दोन्ही बाजूंच्या धर्मांधांकडून अवहेलना,
गुंडगिरी आणि प्रचंड दहशत यांचा सामना करत,
चळवळी आणि आंदोलनांबरोबरच समाजाच्या प्रश्नांवर संशोधन करत,
मुस्लिम स्त्रियांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज बुलंद करणार्या,
धर्मनिरपेक्ष समाजवादी समाजाचे स्वप्न पाहणार्या,
– रझिया पटेल
‘अंनिवा’च्या वाचकांसाठी त्यांनी दिलेली ही खास मुलाखत
1982 मध्ये महाराष्ट्रात सिनेमाबंदी फतव्याविरोधात झालेल्या आंदोलनातून रझिया पटेल पुढे आल्या. मुस्लिम स्त्रिया, मुस्लिम समाज, राष्ट्रीय एकात्मता, लोकशाही धर्मनिरपेक्षता यांच्यासाठी सतत संघर्षात राहिल्या. आंतरराष्ट्रीय परिषदांमधून सहभाग घेतला, संशोधन केले.
‘अंनिवा’साठी त्यांची मुलाखत घ्यावी म्हणून संपर्क केला आणि पाचव्या मजल्यावर आम्ही लिफ्टने पोचलो. ‘रझिया पटेल’ नेम प्लेट वाचून बेल दाबली. हसतमुखाने त्यांनी दरवाजा उघडला.
‘नमस्कार मॅडम.’
‘नमस्कार…’
“मी अनिल चव्हाण, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा सहसंपादक आणि हे ‘अंनिस’चे आमचे पुण्याचे कार्यकर्ते राहुल माने पत्रकार आहेत, ते इथेच पुण्यात असतात. मी एका दमात ओळख सांगितली.
‘या, आत या,’ राहुल माहीत आहेच मला, बसा.’
आत येताना मी दिवाणखाना निरखू लागलो. सगळ्या भिंती छोट्या चौकट केलेल्या चित्रांनी, फोटोंनी भरलेल्या. मांडणी कलात्मक, कोपर्यातल्या टेबलावर ट्रॉफी आणि धातूंच्या दुर्मिळ वस्तूंनी गर्दी केलेली. चरख्याची छोटी प्रतिकृती, मागे सूत कातणारे महात्मा गांधी, मध्यावर ध्यानस्थ बसलेले गौतम बुद्ध! आपण कोणत्या विचारांच्या व्यक्तीच्या घरी आलोय, हे विचारण्याची गरज नाही.
‘पाणी घ्या, आपण जेवण करणार आहात काय?’
मुलाखतीची सुरुवात अशी झाली. एकेका प्रश्नावर त्या भरभरून बोलू लागल्या.
“मुस्लिम कुटुंबातून एखाद्या मुलीने राजकीय-सामाजिक चळवळीत येणे, ही बाजू सोपी नाही. आपण सामाजिक कार्यात कशा आलात?” मी सुरुवात केली. त्यावर त्यांनी मुळाला हात घालतच उत्तर दिले – “या बाबतीत मला दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे बालपणीचे वातावरण आणि दुसरे वैचारिक नाते. ”
“बालपणीच्या वातावरणाचा तुमच्या मनावर, विचारांवर, भावविश्वावर, व्यक्तिमत्त्वावर न पुसला जाणारा ठसा उमटतो.”
लहानपणीच मला वडिलांनी कष्टाने संपादित केलेली साहित्य संपदा वाचायला मिळाली. या साहित्यात कबीर होते, सूरदास, रस्किन, टॉलस्टॉय, मोपांसा यांचे विचार वाचायला मिळाले. भगवद्गीता, कुराण, बायबल या धर्मग्रंथांतले उतारेही वाचायला मिळाले. वडिलांचा लोकसंग्रह अफाट; त्यांच्यात नेतृत्वकौशल्य होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून त्यांनी पदवी घेतली, पण नोकरी न करता, शेतीत लक्ष घातले. श्रमदान करून उभा केलेल्या गावातल्या शाळेत ते शिक्षक म्हणूनही काम करत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी साहित्य संकलन केले, ते मला अनायासे मिळाले.
“वडील राजकारणात होते का?” – राहुलचा प्रश्न.
“नाही. त्यांनी कुठलीही निवडणूक लढवली नाही; पण गांधीजी, साने गुरुजी आणि राष्ट्रीय चळवळीचा वारसा जपला. मी अन्यायाविरोधात केलेल्या बंडखोरीत माझ्या पाठीशी राहिले. मी चळवळीत काम करताना होणार्या टीकेला तोंड दिले. त्यांचा ठसा माझ्या मनावर उठला आहे. मला कुराण पठण शिकवणार्या उस्तादांनी मला ‘मजहब नहीं सिखाता, आपसमें बैर रखना’ हे शिकवले.
“आपण लहानपणीच्या वातावरणाचाही ठसा उमटतो म्हणता; आपल्या भोवतालचे वातावरण कसे होते?” – मी विचारले.
“आमचं गाव म्हणजे भारतातलं एक प्रातिनिधिक खेडं होतं. वस्ती सातशे घरांची. गावात गावगाड्याची व्यवस्था. मध्यभागी ब्राह्मण कुटुंबाचं घर. मग लेवा पाटील, मग मुसलमान, नंतर सर्व बलुतेदार आणि मग जातिव्यवस्थेतला खालचा स्तर. मुख्य वस्ती लेवा पाटील शेतकर्यांची, पंधरा-वीस घरं पटेल, देशमुख या मुस्लिम शेतकरी आणि शेतमजुरांची! एक-दोन घरं पठाण मोगल, मुस्लिम कासार, फकीर खाटीक म्हणजे बकरं कबास यांची. मुस्लिम समाजव्यवस्थेतही असणार्या जातिव्यवस्थेच्या उतरंडीत खालच्या स्तरावर फकीर. त्याचं घरही गावकुसाबाहेरच! सुतार, नाभिक, मातंग यांची एकेक, दोन-दोन घरे तर कुंभार, चांभार वस्ती आठ-दहा घरांची. गावाला किराणा पुरवणारे दोन मारवाडी!”
“गावाशेजारच्या ओढ्यावर धुणं धुवायचं. त्या पलिकडे महानुभाव पंथाचं एक मंदिर आणि शेजारी मशीदही!
