Categories
व्यक्तिविशेष

जगद्विख्यात चमत्कारभंजक : दि अमेझिंग रँडी

वार्षिकांक - २०१८

शहाणपणा हा जसा कोणत्याही एका समूहाचा मक्ता नाही, तद्वत मूर्खपणाही जगात सर्वत्र आढळतो. पु. . देशपांडे यांनी असा मी असा मी या एकपात्री नाटकात माणसांच्या मूर्खपणावर उपरोधिक भाष्य केलंय. आपला मुलगा शंकर्‍या याला वडील सांगतात गाढवं हाकणारा हो! गाढवांना तोटा नाहीपण मानवी स्वभावाचे आणखी एक वैशिष्ट्य लक्षात घ्यायला पाहिजे. मूर्खांच्या अज्ञानाचा गैरफायदा उठवत काही बिलंदर मंडळी त्यांना उल्लू बनवितात; पण या फसवणूक करणार्‍यांचे बिंग फोडून त्यांचे खरे रूप लोकांसमोर मांडणारे काही कलंदर सत्यशोधकही असतात. आपण बहुतेक जण मळलेल्या वाटेने मागच्याच्या पावलावर चालत जीवनप्रवास करतो; पण बिलंदर माणसं मळलेली वाट सोडतात. चोर, दरोडेखोर, ढोंगी बुवामहाराज यांना कष्ट करून प्रामाणिक जीवन जगण्याची मळलेली वाट पसंत पडत नाही. अशा व्यक्ती समाजावरील संकट असतात. अशी माणसं शैक्षणिक, राजकीय, धार्मिक अशा सर्व क्षेत्रांत वावरत असतात. ज्यू लोकांची निर्दयपणे हत्या करणारा हिटलर हा असाच निर्दयी माणूस होता. उलट मळलेली वाट सोडणारे काही मोजकेच कलंदर मानवी संस्कृतीला उन्नत करण्याचं काम करतात. प्रख्यात अमेरिकन जादूगार जेम्स रँडी हे असेच कलंदर सत्यशोधक व्यक्तिमत्त्व होय. जादूगार ते परामानसिक व अतींद्रिय शक्तीचा दावा करणार्‍या चलाख भोंदू मंडळींचा पर्दाफाश करणारे चमत्कारभंजक (Debunker) म्हणून ते जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचा जीवनप्रवास अंनिवाच्या वाचकांना प्रेरणादायी ठरेल.

जादूगार रँडी

कॅनडामधील अँटारिओ राज्यातील टोरोंटो या शहरात 7 ऑगस्ट 1928 रोजी रँडीचा जन्म झाला. त्याच्या आईचे नाव ‘मेरी अलाइस’ व वडिलांचे नाव जॉर्ज रँडल विंज. हॅरी ब्लॅकस्टोन या जादूगाराच्या भेटीने रँडी प्रभावित झाला. आपणही जादूगार व्हावे, असे त्याने मनोमन ठरविले. सायकलवरून जोरात जमिनीवर आपटल्यामुळे झालेल्या अपघातामुळे त्याला 13 महिने बेडवर पडून राहावे लागले. या काळात त्याने आपल्या आवडत्या जादूविद्येवरील अनेक पुस्तके वाचून काढली. रँडी पुन्हा चालू शकणार नाही, असं डॉक्टरनी केलेले भाकीत रँडीने खोटे ठरविले. पुढच्या आयुष्यात तो केवळ चाललाच नाही, तर शारीरिक कसरतीचे अनेक धाडसी प्रयोगही त्याने केले. रँडी स्वत: चाललाच; पण लोकांना शहाणपणाच्या वाटेवरून चालायला तो शिकवित राहिला. रँडीला शाळेच्या अभ्यासात फारशी गोडी नव्हती. कित्येकदा तो शाळेला दांडी मारी. अखेर वयाच्या सतराव्या वर्षी त्याने शाळेला कायमची दांडी मारली आणि आपल्या आवडत्या जादूविद्येच्या क्षेत्रात तो रममाण झाला. कलंदर माणसांचं असंच असतं. बर्नाड शॉने शाळेतील शिक्षणाबाबत उपरोधिक टीका करताना म्हटलंय, ‘माझ्या प्रगतीला काय अडसर ठरली असेल, तर ती माझी शाळा.’ राम गणेश गडकरी यांच्या प्रतिभेने साहित्यक्षेत्रात भरारी घेतली; पण फर्ग्युसन महाविद्यालयात गणित विषय त्यांच्यावेळी सक्तीचा होता. ते त्यात नापास झाले आणि गडकरींना कॉलेज सोडावे लागले. शॉ काय, गडकरी काय किंवा महात्मा गांधीजी काय; यांनी मळलेली वाट सोडली आणि आपापल्या क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली. जेम्स रँडी पुढे जागतिक कीर्तीचा जादूगार झाला आणि जादूविद्येतील हॅरी हुडिनी या सर्वश्रेष्ठ जादूगाराचे बंद पेटीत पाण्यात राहण्याचे रेकॉर्ड त्याने तोडले.

कॅनडा, अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांत नाईट क्लबची करमणूक केंद्रे चालतात. या केंद्रांमध्ये रँडी मन:शक्तीचे जादूचे प्रयोग करू लागला. ज्ञानेंद्रियाशिवाय केवळ मन:सामर्थ्याने वस्तू हलविणे, दुसर्‍याच्या मनातील विचार ओळखणे अशा प्रयोगांना आपण अतींद्रिय शक्ती म्हणतो. असे मनकवडे म्हणजे मेंटॉलिस्टचे प्रयोग रँडी नाईट क्लबमध्ये करीत असे. आपल्याकडे जसे गारुडी रस्त्यावर जादूचे खेळ करतात, तसे जादूचे खेळ अमेरिकेत व कॅनडात ‘कार्निव्हल शो’ नावाने केले जातात. अशा शोमध्ये रँडी सहभागी होई.

पुढे गूढविद्येचा आणि फसव्या विज्ञानाचा पर्दाफाश करणारा रँडी एकेकाळी राशीभविष्य कॉलम चालवत होता, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल; पण या व्यवसायात तो काय करीत असे? विविध पेपरमधील विविध राशींचे भविष्य तो गोळा करी. त्यातील थोडेथोडे एकत्र करून ते प्रसिद्धीस देई, हे भविष्य वाचताना योगायोगाने जुळलेले भविष्य पाहून संबंधित व्यक्ती हरखून जाई. शाळा सोडल्यावर जादूच्या प्रयोगाबरोबरच हे भविष्य सांगण्याचे कामही रँडीने विसाव्या वर्षी चालू केले. जादूचे प्रयोग नाईट क्लब व रोड शोमध्ये करून रँडी उपजीविका करत होता. पुढे 7-8 वर्षांत तो या कलेत निपुण झाला. नाईट क्लब किंवा रोड शोमध्ये त्याला पैसे मिळत असले, तरी स्वत:ची अशी जादूगार म्हणून खास प्रतिष्ठा मिळाली नव्हती.

वयाच्या तिसाव्या वर्षी आपले जादूकलेचे प्रयोग स्वतंत्रपणे करण्यासाठी रँडी सज्ज झाला आणि सुरू झाली त्याची जादू सादर करण्याची व नवी जादू शिकण्याची जागतिक मोहीम.

अमेरिका ते जपान दौरा

रँडीने ब्रिटन व युरोपातील बहुतांश देशाचा दौरा केला. पुढे फिलीपाईन्स व जपानमध्ये त्याने प्रवास केला. या दौर्‍यात रँडीने अतिनैसर्गिक शक्तीने चमत्कार करण्याचा दावा करणार्‍या मंडळींचे चमत्कार पाहिले. चर्चमध्ये जाणार्‍या भक्तांना दैवी शक्तीचे प्रयोग दाखविताना पाद्य्रांनी केलेल्या हातचलाखीच्या प्रयोगाची त्याने माहिती घेतली. ही अतिनैसर्गिक शक्तीचे दावे करणारी मंडळी प्रत्यक्षात जादूचेच प्रयोग करून लोकांना भुरळ पाडीत होती, हे रँडीच्या लक्षात यायला लागले. पुढे जादू व्यवसायातून निवृत्त झाल्यावर अशा ढोंगी मंडळींचा पर्दाफाश करणे हाच रँडीचा उद्योग बनला.

