एशियन ह्युमॅनिझम कॉन्फरन्सची कार्यशाळा 2018 चे आयोजन काऊशिंग, तैवान येथे ह्युमॅनिस्टीक पास्टा कॅरिऑनिझम व ह्युमॅनिस्ट अॅण्ड एथिकल युनियन (ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल) अंतर्गत इंटरनॅशनल ह्युमॅनिस्ट अॅण्ड एथिकल यूथ ऑर्गनायझेशन (यंग ह्यूमॅनिस्ट इंटरनॅशनल) च्या सहकार्याने दि. 29-30 डिसेंबर 2018 रोजी हॉटेल त्राम, काऊशिंग तैवान येथे करण्यात आले होते. आशिया खंडातील पाच विविध देशांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. भारतातर्फे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वय विभागाचे सहकार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी सहभाग घेतला; तसेच झारखंड येथील आंबेडकर सोशल इन्स्टिट्यूटचे रामदेव विश्वबंधू हे देखील सहभागी झाले होते. इतर मान्यवर प्रतिनिधींमध्ये जमिलाह लिम (मलेशियन लथेईस्ट्स अॅण्ड सेक्युलर ह्युमॅनिस्टस, मलेशिया) अॅलेन सेसॉन प्रेसिलास (ह्युमॅनिस्ट अलायंस फिलिपाईन्स इंटरनॅशनल, फिलिपाईन्स), डी. जे. हॅन (ह्युमॅनिस्ट सोसायटी, सिंगापूर), पॉवलो फेरादिनी (पत्रकार, इटली), चिन वेन फेंग, मिंग फँग चेन (ह्युमॅनिस्टिक पास्ता फॅडिअॅनिझम, तैवान) हे होते. या परिषदेत अशियातील विविध देशांच्या 25 प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
आशिया खंडातील मानवतावादी संस्था व व्यक्ती यांच्यात परस्परसंबंध प्रस्थापित करणे, कौशल्य विकसित करणे, क्षमता विकसित करणे, अशी ध्येयधोरणे या परिषदेची होती. यापूर्वी अशी परिषद भारत, बांगला देश, इंडोनेशिया, नेपाळ, सिंगापूर, फिलिपाईन्स इत्यादी देशांमध्ये आयोजित केली होती. चिन वेन फेंग (अध्यक्ष, आशिया विभाग, यूथ ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल) यांनी या परिषदेचे समन्वयक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती.
या परिषदेने ‘काऊशिंग जाहीरनामा’ प्रस्तुत करून तो अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. त्या अंतर्गत आशियातील संस्थांच्या कार्याचा विकास होण्यासाठी ध्येय-धोरणांची निश्चिती करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अॅमस्टरडॅम जाहीरनामा’ लक्षात घेऊन आशियातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे –
1) लिंग, राष्ट्रीयत्व, जात, वंश इत्यादींवर आधारित कोणत्याही स्वरुपाचा भेदभाव न करता मानवी अधिकारांचे संवर्धन करणे.
2) धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी संस्था, संघटनांना पाठबळ देणे.
3) फॅसिझम, ऑथोरिटॅरियानिझम इत्यादीसारख्या गोष्टींना नकार देणे.
4) अल्पसंख्य समाजास होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित शासनाकडे पाठपुरावा करणे.
पारंपरिक कॉन्फरन्सप्रमाणे आयोजन न करता या कॉन्फरन्समध्ये प्रतिनिधींनी कार्यशाळेत सहभाग घेतला. विविध स्थानिक गटांना यांच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. बनावट बातम्यांच्या युगात अत्याचाराचे निर्मूलन करण्यासाठी प्रादेशिक सहकार्याची गरज अधोरेखित करण्यात आली. ‘काऊशिंग जाहीरनामा’ हा आधुनिक आशियाच्या संदर्भातील ‘अॅमस्टरडॅम जाहीरनाम्या’ची पुनरावृत्तीच आहे. आशिया खंडातील देशांतील विविध परंपरा; ज्या आधुनिक मानवजातीशी समान सिद्धांत सांगतात, त्यांचे संवर्धन केले पाहिजे. संस्कृती, भाषा, पाककृती विविध असताना देखील विविधतेतील एकता साधून मानवी मूल्यांची जोपासना करणे गरजेचे आहे.