अशा गावात मुस्लिम शेतकर्यांच्या कुटुंबात मी वाढले. धर्म, काही चाली-रीती, विवाह आणि सण सोडले, तर आमच्यात फारसा फरक नव्हता. आमच्या एकत्र कुटुंबात, काका, काकू, चुलत भावंडं, त्याशिवाय आसर्याला आलेले नातेवाईक, असा मोठा बारदाना. या सर्व पसार्याची सूत्रधार माझी आजी!
आमच्या घरात दिवाळी, ईद, आखाजी म्हणजे अक्षय्यतृतीया, बैलपोळाही व्हायचा. ”
“दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा,” म्हणत गावातली माणसं दसर्याचं सोनं आणि मिठाई घेऊन यायची. संक्रांतीचा हलवाही दिला जायचा. याशिवाय पैगंबर जयंती म्हणजे ‘ईद-ए-मिलाद’ला जागरण करून नमाजपठणही होई! हा जीमलंगच्या डोंगरावर हिंदू-मुसलमान सगळे जायचे. कव्वाली व्हायची आणि रामलीलाही बघायला मिळायची.
“तुम्ही तर तुमच्या गावचं चित्रच उभं केलंत” – राहुल
“या ऐक्याचा संस्कार माझ्यावर झाला.”
“भारतीय समाजातली ही एकरुपता मी कोल्हापुरातही अनुभवली आहे. पण ही एक फोडायचं काम जातीयवादी, धर्मांध शक्तींनी पद्धतशीरपणे केले” – मी माझा अनुभव सांगितला.
-“होय, ते पाहून मन विषण्ण होते.”
“बालपणी तुम्हाला अवांतर वाचनासाठी पुस्तकं उपलब्ध होती का?”
– “होती तर. माझ्या वडिलांनी साधना साहित्याची वर्गणी माझ्या नावेच भरली होती. त्याशिवाय चांदोबा, कुमार, किशोर, एकलव्य, आनंद अशी मुलांची मासिके आणि पराग, धर्मयुगसारखी हिंदी मासिके शाळेच्या वाचनालयात वाचायला मिळत. ताईच्या वहीमध्ये मला. ग. दि. माडगूळकरांचे “उचललेस तू मीठ मूठभर, साम्राज्याचा खचला पाया” हे गीत वाचायला मिळाले. ते पुढे मी शाळेत सामुदायिकरित्या म्हटले.
आमच्या घरातली एकमेव साक्षर सून म्हणजे आई. तिनेच लेखन, वाचनाचा पहिला संस्कार माझ्यावर केला. दुसरे, माझे धाकटे काका. ते तालुक्याला गेले की, येताना लहान मुलांसाठी एक तरी पुस्तक घेऊन येतच.”
“म्हणजे तुमच्या जडणघडणीत, कुटुंब वाङ्मय आणि गावचा वाटा आहे,” – आम्ही सार काढले.
“शाळेत तुमच्या आवडीचा विषय कोणता होता?” – राहुलची शंका.
“मला भाषा विषय जास्त आवडायचा. बहिणाबाई, कवयित्री पद्मजा, कवी बी, हरिवंशराय बच्चन, रामावतार त्यागी हे माझे आवडते कवी. अशा सगळ्या भाषासाहित्याने माझं मन आणि विचारविश्व घडवले. भोवतालच्या स्त्रियांची दु:खं, आसपासची दु:खं, स्वत:ची होणारी कोंडी ही स्पष्टपणे पाहू शकले, ती त्यातूनच.
आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्नेहलता रेड्डी यांच्या ‘सीता’ नावाच्या नाटकाचा सरिता पदकी यांनी केलेला अनुवाद ‘साधना’मधून प्रकाशित झाला. त्यातील सीतेने मला झपाटून टाकले. त्यातली सीता माझ्याच भावना बोलत होती. स्त्री म्हणून जी आणीबाणी अवतीभोवती उभी केली आहे, त्या विरोधात लढण्याची, बंडाची, विद्रोहाची भाषा सीता बोलत होती.
तेव्हापासून “तुम्ही मला संपवू शकाल, माझ्या विचारांना नाही, ही भावना मनात सततची जागी राहिली.”
– “म्हणजे तुमची विचारांची मशागत आधीच झाली होती, मग त्यात आचाराचं बी कधी पडलं? तुम्ही चळवळीत कशा आलात?”
– “मुलींच्या आणि स्त्रियांच्या बद्दल समाजाच्या काही धारणा असतात, मुलींनी कसं वागावं, कसं राहावं, कसं बोलावं इत्यादी. पण या परंपरांना माझ्या ‘का’ ने धक्का दिला.”
“जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातल्या खलील देशमुख यांनी एक मराठी वृत्तपत्र काढले. मी ‘हे पत्र मुस्लिम समाज प्रबोधनासाठी आवश्यक आहे,’ असे अभिनंदनपर पत्र लिहिले. पुढे त्याने स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रश्नांवर उपोषण केले व पाठिंबा द्यायला बोलावले. मी पाचोर्याला गेले. तेथे छात्र युवा संघर्ष वाहिनीशी ओळख झाली. आपण एकटे नाही आहोत; आपणही त्यांच्या लढ्याचा भाग झाले पाहिजे, असे वाटू लागले आणि मी संघर्षवाहिनीची सैनिक बनले. मी त्यांच्या जळगावच्या प्रांतिक कार्यालयात दाखल झाले. मालेगावच्या युवक शिबिरात गेले आणि त्यानंतर यदुनाथजींकडे पुण्याला. तिथे वर्षभर राहिले. यदुनाथजींनी आणि माईंनी म्हणजे जान्हवी थत्तेंनी माझी जबाबदारी घेतली. माझ्या कुटुंबाचा आणि यदुनाथजींचा परस्परांवरील विश्वास यामुळेच हे शक्य झाले. इथून मी ‘साधना’ कार्यालयात जायची; लिहायचीही. नंतर मी एक वर्षभर सय्यदभाईंच्या घरी राहिले. त्यांच्या पत्नी अख्तर सय्यद म्हणजे चाचींनी मला मुलीप्रमाणे सांभाळले.”
– “पुण्यात त्या वेळी मोठे नेते असतील! त्यांच्याशी तुमचा संपर्क आला होता का?”