स्टेज जादूगार

हातचलाखी व जादूकलेत वापरली जाणारी तंत्रे यात अनेक वर्षांच्या परिश्रमानंतर निष्णात झाल्यावर रँडीने स्टेज जादूगार म्हणून स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली. 1946 मध्ये हातांना बेड्या घातलेल्या स्थितीत, बंद खोलीत प्रवेश करायचा व थोड्याच वेळात त्या खोलीतून हात मोकळे करून बाहेर यायचा प्रयोग तो करू लागला. सुरुवातीचे ‘रँडल विंज’ हे नाव टाकून आता तो ‘दि अमेझिंग रँडी’ या टोपण नावाने स्टेजवरील जादू प्रयोग करू लागला. तुरुंगाच्या बंद खोलीतून आणि बंद कपाटातून (दोन्हींना बाहेरून कुलूप), हात बांधलेल्या स्थितीत प्रवेश करून बाहेर निसटण्याचे प्रयोग तो सादर करू लागला. पुढे तर त्याने कमालच केली. रँडीने धातूच्या पेटीत हात बांधलेल्या स्थितीत स्वत:ला बंद केले, ही पेटी बाहेरून सील केलेली होती. ही पेटी हौदातील पाण्यात टाकली गेली. अशा अवस्थेत रँडी या पेटीत 104 मिनिटे राहिला. नंतर तो पेटीबाहेर आला. याचा ‘लाईव्ह शो’ दूरचित्रवाहिनीवर लोक पाहत होते. असाच प्रयोग विश्वविख्यात जादूगार हॅरी हुडिनी यांनीही केला होता. हुडिनी 93 मिनिटे बंद पेटीत थांबला होता. हे रेकॉर्ड रँडीने 104 मिनिटे पाण्यात राहून तोडले. या प्रयोगावेळी रँडीचे वय हुडिनीच्या प्रयोगावेळच्या वयापेक्षा कमी होते.

बोले तैसा चाले

आता रँडी प्रसिद्धीच्या झोतात आला. न्यूयॉर्क रेडिओवर त्याला संधी मिळाली. दूरचित्रवाहिनीवरील विविध चॅनेलवर त्याला निमंत्रणे येऊ लागली. अनेक वेळा विविध देशांना भेटी देऊन आपले जादूचे अचाट प्रयोग त्याने सादर केले. लहान मुलांच्यासाठी तो दूरचिवाहिनीवर जादूचे प्रयोग सादर करू लागला. व्यावसायिक प्रसिद्धी आणि स्वत:ची खास कौशल्ये विकसित केल्यामुळे जादूगार संघटनांनी रँडीला आपापल्या संघटनेत मानाचे स्थान दिले. त्याच्याविषयी जागतिक जादूगार संघटनेने खास गौरवोद्गार काढलेत. नैतिक चारित्र्य हीच रँडीला ‘अमेझिंग’ पदवी मिळण्याचे कारण आहे. अमेझिंग रँडी फक्त बोलत नाही, तर तो जसा बोलतो तसा चालतो. आपल्या तुकोबांच्या भाषेत ‘बोले तैसा चाले। त्याची वंदावी पावले॥’

रँडीने जादू व्यवसायात लागणारी नवनवी विविध साधने बनविली. या साधनांत ‘गिलोटीन’ प्रसिद्ध आहे; पण आपल्याला तोंडात बोटे घालायला लावणारी रँडीची करामत म्हणजे नायगारा धबधब्यावर त्याने केलेला जादूचा अचाट प्रयोग. ‘स्ट्रेट जॅकेट’ नावाचे एक खास साधन आहे. याच्या बाह्या लांब असतात. हे जॅकेट अंगात घालून दोन्ही हात अंगाजवळ घट्ट बांधून टाकायचे. जॅकेटदेखील अंगात घट्ट बसवायचे. हे स्ट्रेट जॅकेट घालून रँडीने तो प्रयोग केला. एका यांत्रिक साधनाने रँडीचे पाय टांगले होते व तो खाली डोके, वर पाय अशा स्थितीत नायगारा फॉलवर तरंगत होता. या अवस्थेतून आपले बांधलेले हात सोडवून स्ट्रेट जॅकेटमधूनही तो बाहेर आला. या प्रयोगाने रँडी विश्वविख्यात जादूगार म्हणून मान्यता पावला.

जादूकडून चमत्कारभंजनाकडे

वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत, तीस-चाळीस वर्षे रँडी जादूच्या क्षेत्रात व्यावसायिक जादूगार म्हणून रमला. या काळात तो जगभर हिंडला. चाणाक्ष रँडीला या काळात एक महत्त्वाचे सत्य गवसू लागले. आपण जे हातचलाखीचे व श्रोत्यांचे लक्ष विचलित करण्याचे जादूचे प्रयोग करतो, ती एक लोकांना फसवणारी मनोरंजनपर कला आहे. यात दैवी सामर्थ्य किंवा अतींद्रिय शक्ती नाही, हे तो जाणून होता; पण जगभरात जादूचे असले प्रयोग करणारे काही चलाख भोंदू लोक त्यांना खरोखरचे अतींद्रिय व परामानसिक सामर्थ्य प्राप्त झाले आहे, असा दावा करतात. जादू ही कला मानून ती ‘प्रामाणिक’ फसवणूक आहे, असे मानणे, हे नैतिक आहे; पण हीच जादू बुवाबाजीसाठी वापरणं म्हणजे शुद्ध लबाडी आहे. रँडी म्हणतो, ‘आम्ही जादूगार म्हणून लबाडीच करतो; पण ‘प्रामाणिक’ लबाड आहोत. (I am Honest Lier).’ जादूगार लबाडीद्वारे श्रोत्यांचे मनोरंजन करतात, तर गूढवादी अशाच प्रयोगांनी लोकांना फसवितात. दैवी शक्तीच्या नावाखाली, आजार बरा करण्याची बतावणी करणे, अतींद्रिय शक्तीच्या नावाखाली असत्याचा प्रचार करणे, हे लोकहिताला मारक ठरणारे आहे. या विचाराने प्रेरित होऊन जेम्स रँडीने साठीनंतर जादूचा व्यवसाय सोडून दिला आणि चमत्कारभंजन (Debunking) म्हणजेच दैवी चमत्कार व गूढ सामर्थ्याचे दावे करणार्‍या ढोंगी मंडळींचा पर्दाफाश करण्याची मोहीम सुरू केली. विश्वविख्यात जादूगार हॅरी हुडिनी याने एके काळी लबाड मांत्रिक आणि बुवा-बाबांच्या विरोधात अशीच मोठी मोहीम सुरू केली होती. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून जेम्स रँडी आध्यात्मिक क्षेत्रातील व परामानसशास्त्रातील अतींद्रिय शक्तीचे दावे करणार्‍या भोंदूंना आव्हान देऊन त्यांची बुवाबाजी समाजासमोर आणू लागला. सामान्य माणसाबद्दलच्या करुणेतून आणि अशा लबाडांबद्दलच्या क्रोधातून रँडी चमत्कारभंजक बनला.

युरी गेलरचा भांडाफोड

युरी गेलर. इस्त्राईलमधील नाईट क्लबमधून जादूचे प्रयोग करणारा एक चलाख तरुण. असे प्रयोग करताना जादू म्हणजे गूढविद्या असा लोकांचा भ्रम होतो, हे लक्षात येताच तो अतींद्रिय शक्तीमुळे आपणास चमत्कार करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले, असे दावे करू लागला. मग सुरू झाली त्याची जगभरची ठकबाजी.

आपणाला गूढ शक्तीद्वारे दृष्टांत होतात, असे तो लोकांना सांगू लागला. बहुतेक या गूढशक्तीचे संदेश परग्रहवासीयांकडून आपल्याला येत असावेत, असा दावा तो करी. प्रत्यक्षात हातचलाखी आणि नजर विचलित करून जादूचे प्रयोग करणारा हा बिलंदर, अतींद्रिय शक्तीमुळे ‘मी चमत्कार करतो,’ असा दावा करी. भलेभले शास्त्रज्ञही त्याच्या गळाला लागले. आपल्या हातचलाखीच्या सामर्थ्याचा त्याने जगभर बाजार मांडला. खून आणि चोरीसारख्या घटनांचा मन:शक्तीने उलगडा करणे (सायकिक डिटेक्शन), भूगर्भातील पाणी व खनिज तेल यांचा डाऊझिंग रॉडने शोध घेणे, लपविलेल्या वस्तूंचा शोध घेणे अशा चमत्कारसदृश गोष्टींचा त्याने व्यवसायच सुरू केला आणि त्याद्वारे अमाप संपत्ती गोळा केली. ब्रिटनमध्ये स्थायिक होऊन तो विविध देशांचे दौरे करी आणि लोकांना उल्लू बनवीत स्वत:चे खिसे भरी. लवकरच तो अतींद्रिय शक्तीचा जागतिक पातळीवरचा समर्थक म्हणून प्रसिद्धीस आला; पण सदा सर्वकाळ सर्व लोकांना फसवता येत नाही. या बिलंदर जादूगाराला भेटला कलंदर विवेकी जादूगार – दि अमेझिंग जेम्स रँडी. युरी आणि रँडी यांच्यामधील आव्हान-प्रतिआव्हान ही बुवाबाजीच्या क्षेत्रातील जागतिक पातळीवरील नाट्यमय रोमांचकारी घटना आहे.