डॅनिएल हिल (उपाध्यक्ष, यंग ह्युमॅनिस्ट इंटरनॅशनल) यांनी केलेल्या मार्गदर्शनात म्हटले आहे की, मानवतावादी सहकार्यांना शोधण्यासाठी, सर्व प्रतिनिधींनी एकमेकांना सर्वतोपरी सहाय्य केले पाहिजे. साधनांचे, विचारांचे आदान-प्रदान केले पाहिजे. ‘युनिकॉर्न्स युनाईट’ या गेन ल्यू, व्हू ले आणि जेसामिन शाम्स-लू यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा संदर्भ देत प्रतिनिधींना प्रत्येकाजवळ असलेल्या साधनसामग्रीद्वारे परस्परसंवादी बनविले. मानवतावादाची सूत्रे गुंतवून ठेवण्यासाठी आपापल्या देशातील नागरिकांना या कार्यात जोडणे गरजेचे आहे. यासाठी योजना आणि आराखडा आखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मिंग फँग चेन (ह्युमॅनिस्ट पास्टा फॅरिअॅनिझम, तैवान) यांनी संस्थेतील कार्यपद्धती आणि संघटनेतील कार्यात नाविण्यता कशा प्रकारे आणता येईल, याबद्दल कार्यशाळा घेतली. आधुनिक मार्केटिंगची तत्त्वे संघटनांच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी, निधी मिळविण्यासाठी वापरली पाहिजेत, असेही सांगितले. संघटनात्मक कार्याची बांधणी, संघटनेतील ‘स्पिरीट’ वाढविण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यात येणार्या अडी-अडचणी, त्यावरील उपाय; तसेच कार्यपद्धती आणि अंमलबजावणी कशी करावी, याबद्दल देखील मार्गदर्शन केले.
प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी पॅनल डिस्कशनमध्ये म.अंनिसच्या कार्याबद्दलची माहिती दिली. संघटनेस आलेल्या विविध अडी-अडचणींबद्दल देखील चर्चा झाली. म.अंनिसने मंजूर करवून घेतलेला जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा याबद्दल माहिती दिली. तसेच 30 वर्षपूर्तीनिमित्ताने 9, 10, 11 ऑगस्ट 2019 रोजी ‘मानवतेसाठी विवेकवाद’ या विषयावर होणार्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे जाहीर निमंत्रण दिले. मअंनिसच्या प्रभावी कार्याची दखल सर्वच संस्था, संघटनांनी घेतली आणि अशा प्रकारचे प्रभावी कार्य करण्यासाठी मअंनिसचे उर्वरित संस्था/संघटनांचे मार्गदर्शक म्हणून देखील जबाबदारी स्वीकारावी, अशी आशा देखील या परिषदेतील कार्यशाळेत व्यक्त करण्यात आली. या चर्चासत्रात प्रा. डॉ. सुदेश घोडेराव (भारत), जमिलाह लिम (मलेशिया), अॅलेन सेसॉन प्रेसील्लास (फिलिपाईन्स) आणि मिंग फँग चेन (तैवान) यांनी सहभाग घेतला.
परिषदेच्या अखेरीस आशियाई कार्यकारिणी गटाच्या प्रतिनिधींनी आशियात मानवतावादी विचारसरणीची स्थापना करण्याच्या समान ध्येयावर काम करण्यास मंजुरी दर्शविली की, ज्यामुळे संसाधनांचे अदानप्रदान सुलभ होऊ शकेल. ह्युमॅनिस्ट सोसायटी, सिंगापूर यांनी 2019 च्या पुढील परिषदेत येण्याचे निमंत्रण दिल्याने पुढील परिषदेअगोदर ठरलेल्या कामांची पूर्तता करण्याच्या उद्देशाने सर्वांची पावले पुन्हा माघारी स्वदेशाकडे वळली. परिषदेच्या संयोजकांनी तैवानचे खास सांस्कृतिक खाद्य पदार्थ ‘स्पागेट्टी’चा आस्वाद सर्व सहभागी प्रतिनिधींना दिला. अनौपचारिक पद्धतीने सर्व प्रतिनिधींची यानिमित्ताने मेजवानीच झाली.