-“होय. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, प्रधान सर, भाई वैद्य, बाबा आढाव, निळू फुले, ताहेरभाई पुनावाला, अनुताई लिमये, कमलाताई पाध्ये, यांच्याबरोबरच सुलभाताई ब्रह्मे! या सर्वांचा मला सहवास लाभला.”
या काळात देशभरात युवक चळवळ उभी राहिली. स्वातंत्र्यानंतर भूमिहीन, दलित, कामगार यांच्यात जागृती होत होती. जमिनीच्या हक्कासाठी लढे सुरू होते. तेलंगणासारख्या चळवळींना हिंसकतेमुळे मर्यादा पडत होत्या. सत्तेद्वारा प्रयत्न अयशस्वी होताना दिसत होता. अशा परिस्थितीत बिहार आणि गुजरातमध्ये युवकांमधील असंतोष उफाळून आला. शिक्षण व्यवस्थेतला भ्रष्टाचार आणि महाविद्यालयातील उपाहारगृहांशी संबंधित त्यांचे प्रश्न होते. त्या युवकांनी जयप्रकाशजींना आपले नेतृत्व स्वीकारायची विनंती केली. जे. पीं.नी त्यांना अट घातली. ‘मी तुमच्या चार वा सहा महिन्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारणार नाही.’ दीर्घकालीन लढाईसाठी तुम्ही तयारी दाखवा. या पार्श्वभूमीवर छात्र-युवा संघर्ष वाहिनीची स्थापना झाली.
निर्दलीय युवक परिवर्तनाचा वाहक असेल असं त्यांचं म्हणणं होतं.”
– “तुमच्या संघर्षवाहिनीची भूमिका स्पष्ट कराल काय?”
– “निर्दलीय शांतीमय संपूर्ण क्रांती के लिए छात्रयुवा संघर्ष वाहिनी,” हे संघर्षवाहिनीचे घोषवाक्य होते.
संपूर्ण क्रांतीचा विचार हा सम्यक पद्धतीने विकसित झाला होता. त्यातली निर्दलीयता सर्वोदयी विचारधारेतून वर्गसंघर्षाचा विचार कम्युनिझममधून, जातिअंताचा विचार लोहियांच्या विचारधारेतून आणि सत्याग्रह गांधीविचारातून आला होता. सर्वांचा समन्वय संपूर्ण क्रांतीच्या विचारात होता.
– “तुमची यामध्ये भूमिका काय होती?”
– मी संघर्षवाहिनीची पूर्ण वेळ कार्यकर्ती बनली. महाराष्ट्र आणि बाहेरही राहिले. संघटनांत सामूहिक नेतृत्व होते. संघर्षातून विचार आणि भूमिका विकसित केली जात होती. कार्यक्रमांचे परखड मूल्यमापन केले जाई. जयप्रकाशजींच्याशीही वाद-विवादाची तयारी ठेवली जाई. त्यातून कार्यकर्त्यांची जडणघडण होऊ लागली.
– “यांचा मुलींच्यावर, महिलांच्यावर काय प्रभाव पडला?”
– “संघर्ष वाहिनीतल्या पुरुषसाथींबरोबर स्त्री-पुरुष समानतेच्या विषयावर सखोल आणि वादळी चर्चा झाल्या. वेगवेगळ्या आंदोलनात संघर्ष करताना महिला साथी पुढे होत्या. मग ते महाराष्ट्रातले नामांतर आंदोलन असू दे की, बिहारमधील बोधगया मठाच्या महंताच्या विरोधात असू दे. महिला या आंदोलनातून रस्त्यावर उतरल्या. त्यातून स्त्री-पुरुष समतेचा विचार सिद्ध झाला. आदिवासींना जमिनीचा हक्क मिळाला, तेव्हा सात-बाराच्या उतार्यावर स्त्रियांचेही नाव लागले पाहिजे, असा महिला साथींनी आग्रह धरला. त्याला बिहार उच्च न्यायालयाने मान्यता दिली.
एवढेच नव्हे, तर जातिव्यवस्था मोडण्यासाठी आडनावांचा वापर बंद करायचा आणि पितृसत्ताक व्यवस्था तोडण्यासाठी आईचेही नाव लावायचे, हे संघर्ष वाहिनीत घडले. खुली अर्थव्यवस्था, हिंदू-मुस्लिम, संबंधांचे स्वरूप, जातीय विषयमता अशा समस्यांवर चर्चा व्हायच्या. जयप्रकाशजींनी मांहलेला विचार त्यामध्ये केंद्रस्थानी असायचा.
– “या आंदोलनात काही गीतांचा प्रभाव होता का?”
– “होय, आंदोलनाला गीतांचीही गरज असते. या चळवळीसाठी दुष्यंतकुमार यांनी गीते लिहिली होती, गझला लिहिल्या होत्या. युवकांमध्ये त्याचे प्रचंड आकर्षण होते. त्यांनी दमनकारी राज्यसत्तेवर, दांभिकपणावर ताशेरे ओढलेच आहेत, पण भारतातील सर्वसामान्य, शोषित माणसाबद्दलही त्यांची कविता बोलते. संघर्षवाहिनीची एकही बैठक दुष्यंतकुमारांच्या गीताशिवाय संपली नाही.
दमन यंत्रणेने या गीतांची धास्तीच घेतली होती. माझ्यावर या गीतांचा प्रभाव पडला.
– “सिनेमा बंदीचे प्रकरण नेमके काय होते?”
– मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी करण्यात आली होती. 2 ऑगस्ट 1981 रमझान ईदचा दिवस. जळगाव शहरातील एका भागातील मुस्लिम मोहल्ल्यात मुस्लिम पंचायत कमिटीची एक बैठक झाली. या बैठकीत मुस्लिम पंचकमिटीने असा फतवा काढला की, सध्या सिनेमामुळे समाजात वाढत असलेली गुंडागर्दी आणि सिनेमामधून होणारे कुसंस्कार टाळण्यासाठी आणि सिनेमातील गुंडागर्दीमुळे आपापसांत होणारी भांडणे व जातीय दंगे उद्भवू नयेत यासाठी आमच्या समाजातील महिलांना आम्ही सिनेमागृहात जाण्यासच बंदी घालत आहोत.”
