Categories
खगोल वृत्त

दि. 26 डिसेंबर 2019 कंकणाकृती सूर्यग्रहण जरूर पाहा

वार्षिकांक - २०१९

गुरुवार, दि. 26 डिसेंबर 2019 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहणाचा नजारा सौदी अरेबिया, दक्षिण भारत, उत्तर श्रीलंका आणि इंडोनेशिया आदी ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी निसर्गाने पृथ्वीवासीयांना उपलब्ध करून दिेलेली आहे. आशियाचा बराचसा भाग, भारताचा बहुसंख्य भाग व उत्तर ऑस्ट्रेलिया येथून मात्र खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण निश्चितच पाहणे, हा एक विलोभनीय आनंद तर आहेच; परंतु यानिमित्ताने ग्रहणाबद्दल जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ग्रहण पाहून मला काय आर्थिक फायदा होणार आहे, या विवंचनेत असणार्‍या वर्गात सामील व्हायचं की निसर्गाच्या आविष्काराचा आनंद घ्यायचा, हे ठरवावं लागेल.

सूर्यग्रहण

ग्रहण हा खरं तर निसर्गामध्ये निसर्गाकडून खेळला जाणारा सावल्यांचा खेळ आहे. तो खेळण्यामध्ये तीन महत्त्वाचे शिलेदार सामील होतात : सूर्य, पृथ्वी आणि चंद्र. सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यास सूर्यग्रहण होते. सूर्यग्रहणात तिघेही एका रेषेत असतात. सूर्यग्रहणात चंद्र सूर्याला झाकतो. त्यामुळे दिवसासुध्दा अंधाराचा अनुभव घेता येतो.

पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा एकाच पातळीत नाहीत. त्या एकमेकांशी पाच अंशाचा कोन करतात. या दोन्ही कक्षा जिथे एकमेकांना छेदतात, त्या छेदनबिंदूंना ‘वसंतसंपात’ आणि ‘शरदसंपात’ असे म्हणतात. हे छेदनबिंदू काल्पनिक आहेत. ज्योतिषी मात्र या बिंदूना राहू आणि केतू असे म्हणतात. राहू-केतूचा वापर समाजाला घाबरवण्यासाठी ते जाणीवपूर्वक करतात. असो, या छेदनबिंदूच्या ठिकाणी चंद्र आल्यास ग्रहणाचा विलोभनीय नजारा दिसतो. सूर्य आकाराने चंद्राच्या चारशेपट मोठा आहे; तसेच सूर्य-पृथ्वी हे अंतर पृथ्वी-चंद्र अंतराच्या चारशेपट आहे. त्यामुळे पृथ्वीवरून चंद्र आणि सूर्य यांचा आकार समान असल्याचा भास आपणाला होतो. केवळ याच कारणामुळे चंद्र सूर्याला झाकू शकतो व ग्रहणास कारणीभ्ाूत ठरतो. सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होते; पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही.

सूर्यग्रहणाचे तीन प्रमुख प्रकार पडतात.

खग्रास सूर्यग्रहण

खग्रास सूर्यग्रहणात चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकतो. या ग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारचे आविष्कार पाहायला मिळतात. खग्रास स्थितीपूर्वी काही काळ आणि खग्रास स्थितीनंतर काही काळ तांबड्या मण्यांचा हार दिसतो, त्याला ‘बेलीज बीड्स’ असे म्हणतात. फ्रान्सिस बेली या शास्त्रज्ञाने हे पाहिल्यानंतर 15 मे 1836 रोजी त्याचे स्पष्टीकरण दिले, म्हणून त्यांना ‘बेलीज बीड्स’ असे म्हणतात. चंद्रावर असणार्‍या विवरांमधून सूर्याचा प्रकाश बाहेर पडतो. त्यामुळे चंद्राच्या कडेने काही ठिकाणी तांबड्या रंगाचे मणी असल्यासारखे दिसतात. खग्रास स्थितीपूर्वी काही क्षण आधी आणि खग्रास स्थितीनंतर काही क्षण हिर्‍याच्या अंगठीसारखे द़ृश्य दिसते. या आविष्काराला ‘डायमंड रिंग’ म्हणतात. चंद्रावर असणार्‍या एकाच विवरातून सूर्याचा प्रकाश बाहेर पडल्यामुळे हा आविष्कार पाहायला मिळतो. 22 जुलै 2009 मध्ये गुजरात, वाराणसी या भागामध्ये खग्रास; तर भारताच्या इतर भागांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळाले होते.

