Categories
अभिवादन

न्यायापासून वंचित राहिलेल्या खैरलांजीच्या भैय्यालाल भोतमांगेंनी अखेर श्वास सोडला!

फेब्रुवारी – २०१७

आपली पत्नी व तीन मुलांची ज्या खैरलांजी गावातील जातीयवाद्यांनी निर्घृण हत्या केली, त्या आरोपींना कठोर शासन होईल, अशी गेली दहा वर्षे प्रतीक्षा करणारे भैय्यालाल भोतमांगे अखेर दि. 27 जानेवारी 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने हे जग सोडून गेले.

खैरलांजीच्या अमानुष दलित हत्याकांडाचा पाठपुरावा करीत असताना ज्या-ज्या वेळेस मी भैय्यालाल भोतमांगे यांना भेटलो, त्यावेळेस आपले सर्वस्व हरविल्याची उदासीनता त्यांच्या नजरेतून व देहबोलीतून जाणवायची. त्यांचे दु:खाने खोल गेलेले डोळे ‘मला न्याय मिळेल का?’ असा सवाल करताहेत असे वाटायचे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सतत अपराधीपणाची जाणीव करून द्यायचे.

29 सप्टेंबर 2006 रोजी विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील ‘खैरलांजी दलित हत्याकांड’ हे सार्‍या गावातील जातीयवाद्यांनी मिळून केलेले सामूहिक हत्याकांड होते. भोतमांगे कुटुंबियांवर जातीयवाद्यांनी अमानुष निर्दयी हल्ला केला व वासनांध जमावाने भैय्यालालची पत्नी सुरेखा व मुलगी प्रियंकावर विकृत लैंगिक अत्याचार केले. भैय्यालाल केवळ त्यावेळेस घरात नसल्यामुळे वाचले. परंतु त्यांनी जवळून प्रत्यक्ष हत्याकांड होताना पाहिले. पण आक्रमक, पिसाट जमावासमोर येण्याची त्यांची हिंमत झाली नाही. पण ते जिवंत राहिल्यामुळेच खैरलांजी हत्याकांड जगासमोर आले.

भंडार्‍यातील दलित महिला कार्यकर्त्या व नागपूर शहरातील जागरूक कार्यकर्त्यांनी या हत्याकांडाविरोधात जेव्हा उग्र आंदोलने सुरू केली, तेव्हा ते हत्याकांड मुंबई व देशभर पोचले. मुंबईत हत्याकांडाविरोधात मंत्रालयात हल्लाबोल केला. ‘तहलका’च्या इंग्रजी मासिकाने कव्हरस्टोरी प्रसिद्ध केल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या खासदार व पॉलिट ब्यूरो सदस्य कॉ. वृंदा करात खैरलांजीत पोचल्या व नागपुरात भैय्यालाल भोतमांगेंची जाहीर पत्रकार परिषद घेतली. त्यामुळे देशभर नव्हे, तर जगभर वृत्त गेल्याने हत्याकांडाचा निषेध झाला. त्यावेळी भैय्यालाल व अन्य कार्यकर्ते पहिल्यापासून हत्याकांडाचा तपास सी.बी.आय.ने करावा, अशी मागणी करीत होते; पण शासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व आरोपींना पाठीशी घालून केस कमजोर केली. सुरुवातीस आंबेडकरी आंदोलकांनाही पोलिसांनी दडपले व नक्षलवादी असल्याचे खोटे आरोप लावले.

नागपूरमधील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ वकील भाऊ वहाने यांनी खैरलांजी हत्याकांडाची केस चालवावी, असे चळवळीतील कार्यकर्त्यांचे म्हणणे असताना शासनाने त्यांचे म्हणणे न मानता भैय्यालाल भोतमांगेंच्या अज्ञानाचा व भोळेपणाचा गैरफायदा घेऊन उज्ज्वल निकम यांना वकील नेमले. शासनाच्या काही चमच्यांनी भैय्यालाल व सिद्धार्थ गजभिये यांच्यात आपसांत भांडणे लावून केस कमजोर केली. त्यामुळेच चार जणांच्या निर्घृण हत्येमधील 47 पैकी 36 आरोपी निर्दोष सुटले व उज्ज्वल निकम न्यायालयासमोर महिलांवरील लैंगिक अत्याचार व जातीयवाद्यांविरोधातील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही शाबीत करू शकले नाहीत. भंडारा सत्र न्यायालयाने जरी सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावली, तरी त्याला भरभक्कम आधार देण्यात उज्ज्वल निकम कमी पडले व त्यामुळेच नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ती फाशी रद्द ठरविली व भैय्यालाल भोतमांगेंना न्याय मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणे भाग पडले आणि भैय्यालाल न्याय मिळण्यापासून वंचितच राहिलेत.

भैय्यालाल भोतमांगेंचा मृत्यू जरी आजारपणाच्या कारणामुळे झाला, असे आपण मानत असलो, तरी माझ्या मते, भैय्यालालजींचा मृत्यू संपूर्ण कुटुंब डोळ्यादेखत मारले जाणे, न्यायाचा पाठपुरावा करूनही न्याय न मिळणे, जवळच्या नातेवाईकांपासून ते समाजापासून आलेले तुटलेपण, विमनस्क एकाकीपण, आंबेडकरी चळवळीची दिशाहीन-कमजोर अवस्था, त्यातून आलेले नैराश्य या उरातील वेदनेनेच भैय्यालाल भोतमांगेंचा रोहित वेमुलानंतर संस्थात्मक मृत्यू झाला आहे.

सुबोध मोरे

संपर्क : 9322025263