याच पत्रकात नमूद करण्यात आले होते की, मुस्लिम पंच कमिटीच्या या निर्णयानंतर जर एखादी महिला सिनेमा पाहण्यास गेलेली आढळली, तर तिला 51 रुपयांपासून 151 रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल. तसेच तिच्या कुटुंबावर मुस्लिम समाजाकडून बहिष्कार टाकण्यात येईल.
या निर्णयानंतर मुस्लिम महिला सिनेमाला गेल्याच, तर त्यांना शोधून काढण्याचे काम तरुण मुलांना देण्यात आले. स्वत:च्या काही रोजगार नसणारी, टवाळक्या करणारी मुलं यात उत्साहाने पुढे आली. हळूहळू सिनेमाबंदीचे लोण सर्व जिल्हाभर पसरले.
महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात विजापूर येथेही मुस्लिम महिलांना सिनेमाबंदी केल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आल्या. पंचकमिट्यांनी या निर्णयाची पत्रके वृत्तपत्रांना दिली आणि समाजातही वाटली. वृत्तपत्रातील बातम्यांवर उलट-सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या.
पंचकमिटीने सिनेमाबंदी केल्यानंतर काही मुस्लिम महिला सिनेमाला गेल्या, तेव्हा पंचकमिट्यांनी नेमलेल्या मुस्लिम तरुणांनी त्यांना चित्रपटागृहाबाहेरे ओढून काढले आणि त्यांची धिंड काढली, अशी आठ-दहा प्रकरणे घडली.
-“यावर तुमची प्रतिक्रिया काय होती?”
आमची संघर्षवाहिनीची बैठक झाली. त्यातून सिनेमाबंदीचा फतवा आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रियांवर चर्चा झाली. मी संघर्षवाहिनीची पूर्ण वेळ कार्यकर्ती होती. या बैठकीत, असा निर्णय झाला की, मी आणि अरुणा तिवारी दोघींनी मुस्लिम महिलांच्या प्रतिक्रिया समजून घ्याव्यात. त्यासाठी मोहल्ल्या-मोहल्ल्यात जावे.
आम्ही दोघी मुस्लिम मोहल्ल्यात गेलो, महिलांशी बोललो. धिंड काढण्यात आली होती, त्या महिलांनाही भेटलो.
मुस्लिम महिलांमध्ये फतव्याविषयी फारशी नाराजी नव्हती, पण पंच कमिट्यांना हा अधिकार आहे का आणि ज्या पद्धतीने त्या निर्णय राबवित होत्या, त्याबद्दल संताप होता.
आम्ही या प्रतिक्रिया वृत्तपत्रांतून मांडायचे ठरवले. आम्ही म्हटले – 1) सर्व समाजाला; त्यातही महिलांना विश्वासात न घेता मुस्लिम पंचकमिटीने सिनेमाबंदीचा निर्णय कसा घेतला?
2) पंचकमिटीत एकही महिला सदस्य नसताना मुस्लिम महिलांसाठी सिनेमाबंदीचा निर्णय कसा घेण्यात आला?
3) वाईट गोष्टी बघू नका असे धर्म सांगत असेल, तर पुरुषांनाही सिनेमाबंदी का नको?
4) धर्माच्या नावाने पंचकमिटी समाजसुधारणेची भूमिका घेते, तर समाजात चाललेल्या सर्वच वाईट गोष्टींना पंचकमिटी विरोध का करत नाही? उदाहरणार्थ पंचकमिटीचे सदस्य असलेल्या लोकांचे वा त्यांच्या परिवारातील सदस्यांचे जुगाराचे अड्डे, दारूच्या भट्ट्या आहेत. काही सदस्यांवर चोरीचे, भ्रष्टाचाराचे, छेडछाडीचे आरोप आहेत. त्यांना सुधारण्यासाठी फतवा काढण्याची पंचकमिटीला गरज का वाटत नाही?
6) भारतीय संविधानाने दिलेला मनोरंजनाचा अधिकार पंच कमिटी काढून घेऊ शकते का?
7) मुस्लिम महिलांना चित्रपटगृहाबाहेर ओढून काढून अपमानास्पद वागणूक देऊन बहिष्कृत करण्याचा अधिकार पंच कमिटीला आहे का? धिंड काढण्याचा अधिकार आहे का?
वृत्तपत्रांमध्ये हे मुद्दे मांडल्यामुळे सुशिक्षित मुस्लिमांचा पाठिंबा मिळू लागला. त्यातच रेहाना शेख नावाच्या मुस्लिम महिलेवर हल्ला करण्यात आला. ती पतीसोबत सिनेमा पाहायला गेली होती. याचा आम्ही निषेध केला आणि बैठका वाढवल्या.
मुस्लिम महिलांच्या बैठकीत आम्ही 8 मार्च 1982 या दिवशी, जागतिक महिलादिनी सिनेमाबंदीविरुद्ध आंदोलन करायचे ठरवले. हा सत्याग्रह असेल, वातावरण तापू लागले. पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. पोलीस अधिकार्यांनी गुंडांना सोडून मलाच वॉर्निंग दिली, ‘तुम्ही सामाजिक शांतता भंग करीत आहात.’
बैठकांना प्रतिसाद चांगला मिळाला; पण सिनेमागृहवाले तिकिटे देईनात. तेव्हा अंमळनेरचे माजी आमदार श्री. गुलाबराव पाटील मदतीला आले. ते जनता पक्षाचे. त्यांनीच तिकिटाची रक्कम भरली आणि तिकिटे मिळवून दिली.
8 मार्चला मोहल्ल्यातून 200 महिला बाहेर पडल्या. पण दगडफेकीमुळे त्यातील 80 चित्रपटगृहांपर्यंत पोचल्या. सत्याग्रह यशस्वी झाला. सर्व वृत्तपत्रांनी बातम्या दिल्या. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने अग्रलेख लिहिला. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रा. ग. प्र. प्रधान यांनी हा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला. विधान परिषदेला सभापतींनी सिनेमाबंदी असंवैधानिक असल्याचे सांगितले. त्यावेळी श्री. रा. सु. गवई सभापती होते. गृहराज्यमंत्री डॉ. श्रीकांत जिचकारांनी महिलांना संरक्षण देण्याचे मान्य केले.
इतर शहरातही सत्याग्रह झाले. मगच सिनेमाबंदी उठवण्यात आली.
– “तुम्ही मोठी लढाई जिंकलीत. पण तुम्हाला भीती वाटली नाही?”
