म.अं.नि.स पिंपरी चिंचवड शाखा व ग्रंथदिंडी यांनी आयोजित केलेले प्रा. अभिजित देशपांडे यांचे भाषण…
‘काळ तर मोठा कठीण आलाय.’ दुसर्या महायुध्दानंतर इंग्लंडच्या साम्राज्याचे जगावरील वर्चस्व संपून अमेरिका या महाशक्तीचा उदय झाला व एका जागी बसून जगाला बटिक बनवण्याचे प्रकार सुरू झाले. जागतिकीकरणाच्या लाटेने आर्थिक, सांस्कृतिक क्षेत्रात सर्व जग कवेत घेतले. दहशतवाद ही बाब नव्याने उदयाला आली. ग्लोबलायझेशननं जग जवळ आलं; पण जवळ येऊन नांदायचं कसं, हे कळेना झालं. सहभावापेक्षा संघर्ष बोकाळला आणि महायुध्दात मारले गेले नसतील इतके स्थलांतरित बाधित झाले. त्यांच्या जगण्याचे व जीवनाचे व्यापक प्रश्न निर्माण झाले. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे कुणाकडेच नव्हती. निरुत्तरे व दुरुत्तरे मात्र जास्त होऊन कुणावर तरी खापर फोडणे सुरू झाले. मी मात्र ‘कबुली जबाबाच्या’ स्वरुपात मलाच प्रश्न विचारतो आणि उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. त्रयस्थपणे पाहिले तर आपणाला गुण-दोष कळू लागतात. हा विचार मला म. अंनिसकडून मिळाला असून आज प्रथमच मी म. अंनिसच्या विचारपीठावरून बोलत आहे. अंनिसमध्ये मला विवेकाचा मंत्रजागर आढळला आणि मी त्याच्याशी जोडला गेलो. विवेकाची मोठी ताकद क्षीण झाली आहे. विवेक जागवणारी चिकित्सा, बुद्धिप्रामाण्य क्षीण होणं घातक आहे. माझ्याकडं ते कमी आलं होतं, हे मी प्रामाणिकपणे कबूल केले पाहिजे.
6 डिसेंबर महत्त्वाचा दिवस! महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आणि त्याच दिवशी बाबरी मशीद पाडली जाणे, हे निव्वळ योगायोग नव्हते. बाबासाहेबांनी अतिशय कष्ट घेऊन भारताला दिलेल्या संविधानाला पायदळी घेण्याचा प्रकार अयोध्येमध्ये बाबरी मशिदीला पाडून हेतुतः करण्यात आला. त्यांनी देशाला दिलेली स्वातंत्र्य, बंधुता, समता, करुणा आणि सहकार्य ही मूल्ये पाळली पाहिजेत. ती मूल्ये माझ्या जगण्यातली आहेत की नाहीत, माझ्या घरातील सर्वांना अभिव्यक्तीचे अधिकार मी दिलेत की नाही, माझ्या स्वातंत्र्याने इतरांच्या स्वातंत्र्यांचा संकोच तर होत नाही ना हे मी पाहिले का आणि अनेक प्रकारच्या भिन्नता स्वीकारून घरामध्ये समतेचे मूल्य मी साकारले का, समतेचे मूल्य मी माझ्यापासून सुरू करतो का, हे मूल्य सांभाळण्याकरिता आवश्यक असलेले ‘बंधुता’ हे मूल्य मी अंगीकारतो का (खरे तर ‘बंधुता’ या शब्दावर माझा आक्षेप आहे. महिलांना वंचित ठेवण्याचा तो प्रकार आहे. त्यापेक्षा ‘कौटुंबिक भाव’ हा शब्द अधिक व्यापक आहे.) तुकोबाचा ‘कळवळा,’ बुध्दाची ‘करुणा’ हे भाव त्या ‘बंधुते’मध्ये समाविष्ट आहेत. करुणा ही दृष्टी आहे, डोळा आहे. संवेदनशीलतेने जगाकडं पाहणे म्हणजे ‘करुणा’! बुध्दाला अपेक्षित करुणा मला माझ्यात रुजवता आली पाहिजे. मूल्यांचा गाभा मला माझ्यात आणून जगता येणार नाही का ? यावर माझी गाढ श्रध्दा आहे. यामुळं सगळ्यांचं जगणं सुखकर होईल. सहकार्य हा सहजभाव निर्माण झाला, तर मी माझी जबाबदारी ओळखून मोठ्या व बर्या गोष्टी तयार होतील. या पाचही मूल्यांचा समुच्चय होऊन जेव्हा मी जगेन, त्यावेळेस माझ्यासह समाजाचं जगणं सुसह्य होईल. 6 डिसेंबरच्या दिवसाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ‘कारसेवा.’ काही विपरीत घडू नये म्हणून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कारसेवकांना दिल्लीबाहेरच रोखून धरले. काहींवर लाठीमार झाला, याचा ‘पब्लिसिटी स्टंट’ त्यांच्या विरुध्द करण्यात आला. मी त्यावेळी, 1992 ला मराठवाड्यात परभणी येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. कारसेवेत माझ्यासह माझे कुटुंबीयही सहभागी झाले होते. अन्यायाच्या सुरम्य (?) कथा सांगून संघपरिवाराने वातावरणनिर्मिती केली होती. मीही संघाचा कार्यकर्ता होतो. घरात धार्मिक वातावरण. मी आजोळी गेलो असता कीर्तनकाराची नक्कल करायचो. एकदा आजोळी एक महाराज भेटले. आजोळी (रिसवड) लोकांनी महाराजांशी ओळख करून दिली. मला कीर्तनाला उभे केले. मी त्यावेळी सातवीत होतो. ऐकलेले मी बोलून गेलो व कीर्तनकार झालो. बोलण्याची कला अशी अल्पवयात साध्य झाल्याने संघशाखेत मंडल कार्यवाह म्हणून कार्य करू लागलो. परभणीला असताना लोक आदराच्या दृष्टीने पाहत. आम्ही 2 डिसेंबरला अयोध्येत कारसेवक घेऊन पोेचलो. 1992 साली परभणीमधून 2500 सेवक अयोध्येला कारसेवक म्हणून आले. ‘जय श्रीराम’ हेच तिकीट ! भाषणात मुस्लिम, ख्रिश्चनांविरुध्द गोष्टी पढवल्या जात. बाबरी मशीद पोलीस बंदोबस्तात पाडली. अयोध्येत खूप मंदिरं आहेत. सर्व देशातून विविध गुणधर्माची माणसे ‘जय श्रीराम’ या एका सूत्राने 5 डिसेंबरपर्यंत जमली. 6 डिसेंबरला लाखोचा जनसमुदाय तयार झाला. स्टेजवर अडवाणी, जोशी, महाजन आदी राजकीय नेते, उमा भारती, अशोक सिंघल इत्यादी संघाच्या विविध विभागांची नेतेमंडळी हजर झाली. बरोबर सकाळी 11.55 ला आवाज सुरू झाला. स्टेजकडे सर्वांचे लक्ष लागलेले. त्यावेळी बाबरीवर झेंडे घेऊन लोक चढलेले पाहिले. ‘एक धक्का और दो। बाबरी मशीद तोड दो।’ घोषणांचा एकच कल्लोळ उठला. पाडण्याचं काम बांधकामाइतकंच शिस्तीनं चालू होतं. त्याचा साक्षीदार झालो. अनेक बॅचेसद्वारा बाबरी मशीद रात्रीपर्यंत भुईसपाट झाली. रात्रीला आर्मीने अयोध्येत शिरकाव केला. पोलीस हतबल होते. कट्टर हिंदुत्ववादी, कट्टर मुस्लिम! वातावरण पेटलेले! नरसिंह राव सरकारने पहाटे चार वाजता ‘लाईव्ह फुटेज’ पाहून आर्मीला आदेश पाठवून कल्याणसिंह सरकार बरखास्त केले. नॉन इश्यूला इश्यू बनवून वाढवू दिलं, त्यात दोन कट्टरपंथीयांसह सरकार सामील होतं. तेढ वाढवली गेली. अस्वस्थ काळ आला. हे निष्क्रियतेनं वाढू देणं याला आपणही जबाबदार आहोत. भारतभर दंगली सुरू झाल्या. 7 ते 10 डिसेंबर सर्व रेल्वे स्टेशन्सवर शुकशुकाट पाहायला मिळाला. पूर्ण ट्रेन कारसेवकांनी भरलेल्या. ट्रेन टू पाकिस्तानचं वातावरण जागवलं गेलं. मी त्या क्षणाचा साक्षीदार, उन्मादाचा भाग बनलो. 500 वर्षांपूर्वीचा इतिहास जागा करून वर्तमान बिघडवला गेला. हिंदू उन्मादाने समाजाची परत फाळणी झाली.
