साधूच झाले पाहिजे. कारणकी, साधूंनी आंघोळ करावी म्हणून त्यांना कुठून कुठून नाशिकमध्ये आणले जाते. त्यातच काही साधू हेलिकाप्टरमध्ये बसून आल्याचेही मला पाहायला दिसले. कधीही कोणता डॉक्टर किंवा इंजीनीअर हेलिकाप्टरमध्ये बसून आल्याचे आपण पाहिले का? मग कशाला उगाचच एवढा अभ्यास करून आणि मम्मी पप्पाचे पैसे वाया घालवून आपण डॉक्टरकीचे शिक्शन घ्यावे? इंजीनीअर मोठे मोठे पूल बांधतो, असं पप्पा सांगतात,परंतु कधी कोणत्या इंजीनीअरच्या हाताने पुलाचे उद्घाटन होते का? परंतु साधूच्या हाताने ते होते.
आणखी एक मोठे आणि म्हत्वाचे कारण की, मला आताही कटिंग करायचा अत्यंत म्हणजे फारच कंटाळा येतो. पप्पा मला ओरडतील म्हणून मी कटिंग करायला जातो. तर साधू झाल्यावर कटिंगसाठी मला कोणीही ओरडणार नाहीच,उलट माझे केस जेवढे जास्त वाढतील,जेवढे जास्त गुंतलेले राहतील तेवढे म्हत्व मला येईल असे सद्या सांगत होता. आपण दोघे घरून पळून जाऊ आणि साधू होऊ असे आम्ही दोघांनी प्लॅनिंगही केले होते. परंतु कारणकी, पप्पा रोज टीव्हीवर नासिकच्या आंघोळी पाहात आसतात, आम्ही साधू झालो, नासिकला आंघोळीसाठी आलो आणि पप्पांनी आम्हाला टीव्हीवर पाहिलं तर ते माझी काय हालत करतील या भीतीनं आम्ही ते आत्ता कॅन्सल केलं. आपण मोठे होऊ तेव्हा पप्पा म्हातारे होतील आणि मग आपण साधू होऊ असं आमचं ठरलं. कारणकी पप्पाचे पप्पा आता म्हातारे झाले आहे आणि पप्पा त्यांना आता बिलकुल घाबरत नाही.
साधूंची मजा म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर केसांची आणि हेलिकॉप्टरची मजा आधी सांगितलेलीच आहे. आणखी मजा म्हणजे, त्यांच्याकडे एकदम सॉल्लिड मोबाईल आसतात, त्यांच्याकडे सॉल्लिड घड्याळं आसतात आणि सर्वात म्हत्वाचं म्हणजे त्यांना पैसे कमावण्यासाठी काहीच मेहनत करावी लागत नाही. पप्पा आल्वेज सांगत आसतात की त्यांनी किती कष्ट केले आणि आपलं घर बाधलं वगैरे. परंतु साधूंना अंगाला राख लावून, गळ्यात माळा घालून, चिलिम ओढत बसले की सगळे काही मिळते. त्यांच्या जेवणाची फसक्लास व्यवस्था होते,असंही चॅनेलवर सांगत होते. सोता राज ठाकरे त्यांची व्यवस्था निट आहे की नाही याची चवकशी करायला आले होते तेसुध्दा पप्पांसोबतच मी टीव्हीवर पाहिले. तेव्हाच मी पप्पांनी विचारणार होतो की मी साधू होऊ का, परंतु विचारले नाही, कारणकी मला भीती वाटली.
याबाबत मी चौकशी पण केली आहे. तिकडे उत्तरप्रदेशात साधूंच्या खूप कंपन्या आहेत, तिकडे साधू होण्यासाठी भरती करतात परंतु त्यासाठी मंत्र शिकावे लागतात असं दिन्या सांगत होता. रम्या मात्र म्हणाला की ते साधू काहीही बडबड करतात, आपल्याला थोडीच खरे मंत्र माहिती असतात? त्यामुळे आपण फक्त ओठ हलवले आणि कोणालाच काही कळणार नाही अशा पध्दतीने, उदाहरणार्थ पीके या पिच्चरमधले नंगा पुंगा नंगा पुंगा हे गाणे म्हटले तरी कोणाला काहीच कळणार नाही. फक्त त्या दिवशी पांड्या म्हणाला तसा एकच प्रश्न आहे. साधूंना लग्न करता येत नाही. मग आपण ते’ कसे करणार? असं पांड्या म्हणत होता. पांड्याला मी काही बोललो नाही, पण नंतर रात्री विचार करताना मलाही तो प्रश्न पडला. आपण आधी लग्न करावे, ते’ करावे आणि मग साधू व्हावे असेही मी ठरवले होते, परंतु लग्न करायचे तर पुन्हा पप्पा म्हणतात तसं डॉक्टर वगैरे व्हावंच लागेल. म्हणजे साधू होण्याच्या मार्गात खूप अडचणी आहेत असे एकूण जाणवते.
साधू होणं कठीण असतं असं मम्मी म्हणतेसुध्दा. पप्पा साधू झाले तर तुला चालेल का, असं विचारलं तेव्हा मात्र मम्मी माझ्यावर वैतागली. मग मी तिला, मी साधू होऊ का असं विचारलं तर ती मारायला धावली आणि मला अभ्यासाला बसवलं. पण मी रोज टीव्ही पाहतो तेव्हा रोज मला वाटते की मी साधू व्हावे कारण की त्यांची मजा असते आणि मोठं झाल्यावर खूप मजा मला करायची आहेच आहे,हे नक्की. तर आता हे मी सांगितलेच आहे मला मोठं होऊन साधू व्हायचं आहे.
–तंबी दुराई