देशभरात विज्ञान प्रचार-प्रसाराचे काम करणार्या अनेक संस्था-संघटना आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्थानिक प्रश्नांवर लढणार्या आहेत. जातीच्या, धर्माच्या, देवाच्या उपासनेच्या नावाखाली होणार्या शोषणाच्या विरोधात त्या-त्या राज्यातील संघटनांच्या ताकदीप्रमाणे बदलाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवून काम करणार्या संस्था-संघटना आहेत. अशा देशातल्या संघटनांचं एक फेडरेशन करण्यात आलं आहे. ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (FIRA), ज्याचे मेंगलोर (कर्नाटक) येथील नरेंद्र नायक हे अध्यक्ष आहेत; तर महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र अंनिसच्या राष्ट्रीय समन्वय विभागाचे राज्य सहकार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव हे सचिव आहेत.
महाराष्ट्र अंनिस ही जरी वेगळेपण जपून कार्यरत असली, तरीही देशातील इतर समविचारी संस्था-संघटनांमध्ये जे वेगळेपण आहे, त्याचा अभ्यास करावा. त्यांच्यातील चांगल्या बाबी आपल्या चळवळीच्या कामात कशा जोडून घेता येईल, याचा विचार करते. त्याचाच एक भाग म्हणून मागील वर्षी विजयवाडा येथे ‘अॅथिस्ट सेंटर’चे प्रमुख विजयम गोरा यांच्या निमंत्रणावरून सात कार्यकर्त्यांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता.
यावर्षी 10 ते 16 मे दरम्यान केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या व युक्तिवादी संघटनांच्या निमंत्रणावरून केरळ राज्या अं.नि.स.चा अभ्यास दौरा करण्यात आला. त्याबाबत थोडक्यात हा वृत्तांत.
दि. 9 मे रोजी मुंबईहून विमानाने अविनाश पाटील यांचे नेतृत्वाखाली माधव बावगे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव हे अंनिसचे पदाधिकारी; समवेत स्नेहलता पाटील, अनया पाटील, तन्वी शहा, मंगल बावगे, शीला घोडेराव, कुसुमित घोडेराव अशी नऊजण कोझीकोडेला (कलकित) पोचली. के. एस. एस. पी. अंतर्गत चालणार्या कालिकतपासून 10 कि. मी. अंतरावर असलेल्या Center for Water Resources Development (CWRDM) सेंटरला भेट दिली. कार्यकर्ते डॉ. अब्दुल हमीद व जसना हे कार्यकर्ते सोबत होते. निसर्गरम्य वातावरणात भर उन्हाळ्यातही तिथल्या धरित्रीने हिरवा शालू पांघरलेला. या सेंटरवर प्राचीन काळापासून ते विकसित होत गेलेले स्वरूप, सद्य:स्थितीत पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत सचित्र शास्त्रीय संदेश देणारी प्रयोगशाळा; त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वनौषधी व मसाल्याच्या वनस्पती दाखवून त्याची खूप आत्मियतेने या दोघांनी माहिती दिली. त्यानंतर कालिकत येथे Regional Science Center & Planitorium Musium Park मध्ये प्रात्यक्षिक कृतीतून विज्ञान सामान्यांपर्यंत पोचवता येण्याचे माध्यम पाहायला मिळाले.
दि. 11 मे, केरळ शास्त्र साहित्य परिषदेचे तीन दिवसीय राज्य अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात महा.अंनिसला विचारपीठावर स्थान देऊन त्यांच्या वतीने उपस्थितांना थोडक्यात परिचय करून देऊन महाराष्ट्र अंनिसचे कार्य व कार्यपद्धती सांगण्यासाठी विनंती केली. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेल्या महा. अंनिसच्या कामाची वाटचाल सांगितली. अधिवेशनासाठी साधारणत: 800 प्रतिनिधी होते. त्यानंतर अधिवेशनाचे संपूर्ण कामकाज हे मल्याळम भाषेत सुरू झाले, ते काही आम्हाला समजून येत नव्हते.
दि. 12 मे, 2018 सकाळी 10 वा. ‘युक्तिवादी पदान केंद्रम एर्नाकुलम (कोची) केरळ’ द्वारा ‘एर्नाकुलम म्युनिसिपल टाऊन हॉल’मध्ये आयोजित “चार्वाकम् नॅशनल लेवल सायंटिफिक रॅशनॅलिस्ट सेमिनार” दि. 12, 13 मे 2018 रोजी उद्घाटन कार्यक्रमास सकाळी 10 वाजता उपस्थित राहिलो. उद्घाटक कुरेपुझा श्रीकुमार, प्रमुख वक्ते सी. रवीचंद्रन होते. विषय होता Frugrance of Truth. याच सेमिनारमध्ये ‘फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन’चे अध्यक्ष नरेंद्र नायक यांना “फ्री थॉट अॅवॉर्ड” अॅड. के. एन. अनिलकुमार यांचे हस्ते देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राष्ट्रीय समन्वय विभागाचे राज्य सहकार्यवाह व ‘फिरा’चे सचिव प्रा. डॉ. सुदेश घोडेराव हे महा. अंनिसचे प्रतिनिधी म्हणून विचारपीठावर उपस्थित होते. दुपारच्या सत्रामध्ये Challenges Faced by Rationalists in Secular India या विषयावर परिसंवाद. या सत्राचे संचालक पत्रकार के. जे. जॅकोब होते. या परिसंवादाचे वक्ते म्हणून नरेंद्र नायक, अविनाश पाटील, राज गोपालाचार्य, बी. व्ही. सुब्बाराव, सिबू इरिकल हे होते. सर्वांनी खूप चांगली मांडणी गेली.
