7 सप्टेंबर 2017 ला बेंगलोर येथे गौरी लंकेश यांचा खून करण्यात आला. गौरी लंकेश या एक कार्यकर्त्या-पत्रकार होत्या. त्यांचे वडील पी. लंकेश हे कन्नड मधील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक होते. गौरी आपल्या वडिलांचे ध्येयवादी पत्रकारितेचे काम नेटाने पुढे नेत होत्या. धार्मिक कट्टरीकरणाच्या विरोधात निर्भयपणे गौरी लंकेश आवाज उठवत होत्या. ‘लंकेश पत्रिके’च्या अंकाचे काम संपवून घरी पोचत असताना, त्यांच्या घराच्या दारात त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. ‘दुचाकी वाहनावरून येऊन गोळ्या मारून पळून जाणे’, ही खुनाची पद्धत डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाच्या पद्धतीला अगदी जवळ जाणारी होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच गौरी लंकेश यांच्या मारेकर्यांचा डॉ. दाभोलकर , कॉम्रेड पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाशी संबंध असेल, अशी शंका व्यक्त केली जात होती. कर्नाटक शासनाने गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक नेमले. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतरच्या गेल्या पाच वर्षांमध्ये पुणे पोलीस; मग सीबीआय, एटीएस, पानसरे यांच्या केसचा तपास करणारे विशेष तपास पथक या सगळ्यांच्या तुलनेत कर्नाटक विशेष तपास पथकाने गेल्या दहा महिन्यांत गौरी लंकेश यांच्या खुनाच्या तपासात बरीच मजल मारली आहे, असे म्हणावे लागेल.
सर्वांत पहिल्यांदा त्यांनी नवीनकुमार नावाच्या कट्टरपंथीय विचारांच्या तरुणाला अटक केली. हा नवीनकुमार मारेकर्यांचा स्थानिक वाटाड्या म्हणून काम करीत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. गोव्यामधील एका संस्थेच्या अधिवेशनाला हा नवीनकुमार गेला असताना त्या मधील हिंदू धर्माचे रक्षण करण्याविषयीच्या चर्चेत तो सहभागी झाला होता. त्या चर्चेत त्याने गरज पडल्यास आपण बंदूक आणि काडतुसे मिळवू शकतो, असे सांगितले होते. त्याचाच आधार घेत या संस्थेचे स्थानिक पदाधिकारी नवीनकुमारपर्यंत पोचल्याचे आता तपासातून समोर येत आहे. नवीनकुमार या कटात सहभागी होण्याची तयारी दाखवल्यावर त्याच्यावर बर्याच स्थानिक जबाबदार्या देण्यात आल्या होत्या. गौरी लंकेश यांच्या खुनानंतर तो अनेक दिवस फरार देखील राहिला होता.
नवीनकुमारच्या संपर्कात असलेल्या प्रवीण नावाच्या व्यक्तीने नवीनकुमार याला बाकीची सर्व मदत पुरवली. पुढे भगवान या कन्नड विवेकवादी विचारवंताच्या खुनाचा कट रचून त्यासाठी काडतुसे गोळा करण्याच्या प्रयत्नात असताना या प्रवीणकुमारला अटक करण्यात आली, असे सांगण्यात येते.
प्रवीणकुमारच्या चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार कर्नाटक विशेष तपास पथकाने आणखी तीन जणांना अटक केली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी अमोल काळे आणि गोवा येथील रहिवासी अमित देगवेकर आणि कर्नाटक मधील मनोहर एडवे यांना अटक करण्यात आली. हे सर्व लोक कट्टरपंथीय संस्थेशी संबंधित आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
कर्नाटक विशेष तपास पथकाचे सर्वांत महत्त्वाचे पाऊल हे प्रवीण वाघमारे या तरुणाला अटक करण्याचे ठरले. हा प्रवीण वाघमारे गौरी लंकेश प्रकरणातील प्रत्यक्ष मारेकरी असल्याची माहिती पुढे येत आहे. सर्वांत काळजी वाटावी, अशी गोष्ट म्हणजे या प्रवीण वाघमारेला गौरी लंकेश कोण याची देखील माहिती नव्हती. त्याला केवळ एवढेच सांगितले गेले होते की, ‘गौरी लंकेश या त्याच्या धर्माच्या विरोधात बोलतात आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांना मारणे आवश्यक आहे.’ धार्मिक कट्टरीकरणाची प्रक्रिया किती खोलवर समाजात रुजली आहे, त्याचा हा भयावह निदर्शक आहे.
गौरी लंकेश तपासातील या प्रगतीमुळे डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाच्या तपासात देखील प्रगती होईल, अशी अशा निर्माण झाली आहे. त्याचे पहिले आणि महत्त्वाचे कारण तपासात हे आता समोर आले आहे की, कॉम्रेड पानसरे खुनामध्ये वापरण्यात आलेल्या दोन पिस्तूलमधील एक पिस्तूल हे डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे या दोन्ही खुनामध्ये वापरले होते, तर दुसरे कॉम्रेड पानसरे, प्रा. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या खुनात वापरले गेले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की, एकाच गटाने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हे खून घडवून आणले आहेत. डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाच्या केसमध्ये अटकेत असलेल्या वीरेंद्र तावडे आणि गौरी लंकेश प्रकरणातील संशयित आरोपी याचा संबंध सीबीआय आणि महाराष्ट्र शासनाच्या विशेष तपास पथकाने तपासून पाहायला हवा. डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या खुनाच्या केस मधील फरार आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार याचा गौरी लंकेश खुनाशी काय संबंध आहे, हे देखील तपासून पाहणे आवश्यक आहे. कर्नाटक सारख्या एका राज्याचे पोलीस दल जर गौरी लंकेश यांच्या तपासात एवढी प्रगती करू शकते तर सीबीआयसारखी देशपातळीवरील यंत्रणा का हे करू शकत नाही, असा उद्विग्न करणारा प्रश्न मनात येतो.
कर्नाटक पोलिसांनी तपासात प्रगती केली असली, तरी अजून गौरी लंकेश यांचा दुसरा मारेकरी; तसेच खुनात वापरण्यात आलेले पिस्तूल आणि गाडीही सापडणे आवश्यक आहे; तसेच दाभोलकर आणि पानसरे यांचे फरार मारेकरी देखील सापडणे आवश्यक आहे. कर्नाटक पोलिसांच्या सांगण्यावरून या लोकांच्याकडे श्री. भगवान, गिरीश कर्नाड अशा पंचवीस लोकांची नावे असलेली यादी सापडलेली आहे. जोपर्यंत हे फरार मारेकरी आणि त्या मागचे सूत्रधार सापडत नाहीत, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका हा कायम आहे.
गौरी लंकेश यांच्या खुनासाठी जे नियोजन केले गेले त्याचे कोड नाव ‘अम्मा’ असे ठेवण्यात आले होते. कन्नडमध्ये ‘अम्मा’ म्हणजे आई. आईचे नाव घेऊन लोकांना मारणारी ही मानसिकता जर शासनाने मुळातून उखडून काढली नाही, तर ती या देशाच्या लोकशाहीच्या मुळावर घाला घालू लागली आहे, हे आपण समजून घ्यायाला हवे. जितके दिवस हा तपास लांबणार आहे, तितके दिवस तो आपल्या लोकशाहीला असलेला धोका आणखी गडद करणार आहे, हे आपण ध्यानात घ्यायला पाहिजे. आपण सगळ्यांनी मिळून आता या संस्थांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शासनावर दबाव वाढवला पाहिजे.