कुणी कुणाला एक साधे पत्र लिहिले
तरी कुणीही गुन्हेगार ठरु शकतो या देशात
डेंजरझोनमध्ये उभा आहे देश,
मी आणि तुम्हीसुद्धा…
तुम्ही बोलायचे नाही धोरणांवर
उपस्थित करायचे नाहीत प्रश्न विकासावर.
पाशवी बहुमतासोबत नसाल
तर उद्या तुम्हीही गुन्हेगारच असाल.
तुमचा ऐकला जाणार नाही आवाज.
दाबले जातील पद्धतशीरपणे विरोधाचे सूर.
अराजक आता फार असणार नाही दूर
चिरडून टाकले जातील
प्रश्न उपस्थित करणारे लोक.
दडपशाहीचे गाठले जाईल टोक.
तुम्हाला सर्व बाजूंनी घेरले जाईल.
आणि लोकांचे जगणेच धोक्यात येईल.
तरीही काही लोक कसे झोपले आहेत बिनधास्त
कळालेच नाही,
चोहोबाजूंनी कसे करकचून आवळले जाताहेत पाश
काहींनी घेतले आहे नुसते झोपेचे सोंग
आणि काहीजण करताहेत
सारे आलबेल असल्याचे ढोंग.
पसरत निघाला आहे सर्वत्र काळोख
विसरत निघाला आहे माणूस माणसाचीच ओळख
परस्परातला तुटतो आहे सहिष्णुतेचा धागा
आणि शोधूनही सापडत नाही आधारासाठी हक्काची जागा
उजेड पेरणारे कधीच नष्ट झालेत हात
आणि कसा रोखायचा हा आत्मघात?
कडेलोटाच्या टोकावर उभे आहेत लोक
आणि आता सुरुंगाच्या वातीसाठी
व्यवस्थेला कुठेतरी पाडावेच लागेल भोक.
करावाच लागेल हल्लाबोल
हक्कांसाठी उतरावेच लागेल रस्त्यावर
तरच जपण्यासारखे मागे काही उरेल शेष.
दोस्तहो,
बघा, कसा डेंजरझोनमध्ये उभा आहे माझा देश.