युरी गेलरला अमेरिकेत त्याचे अचाट शक्तीचे प्रयोग दाखवून प्रसिद्धी मिळवायची होती. डॉ. प्युहारिख आणि रसेल टार्ग या परामानसशास्त्रावर विश्वास ठेवणार्‍या जोडगोळीच्या मदतीने युरी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाला. तेथील वैज्ञानिकांसमोर युरीने आपले टेलिपथी, भविष्यातील घटना ओळखणे केवळ मन:सामर्थ्याने चुंबकीय क्षेत्र बदलणे व घन वस्तू मोडणे असे भन्नाट-प्रयोग केले. या प्रयोगात प्रख्यात अंतराळवीर एडवर्ड मिचेलही सामील झाला होता. या मिचेलने ‘गेलर परिणाम’ दाखविणारी चित्रफीत तयार करण्यास मदत केली. जगप्रसिद्ध वैज्ञानिक मासिक ‘नेचर’मध्ये युरीच्या या पराक्रमाचे रिपोर्टिंग पुरीखने प्रसिद्धीस दिले. आता युरी अतींद्रिय शक्तीचा सुपरस्टार म्हणून अमेरिकेत प्रसिद्ध झाला; पण ‘टाईम’ मासिकाच्या संपादकाला युरीच्या या दाव्याची चिकित्सा करण्याची गरज वाटली. त्याने जेम्स रँडीला हाताशी धरले आणि युरीच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन मासिकाच्या कार्यालयात केले. ‘टाईम’चा फोटोग्राफर व रँडी या प्रयोगासाठी हजर होता. जादूगारासमोर युरी प्रयोग करण्यास नकार देतो, हे ओळखून रँडीने रिपोर्टर म्हणून या प्रयोगात प्रवेश केला होता. युरीचे अतींद्रिय शक्तीचे प्रयोग हे जादूचे, हातचलाखीचे प्रयोग आहेत, हे रँडीने ओळखले आणि त्याला ‘टाईम’ मासिकात प्रसिद्धी दिली. मात्र भलेभले शास्त्रज्ञ व मिचेलसारखे अंतराळवीरही युरीसारख्या बिलंदराला कसे फसतात, याचे रँडीला आश्चर्य वाटले. आपण आपल्या क्षेत्रापुरते ज्ञानी असतो, सर्वज्ञ नसतो, हे अशा मंडळींना का कळत नाही? पूर्वग्रहदूषित भ्रामक विचारांनी प्रभावित झाल्याने व प्रसिद्धी व आर्थिक फायद्याच्या मोहाला ही मंडळी बळी पडत असावीत, याची रँडीला जाणीव झाली. याचा खात्रीशीर पुरावाच त्याला दुसर्‍या एका घटनेद्वारे मिळाला.

जॉन टेलर हा इंग्लंडमधील गणिताचा प्रख्यात प्राध्यापक. टेलरच्या प्रयोगशाळेत युरीने आपले गूढशक्तीचे प्रयोग केले. टेलरला यातील युरीची चलाखी समजलीच नाही आणि त्याने युरीला गूढशक्तीचा सुपरस्टार म्हणून घोषित केले. रँडीने टेलर आणि मंडळींना पत्र पाठवून युरीने त्याच्यासमोर हे प्रयोग करावेत, असे आव्हान दिले. मात्र टेलरने त्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले. मग रँडीने एक नामी युक्ती योजली. तो वार्ताहर म्हणून इंग्लंडमध्ये गेला. टेलरवर लेख लिहून त्याचे कौतुक केले व त्याला भेटण्याची व मुलाखत देण्याची विनंती केली. टेलर खूष झाला व या गोष्टीस त्याने संमती दिली. टेलरच्या प्रयोगशाळेत बंद नळीत अ‍ॅल्युमिनिअमचा तुकडा नजरेने वाकविण्याचा प्रयोग युरीने केला होता. रँडीने हातचलाखीने तोच तुकडा घेऊन त्यावर ‘इशपीं लू ठरपवळ’ अशी अक्षरे कोरली व पुन्हा तो तुकडा नळीत ठेवून दिला. त्याचा फोटो घेतला; टेलरबरोबरही स्वत:चा फोटो घेतला. या सगळ्या घटनेला रँडीने ब्रिटन व अमेरिकेत प्रसिद्धी दिली.

पण बुवाबाजी किती चिवट असते पाहा, मांजराच्या उडीसारखी. वरच्या मजल्यावरून उलटे फेकलेले मांजर जमिनीवर आदळून पाय मोडून घेणार किंवा मरणार, असे आपल्याला वाटते; पण हे मांजर जमिनीवर चार पायांवर अलगद उतरते आणि उड्या मारत पळू लागते. युरी आणि त्याचे समर्थक या मांजरासारखे चिवट होते. पण पुन्हा एकदा युरीला उताणा करण्याची संधी कार्सन या दूरचित्रवाहिनी कार्यक्रमातील स्टारने रँडीला मिळवून दिली. कार्सन हा रँडीच्या विचाराचा होता. त्याने ‘दि टूनाईट शो’ या दूरचित्रवाहिनीच्या कार्यक्रमात युरीला यावयाचे आवाहन केले. युरीने ते स्वीकारले. कार्सनने मग रँडीची भेट घेतली आणि त्याचा युरीच्या कार्यक्रमाबाबत सल्ला घेतला. युरी. त्याचा मन:शक्तीने चमचा वाकविण्याचा हातखंडा प्रयोग आणि तत्सम इतर मन:शक्तीचे प्रयोग दूरचित्रवाहिनीच्या प्रेक्षकांना दाखविणार होता. अशा प्रयोगात प्रयोगकर्ता संबंधित प्रयोगासाठी स्वत:च्या वस्तू घेऊन येतो व हातचलाखीत त्यांचा वापर करतो. यासाठी तो काही साथीदारांचीही मदत घेतो. रँडीच्या सल्ल्याप्रमाणे कार्सनने कौशल्याने युरीच्या प्रयोगाच्या वस्तू बदलून त्याजागी आपल्या वस्तू ठेवून दिल्या आणि युरीच्या साथीदारांना स्टेजवर जाण्यास मनाई केली. परिणामी युरीला आपले हस्तलाघव दाखविणे अशक्य झाले. तो अस्वस्थ झाला. माझी मन:शक्ती आज मला साथ देत नाही, असं सांगू लागला. ती कधी-कधी लुप्त होते, असे म्हणून तो स्टेजवरून निघून गेला.

आता आपण पुरते हरलो आणि नेस्तनाबूत झालो. इस्त्राईलला परत जाऊया, असे निराशेचे विचार त्याला सतावू लागले; पण झालं ते वेगळंच.

युरीला आश्चर्याचा धक्का देणारे दुसर्‍या दूरचित्रवाणी चॅनेलचे निमंत्रण त्याला दुसर्‍याच दिवशी आले. लोकांची कार्सनच्या ‘दि टू नाईट शो’ बद्दल काय प्रतिक्रिया आली? युरीचे गूढशक्तीचे सामर्थ्य खरंच आहे. त्या दिवशी तो लुप्त झालं, एवढंच. युरी जर जादूचे प्रयोग करत असेल, तर त्या दिवशी त्याला ते करता आले असते आणि युरी पुन्हा एकदा पॅरानॉर्मल सामर्थ्याचा सुपरस्टार म्हणून वावरू लागला. रँडी म्हणतो – ‘लोकांना फसवून घेण्याची भारी हौस असते. तेव्हा त्यांना खुशाल फसवा.’ युरीला लोकांची गूढशक्तीबद्दलची तीव्र इच्छा लक्षात आली होती. तो लोकांच्या अंतर्मनातील इच्छांवर बसून दौडत निघाला. तो गाढव हाकणारा झाला. कारण जगात गाढवांना तोटा नाही, हे त्याने पुरेपूर जाणले.

