नोव्हेंबर-डिसेंबर 2018 चा जोडविशेषांक यशस्वीरित्या प्रसिद्ध करताना आम्ही आनंद व्यक्त करतो. या अंकाच्या प्रसिद्धीसाठी आमचे वाचक, कार्यकर्तेआणि देणगीदार यांनी मोलाची साथ दिली. जवळपास तीन दशके दर महिन्याला न चुकता आपण वार्तापत्र प्रसिद्ध करीत आलो आहोत. अंनिसचे कार्यकर्ते, अंनिसवर प्रेम करणारे हितचिंतक आणि महाराष्ट्रातील विवेकी वाचक यांनी सातत्याने अंनिवाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला बळ दिले. त्यामुळेच ‘अंनिवा’ची आज अखेरपर्यंतची वाटचाल सुकर झाली. आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार!
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. याचवेळी अं.नि.स.ने 30 व्या वर्षात पदार्पण केले आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि विकासात ज्या-ज्या व्यक्ती व संस्थांनी योगदान दिले त्यामध्ये अंनिसचे योगदान लक्षणीय ठरेल, असे आम्हाला नम्रपणे वाटते. समाजाचा विवेक जागता ठेवून, तळागाळातील शोषित समाजाला केंद्रस्थानी ठेवून, तसेच स्त्रियांच्या शोषणाविरोधी अंनिसने प्रभावी जनजागरण केले आहे; परिणामी, महाराष्ट्रातील हे घटक शोषणमुक्त होण्यास मोलाची मदत अंनिस चळवळीने केली आहे. या कार्यात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे विशेष योगदान झाले आहे. ‘अंनिवा’ने प्रसिद्ध केलेल्या साहित्यावर आधारित तीन खंड आम्ही प्रसिद्ध केलेत. त्यात अं. नि. चळवळीचा समग्र इतिहास दिला आहे. वाचकांनी हे खंड आवर्जून वाचावेत म्हणजे त्यांना या चळवळीच्या योगदानाचे महत्त्व लक्षात येईल.
या वर्षीचा विशेषांक अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी संबंधित विविध लेखांनी आशयसंपन्न झाला आहे. भारताच्या विविध राज्यांत अंनिसप्रमाणेच विविध विवेकवादी चळवळी कार्यरत आहेत. अशा चळवळींचा परिचय प्रतिवर्षी ‘अंनिवा’मधून दिला जातो. या वर्षी उत्तर प्रदेशात कार्यरत असणार्या ‘अर्जक संघा’चा खास परिचय करून देत आहोत. अं.नि.वा.चे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात आणि सहसंपादक अनिल चव्हाण यांनी उत्तर प्रदेशाचा दौरा करून अर्जक संघाची अभ्यासपूर्ण माहिती घेतली. अर्जक संघाचा परिचय आमच्या कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरेल.
‘प्रबोधन’कार ठाकरे यांनी देऊळ संस्कृतीद्वारे जनसामान्याचे कसे शोषण होते, याचा लेखा-जोखा मांडणारे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ या ग्रंथात मांडला आहे. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी चाललेल्या धार्मिक शोषणाचा बाजार आपण प्रत्येक विशेषांकात देत असतो. यावर्षी काशीमध्ये मोक्षाचा घाऊक बाजार कसा चालतो आणि गंगा नदीचे प्रदूषण कसे केले जाते, यावर आधारित लेख वाचकांना अस्वस्थ करून टाकेल.
पुढच्या वर्षी अं.नि.स. मुंबई येथे जागतिक स्तरावरच्या विवेकवादी परिषदेचे आयोजन करीत आहे. पाश्चिमात्य देशांत विवेकवादी चळवळ गतिमान करण्यात जेम्स रँडी हे विचारवंत अग्रस्थानी आहेत. त्यांनी अमेरिका, युरोप आणि पौर्वात्य राष्ट्रांत ‘स्केप्टिक’ संघटना स्थापन करण्यात पुढाकार घेतला. सध्या या चळवळीत रिचर्ड डॉकिन्ससारखे वैज्ञानिक सामील झालेत. अं.नि.स.च्या ध्येयधोरणात समविचारी संघटनांशी जोडून घेणे, हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. जागतिक विवेकवादी चळवळीचे प्रतिनिधी म्हणून जेम्स रँडीचे कार्य वाचकांचे प्रबोधन करेल.
चालू अंकातील सर्वांत महत्त्वाचा विषय म्हणजे भारतीय राज्य घटना आणि भारताचे सर्वोच्च न्यायालय यांना प्रतिगामी शक्तींनी दिलेली आव्हाने. सुप्रीम कोर्टाने शबरीमला मंदिरात स्त्रियांना प्रवेश यासंबंधात दिलेला निवाडा काही राजकारणी संघटनांना मान्य नाही. धार्मिक दहशतवाद आणि विचारस्वातंत्र्याची गळचेपी हे विवेकी समाजनिर्मितीच्या विरोधात उभे ठाकलेले आव्हान आहे. या विषयावरील परिसंवाद आणि शबरीमला प्रश्नावरील लेख हे या अंकाचे वैशिष्ट्य ठरेल. अविचाराची सरशी का होते, हा मूलगामी लेख या संदर्भात वाचकांना नवी दृष्टी देऊन जाईल.
अशा विविध विचारप्रवर्तक लेखांनी नटलेल्या या अंकाचे आपण स्वागत कराल, याबद्दल आम्ही आशावादी आहोत. ‘आयझॅक अॅसिमॉव्ह’ हा प्रख्यात लेखक लिहितो की, दैवी चमत्कार शक्य नसतात. चमत्कार म्हणजे हातचलाखी किंवा विज्ञानाचा वापर; मग शक्य काय असतं? शक्य असतं विचारांच्या सामर्थ्याने, चिवटपणे व निर्भयपणे घाम गाळून केलेला समाजबदलाचा प्रयत्न. अशा प्रयत्नांनीच जग अधिक सुंदर बनवू या!