‘मुलगाच होईल’ असे सांगून फसवणार्या भरत जिनगोंडा पाटील यास (हलोंडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 च्या 32 (2) व 33 (अ) या कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली.
महाराष्ट्र अंनिस, कोल्हापूर शाखेच्या बुवाबाजीविरोधी कार्यवाह गीता हासूरकर कोल्हापूर-सांगली रस्त्यावरून निघाल्या असताना त्यांनी ‘हमखास मुलगाच होईल’ अशा जाहिरातीचा बोर्ड वाचला. महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर शहर शाखेच्या साप्ताहिक बैठकीत गीताताईंनी या जाहिराती संदर्भात माहिती दिली. त्यानंतर अंनिस राज्य कार्यवाह सुजाता म्हेत्रे व गीता हासूरकर यांनी हलोंडी येथे भरत पाटील यांची भेट घेतली, तेव्हा त्यांना भरत पाटील महिलांना मुलगा होण्यासाठी औषधे देत असल्याचे दिसून आले. तेथे त्यांनी पुढील भेटीची वेळ पाटील याच्याकडे मागितली व त्याचवेळी मावशीच्या मुलगीस मुलगा व्हायचे औषध द्यावे, असे सांगितले व आपला मोबाईल क्रमांक दिला.
कारवाईच्या दिवशी अंनिसच्या सुजाता म्हेत्रे, गीता हासूरकर, स्नेहल माने, रमेश वडणगेकर हलोंडी या गावी पोचले. गावात पोचताना एका ग्रामस्थाला आम्ही विचारले,‘डॉ. भरत पाटील कुठे राहतात,’ तर ते लगेच म्हणाले, ‘ते मुलं व्हायचे ते औषधे देणारे काय?’ आम्ही ‘होय’ म्हणताच त्यांनी आम्हाला डॉक्टरचा पत्ता सांगितला.
डॉक्टराचा दवाखाना अतिशय साधा. टेबल नाही की स्टेथोस्कोप नाही, नाही कोणी परिचारक. आल्या-आल्या प्रवेश, फोनवरूनच डॉक्टर अपॉईंटमेंट घेतो. सुरुवातीस गीता हासूरकर यांची यापूर्वी भेट झाल्यामुळे डॉक्टरला वाटले, हे तर नेहमीचे गिर्हाईक, तसेच बरोबर आणखी एक गिर्हाईक आलेले होते. स्नेहलने डॉक्टरला पहिले अपत्य मुलगी असल्याचे सांगितले; तसेच घरी सासू मुलगाच हवा म्हणून त्रास देत असल्याचे सांगितले. डॉक्टरने तिला पाळीची तारीख विचारली व त्यानंतर पावडर दिली व तिचे दहा भाग करून दररोज अनाशेपोटी खावयाचे, असे सांगितले. तसेच त्याबाबतच्या सूचना दिल्या. स्नेहलने विचारले, ‘मुलगाच होईल ना?’ डॉक्टरने ‘मुलगाच होईल,’ असे भरघोस आश्वासन दिले.
त्या दरम्यान आमच्या सोबत आलेल्या डॉक्टर, पोलीस यांनी प्रवेश केला. डॉक्टरकडे पदवीची मागणी केली. भारत पाटील याने नॅचरोपॅथी कोर्स केल्याचे आढळून आले. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती, ना उपचार माहिती. तालुका. आरोग्य अधिकारी डॉक्टर सुहास कोरे यांनी त्यास विचारले, ‘किती दिवस हे प्रॅक्टीस करतोस’, त्यावर भोंदू भरत पाटील म्हणाले – ‘गेली चार वर्षे अशी प्रॅक्टीस करतो.’ सदर औषधे ही शुक्रजंतू वाढवणारी आहेत, तसेच औषधामुळे गुण आल्याचे सांगितले. तसेच ज्यांना मूल होत नाही, त्यांनाही मी औषध देतो, असे सांगितले. त्यानंतर पोलीस प्रशासनाने त्याच्याकडील औषधे, त्याच्याकडील रजिस्टर जप्त केले व त्यास ताब्यात घेतले.
याकामी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, डॉ. जेसिका, ‘आयुष’ अधिकारी सोनवणे, एम.आय.डी.सी.शिरोली सहाय्यक पो. नि. परशुराम कांबळे, पो. नाईक संगीता जगताप यांचे सहकार्य लाभले. या कारवाई दरम्यान हलोंडी गावच्या पोलीस पाटील अंजली अजेय पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, सरपंच नानासो मोरे, आरोग्य कर्मचारी संजय पुजारी, खांडेकर आदी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र अंनिस कोल्हापूरचे रमेश वडणगेकर, सीमा पाटील, कृष्णात स्वाती, प्रकाश हिरेमठ, सुजाता म्हेत्रे, गीता हासूरकर यांनी ही कारवाई करण्यासाठी परिश्रम घेतले.
रमेश वडणगेकर, कोल्हापूर