स्केप्टिक सोसायटीची स्थापना

स्केप्टिक सोसायटी म्हणजे अमेरिकन अंनिस. युरीला व तत्सम इतर ढोंगबाजांना लगाम घालायचा असेल, तर जनप्रबोधनासाठी मोठी चळवळ उभारावी लागेल, या निष्कर्षाला रँडी आला. पेपर, प्रसिद्धिमाध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांची मदत घेऊन गूढवादाविरोधात मोहीम गतिमान करावी लागेल, या निष्कर्षाला तो आला. 1976 मध्ये रँडी मानसशास्त्रज्ञ रे हायमन यांना भेटला. रे हायमननी युरीचे स्टॅनफोर्डमधील प्रयोग पाहिले होते आणि त्यातील बुवाबाजी त्यांच्या लक्षात आली होती. हायमन आणि रँडी यांनी परस्परांशी चर्चा करून छद्मविज्ञानाशी लढा देण्यासाठी काही समविचारी मित्रांना विश्वासात घेऊन सशक्त संघटन सुरू करण्याचे ठरविले. प्रख्यात स्तंभलेखक व विज्ञानप्रसारक मार्टीन गार्डनर, रँडी आणि रे हायमन यांनी 1976 मध्ये ‘दि कमिटी फॉर सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन ऑफ दि क्लेम्स ऑफ पॅरानॉर्मल’ (CSICOP) या नावाने संघटना सुरू केली. देणग्या जमा करून या संघटनेमार्फत ‘स्केप्टिकल इन्क्वायरर’ हे द्वैमासिक सुरू करण्यात आले. निधर्मी मानवतावादी तत्त्वज्ञ पॉल कूर्ट्झ, प्रख्यात विज्ञान लेखक आयझॅक अ‍ॅसिमॉव्ह आणि खगोल वैज्ञानिक कार्ल सेगन यांना कार्यकारिणीत समाविष्ट करण्यात आले. या स्केप्टिक संघटनेच्या प्रचारासाठी जेम्स रँडी यांनी विविध देशांत झंझावाती दौरा सुरू केला. रँडी हे या संघटनेचे प्रसारप्रमुख बनले. रँडीच्या दौर्‍याचा परिणाम म्हणून युरोपातील विविध देशांत स्केप्टिक संघटना सुरू झाल्या. रँडी या चळवळीचे पितामह म्हणून गौरविले जाऊ लागले.

स्केप्टिक संघटनेतर्फे युरोप व अमेरिकेत मोठी जनप्रबोधन मोहीम गतिमान झाली. सामान्य नागरिक, मीडिया आणि विचारवंत यांना नवा चिकित्सक विवेकी दृष्टिकोन देण्यात स्केप्टिक चळवळ यशस्वी होऊ लागली. महाराष्ट्रात अंनिसने जे कार्य उभे केले ते जागतिक पातळीवर या संघटनेने केले. जेम्स रँडीचे या संदर्भातील योगदान अपूर्व आहे. ‘दि अमेझिंग रँडी’ला महाराष्ट्र अंनिसचा सलाम!

युरीचा भांडाफोड करणार्‍या घटनांवर आधारित रँडीने ‘दि ट्रूथ अबॉऊट युरी गेलर’ हा ग्रंथ 1982 साली प्रसिद्ध केला. या ग्रंथामुळे युरोप-अमेरिकेतील विवेकवादी मंडळी चकित झाली. जे युरीच्या चलाखीला बळी पडले होते व जे त्याच्या लबाडीत सामील झाले होते, त्यांनी उलट्या कोलांट्या मारायला सुरुवात केली. ही मंडळी युरीपासून अलग होऊ लागली. हा ग्रंथ आणि स्केप्टिकचे द्वैमासिक आणि मीडियातील प्रबोधन यामुळे युरीच्या प्रसिद्धीचा पारा झपाट्याने खाली उतरू लागला.

पंधरा दशलक्ष डॉलर्सची फिर्याद

चिडलेल्या युरीने रँडीवर 15 दशलक्ष डॉलर्सची अब्रुनुकसानीची फिर्याद 1991 मध्ये कोर्टात दाखल केली. ही फिर्याद युरी हरला. रँडी निर्दोष ठरला. युरीने उडखउजझ वरही फिर्याद दाखल केली होती. 1995 मध्ये तिचाही निकाल युरीच्या विरोधात लागला. अशा खोट्या केसला शिक्षा म्हणून प्रतिवादीला भरपाई देण्याचा हुकूम कोर्टाने युरीला दिला. रँडीला एका समाजसेवी संघटनेकडून त्याच्या कामासाठी दोन लाख बहात्तर हजार डॉलर्सचे अनुदान मिळाले होते. ही सर्व रक्कम रँडीला खटला चालविण्यासाठी खर्च करावी लागली. तो कफल्लक झाला. अशा खटल्यात वेळ पैसा आणि श्रम यांची हानी होते म्हणून स्केप्टिक संघटनेने रँडीला, युरीवरील टीकेपासून दूर राहण्याचा सल्ला दिला; पण सत्यशोधक रँडीने याला नकार देऊन संघटनेचा राजीनामा दिला. मात्र स्केप्टिक ग्रुपमधील आपल्या सहकार्‍यांबरोबर त्याचे संबंध सौहार्दपूर्ण राहिले. पुढे 2006 मध्ये उडखउजझ चे नामांतर उडख असे झाले. उडख म्हणजे ‘कमिटी फॉर स्केप्टिकल इन्क्वायरी.’ 2016 मध्ये या कमिटीसाठी निवडलेल्या 16 फेलोमध्ये पुन्हा रँडीचा नव्याने समावेश करण्यात आला.

स्केप्टिसिझमचा आशय

स्केप्टिक (Skeptic) म्हणजे शंकेखोर किंवा संशयी. याच्या उलट अर्थाचा शब्द म्हणजे श्रद्धाळू. श्रद्धेबाबत संशय किंवा शंका घ्यायची नसते; पण संशय किंवा शंका उपस्थित केल्याशिवाय ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची त्याचे खरे स्वरूप कसं कळणार? कारण माझ्यावर श्रद्धा ठेवा, असं सांगणारा गुरूमहाराज लबाड असू शकतो. आसारामबापू किंवा रामरहीम यांच्यावर श्रद्धा ठेवणार्‍यांचे काय झाले? खरे कोण, लबाड कोण; सत्य काय, असत्य काय, एखादी गोष्ट ज्ञानप्रद की अज्ञानमूलक हे समजण्यासाठी शंका उपस्थित करणे अनिवार्य आहे. प्रख्यात ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटल म्हणतो – शंका ही सर्व ज्ञानाची जननी आहे. (Doubt is the begining of all knowledge) पण शंका किंवा संशय यांना धार्मिक मंडळींनी बदनाम केलं आहे. शंकेखोरपणा म्हणजे उद्धटपणा, संशय घेणे म्हणजे नकारात्मक अविचार, असा अपसमज सर्व धर्ममार्तंडांनी समाजात पसरविला आहे; पण स्केप्टिक असणे याचा आशय तसा नाही. मानवी संस्कृतीचा विकास श्रद्धेच्या चिकित्सेतूनच झाला आहे. प्रचलित ज्ञानाला नम्रपणे प्रतिप्रश्न विचारूनच मानवी प्रगती होत आली आहे. खरं तर स्केप्टिक असणे ही प्रत्येक माणसाच्या ज्ञानलालसेची, सत्याकडे जाण्यासाठीच्या प्रयत्नाची खूण आहे.

मानवी इतिहासात स्केप्टिसिझमची सुरुवात ग्रीक संस्कृतीपासून झाली. मला माहीत नाही, हे ज्याला माहीत होते, तो खरा शहाणा (He who knows that he really does not know is really wise). हे सॉक्रेटिसचे वचन म्हणजे स्केप्टिसिझमचे सार आहे. स्केप्टिक म्हणजे सीनिकल किंवा निहिलिस्ट नव्हे. सीनिकल म्हणजे निंदक, कशावरच विश्वास नसणारा. विवेकशून्य व्यक्ती. निहिलिस्ट म्हणजे शून्यवादी. जग असार, अर्थहीन आहे, असं मानणारा. गडकर्‍यांची एक कविता आहे. त्या कवितेतील शून्यवादी म्हणतो – ‘देवाने आकाशात इतक्या चांदण्या कशाला निर्माण केल्यात?’ कवी उपरोधिकपणे उत्तर देतो – ‘जा वर! आणि विचार त्याला.’ नदीतून पुराचे पाणी कशासाठी वाहून जातंय? कवी म्हणतो – ‘बघवत नाही? मग टाक उडी त्या पुरात!’ स्केप्टिक या शून्यवाद्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीत अर्थशून्यता शोधणारा नसतो. मग स्केप्टिक मनोवृत्ती असते, तरी कशी आणि ती आपणात का हवी?

Skeptic हा शब्द Skeptics या ग्रीक शब्दापासून आलाय. डज्ञशिींळली म्हणजे ढर्हेीसहींर्षीश्र. म्हणजेच विचारशील.