खंडग्रास सूर्यग्रहण

या ग्रहणामध्ये सूर्याचा काही भाग चंद्र झाकतो. सौरचष्म्यातून पाहिले तर सूर्याचा काही भाग झाकलेला दिसतो.

कंकणाकृती सूर्यग्रहण

या ग्रहणामध्ये सूर्याच्या बरोबर मध्ये चंद्र येतो. परंतु तो सूर्याला झाकू शकत नाही. याचं कारण दडलंय चंद्राच्या पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरण्यामध्ये. चंद्राच्या या कक्षेमुळे चंद्र पृथ्वीपासून कमी- जास्त अंतरावर असतो. ज्या वेळी तो सूर्यापासून कमी अंतरावर असेल, त्या वेळी साहजिकच पृथ्वीपासून तो जास्त अंतरावर असणार. या अंतरावरील चंद्र पूर्ण सूर्याला झाकू शकत नाही; पण सूर्याच्या मध्यावधी भागाला झाकू शकतो. सूर्याच्या कडेच्या भागाला चंद्राने न झाकल्यामुळे या भागातून पृथ्वीवर प्रकाश येतो. हे द़ृश्य बांगडीच्या आकारासारखे दिसते, म्हणून याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. 15 जानेवारी 2010 मध्ये कन्याकुमारी आणि आसपासच्या प्रदेशात कंकणाकृती सूर्यग्रहणाचा आविष्कार दुपारच्या वेळेस पाहण्याचा योग त्या वेळेला मिळाला आणि आता पुन्हा 26 डिसेंबर 2019 रोजी तो योग येत आहे; फक्त सूर्योदयाच्या वेळेस.

सूर्यग्रहण दिसणार्‍या ठिकाणांचा नकाशा

तीन रेषांच्या मधील ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल (कोईमतूर, मदुराई, कोझीकोडे, तिरूचिरापल्ली इ.)

रेषांच्या वरील व खालील भागामध्ये खग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे.

रेषेपासून जसजसे दूर जाऊ, तसतशी खग्रास स्थिती कमी होत जाईल.

महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी येथे 85 टक्के, तर नागपूरला 62 टक्के : खग्रास स्थिती असेल. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी खग्रास स्थितीमध्ये सूर्याच्या झाकल्या जाणार्‍या भागाची टक्केवारी खाली दिलेली आहे.

रत्नागिरी, बेळगाव : 85% सातारा, सांगली, कोल्हापूर : 81 ते 83%

पुणे, सोलापूर, मुंबई, ठाणे, पालघर : 78%

लातूर, बीड, नाशिक, अहमदनगर : 75%

धुळे, जालना, परभणी, औरंगाबाद, नांदेड : 70 ते 71% यवतमाळ, अकोला, जळगाव : 66 ते 68%

नागपूर, वर्धा, अमरावती : 62 ते 65%

या ग्रहणाचे औचित्य साधून सर्व देशभर ‘सूर्योत्सव-2019’ साजरा करत आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ‘सूर्योत्सव-2019’चे आयोजन करत आहे. यानिमित्ताने विभागीय कार्यशाळा आणि प्रत्यक्षात सूर्यग्रहणाचा आविष्कार पाहण्याची संधी सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या अनुषंगाने सूर्याशी संबंधित विविध प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

गुरुवार दि. 26 डिसेंबर 2019 रोजी होणारे सूर्यग्रहण काही ठिकाणी कंकणाकृती, तर काही ठिकाणी खंडग्रास स्वरूपामध्ये दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सूर्यग्रहण लागण्याची वेळ सकाळी 8.00 असून सुटण्याची वेळ 11.30 आहे. खंडग्रास स्थितीची जास्तीत जास्त वेळ 9.30 राहणार आहे. ग्रहणाची ही वेळ भारताच्या द़ृृष्टीने सूर्योदयानंतरची असल्यामुळे हे ग्रहण पाहण्याची सुवर्णसंधी दवडण्यात अर्थ नाही. कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळ या भागामध्ये कंकणाकृती ग्रहणाचा, तर उर्वरित भारतामध्ये खंडग्रास ग्रहणाचा आविष्कार अनुभवण्याची संधी चालून आलेली आहे. खंडग्रास स्थितीमध्ये सूर्याचा जवळपास 82 टक्के भाग झाकला जाणार आहे. सकाळी 8 ते 11.30 वाजेपर्यंत ग्रहणाचा नजारा अनुभवण्याची आणि खगोलविज्ञानाशी नाते जोडण्याची संधी उपलब्ध होत आहे.