– “आम्हाला देशभरातून अगदी काश्मीरमधूनही अभिनंदनाची पत्रे आली. त्याचवेळी दहशतही वाढली. संघर्ष वाहिनीच्या कार्यालयावर रात्री-अपरात्री दगडफेक होई. धमक्या येत. सरकारने मला काही काळ पोलीस संरक्षणही दिले. काम वाढायला अडचणी आल्या. पण आम्ही घाबरलो नाही, उलट आत्मविश्वास वाढला.”
– “याच काळात आपला विवाह झाला काय?”
– नाही. सिनेमाबंदीच्या आंदोलनानंतर मुंबईतल्या साथींनी एक जाहीर सभा ठेवली होती. मी मुंबईला गेले. तेथे संघर्ष वाहिनीने झुग्गी-झोपड्यांच्या कच्च्या वस्त्यांमध्ये काम सुरू केले होते. संघर्ष वाहिनीबरोबर ‘बालवाहिनी’ही होती. या काळात मी नानांच्या बरोबर म्हणजे हिंद मजदूर सभेचे ज्येष्ठ नेते वसंत गुप्ते आणि साथी चंद्रशेखर देशपांडे यांच्या घरी राहत होते. मुंबईत काम करत असताना माझा परिचय श्रीकांतशी झाला. त्याचे मैत्रीत आणि पुढे विवाहात रूपांतर झाले.
– “म्हणजे तुमचा आंतरधर्मीय विवाह आहे.”
– आमच्या कुटुंबीयांनी आणि समाजाने थोडा फार विरोध दर्शवला. पण हा आंतरधर्मीय विवाह म्हणता येणार नाही. कारण आम्ही दोघेही ‘मानवता’ हा धर्म मानतो.
विवाह जातीय, आंतरजातीय वा आंतरधर्मीय असो, त्याच्या यशस्वितेचे बीज दोघांच्या समन्वयात आणि मैत्रीत असते.
आमची मुलगी नेहा हिचा जन्म औरंगाबादचा. लहानपणापासून तिला चळवळी, आंदोलने पाहता आली. लोकवाङ्मयाची प्रकाशने आणि असंख्य पुस्तके तिने लहानपणी वाचली.
– “शहाबानो प्रकरणाबद्दल आपण काय सांगाल? त्याचा परिणाम चळवळीवर वाईट झाला, असे आपल्याला वाटते काय?”
– शहाबानो प्रकरण 1986 चे. शहाबानो नावाच्या मुस्लिम महिलेने पोटगीसाठी न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तिच्या बाजूने असूनही भारतीय संसदेने कायदा बदलून मुस्लिम महिलांना भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 125 मधून वगळून टाकलं. यातून जी खळबळ माजली, त्यामुळे मुस्लिम महिलांचे नुकसान झालेच, त्याबरोबर हिंदू-मुस्लिमांमधील धर्मांध शक्ती प्रबळ झाल्या. धर्मांधांपुढे सरकार नमतं, असा संदेश यातून दिला गेला. महिलांसाठी न्याय देणारे कायदे विकसित करता जाण्याऐवजी मुस्लिम महिलांना मध्ययुगात फेकून देण्याचा क्रूर निर्णय सरकार घेऊ शकतं, हे सिद्ध झालं. धर्मनिरपेक्ष भारताची जगापुढे असलेली प्रतिमाही मलीन झाली. मुस्लिम स्त्रियांच्या हक्काची चळवळ मागे रेटली गेली.
या प्रकरणावर संघर्ष वाहिनीने शहाबानोला न्याय मिळावा म्हणून ठिकठिकाणी आवाज उठवला. पुरोगामी संघटना- पक्षांची नागरी समिती आमंत्रित केली. या काळात तलाक मुक्ती मोर्चा औरंगाबादला येणार होता. त्याला तिथल्या जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली. कारण काही धर्ममार्तंडांचा त्याला विरोध होता. प्रशासनाने पुरोगामी मुस्लिम कार्यकर्त्यांना बंदी आणि गुंडांना पाठीशी घातले.
तेव्हा मी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक याचिका दाखल केली. अॅड. नरेंद्र चपळगावकर यांनी आमची बाजू लढवली. आमच्या लोकतांत्रिक अधिकाराचा व भारतीय घटनेचा भंग होत आहे, हे आमचे म्हणणे होते. निकाल आमच्या बाजूने झाला.
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जिल्हाधिकार्यांवर ताशेरे ओढले. त्यांची नंतर बंदही करण्यात आली.
-“पण या प्रकरणात मुस्लिमांना झुकते माप दिल्याची टीका काही हिंदुत्ववाद्यांनी केली होती, त्याचे काय?”
– काही हिंदुत्ववादी पक्षसंघटनांनी या प्रकरणाचा वापर मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी केला. आम्हाला एकीकडे मुस्लिम धर्ममार्तंडांशी लढावे लागत होते आणि दुसरीकडे यांच्याशी. स्त्रीप्रश्नांविषयी वेगळाच ‘सर्व धर्मसमभाव’ दिसत होता. ‘मुसलमान पुरुषाला आपल्या घटस्फोटित पत्नीला पोटगी देण्यापासून सुटका दिली, मग हिंदू पुरुषाला का नाही?’ असा प्रश्न त्या संघटनांचे कार्यकर्ते विचारत. मुुस्लिम स्त्रीच्या न्यायापेक्षा हिंदू पुरुषाला पोटगीतून सुटका हवी, असा त्यांचा मुद्दा होता. शिवाय मुसलमान पुरुष आपल्या पत्नीला केवळ ‘तलाक तलाक’ म्हणून सोडून देऊ शकतात, असाही मुद्दा ते उपस्थित करत होते. त्यावर मुस्लिम धर्ममार्तंड म्हणत – “हम तो सिर्फ छोड देते है, आप तो जला देते हो।’ म्हणत.
देशाचा कायदा मानत नाहीत म्हणून मुसलमान देशद्रोही आहेत, असाही प्रचार करण्यात आला. शिवसेनेने समान नागरी कायद्यासाठी मोर्चा काढला. औरंगाबादमध्ये दंगल उसळली. विद्वेष प्रचंड वाढला. याच काळात शिवसेना औरंगाबाद महापालिकेत निवडून आली.