ऑक्सफर्ड इंग्लिश शब्दकोशानुसार Skeptic म्हणजे ‘inquiring,’ Reflective आणि watchful Inquiring म्हणजे चौकसवृत्तीचा. Reflective म्हणजे चिंतनशील आणि Watchful म्हणजे लक्ष ठेवून असणारा. Skeptic हा वाईट किंवा अज्ञानमूलक कल्पनांवरचा वॉचमन असतो. विज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाची पद्धती व मनोवृत्तीचा पाया स्केप्टिसिझम हाच आहे. हा स्केप्टिसिझम जसा विज्ञानातील सत्यशोधनासाठी अटळ असतो तसाच तो धर्म, राजकारण, अर्थकारण, जाहिरातबाजी अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रांना लागू पडतो. स्केप्टिसिझमच्या पायावर जगातील व्यवहार चालू लागले, तर जग अधिक सुंदर बनून जाईल.

जेम्स रँडी आणि त्याचे सहकारी यांनी अमेरिका, कॅनडा संपूर्ण युरोप आणि पौर्वात्य देशात स्केप्टिसिझमची चळवळ गतिमान केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची ध्येये आणि उद्दिष्टे स्केप्टिसिझमवरच आधारित आहेत. स्केप्टिसिझमचा विस्तारित अर्थ मराठीत ‘विवेकवाद’ या शब्दाने यथार्थपणे व्यक्त होतो. अंनिसची विवेकाची चळवळ आणि पाश्चात्य स्केप्टिसिझम एकच होत. या चळवळीचा जागतिक प्रणेता जेम्स रँडी हा विविध देशांतील परामानस, अतींद्रिय शक्ती छद्मविज्ञान व फेथहीलिंग यांचा प्रामाणिक शोध घेत वॉचमनच्या भूमिकेतून सत्यशोधन करू लागला. रँडी स्वत:ला डी-बंकर म्हणजे भ्रमभंजक समजत नाही. तो स्वत:ला शोधक म्हणजे खर्पींशीींळसरीेीं समजतो. मनात पूर्वग्रह न बाळगता तो गूढ शक्तीच्या दाव्यांचा प्रामाणिक शोध घेतो. या शोधात त्याला सत्य आढळले, तर ते स्वीकारण्याची त्याची तयारी असते; पण वरून कीर्तन आतून तमाशा असेल, तर असा कीर्तनकार खोटारडा आहे, असे जाहीर करायला तो कचरत नाही. रँडीची खंत अशी की, त्याने तपासलेल्या शेकडो घटनांमध्ये त्याला दांभिकता आणि लबाडीच दिसून आली. रँडीने जागतिक पातळीवरील तथाकथित सुपरनॅचरल शक्तीवाल्या सगळ्या लबाडांचे वर्णन करायचे झाल्यास एक मोठा ग्रंथही पुरणार नाही. आपण रँडीने पर्दाफाश केलेल्या काही महत्त्वाच्या मोजक्याच मोहिमांची माहिती घेऊ या.

फेथहीलर पोपोफची लबाडी

पीटर पोपोफ हा ख्रिश्चन पाद्री. मंत्रशक्ती आणि प्रार्थना यांनी लोकांचे रोग बरे करायचा. विशेष म्हणजे समोर बसलेल्या लोकांबद्दल अगोदर काहीही माहीत नसताना त्यांचे आजार ओळखायचा. लोक आश्चर्यचकित व्हायचे. मग ते पोपोफच्या आधीन होत. पोपोफ त्यांच्यासाठी येशूला प्रार्थना करायचा, मंत्र म्हणायचा. यासाठी तो संबंधितांकडून डॉलर्स उकळीत असे. दूरचित्रवाणी स्टार जॉनी कार्सन याच्या मदतीने रँडीने पोपोफची बुवाबाजी उघड केली. पोपोफचा कार्यक्रम ‘दि टूनाईट शो’ वर कार्सनने आयोजित केला. रँडीने हा कार्यक्रम बारकाईने तपासला. पोपोफचे मदतनीस समोरच्या श्रद्धाळूकडून कार्डावर प्रत्येकाची माहिती घेत होते. त्यात त्यांचे नाव व आजाराचे स्वरूप लिहिलेले असे. ही कार्डे पोपोफच्या बायकोला स्टेजच्या पाठीमागे दिली जात. ही बया सूक्ष्म ट्रान्समीटरद्वारे एकेक श्रद्धाळूची माहिती पोपोफला पाठवीत असे. पोपोफने कानात सूक्ष्म रिसिव्हर दडवलेला होता. त्याद्वारे तो श्रोत्यांचे नाव घेऊन त्यांचा आजार सांगायचा. हा कार्यक्रम चालू असतानाच रँडीने व्हिडीओ चित्रण केले आणि पोपोफची बायको त्याला कशी माहिती देते, याचा गौप्यस्फोट केला. या पर्दाफाशमुळे इतर दूरचित्रवाहिनी चॅनेलनी पोपोफचे कार्यक्रम नाकारले. त्याची बुवाबाजी बंद पडली आणि तो दिवाळखोर बनला.

जेम्स हायड्रीकची सुपरपॉवर

परामानसशास्त्रात ‘सायकोकायनेसिस’ नावाचा प्रकार आहे. यामध्ये कोणतेही भौतिक बल न लावता केवळ मन:सामर्थ्याने वस्तू हलविण्याचा दावा संबंधित मंडळी करतात. हायड्रीकही असा दावा करी. आपण मन:सामर्थ्याने समोरच्या टेबलावर ठेवलेल्या टेलिफोन डायरीची पाने उघडून दाखवू शकतो, असा दावा त्याने केला. या दाव्याची चाचणी दूरचित्रवाणीवर घेतली गेली. डायरी टेबलावर ठेवली होती. समोरच्या खुर्चीवर हायड्रीक बसला. तीन परीक्षक जवळ बसले होते. रँडी पण बाजूला उभा राहून त्याचे अचाट सामर्थ्य पाहत होता. हायड्रीकने मन:शक्ती जागृत करण्याचा हावभाव करून डायरीची पाने उलगडून दाखविली. चतुर रँडीला त्याची युक्ती कळाली. डायरीच्या पानांवर तोंडाने हळूच फुंकर मारून तो हा चमत्कार करीत होता. रँडीने मग त्याला हा प्रयोग पुन्हा करण्याचे आव्हान दिले. यावेळी त्याने डायरीभोवती, फोमच्या हलक्या गोळ्या चहूबाजूंनी पसरून ठेवल्या व हायड्रीकला अट घातली की, त्या गोळ्या न हलविता केवळ डायरीची पाने मन:सामर्थ्याने उलगड. हायड्रीकच्या लक्षात आले की, आपण फुंकर मारली, तर फोमच्या गोळ्यापण उडणार. तो काही वेळ थांबला आणि आपले बिंग फुटेल, या भीतीने त्याने रँडीसमोर सरळ शरणागती पत्करली. रँडी जादूगार असल्यानेच त्याला हायड्रीकची लबाडी समजली होती.

ज्योतिषाचा फुगा फुटला

एका ज्योतिषाचा असा दावा होता की, जन्मवेळ व जन्मतारीख याशिवाय केवळ एखाद्या व्यक्तीशी काही मिनिटे गप्पा मारून त्याची रास कोणती आहे, हे तो सांगू शकतो. रँडीने त्याला आव्हान दिले. त्याने वेगवेगळ्या 12 राशींचे 12 लोक निवडले. त्यांच्या राशींबद्दलची माहिती रँडीने नोंदवून ठेवली; पण त्या ज्योतिषाला दिली नाही. ज्योतिषी त्या बारा लोकांबरोबर एकेकाला समोर घेऊन बोलला. मग ज्योतिषाने या बारा लोकांना प्रत्येकाची रास स्वत:च्या मन:सामर्थ्याने ओळखून त्या राशीच्या फलकाजवळ जाऊन उभे राहण्यास सांगितले. करारानुसार ज्योतिषाने 12 पैकी 10 राशी बरोबर ओळखावयाच्या होत्या; पण एकाही व्यक्तीची अचूक रास ज्योतिषाला ओळखता आली नाही.

तेजोवलयाची बनवेगिरी

एका ज्योतिषाने मानवी शरीराभोवती तेजोवलय असते आणि त्याची उंची डोक्याच्या वर पाच इंचांपर्यंत असते, असा दावा केला. त्याला असे तेजोवलय असलेल्या 10 जणांची निवड करण्यास सांगितली. हे दहाजण एकेका पडद्यामागे उभे करण्यात आले. ते ज्योतिषाला दिसत नव्हते; पण फक्त त्यांचे तेजोवलय पडद्याच्या वर दिसेल, अशी व्यवस्था करण्यात आली. शक्यता सिद्धांतानुसार ज्योतिषी 50 टक्के म्हणजे 10 पैकी 5 लोकांचे तेजोवलय ओळखू शकला असता. प्रयोग तेव्हाच यशस्वी जेव्हा त्याचा अंदाज 50 टक्क्यांपेक्षा अधिक खरा ठरेल. रँडीने त्याला 10 पैकी 8 जणांचे तेजोवलय ओळखले, तर प्रयोग यशस्वी अशी अट घातली.