ग्रहणाचे फायदे

ग्रहणाच्या संशोधनातून अनेक नवनवीन शोध लागतात. सन 1915 मध्ये आइन्स्टाइनने व्यापक सापेक्षतेचा सिध्दांत मांडला. त्यालाच आइन्स्टाइनचा गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत म्हणतात. दूरच्या तार्‍यापासून निघालेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जाताना सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने वक्र होतात अथवा मार्ग बदलतात. या सिध्दांताची प्रचिती आर्थर एडिंग्टन या शास्त्रज्ञाने 29 मे 1919 रोजी झालेल्या सूर्यग्रहणाच्या वेळी दाखवून दिली. वैज्ञानिकांची प्रगल्भता काय असते, याचं हे द्योतक आहे. असे संशोधन एका बाजूला आणि ग्रहण पाळणारा आणि पाळायला लावणारा समाज दुसर्‍या बाजूला. सूर्यग्रहण ही निसर्ग घटना वैज्ञानिक संशोधन आणि नवनिर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

सूर्यग्रहण आणि अंधश्रध्दा :

सूर्यग्रहणांनी नेहमीच मानवी मनावर खोल परिणाम केला आहे. जीवनाचा स्रोत असणार्‍या सूर्याचे झाकोळले जाणे ही घटना अपशकुन मानली जाई. मेसोपोटेमिया, इजिप्त, ग्रीस आणि भारत येथील प्राचीन संस्कृतीतील धर्मपंडितांनी ग्रहणाबाबतचे ज्ञान स्वत:जवळच राखून ठेवले. ग्रहण कधी होणार, हे फक्त त्यांनाच ठाऊक असल्यामुळे आपण आपल्या मर्जीनुसार ग्रहण घडवू शकतो, असे ते लोकांना भासवत. भीतीपोटी सामान्य लोक मंदिरात दक्षिणा किंवा बळी देत असत. परंतु ग्रहणाबाबत भीती बाळगण्याची परंपरा आजच्या काळातही चालू ठेवायचे काहीच कारण नाही. विश्वाच्या पसार्‍यात आपले स्थान काय आहे, याची जाणीव ग्रहणाच्या द़ृश्याने होते. ग्रहणं हा खरं तर एक विलोभनीय खगोलीय आविष्कार आहे. त्याचा आनंद लुटायलाच हवा.

ग्रहणासंबंधीच्या कल्पना, श्रध्दा, प्रथा, धार्मिक विधी भारतीय समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आजही एकविसाव्या शतकात टिकून आहेत. ग्रहणकाळात उपवास करणे, अन्न ग्रहण न करणे, अन्न टाकून देणे, घरातील पाणी टाकून देणे इत्यादी अनावश्यक गोष्टी केल्या जातात. ग्रहणकाळात वातावरण दूषित होते, असा गैरसमज आहे. ग्रहण हा खरा तर सावल्यांचा खेळ आहे. त्याने वातावरण दूषित होण्याचा प्रश्नच नाही. उलट अन्न, पाणी टाकून देऊन आपणच आसपासचे वातावरण दूषित करत असतो, हे आपल्या कधी ध्यानात येणार?

युध्दकाळात ग्रहण लागल्यानंतर ग्रीकांनी युध्द थांबवल्याच्या किंवा युध्दभूमीवरून माघार घेतल्याच्या अनेक घटना इतिहासात नमूद केलेल्या आहेत. रेड इंडियन्स लोक सूर्यग्रहणात सूर्याचा प्रकाश जातो, असे समजत होते. त्याला पुन्हा पेटवण्यासाठी आणि प्रकाशमान करण्यासाठी ते सूर्याच्या दिशेने पेटते बाण वेगाने सोडत.

