उच्छाद मांडलाय गव्यांनी सर्वत्रत्यांची दहशत आहे प्रचंड
लोक आता रानावनात जात नाहीत
गावाबाहेर, घराबाहेर पडत नाहीत
शेतावर जायचं कधीच सोडलंय त्यांनी
आणि हातातोंडाशी आलेली ही पिकं फस्त करून टाकलीत गव्यांनी
कळत नाही,
कुठून, कसे अचानक येतात हे हिंस्र गव्यांचे कळप
गावागावात घुसतात
आणि कशी करतात चाल कोणाच्याही अंगावर
त्यांचा नाही नेम नसतो
कळप नेहमी शिंगे रोखून असतो
म्हणून अलिकडे जीव मुठीत घेऊन वावरतात माणसं
आणि काहीही करून स्वत:ला गव्यांपासून वाचवतात माणसं
शेतांची, पिकांची, बांधांची, झाडांची, घरांची, गावांची
प्रचंड नासधूस करीत निघाले आहेत हे कळप गव्यांचे.
जंगलप्रवण क्षेत्र सोडून
गावागावात घुसलेले हे धोकादायक कळप
अख्ख्या शेतीसह गावंच्या गावं उद्ध्वस्त करीत निघाले आहेत
नद्यांकाठी वसलेली प्राचीन संस्कृती
डोळ्यांदेखत नष्ट करीत निघाले आहेत
आणि कोणीही काहीही करू शकत नाही गव्यांचे
एकामागोमाग एक कळपा-कळपाने गावात बेधडक घुसणार्या
या गव्यांची दहशतच एवढी मोठी आहे ही
विरोध करण्याऐवजी खूपच भेदरलीत ही माणसं
विरोधाची हिम्मत गमावून गव्यांना सपशेल शरण जाताहेत
ही हतबल, हताश झाली नेभळट माणसं
बेभान झालेले हे गव्यांचे कळप
एकदम सुसाट सुटले आहेत
उन्मत झाले आहेत
गावंच्या गावं, शिवारंच्या शिवारं पालथी घालताहेत
लोकांचं जगणं हैराण करताहेत
तरीही त्यांना रोखण्याची क्षमता
कशी उरली नाही कुणातच?
आणि कसा हा उच्छाद मांडलाय गव्यांनी सर्वत्र