माझी आजी म्हणायची, ‘शिवाजीचे सर्व किल्ले पाहायचेत.’ कॉलेजमध्ये शेख शफी नावाचे सर संतमहात्म्य शिकवत. त्यांच्या घरातील एक स्त्री नित्यनेमाने पंढरपूर वारीला जायची. हमीद दलवाई यांच्या लिखाणात मुस्लिम घरात गणपतीपूजा करत असल्याचा उल्लेख आहे. ‘बाबरी’ पडल्याचे दुःख नाही, तो सेक्युलॅरिझमवर हल्ला होता. मुंबईला आलो. संघकार्य थांबलं. एकलकोंडं आयुष्य मिळालं! अवकाश प्राप्त झाला! लायब्ररीत मुबलक पुस्तके वाचायला मिळाली. आंबेडकरी प्रेरणा होत्या. अनेक प्रश्नांवर वाचन झाले. उत्तर मिळत नव्हते. ‘भारतीय तत्त्वज्ञानाचा इतिहास’ हे पुस्तक वाचनात आले. बौध्द, जैन तत्त्वज्ञान वाचून आढळले..1. बौध्द परंपरा .. दुःख , वंचना कमी करणे हे माझी प्राथमिकता आहे. देव असणे-नसणे हा विषय नाही. मी नास्तिकतेप्रत प्रवास केला.
2003 मध्ये मला मुलगा झाला. त्यावेळेस त्याचं नाव मी थोड्याशा आग्रहाने ‘कबीर’ असं ठेवलं. घरामध्ये धार्मिक वातावरण असल्याने, आणि थोडंसं ‘कबीर!’ पण त्यांना कबीर थोडंसं चालणार होतं. कारण कबीर हे सुधीर फडक्यांच्या गाण्यात, ‘कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम….’ थोडा कबीर त्यांना चालणार होता. कारण रामाशी संबंध आहे म्हणून. माझ्या दृष्टीने कबीर वेगळा आहे. साधु देख जग दौराना (दोहराना म्हणजे ‘खुजा’) ‘साधु’ हा शब्द कुणाला उद्देशून वापरतो ? ‘तेरा भस्माचे पट्टे, गळ्यात माळा!’ अशा साधूंना उद्देशून नाही. ‘साधू’ हा शब्द तो माणसांना वापरतो. सगळ्या सर्वसामान्य माणसांना उद्देशून! तो तुम्हालाच साधू म्हणतोय. आणि साधू याचा अर्थ ‘सज्जनहो!’ या अर्थाचा तो शब्द वापरतो. साधू देखू जग दौराना। ( किती जग खुजं आहे !) हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहिमाना! (हिंदू म्हणतात राम आमचाय, मुसलमान म्हणतायत रहिमान आमचाय) आपस मे दो लढे, मरत है। मरन कोई नही जाना। साधु देखु जग दौराना ….। ‘तो’ कबीर माझ्या जवळचा आहे. म्हणून मला माझ्या मुलाचं नाव कबीर ठेवायचंय! कबीर म्हणतो, ‘पोथी पढ पढ जगनुवा पंडित भय ना खोय।’ (पोथ्या वाचून कोणी पंडित नाही होणार, ‘ढाई अक्सर प्रेमका पढे सो पंडित होय।’ प्रेमाची अडीच अक्षरं ज्याला वाचता येतात, तो पंडित!