सूर्याला ग्रहणातून सोडवण्यासाठी चीनी लोक ढोल, भांड्यांचा आवाज करीत अथवा मोठ्याने ओरडत असत. ग्रहण सुटल्यानंतर आपल्या ओरडण्यामुळेच सूर्याला मोठ्या राक्षसाने सोडले, असा त्यांचा समज होई. आज या गोष्टी ऐकून आपणाला हसू येण्याची शक्यता आहे. ज्या काळात सूर्यग्रहण कसे होते, हे माहीत नव्हते, त्या काळातील लोकांनी ग्रहण सुटण्यासाठी लढवलेल्या क्लृप्त्या आजच्या युगात वेडेपणाच्या म्हणून पाहण्याची गरज नाही. अज्ञानामुळे ते असे प्रकार करत होते, हे निर्विवाद सत्य आहे. आज मात्र ग्रहणे का होतात, हे माहीत असूनसुध्दा आपण ग्रहणाशी निगडित ज्या प्रकारची कर्मकांडे करतो, ती मात्र हास्यास्पद आणि मूर्खपणाची आहेत.

गरोदर स्त्रीला ग्रहण पाहू न देणारा समाज तिला जन्मणार्‍या मुलाच्या अपंगत्वाची भीती घालतो. पंधरा कोटी किलोमीटर अंतरावरील सूर्याची किरणं, तीन लाख चौर्‍याऐंशी हजार किलोमीटर अंतरावरील चंद्राने अडवली, तर पृथ्वीवरील आशिया खंडातील भारत-महाराष्ट्र-जिल्हा-तालुका-गाव असा पल्ला पार करत कोणत्या तरी गल्लीतील गरोदर स्त्रिला हानिकारक कसा ठरू शकेल, हा लहान मुलांना पडणारा साधा प्रश्न तमाम सुशिक्षितांना पडू नये, याचं आश्चर्य वाटतं आणि खेदही वाटतो. सूर्य आणि चंद्राचं पृथ्वीपासून अंतर पाहिलं, तर अंतर उच्चारताना धाप लागते. असं चित्र एका बाजूला आणि ग्रहण सुटल्यानंतर नदीच्या पाण्यात डुबकी मारणार्‍या आणि घरातील पाणी टाकून ताजं पाणी भरणार्‍या समाजातील स्वत:ला ‘शहाणे’ समजणार्‍या तथाकथित सुशिक्षितांकडून आपण काय अपेक्षा ठेवणार म्हणा!

सूर्यग्रहण पाहण्यासाठी घ्यावयाची काळजी

सूर्यग्रहण पाहताना काळजी घेणे आवश्यक आहे. सूर्याकडे कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये. कारण सूर्याकडून येणारे प्रखर किरण डोळ्यांसारख्या नाजूक भागाला इजा करू शकतात व कायमचेे अंधत्व निर्माण करण्याची शक्यता असते. सूर्यग्रहणाच्या वेळी आपण सूर्याकडे जाणीवपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तावेळी किरणाची तीव्रता कमी असते. त्यामुळे सूर्याकडे पाहताना किरणांच्या तीव्रतेविषयी डोळ्यांना फारसं जाणवत नाही. किरणांची तीव्रता कमी करण्यासाठी मायलर फिल्मचा वापर केलेले सौरचष्मे खगोल निरीक्षकांकडे उपलब्ध आहेत. या चष्म्यांतून ग्रहण पाहणे आवश्यक आहे. अन्यथा उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. चंद्रग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.

एक्स-रे फिल्म अथवा काच काळी करून सूर्यग्रहण पाहू नका.

दुर्बिण अथवा बायनॉक्युलरमधून सूर्यग्रहण पाहणे अत्यंत धोकादायक आहे. डोळे निकामीच होणार.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती ‘सूर्योत्सव 2019’च्या निमित्ताने

सूर्यग्रहणाविषयी माहिती देणारे कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने विभागवार कार्यशाळा आयोजित करीत आहे.

समितीचे कार्यकर्ते आपल्या जिल्ह्यातील विविध शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन ग्रहणाबद्दल माहिती देतील व सूर्यग्रहण पाहण्यासाठी प्रवृत्त करतील.

समितीच्या वतीने दि. 26 डिसेंबर 2019 रोजी सूर्यग्रहण पाहण्यासाठी जाहीररित्या कार्यक्रमाचे आयोजन शाखांच्या ठिकाणी करण्यात येणार आहे.