महिला संघर्ष समितीकडे एक दलित महिलेचीही केस आली होती. अत्याचार आणि छळातून कशी-बशी ती निसटली होती. त्या दलित पुढार्याची प्रचंड दहशत होती. आम्ही जिल्हाधिकारी कचेरीत एकदा जंगल जमिनीबद्दल निवेदन द्यायला गेलो होतो. त्या आवारातच त्या पुढार्याने मला मोठ्याने ओरडून धमकी द्यायला सुरुवात केली. तेव्हा सी.पी.आय.चे ज्येष्ठ नेते सी. डी. चौधरी यांनी मला आपल्या बाजूला घेतलं, नंतर त्याचा निबंध करण्यात आला.
हुंड्यासाठी अॅसिड टाकलेले एक ‘आजरा अॅसिड’ प्रकरणही आम्ही संघर्ष वाहिनीतर्फे लावून धरले. या तिन्ही प्रकरणांत मला दहशतीला तोंड द्यावे लागले. रात्री-बेरात्री दगडफेक झाली, तेव्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. भालचंद्र कानगो माझ्या मदतीला आले. त्यांचे घरही आमच्या शेजारी सिडकोमध्ये होते.
-“रामजन्मभूमी – बाबरी मशीद प्रकरणानेही देशात धर्मांधता वाढली, असे वाटते का तुम्हाला? त्याचा तुमच्या चळवळीवर काय परिणाम झाला?”
-होय. अयोध्या येथे असलेली 400 वर्षे जुनी बाबरी मशीद 1992 मध्ये हिंदुत्ववाद्यांनी उद्ध्वस्त केली. देशाच्या राजकारणाला एक विघातक वळण लागले.
-“आपण आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येही भाग घेतला, त्याबद्दल बोलाल का?”
वाढत्या धर्मांधतेचा स्त्रियांवर होणारा परिणाम भारताप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरही जाणवत होता. जानेवारी 1988 मध्ये मुंबईतील ‘नारी केंद्र’ या संघटनेने एक आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. तिचा विषय होता – ‘स्त्री धर्म आणि कायदा’ या परिषदेतील चर्चेवरून लक्षात आले की, स्त्रियांचे प्रश्न हे विशिष्ट देश, धर्माचे नसून संपूर्ण जागतिक पातळीवर पुरुषसत्ताक व्यवस्था आणि स्त्रीचे दुय्यम स्थान निदर्शक आहेत.
याच परिषदेत ‘वुमेन लिव्हिंग अंडर मुस्लिम लॉज’ या आंतरराष्ट्रीय मुस्लिम महिला संघटनांचा पाया घातला गेला. मीही त्यात सहभागी होते. या संघटनेने जिनिव्हात घेतलेल्या परिषदेतही मला सहभागी होता आले.
या परिषदेतच पहिल्यांदा पाकिस्तानच्या मुस्लिम महिलांनी मागणी केली की, धर्मग्रंथांचा अर्थ पुरुष सांगत आलेत. आता धर्माचा अर्थ आम्ही लावणार, ज्यातून स्त्रियांना न्याय मिळेल.
1993 साली व्हिएन्ना येथे झालेल्या जागतिक स्तरावरील मानवी हक्क परिषदेत मला स्त्रियांचे प्रश्न मांडता आले. तिथे मी दोन मुद्द्यांवर बोलले – एक जातीयवादाचा पुनरूज्जीवनवादाचा स्त्रियांवर होणारा परिणाम आणि दोन भारतीय मुस्लिम स्त्रियांसाठीचे कायदे आणि त्यांचा मानवी हक्कांवर परिणाम काय होतो?
1995 साली चीनमध्ये बीजिंग येथे आंतरराष्ट्रीय महिला परिषद झाली. इथे ‘यूनो’च्या सदस्य राष्ट्रामध्ये महत्त्वाचा करार झाला. ‘आपापल्या देशातील स्त्रीविषयक कायद्यांचे स्त्रीविषयक स्वरूप भेदभावरहित करावे,’ यावर सही करताना भरताने अट घातली – “संबंधित समाज यासाठी तयार असेल तर एका निधर्मी-लोकशाहीवादी देशाने अशी अट घातली. धर्मांधांच्या बरोबर राज्यकर्त्यांनीही स्त्री समस्या कठीण करून टाकली आहे.”
– “आपण संशोधनात्मक अभ्यास केला आहे पी.एच. डी. ची संशोधने पुस्तकातून बाहेर येत नाहीत, असा अनुभव आहे; पण आपण सामाजिक समस्यांवर संशोधन केले आहे. त्याने कार्यकर्त्यांसाठी एक वैचारिक बैठक तयार झाली. त्या संबंधी आपण बोलू या.”
कलम 125 मधून मुस्लिम महिलांना वगळण्यात आले. पोटगीपासून तलाकपीडित महिला वंचित झाल्या. या प्रकरणामुळे मी राष्ट्रीय पातळीवर एक अभ्यास प्रकल्प घेतला होता – ‘इंडियन मुस्लिम विमेन द स्ट्रगल फॉर लिव्हिंग विथ डिग्निटी’ हा त्याचा विषय. यात मुस्लिम महिलांच्या समस्या, त्यांची मते आणि भूमिका याबाबत अभ्यास केला. या विषयावरील अभ्यासासाठी मला ‘टाईम्स फौंडेशन’ची शिष्यवृत्ती मिळाली. हा पहिला संशोधन प्रकल्प 1993-94 या काळातील.
बाबरी मशीद उद्ध्वस्त करून दंगली घडवून आला, याचा हा काळ होता. देशभर दंगली झाल्या. मुंबईच्या दंगलीत हजारच्यावर माणसे मारली गेली. अशा काळात मी देशभर फिरले. देशभरातल्या मुस्लिम महिला मुख्यत्वे चार मुद्दे मांडत होत्या. – 1) शिक्षण 2) सुरक्षितता 3) रोजगार 4) कायदे.
एकीकडे, आपल्याच समाजातून स्त्रीचे हिरावले जाणारे अधिकार, तर दुसरीकडे बहुसंख्याक समाजातील धर्मांधांचे हल्ले अशा परिस्थितीत एकाकी हतबल महिला समाजाच्या विकासाचेच मुद्दे मांडत होत्या.
