Categories
अभियान चळवळ

‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’

फेब्रुवारी – २०१७

महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान 3 ते 12 जानेवारी 2017

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महिला सहभाग विभागातर्फे 3 जानेवारी, ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती’ ते 12 जानेवारी, ‘राजमाता जिजाबाई जयंती’ या दरम्यान महिला सबलीकरण आणि प्रबोधन अभियान घेण्यात आले.

‘जातिधर्माचा नको आधार, आम्ही वापरू मानव अधिकार’ हे घोषवाक्य घेऊन कार्यक्रम सादर करण्यात आले. महिला सबलीकरणासाठी ‘जातिअंत’ या विषयावर भर देण्यात आला. समाजव्यवस्था, अंधश्रद्धा व जातपंचायतींचे निर्णय यामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यामुळे यासंदर्भात महिलांमध्ये जागृती होण्याची गरज आहे. यंदा कॉलेज युवती आणि युवक यांच्यासाठी हे अभियान राबविण्यात आले. कारण युवती आणि युवकच उद्याच्या शोषणमुक्त समाजनिर्मितीचे आधारस्तंभ आहेत. व्यावहारिक जीवनात प्रवेश करताना त्यांना या प्रबोधनाचा नक्कीच उपयोग होणार आहे.

या अभियानाचे उद्घाटन 3 जानेवारी रोजी सोलापुरातील वसुंधरा महाविद्यालयात करण्यात आले. उद्घाटन समारंभास अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बृहस्पती चौधरी व प्रमुख पाहुणे म्हणून म.अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील उपस्थित होते. मअंनिस राज्य प्रधान सचिव माधव बावगे हेही उपस्थित होते. महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह उषा शहा यांनी प्रास्ताविक केले. अविनाश पाटील आणि डॉ. बृहस्पती चौधरी यांनी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महिलांसाठी काम करणार्‍या सीमा किणीकर व आंतरजातीय विवाह केलेल्या तीन जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. दुसर्‍या सत्रात युवतींशी त्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्नांसंदर्भात संवाद साधला. बर्‍याच युवतींनी मनोगत व्यक्त केले. ‘विवेक’ लघुपट महोत्सवातील निवडक लघुपटांच्या प्रदर्शनाने कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला. अनेक युवक-युवती, प्राध्यापक व प्राचार्य यांनी अशा स्वरुपाच्या कार्यक्रमाच्या आयोजनाची गरज बोलून दाखविली. या कार्यक्रमास 150 युवती, युवक व सोलापुरातील अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते. नियोजन उषा शहा व सूत्रसंचालन अंजली नानल यांनी केले.

खानदेश महसूल विभागात दि. 6 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता जळगाव येथील नूतन मराठा कॉलेजमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. उपप्राचार्य डॉ. आर. पी. देशमुख आणि डॉ. एस. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आंतरजातीय विवाह केलेल्या एका जोडप्याचा व तरुण उद्योजक महिला सौ. संध्या सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात मअंनिस महिला विभाग कार्यवाह उषा शहा व जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. दिगंबर कट्यारे यांनी मार्गदर्शन केले. युवतींशी त्यांच्या मनोगतातून संवाद साधण्यात आला. ‘आज आमच्या मनात सबलीकरणाची जी ठिणगी पेटवली तशी आमच्या पालकांच्याही मनात पेटवा,’ असे एका युवतीने बोलून दाखविले. या कार्यक्रमास प्राध्यापक वर्ग, अंनिसचे कार्यकर्ते व 120 युवती उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. दिगंबर कट्यारे व सूत्रसंचालन प्रा. माधुरी पाटील यांनी केले.

