‘अंनिस’च्या पनवेल शाखेचा अभिनव उपक्रम
दि. 3 ते 12 जानेवारी या दरम्यान दरवर्षीप्रमाणे ‘महिला सबलीकरण प्रबोधन अभियान’ राबविण्याचा विचार करीत असताना सारखं जाणवत होतं की, ‘आपण यापलिकडे जाऊन वेगळं काहीतरी करायला हवं.’ म्हणजे महिलांच्या समूहात, त्यांच्या सोयीने त्यांना एकत्र करून कार्यक्रम करतोय, त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय; परंतु अधिक मोकळं आणि त्यांच्या भावविश्वाला भिडणारं काहीतरी करावं, असं मनात होतं. त्यातही जाहीर कार्यक्रम असो, व्याख्यान असो त्याला येणारा महिलांचा समूह मुळातच कमी दिसतो; शिवाय येणार्यांचाही ठरलेला एक समूह असतो. सर्वसमावेशक अशा वर्गातल्या स्त्रिया येण्यासाठी नवीन माध्यम शोधायला हवं. म्हणजेच त्यांना या चाकोरीतल्या ग्रुपमधून बाहेर काढून एका नवीन ग्रुपमध्ये रुपांतरित करायला हवं. या विचारातूनच त्यांना एकत्रित करून दोन दिवस फक्त त्यांचे असतील, अशा स्वरुपाची निवासी संवादशाळा घेण्याची कल्पना पुढे आली.
शाखेच्या बैठकीत चर्चा करताना, ‘निवासी महिला येतील का?’, ‘मुलांचा प्रश्न असतो’, ‘उपस्थिती फार कमी असेल’, ‘त्यापेक्षा दोन दिवसांची; पण निवासी नसणारी संवादशाळा घेऊ या’, असे अनेक मुद्दे पुढे आले; परंतु या सगळ्या मुद्द्यांना छेद देण्यासाठीच आपण ही संवादशाळा घेतोय, याबाबत एकमत झालं. घरातली जबाबदारी स्त्रीचीच असते, या चाकोरीला तिनेच छेद द्यावा आणि स्वत:च्या मोकळ्या अस्तित्वाला साद घालावी, हाच तर उद्देश होता. स्त्रीने नेहमीचा गट सोडून कुठेतरी अनोळखी अशा वेगळ्या समूहात निवासी जाणं ही आजच्या आधुनिक युगात सुद्धा अवघड गोष्ट आहे. चळवळींमध्ये काम करणार्या अनेक कार्यकर्त्यासुद्धा निवासी कार्यक्रम टाळतात. नोकरी करणार्या महिलासुद्धा निवासी पिकनिक असेल, तर जायचं टाळतात. म्हणूनच आम्हाला ही संवादशाळा निवासी घ्यायची होती. तिला तेवढंच समर्पक नावही दिलं गेलं ‘झेप-एक भरारी आत्मसन्मानासाठी’.
नेहमीच्या वातावरणापासून दूर एकत्र यायचं. वेगवेगळे विषय समजून घ्यायचे; पण ‘शिबीर म्हणजे बोअर, फार वैचारिक,’ या समजालाही छेद द्यायचा! यादृष्टीनेच प्रत्येक सत्राची आखणी केली. मांडणीची कोणतीही पद्धत रिपीट होणार नाही, याची काळजी घेतली. खरं तर आमची पनवेल शाखा शिबीर हा शब्दच वापरत नाही. आम्ही नेहमी संवादशाळा भरवतो. कारण आम्हाला संवाद अपेक्षित असतो. इथेही तेच घडवायचं होतं. तसेच धम्माल मस्तीही असणार होती. कारण त्यातून आपल्याला भरपूर ऊर्जा मिळते.
कोणताही निश्चित गट डोळ्यासमोर ठेवलेला नव्हता. कॉलेज करणार्या युवतींपासून, वयाच्या कोणत्याही टप्प्यावरच्या महिला, शिकणार्या, नोकरी करणार्या, घर चालवणार्या, सामाजिक क्षेत्रातल्या, अगदी आजीबाई सुद्धा यात सहभागी झाल्या. अशाच वेगवेगळ्या पिढ्या एकत्र याव्यात आणि संवाद घडावा, हा हेतू होता. आधीच्या पिढीला तरुणांसमोर अवघडलेपण असतं, तर तरुणांना आधीच्या पिढीविषयी न्यूनगंड असतो; पण मनाची झेप एकच असते हेच दाखवायचं होतं! एक विश्वास होता की, आपण महिलांना अपेक्षित आहे, तेच करतोय आणि तसंच झालं. आम्ही 25 सहभागींचे उद्दिष्ट ठेवून आणि फक्त सोशल मीडियावर जाहिरात करूनसुद्धा रायगड, मुंबई, ठाणे, पुणेपासून अगदी औरंगाबादपर्यंतच्या 50 जणी उपस्थित राहिल्या. हा प्रतिसाद आश्वासक होता. खरंच, महिलांना अशी भरारीची संधी मिळणं गरजेचं वाटतंय, हे सांगणारा होता.