मग 2004 नंतर मी माझ्या एका निष्कर्षावर आल्यानंतर आणि माझे पुस्तक लिहिल्यानंतर 2003 ला माझा मुलगा जन्माला आला, त्याच्यासाठी तर केलंच; पण त्यानंतर मीही माझ्या कुठल्याही कागदपत्रावर जाणीवपूर्वक आणि कुठे-कुठे तर अॅफिडेव्हिट करून, कुठेही माझी जात आणि धर्म लागणार नाही, याची काळजी घेतली. अॅफेडेव्हिट मला माझ्या मुलाकरितापण करावं लागलं. ज्या वेळेस त्याला शाळेत घातलं, धर्म… जात…. नाही!’ जिथे शिकले-सवरलेले लोक असतील, असा आपला समज आहे, तिथे सुध्दा. परंपरा काय गोल करतात आपल्याला! स्त्रीने आडनाव बदलायचं! का तर परंपरा आणि तुम्ही त्याला धर्माचा आधार देता. ही रुपं मग कशी वेगवेगळ्या प्रकारानं झिरपतात? तलाकपासून शबरीमलापर्यंत! सगळे धर्म, मी शब्द वापरतोय ‘धर्म’ हे पुरुषप्रधान आहेत आणि ज्यावेळेस मी समतेला मानतो, त्यावेळेस मला ही पुरुषप्रधानता, ही विषमता, हा अन्याय दिसलाच पाहिजे. मी मघाशीच पेंडसे काकांशी, पाखले काकांशी बोलत असताना अनेकजण डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील आणि उच्चशिक्षित- उच्चविद्याविभूषित लोक जे आहेत ते सुध्दा कुठल्यातरी कडव्या विचारांच्या आहारीपण गेलेले दिसतायत. त्यामुळं फक्त या प्रकारचं टेक्निकल शिक्षण नाही, तुम्ही मानवतेकडे जोपर्यंत बघू शकत नाही, या मूल्यांकडं बघू शकत नाही, या मूल्यांसह बघू शकत नाही तर ते खरं शिक्षण नाही, असं मला वाटतं. ‘ह्युमॅनिटीज’ शिकलेलो आहे. मी कॉमर्स किंवा सायन्सचा विद्यार्थी नाही. त्या अर्थाने पण ‘ह्युमॅनिटीज’ ही गोष्ट तुम्हाला जे शिकवते, त्यातलं जे मूल्यशिक्षण आपल्याला मिळतं ते अधिक व्यापक जगाकडं पाहण्याचं शिक्षण आहे. मी फक्त एका समाजापुरतं, भारतापुरतं बोलत नाही, हे लक्षात घ्या आणि मग जिथे ‘ह्युमॅनिटीज’ची आज मोठी परंपरा दिसते, ते ‘जेएनयू’सारखे विद्यापीठ आज नादुरुस्त करायला घेतलेले आहे. जिथे ‘ह्युमॅनिटीज’ची मोठी परंपरा आहे ते ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ सत्ताधार्यांनी उद्ध्वस्त करायला घेतलेले आहे. हल्ले किती होताहेत, लक्षात घ्या! त्यांना भीती वाटतेय, व्यापक विचारांची. त्यांचे विचार वाढू नयेत, यासाठीच त्यांचे प्रयत्न आहेत. डॉ. दाभोलकरांची, पानसरेंची, गौरी लंकेशची हत्या या त्यांच्या असुरक्षिततेतून झाल्या आहेत. आपल्याला कुणाला असुरक्षित करायचे नाहीये; पण आपल्याला स्वतः सुरक्षित व्हायचे असेल, समाजाला खर्या अर्थाने सुरक्षित करायचे असेल, आपला समाज खरोखरीच प्रगल्भ बनवायचा असेल, समंजस बनवायचा असेल तर समाजातलं शिक्षणाचं वातावरण वाढलं पाहिजे आणि हे शिक्षण या प्रकारचं फक्त तांत्रिक शिक्षण आणि व्यवसायाचे शिक्षण आणि उद्योगाचे शिक्षण नव्हे. त्यामध्ये ही ‘ह्युमॅनिटीज,’ ही करुणा, ही स्वातंत्र्य समतेची मूल्येपण अध्यावृत असली पाहिजेत, जी आपल्या संविधानाने आपल्याला दिलेली आहेत. जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जगले. आणि याच मूल्यांनी आपण समाजाला खर्या अर्थाने काँट्रिब्युट करू शकतो, असं मला वाटतं. हे सगळं बोलत असताना मी मघाशी म्हणाल्याप्रमाणे या कबुलीजबाबपर नोंदी आहेत. मी काहीतरी एका अपराधगंडातनं गेलेलो आहे. मी काहीतरी पाप केलंय! मी बाबरी मशीद पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होतो, हे ज्या वेळेस मी सांगतो त्यावेळेस मला जाणीव आहे की मी काहीतरी चूक केलेली आहे. आणि त्याची मला कबुली दिली पाहिजे. तुम्ही ज्या वेळेस मान्य करता की, मी एक चूक केली आहे, त्याचवेळी तुमच्या सुधारणांची शक्यता तयार होते. आणि संविधानाचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विवेकाचं स्मरण करून आपण हीच विवेकयात्रा पुढे नेऊया!
शब्दांकन : देविदास इंगळे, पुणे