दि. 14 मे, 2018. सायंकाळी 6.30 वा. के. एस. एस. पी. चे दुसरे युनिट (I.R.T.C.) Integrated Research Technoloogy Center येथे पोचलो. डायरेक्टर डॉ. एन. के. ससिधन पिलाई यांची भेट घेतली. समवेत तेथील को-ऑर्डिनेटर जे. एम. सोमनाथन होते. त्यांच्या समवेत संघटनात्मक कार्याबद्दल चर्चा झाली व रात्री तिथे मुक्काम केला.
दि. 15 मे, 2018 सकाळी आय.आर.टी.सी. मेन कॅम्पस् मुंडूर, जि. पल्लकड येथे विविध विभागांना भेटी देऊन त्यांची माहिती घेतली. त्यात गांडूळ खत, मातीची ऑरनामेंट्स, भांडी, बायोगॅस, बायोगॅस गॅसोफायर, रबर प्लॉट्स, रबर बनवण्याची प्रक्रिया, मशरूम यासह नर्सरी याबाबत माहिती घेऊन त्यांच्या कार्यालयात पी.पी.टी.वर पिलाई व रजिस्ट्रार यांची रिसर्च बेस संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. के. एस. एस. पी. मुख्य संघटन या अंतर्गत वेगवेगळे संस्थात्मक काम कसे उभे केले? त्याच्या फंडिंग व उत्पन्नाचे सोर्सेस संघटनात्मक कामातून राज्यातल्या वेगवेगळ्या समाजघटकापर्यंत कसे पोचले, याची इत्थंभूत माहिती दिली.
जेवणानंतर दुपारी केरळ शास्त्र साहित्य परिषद भवन, गुरुवयूर रोड, त्रिशूर येथे पोचलो. त्रिशूर येथे के.एस.एस.पी.चा प्रकाशन व वितरण विभाग चालतो. तिथे के.एस.एस.पी.चे फाऊंडर परमेश्वरम, एम. पी. मुरलीधरन, के. आर. जनार्दन शिवशंकर यांच्याशी बैठकीत चर्चा झाली. त्यांनी के.एस.एस.पी.अंतर्गत 1200 पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यात 770 पुस्तकांच्या दोन-दोन लाखांच्यावर प्रती छापल्या व त्याचे वितरण केले जाते. कुठल्याही अनुदानाशिवाय स्वत:च्या उत्पन्नातून प्रकाशन विभाग चालतो. तो एवढा फायद्यात आहे की, संघटनेला आर्थिक पाठबळ देणारा विभाग आहे. पुस्तके हे संघटनेतर्फे विकतात; त्याचबरोबर त्यांनी सुरुवातीपासून ‘शास्त्रगदी’ मॅगेझिन काढतात. त्याचे वर्गणीदार 10 हजार आहेत. वार्षिक वर्गणी 200 रुपये आहे. ‘युरेका’ हे शालेय मुलांसाठी मासिक काढतात. त्याचे वर्गणीदार 20 हजार आहेत. वार्षिक वर्गणी 250 रुपये आहे. याची संकल्पना, कथा व चित्र, रायटिंग, एडिटिंग विद्यार्थ्यांकडूनच करवून घेतले जाते. त्याला विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. तिसरे मासिक जनरल पब्लिकसाठी काढले जाते. ते ‘शास्त्र केरळ’ त्याची वार्षिक वर्गणी 200 रुपये, तर वर्गणीदार 10 हजार आहेत. आता नव्याने (मागील वर्षापासून) 4 मासिक ‘लुका’ नावाचे काढले आहे. आजपर्यंत त्यांनी तीन कोटींची पुस्तके विकली आहेत. हे आपल्या अंनिस कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.
दि. 16 मे, 2018 रोजी सकाळी ‘फिरा’चे माजी सचिव कलानाथन भेटण्यासाठी आले. त्यानंतर के.एस.एस.पी.च्या परिषद भवन, कालिकत येथे सकाळी 11 वाजता प्रो. के. श्रीधर (अध्यक्ष, के.एस.एस.पी.), डॉ. ए. अच्युतन, के. पी. विश्वनाथन, अब्दुल हमीद, नितीन कलानाथन यांच्यासमवेत सविस्तर संघटनात्मक बैठकीत चर्चा झाली. नंतर कलानाथन यांचे वलिकुनू, जि. मलापूरम गावी गेलो. कुटुंबियांची भेट व पाहुणचार घेऊन जेट्टी स्पॉट, बेपूर पोर्टवर समुद्राला मिळालेली नदी, त्यातून आमचा प्रवासी ट्रॅव्हल्स, इतर गाड्या व व्यक्ती जहाजात भरून पैलतिरी पोचलो.
एकूण केरळ अभ्यास दौरा चांगला मार्गदर्शक ठरला.
–माधव बावगे