दुसरा प्रकल्प भारतीय शिक्षण संस्थेद्वारा मुस्लिम मुलींच्या शिक्षणाच्या प्रश्नावर होता. डॉ. चित्रा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ‘अल्पसंख्याक समाजाचे शिक्षणाचे प्रश्न’ या विषयावर कृतिसंशोधन प्रकल्प राबवले. त्यात आढळले की, धार्मिक शिक्षण देणार्या शाळेत मुली जास्त आहेत. मुली आणि मुलांचे प्रमाण 75 : 25 असे होते आम्ही पालकांशी संपर्क साधला तेव्हा समजले की, अर्थार्जन करता येईल, असे शिक्षण मुलांना तर संस्कृती म्हणजे तहजीब आणि घर सांभाळण्याचे शिक्षण मुलींसाठी हवे. ही भावना आहे. या शाळांतून आलेली मुले खालच्या स्तरातून आलेली असून त्यांची मातृभाषा शुद्ध उर्दू नव्हती. कन्नड, तेलगू, गुजराती, दरबनी, भोजपुरी इतकी विविधता त्यांच्या भाषांमध्ये होती. म्हणजे मुसलमानांची भाषा उर्दू ही हाकाटी खरी नाही.
मातृभाषेतून शिक्षण मिळत नसल्याने आकलनाची प्रक्रिया मंदावते. ही शिक्षण व्यवस्था त्यांच्या साध्यासुध्या अपेक्षाही पूर्ण करू शकत नाही. पालक म्हणत – ‘तालीम (शिक्षण) ऐसी हो, जो हुनर, हिसाब और हिंमत दे।’ किंवा “तालीम ऐसी हो, जो हमे इज्जतकी रोटी दिला सके।” यावेळी एक गोष्ट जाणवत राहिली, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण या सगळ्या गोष्टींची किंमत या समाजाला चुकवावी लागणार आहे.
मी तिसरा अभ्यास डॉक्टरेटसाठी केला. त्याचा विषय होता – ‘मुस्लिम समाजाचे शिक्षण आणि रोजगाराचा परस्परसंबंध’ या अभ्यासाला डॉ. सुहास पळशीकर यांनी मार्गदर्शन केले. 700 कुटुंबांचा अभ्यास करताना आढळून आले की, मुस्लिम समाजात स्वयंरोजगाराचे प्रमाण जास्त आहे. पण ते असंघटित क्षेत्रात. त्यांच्या व्यवसायांना प्रतिष्ठा नाही आणि आर्थिक उत्पन्नही स्थिर नाही. शिवाय दंगलीच्या काळात त्यांचे व्यवसाय लक्ष्य केले जातात.
-“सच्चर समितीनेही मुस्लिम समाजाच्या मागासलेपणात शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे मांडले आहे.”
– होय. पण राजकीय पातळीवर पुरेशा गंभीरपणे हे प्रश्न घेतले जात नाहीत. अजूनही प्रत्येक पक्षाला सनातनी नेतृत्वाचाच मोह आहे. संपूर्ण देशात मुस्लिम समुदाय अस्थिरतेची, असुरक्षिततेची भावना अनुभवतो आहे. त्यामुळेही अग्रक्रम बदलतात.
– “ही असुरक्षितता, भीषणता दिसते; तीही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या महाराष्ट्रात. इथेच सर्वांत भीषण दंगली कशा काय होतात? यासंबंधी आपल्याला काय वाटते?
– तो प्रश्न मलाही पडत आहे. लोकमत तयार करण्याचे काम साहित्यही करत असते. मी त्यासंबंधीही एक संशोधन प्रकल्प केले आहे. ‘समकालीन भारतीय साहित्यात मुस्लिम समाजाचं चित्रण’ असा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यसत्ता कशी धर्मनिरपेक्ष असावी, याचे उदाहरण घालून दिले आहे. पण सावरकरांनी त्यांचं वर्णन कसे केले आहे पाहा –
‘गोमातांची मान आणि ती शिखा ब्राह्मणांची,
परदास्यांची सुरी बंधूंनो चिरी एकदाची।
देश हिंदूंचा हाय तयाचा मालक ठरे
परि परमेशा फार दिवस हे रुचेल बरे।
मग आर्य देश तारणा। अधम मारणा। कराया ढेगा
परदास्यरात्री नाशाला शिवनेरी श्रीमान आला।
सर्व जाती-धर्माच्या लोकांना राजकारभारात सामावून घेणारे शिवाजी महाराज सोडून दिले आणि त्यांच्या भूमिकेचा ‘आर्य समाज दारणा अधम मारणा, इतका संकोच करून टाकला. ‘सहा सोनेरी पाने’मध्ये मुस्लिम पुरुषालाच शत्रू म्हणून अधोरेखित करून न थांबता, मुस्लिम स्त्रीसमाजही तितकाच अधम आहे, अशी मांडणी केली.
ही परंपरा पु. भा. भावे पुढे घेतात. मुस्लिम पुरुषाला धडा शिकवणाच्या दृष्टीने मुस्लिम महिलांच्या प्रश्नांकडे बघतात. मुस्लिम स्त्रीचा प्रश्न राष्ट्रनिष्ठेशी जोडतात. त्यातून आपोआप स्त्रियांच्या हक्काला विरोध करणारा मुस्लिम पुरुष राष्ट्रद्रोही ठरतो. हिंदू स्त्रियांच्या प्रश्नांवर असा विरोध करणारे राष्ट्रद्रोही ठरत नाहीत, हे लक्षात घ्या. शिवाय हिंदू समाज किती सुधारक, हे वर्णन करताना हिंदू सुधारकांना झालेला त्रास, सावित्रीबाईंवर शेणामारा करणारे कोण होते? हे भावे सोयीस्कररित्या विसरतात.
श्री. ना. पेंडसेंच्या ‘एल्गार’ कादंबरीत तर मुसलमान येतोच मुळी शापाच्या स्वरुपात. दादा मिराशी नावाचा सत्प्रवृत्त ब्राह्मण पौरोहित्यात हलगर्जीपणा करता, तेव्हा त्याला शाप मिळतो- ‘या पापाचं फळ चालू जन्मात तू मुसलमान होऊन भोगशील.’
मुसलमानांची एक तिरस्करणीय शत्रूची प्रतिमा निर्माण करण्याचं काम या साहित्यानं केले. या साहित्यात खलनायकाची जागा मुस्लिम पात्रासाठी आरक्षित दिसून येते.
