Categories
जादूटोणा

सुशिक्षित पुण्यात महिला उमेदवाराला दाखवली काळ्या जादूची भिती!

मार्च - २०१७

सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद असे मार्ग सर्वच पक्षाचे उमेदवार वापरीत असतात. पण, पुण्यात जे घडलं ते काहीतरी वेगळंच आहे. चर्‍होली मोशी प्रभाग क्रमांक तीन मधून भाजपच्या शैला मोळक या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.. त्या भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा देखील आहेत. पण, त्यांच्या नावानं या अशा काळ्या बाहुल्या त्यांच्या घरासमोर आणि बूथच्या आसपास टाकण्यात आल्या. त्यावर त्यांचं नाव सुद्धा लिहिण्यात आलंय. शैलाताईंनी त्याला जुमानलं नाही, तो भाग वेगळा. पण लोक कोणत्या पातळीवर उतरून लोकशाहीचा खेळ करतात, याचा नवा अनुभव यंदाच्या निवडणुकीत गाठीशी आलाय.

शैलाताई या घराणेशाहीतून पुढं आलेल्या नाहीत. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, निर्णय घेण्याची क्षमता असलेली एक महिला म्हणून त्यांनी स्वतः स्वतःची ओळख निर्माण केली. गेल्या काही वर्षांत त्यांनी चांगलं कामही उभं केलं. पण, भाजपमध्ये झालेल्या आयातीमुळे त्यांच्या तिकिटावर गदा आली होती. प्रतिस्पर्धी पैलवानांना त्यांनी चीत करत उमेदवारी मिळवली आणि प्रचाराचा धडाका लावला. तरी सगळं सुरळीत झालं असं नाही. सर्व प्रचार त्यांना एकटीनंच करावा लागला. त्यात आता हे प्रकार घडत आहेत.

राजकारणात आता 50 टक्के महिला दिसतात. पण त्यांची अवस्था कटपुतळी बाहुली सारखी. कोणाच्या तरी तालावर नाचणारी बाहुली ती. तिनं जरा जरी स्वतः निर्णय घ्यायचा प्रयत्न केला तर लगेच येनकेनप्रकारेण तिला दाबण्याचे कसोशीनं प्रयत्न सुरू केले जातात. अर्थात इथं ती राजकीय घराणेशाहीतून पुढे आली असेल तर चित्र थोडंफार वेगळं असतं. पण ज्या महिला कोणत्याही घराणेशाहीतून पुढं येत नाही, त्यांच्यासाठी सगळंच अवघड असतं.

राजकारणाच्या आखाड्यात महिलांना खाली खेचण्याची एकही संधी हातची सोडली जात नाही. एकतर तिला काय कळतं असं म्हणत वडील, भाऊ, नवरा, सासरा यापैकी एक पुरुष सगळी सूत्र आपल्या हातात ठेवत असतो. असं असलं तरी काही जणी राहतात खंबीरपणे उभ्या. पण त्या कोलमडून पडाव्यात म्हणून व्यवस्था पणाला लागते. अगदी पातळी सोडून काहीही केलं जातं.

अश्विनी सातवडोके, पुणे