Categories
प्रतिसाद

वाचक म्हणतात

मार्च - २०१९

अ‍ॅड. सूर्यवंशी सरांवरील लेख आवडला

आपला अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रमधील अ‍ॅड. एन. डी. सूर्यवंशी सरांच्या आदरांजली बद्दलचा लेख वाचला.

आदरणीय इंदिरा जयसिंग ते आदरणीय अविनाश पाटील यांच्यापर्यंतचे विविध संदर्भ देत सरांच्या मूळ स्वभावाची ओळख वाचकांना करून दिली त्यात… क्लृप्त्यांची मदत न घेता काम करण्याची जिद्द…‘महिलांचा आदर’ हा माणूसपणाला झळाळी देणारा पैलू आपण वाचकांसमोर ठेवला…

नर्मदा बचाव, वनजमीन कायदा, सोशीत-वंचित, दलित-आदिवासी, अन्याय, अत्याचार ग्रस्तांसाठी लढणार्‍या लढवय्या नेतृत्वास आपण वाहिलेली आदरांजली नक्कीच अंगावर शहारे आणणारी, तेवढीच आत्मभान जागृत करणारी आहे….

सर माफ करा, आपला परिचय नसतानाही आपणाशी संवाद साधत आहे. मला सरांबाबतीत फार माहिती नाही; पण माझी पत्नी साक्री येथे वकिली व्यवसाय करते. तिच्याकडून कळलेल्या गोष्टींवरून व आपल्या लेखातून सर अंतर्बाह्य असे होते, हे अनुभवास मिळाले.

– जगदीश शिंदे, साक्री, जि. धुळे

———————————–

अ‍ॅड.सूर्यवंशी सराच्या काही नोंदी…

फेब्रुवारी 2019 च्या अंकात जागेच्या मर्यादेमुळे एन. डी. सूर्यवंशी सरांवरील माझ्या लेखात सुटून गेलेल्या दोन महत्त्वाच्या नोंदी :-

1) जळगाव घरकुल घोटाळ्यात विशेष सरकारी वकील म्हणून एन. डी. सूर्यवंशी सरांची नियुक्ती झाली होती. यात त्यांनी केलेले काम व युक्तिवाद देशभर गाजले होते. एखाद्या लोकप्रतिनिधीला काही वर्षे जामीन मिळू दिला नाही, तुरुंगात कोणतीही विशेष सवलत मिळू शकली नाही, असे महाराष्ट्राच्या इतिहासात फार क्वचितच घडले असेल. ते या केसमध्ये घडले. त्याचे सारे श्रेय एन. डी. सरांनाच जाते. यात जेव्हा-जेव्हा तुरुंगात विशेष सवलतीचा मुद्दा आला तेव्हा-तेव्हा सरांनी ‘कायद्यापुढे सर्व समान असतात. त्यामुळे अशी सवलत इतर सर्व कैद्यांना देखील देण्यात यावी,’ अशी आग्रही भूमिका घेतली. दुर्दैवाने याच काळात सरांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर मोठ्या शस्त्रक्रिया झाल्या आणि एन.डी.सरांना या केसच्या कामातून बाहेर पडावे लागले.त्यानंतर मात्र संबंधितांना जामीन झाले. सरांनी लढविलेली ही शेवटचीच केस.

दुसरी घटना आहे- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात सुझलॉन कंपनीचे पवन ऊर्जा प्रकल्प ऊभे राहत होते. त्यासाठी आदिवासींच्या जमिनी अत्यल्प मोबदल्यात बळकावल्या जाण्याच्या तक्रारी होत्या आणि वन विभागाच्या अत्यंत क्लिष्ट परवानग्या देखील रातोरात मिळविल्या जात होत्या. याविरोधात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे कॉ. किशोर ढमालेंच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने चांगलाच जोर धरला होता. शासनाने शेवटी दमनाचा वापर करून ढमालेंना तडीपार करण्याचे आदेश दिले. याविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करून एन. डी. सरांनी अत्यंत मेहनतीने युक्तिवाद करून कॉ. ढमालेंची तडीपारी रद्द केली आणि आंदोलनाला पुन्हा धार आली.

–परेश शहा, शिंदखेडा

————————————

वार्तापत्राने मला पुरोगामी दृष्टी दिली

गेली सुमारे 8-10 वर्षे मी वार्तापत्राचा वाचक व वर्गणीदार आहे. माझ्या डोळ्यांचे रेटिना डॅमेज झाला आहे. हा विकार पूर्ण बरा होऊ शकत नाही. गेली 10-12 वर्षे त्यावर उपचार चालू आहेत; पण वाढत्या वयाबरोबर हळूहळू दृष्टी क्षीण होत असल्याने आता मला वाचन करता येत नाही. त्याच अवस्थेत मी हे पत्र लिहित आहे. खास अंकाचे केवळ मथळे वाचणे; काही मोबदला देण्याची तयारी दाखवूनही कोणी सामाजिक कार्यकर्ता माझ्यासाठी तासभर वाचन करणारा मिळत नाही. स्व. वसंत कारापूरकर या अत्यंत पुरोगामी विचारांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी मला वार्तापत्राचा वाचक व वर्गणीदार बनवले ते रोज मडगावातील लोहिया मैदानावरील स्वा. सै. कार्यालयात यायचे व आमचे प्रबोधन करायचे.

मी 87 वर्षांचा असून शहरांतील एका नामांकित हायस्कूलचा सेवानिवृत्त शिक्षक आहे. पण आता मला वाचना व लिहिताही येत नाही. घरात मुलगा, सून, नातू आहेत ते आपापल्या नोकरीधंद्यात गुंतलेले. त्यांना माझ्यासाठी वाचन करायला वेळ नाही. त्यांचे मोकळ्या वेळेत मोबाईलवर खेळ चालू असतात. माझी पत्नी असती, तर तिने मला वृत्तपत्र वाचून दाखवले असते; पण माझ्या दुर्दैवाने त्या 15 वर्षांपूर्वी मला सोडून गेल्या. त्यांनी गोवा स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता.

हे पत्र लिहिताना डोळ्यांवर ताण येत आहे. दोन बल्बांच्या उजेडात जमेल तसे लिहिले. वार्तापत्राने मला पुरोगामी दृष्टी दिली. डॉ. दाभोलकरांसारख्या अत्यंत पुरोगामी विचारांशी नाते जडले. वार्तापत्राची पुरोगामी सतत वृद्धिंगत होत राहो.

– दामोदर कवळेकर, गोवा

————————————

वार्तापत्राचा फेब्रुवारीचा अंक आवडला

फेबु्रवारी अंक पूर्ण वाचला. आनंद झाला. पान नं. 1 व 2 हे अतिउक्तृष्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद. पान नं. 2 ची माहिती शब्दांत थोडक्यात मांडणे, सांगणे अवघड होते. ते चित्ररूप झालं. नवीन बायोडेटा 100 टक्के लोकांना उशिरा का होईना मान्य होईल, थोडा कालावधी जाईल; पण या पद्धतीचे वापर करून विवाह केलेले निकोप होतील, अशी आशा वाटते.

‘दि लास्ट गर्ल’ या आत्मवृत्ताद्वारे नादिया आणि याझिदी अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या विरोधात झुंज देणार्‍या नादिया या युवतीची चांगली माहिती वाचकांपुढे मांडली आहे. जानेवारी 2019 पासून अंनिवा मध्ये डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘युवा मन’ हे ‘मानसिक आरोग्य’ सदर सुरू केले, ही बाब कौतुकास्पद आहे.

–विलास भांदिर्गे, तारळे, जि.सातारा.