Categories
बुवाबाजी

सांगलीत मौलाना जमीर मुजावर या भोंदूबाबाला सक्तमजुरी

जादूटोणाविरोधी कायदयांतर्गत जिल्हयातील पहिली शिक्षा
जुलै - २०१६

‘धंद्यात बरकत आणून देतो,’ असे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याबद्दल भोंदूबाबा जमीर अहमद मुजावर (वय 24, रा. नांद्रे, ता. मिरज) याला सात वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी नुकतीच सुनावली. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार त्याला एक वर्षाची शिक्षाही यावेळी सुनावण्यात आली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. सुरेश भोसले यांनी काम पाहिले.

‘महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा 2015’ नुसार ही राज्यातील तिसरी, तर जिल्ह्यातील पहिली शिक्षा आहे. या शिक्षेमुळेे भोंदूगिरीला चाप बसणार आहे. जादूटोणाविरोधी कायद्यानुसार पहिलीच शिक्षा झाल्याने याचे ‘अंनिस’सह विविध सामाजिक संघटनांकडून या निकालाचे स्वागत करण्यात आले.

खटल्याची पार्श्वभूमी अशी : नांद्रे (ता. मिरज) येथील दर्ग्याजवळच गावातील एका तरुणाचा ‘चिकन-65’ चा हातगाडा आहे. 8 मार्च 2014 रोजी नांद्रे दर्ग्यातील तथाकथित बुवा जमीर मुजावर या तरुणाच्या गाड्यावर गेला. त्याच्या धंद्याची विचारपूस केली. धंदा चांगला चालतो; पण पैसे शिल्लक राहत नसल्याचे तरुणाने त्याला सांगितले.

त्यानंतर धंद्यात बरकत येऊन पैसे टिकण्यासाठी घरी येऊन पठण करतो, असे जमीरने त्याला सांगितले. त्यानुसार दुसर्‍या दिवशी (9 मार्च 2014) घरी येऊन धंद्यात बरकत येईल, असे काहीतरी करून देण्याचे आमिष जमीरने त्याला दाखवले. त्याप्रमाणे दुसर्‍या दिवशी सकाळी जमीर हा तरुणाच्या घरी गेला.

तो तरुण त्याच्या कुटुंबियांसह एकाच खोलीत राहत होता. जमीरने तरुणाला वाटी भरून खोबरेल तेल आणावयास सांगितले. एकांतात प्रार्थना करण्याच्या बहाण्याने जमीरने सर्वांना घराबाहेर काढले व दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतर प्रथम त्या तरुणाला घरात बोलविले. त्याच्या अंगाला तेल लावले. त्यानंतर त्याला बाहेर जाण्यास सांगून पत्नीला आत पाठविण्यास सांगितले. तरुणाची पत्नी घरात आल्यानंतर आपण परमेश्वराचा अवतार असल्याचेे भासवून तरुणाच्या पत्नीला खोलीत बोलविले.

‘डरने का नहीं, डॉक्टर जैसे इलाज करतेे है वैसे मै तेरा इलाज करता हूँ’ असे म्हणत भोंदू जमीरने त्या महिलेवर बलात्कार केला. ‘या घटनेची कुठे वाच्यता केल्यास मुलाला ठार करेन’, अशी धमकीही त्याने पीडित महिलेला दिली. त्यानंतर बाहेर आल्यावर महिलेने घडलेला प्रकार पतीसह नातेवाईकांना सांगितला. ते पाहून जमीरने तेथून पलायन केले.

त्यानंतर पीडित महिलेच्या पतीने व नातेवाईकांनी गावातील व समाजातील प्रतिष्ठीत लोकांना बोलावून घेतले. त्या बैठकीमध्ये जमीरला गावाबाहेर काढण्याचे व त्याच्याकडून कबूलनामा लिहून घेण्याचे व पोलिसात फिर्याद न देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणेे जमीरने कबूलनामा लिहून दिला. परंतु त्याला गावाबाहेर काढले नाही म्हणून पीडित महिलेने 11 मार्च 2014 रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी तपास करून जमीरविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. यामध्ये त्यांना हवालदार विद्यासागर पाटील यांनी मदत केली.

सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. प्रधान जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उल्हास चिप्रे यांनी आरोपींच्या शिक्षेवर युक्तिवाद केला. न्यायालयाने जमीरला भा.दं.वि.376 अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व 10 हजार रूपये दंड; तर जादूटोणाविरोधी कायद्यान्वये एक वर्ष सक्तमजुरी व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडापैकी 10 हजार रुपये पीडित महिलेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकार पक्षाला हवालदार रमा डांगे, वंदना मिसाळ यांनी मदत केली. पिडीत महिलेस मदत करण्याचे काम सांगली अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, प्रा. प. रा. आर्डे, चंद्रकांत शिंदे, चंद्रकांत वंजाळे यांनी केले.

अभिजित बसुगडे