सुरुवातीचे उद्घाटनसत्र, ओळख यापासूनच महिलांना अभिव्यक्तीची संधी मिळत होती; ती संधी इतर सत्रांमधूनही मिळत गेली. वृषाली मगदूम, सुरेखाताई दळवी, मुक्ता दाभोलकर, मनीषा महाजन, तपस्वी गोंधळी यांची उपस्थिती आणि त्यांच्याबरोबरचा मोकळा संवाद हा आत्मविश्वास वाढवणारा होता, सहभागींना प्रेरणा देणारा होता. इथे प्रश्नांवर चर्चा होती, प्रबोधनात्मक मांडणी होती, अभिव्यक्ती होती. मनोरंजन होते, सांघिकता होती आणि हे सर्वही नेहमीच्या साच्यापेक्षा वेगळं होतं.
सहभागी महिला आपापल्या कौटुंबिक समस्यांतून वाट काढत आलेल्या होत्या. कुणाची मुलं लहान होती, कुणाकडे घरातील व्यक्ती आजारी होती, कुणाच्या घरी कामाचा प्रश्न होता, कुणा तरुणीला पहिल्यांदाच बाहेर एकटीने जाण्याची परवानगी मिळालेली होती. परंतु इथे आल्यावर मात्र वेगळं विश्व सुरू झालं. कारण इथे येण्याची एक अट मात्र होती की, प्रत्येकीने येताना आपले सामाजिक वलय, पद, प्रतिष्ठा सर्व बाजूला ठेवून यावं. कारण नोंदणी करताना जाणवत होतं की, काही जणी वरच्या पदावर काम करणार्या, काही उच्चशिक्षित असलेल्या, काही सामाजिक क्षेत्रात ओळख असलेल्या, तर काही गृहिणी होत्या. वेगवेगळ्या स्तरातील महिलांना एकमेकींमध्ये मिसळताना कोणताही न्यूनगंड किंवा अहंगंड असू नये, तर केवळ एक व्यक्ती म्हणून त्यांनी आपसांत मैत्री करून घ्यावी, असा आमचा उद्देश होता. त्यामुळेच खेळातला सहभाग असो की, रात्रीच्या शेकोटीचा कार्यक्रम, सर्व मर्यादा गळून पडल्या. छोट्या मजेशीर खेळांतूनही नेहमीच्या अनुभवविश्वातला विचार व्यक्त होत होताच. शेकोटी तर धम्मालच. आपण शेवटचे कधी नाचलो होतो, खेळलो होतो, हे आठवत ‘झेप’च्या सख्यांनी शेकोटीला धम्माल केली. सेल्फ डिफेन्सच्या ट्रिक्स शिकतानासुद्धा वेगवेगळ्या वयाच्या या महिला आपलं वय विसरून क्षमता आजमावत तल्लीन होऊन उत्साहात शिकत होत्या. हे सत्र तर संपूच नये, असं प्रत्येकीला वाटत होतं. सुरेखाताईंसोबत संवाद झाला आणि प्रत्येकीला आपल्या सुरक्षित कवचाबाहेरच्या जगाची अनोखी सफर घडली. त्यातून मनाच्या संवेदनशीलतेची कवाडे उघडल्याचा भास तर झालाच, सोबत उपेक्षितांच्या जगाचं भानसुद्धा आलं असं आम्हाला वाटतं.