रँडीने केवळ चार जणांना चार पडद्यामागे उभे केले. पण ज्योतिषाने दहाही पडद्यामागे तेजोवलयांकित व्यक्ती उभ्या असल्याचे सांगितले. ज्योतिषाची मन:शक्ती हरली. कारण कोणाही व्यक्तीला असे तेजोवलयच नसते.

डाऊझर पडला उताणा

डाऊझर म्हणजे आपल्याकडे पाणाडे. पाश्चात्य देशात ही मंडळी जमिनीतील पाण्याबरोबर खनिज इंधन व खनिज धातूंचापण शोध लावतात. बंद मोटारीत लपविलेला बॉम्ब किंवा अन्य वस्तूपण दाखवून देतात. एका डाऊझरने सीलबंद कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवलेल्या बाटलीत पाणी भरले आहे की नाही, हे आपण डाऊझिंग रॉडच्या सहाय्याने दाखवू शकतो, असा दावा केला. रँडीने त्याला आव्हान दिले. यासाठी रँडीने 20 बॉक्स मांडले व त्यातील किती बॉक्समध्ये पाण्याची बाटली आहे, हे डाऊझरला ओळखण्यास सांगितले. त्याने वीसपैकी 8 बॉक्स निवडले व त्यात पाण्याच्या बॉटल आहेत, असे सांगितले; पण प्रत्यक्षात 20 पैकी पाचच बॉक्समध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. डाऊझरने निवडलेल्या आठपैकी फक्त एका बाटलीत पाणी होते, तर दुसर्‍या एका बाटलीत वाळू भरली होती, बाकीच्या सहा बाटल्या रिकाम्या होत्या.

वस्तूवरून मालक ओळखण्याची लबाडी

एक मन:सामर्थ्यवाली बाई दावा करे की, एखाद्या व्यक्तीजवळची वस्तू मला द्या; त्यावरून मी संबंधित व्यक्तीबद्दलची वैयक्तिक माहिती सांगू शकते. खात्रीशीर नसलेली माहिती टाळण्यासाठी रँडीने प्रयोगासाठी 12 लोकांची निवड करून त्यांच्या जवळचे घड्याळ आणि किल्ली त्या बाईकडे सुपूर्द केली. या वस्तू कोणत्या व्यक्तीच्या, हे बाईने ओळखायचे होते. पूर्वअटीप्रमाणे 12 पैकी 9 व्यक्ती बरोबर ओळखायच्या होत्या; पण बाईला फक्त दोनच जणांना ओळखता आले.

लबाडीच्या अशा शेकडो घटना रँडीने उघड केल्या. केवळ अमेरिकेतच नव्हे, तर युरोप, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये त्याने परामानसशास्त्र, अतींद्रिय शक्ती व तत्सम गूढ घटनांचा पर्दाफाश केला. खरं तर रँडी हा एक अत्यंत प्रामाणिक, नीतिमान गृहस्थ होता. त्याला अशा गूढ शक्ती असतील, तर त्यांचा शोध घ्यायचा होता. तो स्वत:ला शोधक म्हणजे खर्पींशीींळसरीेीं म्हणे; पण गूढ शक्तीचा एकही विश्वसनीय पुरावा त्याला मिळाला नाही. आपण करतो ती मनोरंजनाची जादूच ही गूढ शक्तीवाली मंडळी करत असतात; पण नाव घेतात अलौकिक शक्तीचे, याची रँडीला खात्रीच झाली. गूढ शक्तीची अशक्यता सामान्य लोकांना कळावी आणि त्यांनी अशा लबाडीला भुलू नये म्हणून रँडीने गूढशक्ती सिद्ध करणार्‍यास बक्षिसाचे जाहीर आव्हान दिले आणि लोकप्रबोधन करण्यासाठी ‘जेम्स रँडी एज्युकेशनल फौंडेशन’ची स्थापना केली.

जेम्स रँडी एज्युकेशनल फौंडेशन (JREF)

1996 मध्ये जेम्स रँडीने जे.आर.इ.एफ. (JREF)) ची स्थापना केली. ‘ना नफा’ तत्त्वावर ही संघटना कार्य करते. ज्याला विश्वसनीय पुरावा नाही, अशा दाव्यावर विश्वास ठेवल्यामुळे होणारे संभाव्य धोके लक्षात यावेत, यासाठीचे लोकशिक्षण आणि मीडियाचे प्रबोधन करणे, हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. अतींद्रिय शक्तीची नियंत्रित वैज्ञानिक चिकित्सा करणार्‍या संशोधकांनाही ही संस्था मार्गदर्शन करते. 2015 मध्ये या कार्यासाठी जे.आर.ई.एफ.ने सक्षम संशोधकांना अनुदान देण्यास सुरुवात केली. व्हर्जिनिया राज्यातील फॉल्स चर्च येथे जे.आर.ई.एफ.चे मध्यवर्ती कार्यालय आहे.

सभासदांची वर्गणी, विविध व्यक्ती व संस्थांकडून मिळणार्‍या देणग्या आणि परिषदांचे आयोजन याद्वारे जे.आर.ई.एफ. निधीसंग्रह करते. 2015 नंतर अशाप्रकारे निधी गोळा करणे जे.आर.ई.एफ.ने थांबविले आहे. जे.आर.ई.एफ.च्या वेबसाईटवरून या संस्थेच्या संदर्भातील माहिती आणि बातम्या; तसेच अतींद्रिय शक्तीच्या भांडाफोडीच्या घटना ब्लॉगद्वारे प्रसारित केल्या जातात.

दहा लक्ष डॉलर्सचे पॅरानॉर्मल आव्हान

1964 मध्ये परामानसिक म्हणजे पॅरानॉर्मल शक्ती सिद्ध करणार्‍या व्यक्तीला 1000 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस रँडीने जाहीर केले. मात्र दोन्ही पक्षांनी चाचणीसाठीच्या वैज्ञानिक कसोट्या मान्य करण्याचे बंधन पाळणे अनिवार्य होते. ही रक्कम पुढे 10 लक्ष डॉलर्सपर्यंत वाढविण्यात आली. संबंधित आव्हानप्रक्रियेची जबाबदारी जे.आर.ई.एफ.वर सोपवण्यात आली. एक हजारपेक्षाही जास्त महाभागांनी हे आव्हान स्वीकारले. त्यापैकी बहुतेक जण हरले, तर इतरांनी आव्हान प्रक्रियेतून आयत्या वेळी पळ काढला. 2015 नंतर जे.आर.ई.एफ.ने ही आव्हान प्रक्रिया थांबविली आहे, कारण कोणीही लुंग्यासुंग्याने संस्थेचा वेळ वाया घालवू नये म्हणून. मात्र असे आव्हान देणार्‍याने पहिल्यांदा प्राथमिक चाचणीत यशस्वी व्हावे; मगच अंतिम चाचणी ठेवली जाईल, असे जाहीर केले आहे.

जिम मॅकॉर्मिक हा ब्रिटीश व्यावसायिक असून त्याने बोगस ‘एडीई 651’ या बॉम्बशोधक उपकरणाचा शोध लावला. 2008 मध्ये रँडीने जिमला त्याचे उपकरण विश्वसनीय असण्याच्या चाचणीला सामोरे जाण्याचे आव्हान दिले. रँडीच्या मते एडीई हे साधन बोगस व निरुपयोगी असून ते फक्त भोळसट लोकांचे खिसे रिकामे करण्याचे काम करते. याची विक्री ही सरळसरळ फसवणूक आहे. माझे आव्हान स्वीकारावे व दहा लाख डॉलर्स जिंकावेत, असे सरळ आव्हान रँडीने जिमला दिले. हे आव्हान मॅकार्मिकने स्वीकारले नाही. मिळविलेल्या रिपोर्टनुसार, बगदाद बॉम्बशोधक पथकाला हे बोगस साधन भरमसाठ किमतीला विकण्यात आले. बॉम्ब वाहून नेणार्‍या गाड्या चेक स्थानकावर तपासण्यास एडीएचा वापर करण्यात आला; पण हे साधन गाडीतील बॉम्ब शोधू शकले नाही. परिणामी बॉम्ब वाहून नेणारे अतिरेकी त्यांची वाहने इच्छित ठिकाणी घेऊन गेले आणि हजारो नागरिकांचे प्राण घेण्यात यशस्वी ठरले. 2013 मध्ये मॅकार्मिकवर बोगस बॉम्ब शोधक विक्रीबद्दल खटला भरण्यात आला. त्यात त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. या गृहस्थाला शिक्षा होण्यासाठी रँडीने केलेले संशोधन व आव्हान उपयोगात आले. इराकी सरकारने वेळीच रँडीचे मत लक्षात घेऊन बोगस बॉम्बशोधक विकत घेण्याचे थांबविले असते तर निरपराध इराकी नागरिक व सैनिक यांचे प्राण वाचले असते.

