फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनॅलिस्ट असोसिएशन (फिरा) ची 11 वी राष्ट्रीय परिषद नुकतीच आंध्रकेसरी कलाक्षेत्रात, उक्कुनगरम, स्टील प्लांट, विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) येथे झाली. यामध्ये देशातील बहुतेक सर्वत्र राज्यांतील 50 हून अधिक विविध प्रतिनिधी सहभागी झाले होते. ‘विवेकवादासमोरील आव्हाने’ या मुख्य विषयावर या परिषदेचे आयोजन मानव विकास वेदिका संस्थेने केले होते.
परिषदेच्या उद्घाटन सत्रासाठी प्रमुख पाहुणे चार्वाक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रा. डॉ. राम कृष्णा भट्टाचार्य (पश्चिम बंगाल) होते. त्यांनी मनोगतात चार्वाक तत्त्वज्ञानाची माहिती दिली. चार्वाक तत्त्वज्ञानाचा अजून सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. 12 व्या शतकात तत्कालीन चार्वाक तत्त्वज्ञान विरोधकांनी भट्टाचार्य म्हणाले, चार्वाक साहित्य नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे विविध भागांत ते तुकड्या-तुकड्यांनी आढळते. ग्रीक आणि चार्वाक तत्त्वज्ञानात चार महाभुतांचा उल्लेख; तर इतर तत्त्वज्ञानांत पंचमहाभुतांचा समावेश आढळतो. भारतीय विचारवंतांनी या तत्त्वज्ञानांचा अभ्यास केला पाहिजे. अगदी कमी कालावधीत यश येणार नाही, म्हणून जणू काही लांब पल्ल्याच्या मॅरेथॉन शर्यतीसाठी मानसिक तयारी केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सन्माननीय पाहुणे म्हणून द्रविडियन विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. एस. चलाम होते. त्यांनी त्यांच्या भाषणात पुरोगामी विचारसरणीचे कार्यकर्ते आणि समाज यातील परस्परसंबंध उलगडून दाखविला. तसेच पौराणिक काळापासून चालत आलेल्या अनेक अंधश्रद्धा, रुढी, प्रथा-परंपरा यांचा फोलपणा उघडकीस आणला. धर्म ही व्यवस्था भांडवलशाहीला पोषक आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले. आपल्या देशात ज्ञानमंदिराऐवजी मोठ्या प्रमाणात देव-देवतांची मंदिरे असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
द्रविड कळघमचे नेते के. वीरमणी यांचा संदेश याप्रसंगी वाचून दाखविण्यात आला. महाराष्ट्र, कर्नाटकप्रमाणे जादूटोणाविरोधी कायदा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले. विवेकवादी चळवळीचे कार्यकर्ते अॅड. सौरभ दत्ता, पश्चिम बंगाल यांनी भारतीय राज्यघटनेबद्दल समाजात असलेल्या गैरसमजुतींवर बोट ठेवले. समाजात संविधान साक्षरता येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच सर्वोच्च न्यायालयात देवस्थान जमिनींबाबत याचिका दाखल करण्याचे आवाहनही केले. राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा नागरिकांचे मूलभूत कर्तव्य म्हणून सांगितला गेला आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आचरणदेखील मूलभूत कर्तव्यात समाविष्ट असल्याने त्याच्याविरोधात वर्तन करण्रार्यांवर तत्परतेने कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी म्हटले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आणि ‘फिरा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र नायक यांनी ‘फिरा’च्या स्थापनेची पार्श्वभूमी, इतिहास विषद केला. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पूर्वीच्या सरकारद्वारा शासकीय निधी अनुदानस्वरुपात उपलब्ध करून दिला गेला होता. सध्याच्या सरकारने मात्र त्यासाठीच्या अनुदानावर बंदी आणण्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रीय परिषदेचे संयोजक एम. एस. एन. मूर्ती यांनी प्रास्ताविक; तर साजित सी. यांनी आभार प्रदर्शन केले. विविध विषयांवरील पाच पुस्तकांचे प्रकाशन देखील या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. नास्तिक केंद्र, विजयवाडाचे संचालक विजयम यांनी देखील मनोगत व्यक्त केले.