खानदेशातीलच खिरोदा, ता. भुसावळ, जि. जळगाव येथे दि. 6 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता साने गुरुजी विद्याप्रबोधिनी सर्वसमावेशक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात या अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलकंठ रामदास फेगडे होते, उषा शहा आणि प्रा. दिगंबर कट्यारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. युवतींच्या सबलीकरणाच्या प्रश्नांसंदर्भात उषा शहा यांनी त्यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमास प्राध्यापक, अंनिसचे कार्यकर्ते, 25 मुले व 30 मुली उपस्थित होत्या. नियोजन प्रा. लांडगे व सूत्रसंचालन प्रा. छाया चौधरी यांनी केले.

विदर्भ विभागात पातूरगाव, जि. अकोला येथे दि. 7 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता डॉ. एच. एन. सिन्हा कला व वाणिज्य महाविद्यालयात या अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. जायले हे अध्यक्ष आणि मअंनिस महिला विभाग कार्यवाह उषा शहा, डॉ. निनाद शहा व अकोला जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. बबन कानकिराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी उषा शहा यांनी महिला सबलीकरणाची गरज व त्यासाठी युवतींनी कशा रीतीने विचार व कृती करणे आवश्यक आहे, यावर मार्गदर्शन केले. प्रा. कानकिराड व प्राचार्य जायले यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी प्राध्यापक वर्ग, अंनिसचे कार्यकर्ते; तसेच 80 युवती व 20 युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. कानकिराड व सूत्रसंचालन प्रा. हारकुड यांनी केले.

मराठवाडा विभागात नांदेड येथे दि. 8 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता या अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. नांदेड शहरातील आठ कॉलेजमधील एन.एस.एस.च्या विद्यार्थिनींसाठी सायन्स कॉलेजमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. डी. यू. गवई हे अध्यक्ष म्हणून व मअंनिस महिला विभाग कार्यवाह उषा शहा, राज्य प्रधान सचिव माधव बावगे, विद्यापीठ एन.एस.एस.चे समन्वयक प्रा. एन. व्ही. कांबळे, कॉलेज एन.एस.एस.चे प्रा. डी. डी. पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी आंतरजातीय विवाह केलेल्या दोन जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. मंगाराणी अंबुलगेकर व न्यायालयीन समुपदेशन समिती सदस्य राधिका गवारे यांचा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यांनी मनोगते व्यक्त केली. महिला सबलीकरण या संदर्भात उषा शहा व माधव बावगे यांनी मार्गदर्शन केले. एन.एस.एस.चे समन्वयक प्रा. कांबळे व प्रा. पवार यांनी सबलीकरणासाठी सर्व प्रकारचे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. अध्यक्ष प्राचार्य डॉ. गवई यांच्या मार्गदर्शनपर मनोगताने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी अंनिसचे कार्यकर्ते; तसेच 150 युवती व 20 युवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. सुलोचना मुखेडकर व सूत्रसंचालन प्रा. सौ. शुक्ल यांनी केले.

दि. 12 जानेवारी रोजी महिला सबलीकरण व प्रबोधन अभियानाचा समारोप कोकण विभाग अलिबागमधील पी.एन.पी. कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स येथे करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, तर प्रमुख पाहुणे म्हणून मअंनिस राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील व महिला विभाग कार्यवाह उषा शहा, कोकण विभाग सरचिटणीस नितीन राऊत हे उपस्थित होते. याप्रसंगी आंतरजातीय विवाह केलेल्या दोन जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. देवकाते व सौ. विजया गावकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. महिला सबलीकरण व जातिअंत या विषयावर उषा शहा व अविनाश पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य अग्निहोत्री यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी अलिबाग अंनिस शाखेने महाविद्यालयाला अंनिसच्या पुस्तकांचा संच भेट दिला. एक लघुपटही दाखविण्यात आला. याप्रसंगी कॉलेजचा प्राध्यापक वर्ग, अलिबाग अंनिस शाखेचे कार्यकर्ते आणि 100 युवक व युवती उपस्थित होते. नियोजन सौ. फुलगावकर व सूत्रसंचालन सौ. जेधे यांनी केले.

उषा शहा, सोलापूर

संपर्क : 9423593215