दि अमेझिंग मीटिंग

इ.स.2003 पासून रँडीने ‘दि अमेझिंग मीटिंग’ या नावाने प्रतिवर्षी परिषदा घेण्यास सुरुवात केली. 2015 पर्यंत या परिषदा सातत्याने चालू राहिल्या. या परिषदा म्हणजे वैज्ञानिक, स्केप्टिक्स आणि नास्तिक विचारवंतांचे संमेलनच असे. प्रख्यात बुद्धिप्रामाण्यवादी रिचर्ड डॉकिन्स, पेन, टेलर, मायकेल शर्मर आणि अ‍ॅडॅम सॅव्हेज यासारखे अतिरथी-महारथी या संमेलनात सहभागी होत. आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका आणि ब्रिटनमधील स्केप्टिक विचारवंत दरवर्षी या परिषदेमध्ये सहभागी होतात.

बहुतेक अमेझिंग मीटिंग लास व्हेगास येथे आयोजित केल्या जात. चालू वर्षी अशी परिषद तेथे भरली होती. या परिषदेत वाई अंनिसचे सभासद डॉ. शंतनु अभ्यंकर सहभागी झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्र अंनिसने संघर्ष करून मिळवलेल्या जादूटोणा आणि अघोरी अंधश्रद्धांविरुद्धच्या कायद्यावर या परिषदेत निबंध वाचन केले. त्या निबंधाचे टाळ्यांच्या गजरात जगातून जमलेल्या प्रतिनिधींनी कौतुक केले. शंतनु या वेळी रिचर्ड डॉकिन्स व रँडीला भेटला. त्यांच्याबरोबरच्या गप्पा हा एक अपूर्व आनंदाचा अनुभव होता, असे शंतनु म्हणतो. त्याच्या या परिषदेतील सहभागावर आधारित लेख या लेखाला जोडूनच प्रसिद्ध करण्यात आला आहे. अंनिसमधील सक्षम कार्यकर्त्यांनी दरवर्षी जागतिक पातळीवरील आपल्या समविचारी मंडळींशी वैचारिक देवाण-घेवाण करायला हवी.

पॉडकास्टद्वारा जनजागरण व साहित्यनिर्मिती

‘पॉडकास्ट’ म्हणजे इंटरनेटद्वारे घराघरांत इंटरनेट मोबाईल (स्मार्ट फोन) किंवा संगणकाच्या माध्यमातून केली जाणारी विविध विषयांवरील ऑडिओ स्वरुपातील मांडणी. जेम्स रँडी सातत्याने ‘पॉडकास्ट’द्वारे आपले विचार जनप्रबोधनासाठी मांडत राहिले आहेत. स्केप्टिकॅलिटी हे स्केप्टिक सोसायटीचे पॉडकास्ट; तसेच ‘पॉईंट ऑफ इन्क्वायररी’ हे ‘सेंटर फॉर इन्क्वायररी’चे पॉडकास्ट याद्वारे रँडी सामान्य नागरिकांचे प्रबोधन करीत आहेत. 2006 पासून सातत्याने ‘दि रँडी स्पीकस्’ या शीर्षकाखाली ‘दि स्केप्टिक्स गाईड टू दि युनिव्हर्स’ या ‘पॉडकास्ट’वर रँडीची भाषणे प्रसारित झालीत. याशिवाय ‘दि अमेझिंग शो’ या ‘पॉडकास्ट’द्वारे रँडी त्यांच्या जीवनानुभवावर व कार्यावर आधारित विविध किस्से प्रसारित करतात.

रँडीने एकूण दहा ग्रंथांचे लेखन केले. त्याच्या आवडत्या जादूकलेवर आधारित ‘कंजुरिंग’ (उेपर्क्षीीळपस) हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. यात प्रख्यात जादूगारांच्या चरित्राचा समावेश आहे. याच विषयावरील दुसरा ग्रंथ – ‘हौदीनी, हिज लाईफ अँड आर्ट’ हा प्रख्यात जादूगार हॅरी हौदिनी याचे व्यक्तिगत जीवन व त्याचे अफलातून जादूचे प्रयोग याचा परिचय करून देतो. रँडीने मुलांसाठी जादूकलेचा परिचय करून देणारे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्याचे नाव आहे, ‘दि मॅजिक वर्ल्ड ऑफ अमेझिंग रँडी.’

परामानस आणि छद्मविज्ञानावर रँडीने लिहिलेल्या ग्रंथाचा थोडक्यात परिचय असा (1) युरी गेलरचे चरित्र (2) नॉस्ट्रॉडॅमस याच्या भविष्याची चिकित्सा (3) फ्लिमफॅम (4) दि फेथ हीलर्स (5) जेम्स रँडी सायकिक इन्व्हेस्टिगेटर (6) टेस्ट युवर ईएसपी पोटेन्शियल (7) एनसायक्लोपीडिया ऑफ ऑकल्ट अँड पॅरानॉर्मल.

याशिवाय ‘सेंटर फॉर इन्क्वायररी’च्या ‘स्केप्टिकल इन्क्वायरर’ या मासिकात रँडीने सातत्यपूर्ण लेखन केले आहे.

देवधर्माविषयीचा दृष्टिकोन

रँडीचे आई-वडील अँग्लिकन चर्चचे सभासद होते; पण ते क्वचितच चर्चमध्ये जात असत. रँडी टोरोंटोमधील चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेला अधून-मधून जाई. येशू ख्रिस्तांविषयीच्या कथांबद्दलच्या पुराव्याचे स्पष्टीकरण त्याने एकदा चर्चमधील धर्मोपदेशकांना विचारले. त्याचे समाधानकारक उत्तर त्याला मिळाले नाही. म्हणून त्याचे चर्चला जाणे बंद केले.

रँडीने ‘मी धर्म का नाकारतो?’ या विषयावर एक निबंध लिहिला आहे. त्यात आपण नास्तिक आहोत, असा स्पष्ट उल्लेख आहे. या निबंधात त्याने ख्रिस्तविषयक धार्मिक ग्रंथामधील चमत्कारावर आपला विश्वास नसल्याचे मत व्यक्त केले आहे.

रँडीच्या मते, नास्तिकांचे दोन प्रकार मानता येतील. काही नास्तिक देवाचे अस्तित्वच मानत नाहीत, तर दुसर्‍या प्रकारचे नास्तिक देवाच्या अस्तित्वाचा पुरावा मिळत नाही, अशा मतांचे आहेत. रँडी स्वत:ला दुसर्‍या प्रकारचे नास्तिक मानतात. देव अस्तित्वात नाही, अशी ठाम भूमिका घेतली, तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी आपणावर येते आणि ते शक्य नाही. धार्मिक मंडळी म्हणतात, ते देव मानतात. कारण त्यांनी ग्रंथात तसे वाचले आहे आणि त्यावर त्यांची श्रद्धा आहे. तो त्यांचा अधिकार आपण कशाला हिरावून घ्यायचा? किंवा मानवी जीवनातील घटनांचे कारण देव आहे, असं समजण्यापेक्षा अन्य सोप्या तार्किक पद्धतीने व विज्ञानाच्या आधारे अशा घटनांची स्पष्टीकरणे आपण मिळवू शकतो.

सन 2016 च्या उडख च्या परिषदेत केंड्रिक प्रेझियर यांच्याबरोबरच्या चर्चेत रँडीने स्पष्टपणे म्हटलंय –

“सध्याच्या ऐतिहासिक क्षणी मानवी जीवन अधिक दूषित होण्यास आणि त्याला धोक्याच्या वळणावर नेण्यास देवावरचा विश्वास हे महत्त्वाचे कारण आहे.”