परिषदेचे दुसरे सत्र ‘महिलांच्या समस्या व विवेकी उपाययोजना’ या विषयावर झाले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. वासंती आचार्य (ओडिसा) व सहभागी वक्त्या म्हणून तेलुगू फिल्म अभिनेत्री चंदना चक्रवर्ती (आंध्रप्रदेश), प्रा. राजबाला त्रिपाठी (ओडिसा) व व्ही. ए. टी. अमिलिय न्यायालयाच्या न्यायाधीश डॉ. जी. राधाराणी (आंध्रप्रदेश) या होत्या.
परिषदेच्या तिसर्या सत्रात ‘फिरा’च्या संघटनाबांधणी बाबत चर्चा झाली. संस्थेची नियमावली मंजूर करून महाराष्ट्र अंनिसच्या सहकार्याने ‘फिरा’ संघटनेची कायदेशीर नोंदणी प्रक्रिया नाशिक, महाराष्ट्र येथे नोंदणी करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या सत्राचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र नायक हे होते. यात ई. टी. राव (ओडिसा), लाल सलाम (केरळ), राजा सुरेश (ओडिसा) यांनी सहभाग घेतला. नियमावलीचे वाचन अॅड. चेलीमेला राजेश्वर (तेलंगणा) यांनी केले, तर आभार प्रदर्शन शामसुंदर राव (कर्नाटक) यांनी केले.
दुसर्या दिवशी झालेल्या चौथ्या सत्रात ‘फिरा’शी संलग्न संस्था-संघटनांनी वार्षिक अहवाल सादर केला. महाराष्ट्र अंनिसचे राष्ट्रीय समन्वय विभागाचे सहकार्यवाह प्रा. डॉ. सुदेश घोडेराव यांनी ‘विवेकवादासमोरील आध्यात्मिक बुवाबाजीचे आव्हान’ या विषयावर निबंध सादर केला; तसेच मअंनिसचा वार्षिक अहवाल देखील सादर केला. देशातील एकूण 25 संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कार्याचा अहवाल सादर केला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. धनेश्वरी साहू (ओडिसा) होते, तर प्रा. डॉ. सुदेश घोडेराव (महाराष्ट्र), हरचंदसिंह भिंदर (पंजाब), सुकुमारन अनुवच्चपूरम (केरळ) यांनी संयोजन केले. रघुराम सिंग (उत्तर प्रदेश), मनोज कुमार (महाराष्ट्र), ईश्वर नास्तिक (राजस्थान), अनिल कुमार (केरळ), जया कुमार (तामिळनाडू), उन्नीकृष्णन (मुंबई), सुमोना चौधरी (आसाम), पी. सत्त्याह (तेलंगणा), राजा सुरेश (ओडिसा) यांनी अहवाल सादर केला. आभारप्रदर्शन डॉ.गिरीधर राव (कर्नाटक) यांनी केले.
चौथ्या सत्रात ‘धार्मिक मूलतत्त्ववादाची विवेकवादी चळवळीसमोरील आव्हाने’ या विषयावर मा. अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, महाअंनिस) यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. चार्वाक (आसाम), विद्याभूषण रावत (दिल्ली), बी. सम्बासिवा राव (आंध्र प्रदेश), नरणे वेन्कटा सुवैय्या (आंध्र प्रदेश) यांनी सहभाग घेतला. मो. सुकुर (ओडिसा) यांनी आभारप्रदर्शन केले.
समारोपाच्या सत्रात मा. अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, महाअंनिस) यांच्या हस्ते ‘फिरा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. नरेंद्र नायक यांना ‘कोमला-इन्नियाह मारीसेट्टीज – राष्ट्रीय मानवतावादी’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 25 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. मानव विकास वेदिका आंध्रप्रदेश या संघटनेद्वारा हा पुरस्कार दर दोन वर्षांनी ‘फिरा’च्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रदान करण्यात येतो. सन्मानपत्राचे वाचन मानव विकास वेदिकाचे अध्यक्ष व्ही. व्ही. व्ही. सुब्बाराव यांनी केले, सत्काराला उत्तर देताना प्रा. नायक यांनी त्यांचा विवेकी जीवन प्रवास उलगडून दाखविला.
–डॉ. सुदेश घोडेराव
लेखक संपर्क : 9422257654