2014 च्या ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये 3 तारखेला एक इसम ‘देवाची पूजा करत आहे, त्यासाठी दक्षिणा द्या’, असे सांगून घरासमोर आला. दुपारी 12:30 ची वेळ होती. घरातील महिलेने त्याला 11 रुपये दक्षिणा म्हणून दिले. दक्षिणा घेत असताना, त्याने त्या महिलेला तिच्या घरातील सध्या चालू असणार्या त्रासाविषयी सांगायला सुरुवात केली. आणि ‘या त्रासातून मी तुम्हाला बाहेर काढेन. फक्त हे कोणाला सांगू नका’ असे सांगून हळदी-कुंकवाची पूड हातात देऊन तो इसम दोन दिवसांनी पुन्हा येतो असे सांगून निघून गेला. दोन दिवसांनी आल्यावर त्याने सांगितले की, यासाठी तुम्हाला विधी करावा लागेल व त्यासाठी मार्वेबीचवर यावे लागेल. बीचवर गेल्यावर त्याने महिलेच्या व तिच्या मुलीच्या नावाचा उतारा केला. त्यानंतर वेळोवेळी असेच पूजा व उतारा करण्याच्या बहाण्याने त्याने या महिलेकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. सुरुवातीला ही महिला सुद्धा मागेल तसे पैसे पुरवत गेली. पुढे जेव्हा तिने पैसे देण्यास नकार द्यायला सुरुवात केली, तेव्हा हा बाबा तिला काळी जादू करून नुकसान करण्याची धमकी देऊ लागला. त्याच्या भीतीने महिलेने घरातील पैसे संपले, तरी शेजार्यांकडून, नातेवाईकांकडून, नवर्याच्या मित्रांकडून पैसे घेऊन, त्या बाबाला नेऊन दिले. पैसे संपल्यावर घरातील दागिने, नवर्याच्या अंगठ्या गहाण ठेवून तिने पैसे दिले. पुढे पूजेसाठी म्हणून मंगळसूत्र सुद्धा तो बाबा घेऊन गेला व परत देतो, असे बोलूनही परत दिले नाही. एवढे सगळे होईपर्यंत जवळजवळ दोन वर्षे उलटली होती. घरातील परिस्थिती काहीही बदलली नव्हती. एव्हाना आपण फसलो आहोत, याची जाणीव त्या महिलेला सुद्धा झाली व तिने त्या बाबाला आपले पैसे परत मागायला सुरुवात केली. पण त्याने पुन्हा ‘काळी जादू करून घराला आग लावू, घरातील लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू’, असे सांगून तिला धमकावले. मग घाबरून त्या महिलेने दादर येथील एका खासगी गुप्तहेराला सुद्धा ही बाब सांगितली. पण त्यांनी तिला अगोदर त्यांची फी भरायला सांगितले. तेवढे पैसे जवळ नसल्याने तिने ते सोडून दिले. नंतर तिने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांकडून विशेष दखल घेतली जात नसल्याचे पाहून महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वेबसाईटवरून राज्य सरचिटणीस नंदकिशोर तळाशीलकर यांचा नंबर घेऊन त्यांना संपर्क केला. दि. 23 एप्रिल रोजी त्यांची गोरेगाव येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व प्रकरण सांगितले.
त्यानंतर महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी चारकोप पोलीस स्टेशनशी संवाद साधून या केससंबंधी पाठपुरावा केला. दि. 7 जून रोजी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते नंदकिशोर तळाशीलकर व सचिन थिटे तक्रारदार महिलेसोबत चारकोप पोलीस स्टेशनला गेले व रीतसर तक्रार दाखल केली. त्या वेळी पोलीस उपनिरीक्षक महादेव भोसले यांनीसुद्धा सहकार्याची भूमिका दाखवली. आम्ही तक्रारदार महिलेकडे त्या बाबाशी झालेल्या काही बोलण्याचे रेकॉर्डिंग होते, ते पोलिसांना ऐकवले व त्यात काळी जादूच्या नावाने धमकी दिल्याचा व पैसे घेतल्याचा उल्लेख असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यांनतर पोलिसांनी सुद्धा तत्परता दाखवत दोन दिवसांत त्या सागर जोशी नामक भोंदू बाबाला महिलेच्या मदतीने त्याच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. दिवसभर चौकशी केल्यानंतर शेवटी त्याने आपला गुन्हा कबूल केला. दुसर्या दिवशी त्याला रीतसर अटक करण्यात आली. सध्या भोंदू सागर जोशी पोलीस कस्टडीत आहे. जादूटोणा कायदा व इतर कलमांतर्गत पोलीस चौकशी चालू आहे आणि पुढील पाठपुरावा मुंबई अंनिस चे कार्यकर्ते व अॅड. तृप्ती पाटील करत आहेत.
– सचिन थिटे,
मुंबई मो. 8424041159