झुंज आजाराशी

फेबु्रवारी 2006 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी रँडीला बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून तो पूर्ण बरा झाला आणि लोक समजतात तेवढा केमोथेरपीचा त्रास मला जाणवला नाही, असे मत रँडीने व्हिडीओद्वारा व्यक्त केले आहे. ऑक्टोबर 2016-17 मध्ये रँडीने त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका असल्याचे व्हिडीओद्वारे उघड केले. परिणामी तो आता लांबवरचा प्रवास करू शकत नाही. त्यामुळे 2017 च्या लास व्हेगॉसच्या परिषदेस तो हजर राहू शकला नाही; पण धीरोदात्त जीवन जगणारा हा पितामह या वर्षीच्या परिषदेमध्ये व्हील चेअरवरून सहभागी झाला होता. महाराष्ट्र अंनिसचे डॉ. शंतनु अभ्यंकर यांनी वाचलेल्या निबंधावेळी ते उपस्थित होते. शंतनुचे त्यांनी कौतुकही केले. पुढच्या वर्षी मुंबईत भरणार्‍या महाराष्ट्र अंनिसच्या जागतिक परिषदेला हजर राहण्याचे शंतनुने त्यांना निमंत्रण दिले. रँडींनी वयाची नव्वदी पार केली, तरी ते कृतिशील राहून मानवतावादी चळवळीला बळ देत आहेत. रँडी झिंदाबाद!

रँडींनी सिगारेटला आयुष्यात कधीही स्पर्श केला नाही. अफू-गांजासारखी मादक द्रव्ये आणि मद्यपान यापासून ते नेहमीच दूर राहिले. याचं मजेशीर कारण ते देतात, ‘मद्याच्या किंवा मादक द्रव्याच्या सेवनाने आपण भ्रामक जगात वावरायला लागतो. अशा वेळी आपली बुद्धी आपण गमावतो. मला ते परवडण्यासारखे नाही. भ्रामक सृष्टीत रमण्यापेक्षा मला समोरच्या वास्तव जगातील आव्हाने स्वीकारण्यात अधिक रस आहे. त्यासाठी मला बुद्धी सतत सतेज ठेवायला हवी.’

रँडी राजकीयदृष्ट्या डेमोक्रॅट पक्षाचे समर्थक आहेत. बराक ओबामा जेव्हा राष्ट्राध्यक्ष झाले, त्यावेळी त्यांना आनंदाश्रू अनावर झाले. एका निग्रोला राष्ट्राध्यक्षपदाचा मान मिळणे, ही अमेरिकेच्या इतिहासातील असाधारण घटना, याचा आनंद त्यांना झाला. आता अमेरिकेच्या अध्यक्षपदावर स्त्री बसावी याची वाट ते पाहत आहेत. खरंच रँडी हे धर्म, जात, लिंग यांच्यापलिकडे पोचलेले महान मानवतावादी व्यक्तिमत्त्व आहे.

रँडी आणि अंनिस

जेम्स रँडी हे कॅनडा, अमेरिका, युरोप आणि आशिया, दक्षिण अमेरिका म्हणजे जवळजवळ संपूर्ण जगात गूढवादाला आव्हान देणार्‍या निधर्मी मानवतावादाचे प्रसारक आहेत. जेम्स रँडी फौंडेशन आणि स्केप्टिक चळवळीचे ते मार्गदर्शक आहेत. या जागतिक चळवळीची जी ध्येयधोरणे आहेत, तीच महाराष्ट्र अंनिसची आहेत. ‘सत्यमेव जयते’ हे जर खरं असेल, तर भविष्यकाळात मानवतावादाचा विजय होणार हे नक्की.

पितामह रँडी! तुम्ही खरंच ‘अमेझिंग’ आहात.

लेखन सहाय्य – आशा धनाले

आरोपीच्या पिंजर्‍यात

युरी गेलरने रँडीवर पंधरा दशलक्ष म्हणजे दीड कोटी डॉलर्सचा अब्रुनुकसानीचा खटला भरला. त्याचा उल्लेख याच लेखात पाठीमागे आला आहे. काय होता दोघातील वाद?

वर्ष 1970 च्या सुरुवातीस युरीची आणि रँडीची भेट झाली. अतिशय मोहक, कुणालाही आवडेल असे सुंदर, सर्वगुणसंपन्न असे हे व्यक्तिमत्त्व रँडीला भावले; पण जेव्हा त्याच्या नजरेने चमचा वाकविणे यासारख्या चमत्काराद्वारे रँडीला त्याची लबाडी लक्षात आली, तेव्हा त्याने त्याचा पर्दाफाश करण्याची मोहीम सुरू केली. रँडी आपली बदनामी करतोय, असा त्याच्यावर आरोप करून युरीने त्याच्यावर एकामागून एक अब्रुनुकसानीचे खटले दाखल केले. जपानमधल्या एका खटल्याचा अपवाद सोडला, तर सर्व खटल्यांत युरी हरला. जपानमधील खटल्यात मात्र युरीने मागितलेल्या नुकसानभरपाईच्या रकमेच्या तिसर्‍या हिश्याचा एक टक्का रक्कम रँडीने युरीला द्यावा, असा निकाल दिला; पण हा निकालसुद्धा रद्द झाला. कारण युरीने दुसर्‍या खटल्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याने जपानच्या खटल्याकडे दुर्लक्ष केले.

मे 1991 मधील खटल्यात युरीचा असा आरोप होता की, त्याने प्रसिद्ध अशा शास्त्रज्ञांनाही फसविले, असे बदनामीकारक लिखाण रँडीने केले. युरीचे चमत्कार म्हणजे सीरियल बॉक्सवरील चमत्कारासारखे क्षुल्लक आहेत, अशी टीका रँडीने केली होती. त्यामुळेही आपली बदनामी झाली, असा युक्तिवाद युरीने कोर्टात केला होता. उदाहरण म्हणून युरीने चमचा वाकविण्याच्या प्रयोगाचा उल्लेख केला होता. हा खटला कोर्टाने रद्द करून युरीने एक लाख वीस हजार डॉलर्स रँडीला दाव्याच्या खर्चापोटी द्यावे, असा हुकूम केला.

गेलरने एका दुसर्‍या खटल्यात रँडी व उडखउजझ या संघटनेवर खटला भरला होता. कोर्टाने गेलरने उडखउजझ ला विनाकारण या खटल्यात गोवल्याचा निकाल दिला. अखेर कोर्टाबाहेर तडजोड होऊन हा खटला निकालात निघाला आणि गेलरने युरीवरील इतर सर्व खटले मागे घ्यावेत, असा समझोता झाला.

रँडी म्हणतो की, युरीप्रमाणे अनेकांनी त्याच्यावर विविध खटले गुदरले; पण या सर्व खटल्यांत मी एक दमडीही वादींना नुकसान भरपाई म्हणून दिलेली नाही. मात्र हे खटले लढविण्यात त्याला ‘मॅकॉर्थर फौंडेशन’ने दिलेली सर्व ग्रँट खटले चालविण्यासाठी खर्ची पडली, याचा त्याला विषाद वाटतो.

रँडीने, एल्डन बायर्ड या बाल्टीमोअरमधील गृहस्थावर, मुलावर लैंगिक अत्याचार करणारा म्हणून टीका केली होती. यामुळे आपली बदनामी झाली, असा आरोप बायर्डने रँडीवर केला आणि बाल्टीमोअर कोर्टात रँडीविरोधात खटला दाखल केला; पण नंतर विवाह केलेल्या आपल्या मेहुणीबरोबर ती लहान असताना बायर्डने लैंगिक अत्याचार केला होता, असा पुरावा रँडीने कोर्टात दाखल केला. निकाल रँडीच्या बाजूने लागला.

अर्ल कुर्लेहा टोरोंटो (कॅनडा) येथील मांत्रिक. त्याने रँडीवर बदनामीकारक टीका केली आणि रँडीला आव्हान दिले की, त्याने अर्लवर खटला भरावा. जर रँडीने खटला भरला नाही, तर त्याने मी केलेले आरोप मान्य करावेत. 1996 मध्ये रँडीने अर्लवर अब्रुनुकसानीचा खटला भरला. अर्लला हे अनपेक्षित होते. दोन वर्षेखटला चालला. 1998 मध्ये अर्लचा अतिमद्यसेवनाने मृत्यू झाला.

स्निफेक्स हा बॉम्बशोधक डाऊझिंग साधनांचा निर्माता. या साधनाची सरकारी यंत्रणेद्वारे चाचणी घेण्यात आली. चाचणीत हे साधन बोगस असल्याचे सिद्ध झाले. या घटनेवर रँडीने स्निफेक्सच्या लबाडीवर भाष्य केले म्हणून त्याने रँडी व जे.आर.ई.एफ.वर सन 2007 मध्ये खटला भरला. स्निफेक्स हा खटला हरला.

रँडीवर कसलेही आरोप सिद्ध झाले नाहीत. कारण त्याची बाजू न्यायाची व सत्याची होती. महाराष्ट्र अंनिसवर देखील सनातन्यांनी अशा प्रकारचे अनेक खटले घातले. त्यातील निकाल लागलेल्या सर्व खटल्यांत अंनिस निर्दोष ठरली. कारण अंनिसची बाजू सत्याची व न्यायाची होती. रँडी झिंदाबाद! सत्यमेव जयते!