वृषाली मगदूम यांनी कौटुंबिक अत्याचाराच्या केसेस संदर्भातले मांडलेले अनुभव हे आपल्या भवतालचा शोध घ्यायला लावणारे होते. मुक्ताताईंबरोबर अंधश्रद्धेवर रंगलेल्या गप्पा तर संपूच नयेत, असं प्रत्येकीला वाटत होतं. या गप्पांमधून अंधश्रद्धेचे अनेक पैलू उलगडले गेले आणि उपस्थितांनाही मोकळं होता आलं. मनीषा महाजन यांनी केलेली स्त्रियांविषयीच्या कायद्याची मांडणी पुढे चर्चेत रुपांतरित झाली. खूप अनुभव, शंकांना प्रत्येकीला वाट मोकळी करून द्यायची होती. पण वेळेची मर्यादा होती. गटचर्चेत कपड्यांचा मुद्दा होता, तसेच मुलीने मोकळे बोलण्यावरच्या मर्यादा, कामाच्या अपेक्षा असे ज्वलंत विषय होते आणि चर्चेत तरुणींपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजणी बदलाचा एकाच दिशेने विचार करताना आढळल्या. वेगवेगळ्या पिढ्या आजच्या विषमतेच्या मुद्द्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात, हे समजायला मदत झाली. ‘शांतिवन’सारख्या सामाजिक संवेदना जागवणार्या वातावरणाचा अनुभवही अनेकींसाठी नवीनच होता. विशेष म्हणजे सासू-सून, आई-मुलगी, जावा-जावा, बहिणी-बहिणी, आजी-नात असे नातेसंबंध एकत्र येऊन समान प्रश्नांवर चर्चा करत होते. आणखी एक नमूद करायलाच हवं, पनवेल शाखेच्या तरुणींनी ‘झेप’चं केलेलं नियोजन, त्यांची धावपळ, सादर केलेले महिला स्पेशल रिंगण हे लक्षवेधी होते.
सहभागींपैकी वृषाली या युवतीने ‘झेप’वर केलेल्या कवितेतील दोन ओळी यासंदर्भात अचूक भाष्य करतात. ती म्हणते-
“मनातील दु:खांना आवर घालावा वाटतो…
कॉलेजच्या दिवसांना तिला जिवंत करावं वाटतं…
बेधुंद होऊन फुलपाखरासारखं उडावं वाटतं….
रंगवलेल्या सर्व स्वप्नांत ती रात्र जागवते…
दुसर्यामध्ये स्वत:ला शोधून कुठेतरी हरवते…
तिलाही कधीतरी जगावंसं वाटतं पुन्हा नव्याने.
‘झेप’ अविस्मरणीय क्षण, बेधुंद अगदी भन्नाट उंच अशी उडान”
तिची ही एक प्रतिक्रिया ‘झेप’ बद्दल बरंच काही बोलून जाते. ‘झेप’चं आयोजन आमच्या पनवेल शाखेचीसुद्धा अतिशय वेगळी भरारी होती. आमच्या शाखेतील सर्व तरुण झेपमय झालेले आम्ही अनुभवले. प्रियांका, वैदेही, आरती, तनुश्री, देवयानी, मनस्वी पाटेकर, करुणा तांडेल, कविता माळी, कार्याध्यक्ष मनोहर तांडेल व उपाध्यक्ष पद्मा पाटोळे यांनी आयोजनासाठी विशेष कष्ट घेतले. सर्व महिला एकत्र असतील, न कंटाळता रमलेल्या असतील, प्रत्येकीला विसाव्याचे क्षण सुद्धा अनुभवायला मिळतील, अशा आगळ्या कल्पनेसह आम्ही सावित्रीच्या लेकींना साद घातली होती; त्याला चांगला प्रतिसाद देत जमलेल्या सगळ्यांनी आमचाही उत्साह वाढवला. प्रत्येकीला दुसर्या दिवशी आपल्या घरट्याकडे झेपावण्याची ओढ होती; पण त्या झेपावण्यात आत्मविश्वासाची चमकसुद्धा दिसत होतीच. एक वेगळं आभाळ गवसल्याचं सुख जाणार्या प्रत्येक चेहर्यावर दिसत होतं, जी आता आमची ठेव होती.
– आरती नाईक
लेखक संपर्क : 8652223803
दोन प्रतिक्रिया
महिलांना स्वच्छंद भरारी मारण्यासाठी झेप शिबीर खरोखरच फलदायी ठरणारे आहे. दीड दिवसीय शिबिरात खूप काही शिकायला मिळाले. अशी शिबिरे वारंवार घ्यायला पाहिजेत की, ज्यामुळे कौटुंबिक ताणतणावावर नियंत्रण होण्यास मोलाची मदत होऊ शकते. –अरुणा श.भोसले, औरंगाबाद
या ‘झेप’ शिबिरात दीड दिवस मी पद्मा म्हणून जगले. घर व माझा भूतकाळ विसरून नव्या मैत्रिणींशी गप्पा मारत खळखळून हसत होते. चक्क माझं लहानपण परत आल्यासारखं वाटत होतं. याचं सगळं श्रेय अंनिसच्या पनवेल शाखेला जातं. माझ्या वैयक्तिक दु:खावर मात करण्यासाठी या शिबिरातून मला आत्मविश्वास मिळाला. – पद्मा सुरेश पाटोळे, पनवेल