याला अपवाद वा. कृ. चोरघडे यांचा. त्यांच्या ‘संस्कार’ कथेत कथानायकाला बालमैत्रीण ‘सलमा’ भेटते आणि माणुसकीचा सुंदर संस्कार करते. पुढे मधु मंगेश कर्णिक, भालचंद्र नेमाडे अशा सांप्रदायिकतेवर भाष्य करतात.
हमीद दलवाईंनी इंधन कादंबरीत सांप्रदायिकतेचे आर्थिक आधार, धर्मनिरपेक्ष शक्तींचे कमकुवत होतो. प्रशासनाचे सांप्रदायिकीकरण आणि सांप्रदायिकतेचे स्त्रियांवर, कुटुंबावर परिणाम याकडे लक्ष वेधले.
– “मग इतर भारतीय भाषांमध्ये काही वेगळेपणा आहे काय?”
-होय. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे अनुवादित साहित्य मी वाचले. त्यातून हिंदू-मुस्लिम संबंधांचे विचारांचे, संवेदनांचे पदर उलगडत गेले. या साहित्यात हिंदू-मुस्लिमांचा एकात्मवाद आहे. ज्या पंजाबने फाळणीचा भीषण संहार पाहिला, तिथेही भीष्म साहानी, अमृता प्रीतम, मंटो, साहिर असे लेखक निर्माण झाले. त्यांनी मानवतेचा झरा साहित्यात प्रवाहित ठेवला. त्या उलट महाराष्ट्राने मात्र मने दुभंगणारे साहित्य निर्माण केले. ही खंत आहे.
-“तुमचे स्त्री असणे आणि मुस्लिम असणे हे चळवळीमध्ये काम करण्यात अडथळा ठरले का?”
मी स्त्री असणे, मुस्लिम असणे हे चळवळीत काम करण्यासाठी आव्हान ठरले, असे मला वाटत नाही. मात्र समाजाने काही बंधने स्त्रीवर घातली आहेत. शिवाय पुरुषप्रधान व्यवस्थेशी तर स्त्रियांना लढा द्यावाच लागतो. त्यामुळे चळवळीत आलेल्या बंडखोरी करणार्या स्त्रियांना समाजाचा विरोध सर्वत्र झाला. मग त्या कोणत्याही धर्म वा जातीच्या असू देत. दुसरे म्हणजे मुस्लिम असणे हे चळवळीत काम करण्यासाठी अडसर ठरले नाही. पण मुस्लिम समाजाबद्दल पसरवण्यात आलेले गैरसमज मात्र सामाजिक काम करताना खूप अडथळा करणारे ठरले.
– “आपला अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी संपर्क कसा आला? – राहुल
अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी माझा संबंध डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मुळे आला. मी छात्र युवा संघर्ष वाहिनीत असताना डॉ. दाभोलकरांची व्याख्याने ऐकली. आमच्या अभ्यास वर्गात ही व्याख्याने होत. त्यांची पद्धत संवादी होती. त्यामुळे वयात अंतर असले, तरी डॉक्टरांचे दडपण वाटत नसे. शिवाय वैचारिक स्पष्टता या सर्व गोष्टींमुळे त्यांच्याशी संवाद राहिला. त्यामुळे मी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी जोडले गेले.
प्रत्यक्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मी बालवयात ऐकला होता. हायस्कूलमध्ये असताना बहिणाबाईंची एक कविता अभ्यासली होती ती म्हणजे –
देवा तुझ्या बी घरचा, झरा धनाचा आटला
धन रेषंच्या चर्यानं तयहात रे फाटला
बापा नको मारू थापा, असो खर्या असो खोट्या
नाही नशीब नशीब तयहाताच्या रेघोट्या॥
राहो दोन लाल सुखी, हेच देवाले मागणं
त्यात आलं रे नशीब, काय सांगे पंचांगंनं
नको नको रे ज्योतिषा नको हात माह्या पाहू
माह्यं दैव माले कये, माझ्या दारी नको येऊ॥
त्या निरक्षर माऊलीनं केवढा मोठा विचार दिला होता. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीशी जोडणे फारसे अवघड नव्हते.”
– “पुढील काळासाठी आमच्या वाचकांसाठी आपण काय संदेश द्याल?”
-“सध्याचा काळ सामाजिक, राजकीय चळवळीसाठी खूप कठीण आहे. त्यामुळे खूप विचारपूर्वक आणि निष्ठेने लढावे लागेल. खूप गोष्टींबाबत, आव्हानांबाबत सतर्क राहावे लागेल. त्यासाठी विचारांचा पाया पक्का असणे, विचारांची स्पष्टता असणे आणि मूल्यांशी कोणतीही तडजोड नसणे, या गोष्टींचे भान ठेवणे गरजेचे आहे.
प्रश्नांची मूळ कारणे शोधणे, त्यांची उत्तरे शोधणे, आवाज उठविणे हे महत्त्वाचे आहेच. पण त्यासाठी लोकशाही असणे धर्मनिरपेक्षतेचे मूल्य रुजविणे जाणे, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणे, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. मुख्य म्हणजे समाजातल्या अंतिम माणसाबद्दल प्रेम असणे महत्त्वाचे आहे.
-“ म्हणजे आपण अजूनही आशावाद आहात तर?”- मी
-“हो, मला एक गोष्ट उभारी देणारी, लढ्याला बळ देणारी जाणवली. ती म्हणजे देशातल्या सर्वसामान्य माणसाचे प्रेम, विश्वास, आपलेपणा. त्यांनी मला हिंदू किंवा मुस्लिम चौकटीत बद्ध न करता आपल्यातील एक मानले. हा अनुभव माझा भारतीय समाजाबद्दलचा अभिमान, आपलेपणा आणि लढ्याची प्रेरणा कायम ठेवतो.
जमिनीवरच्या माणसाचं शहाणपण आणि त्याची सदसद्विवेकबुद्धी मला लढण्याची शक्ती देत राहतात आणि शेवटी विश्वास दृढ होतो.- ‘वो सुबह कभी तो आएगी।’
स्त्रियांसाठी कायदे
मुस्लिम देशांमध्ये जुबानी तलाक, बहुपत्नीत्व इत्यादी कायद्याने नियंत्रित केलेले आहे. सबळ कारणाशिवाय; तसेच प्रथम पत्नीची परवानगी सिद्ध केल्याशिवाय दुसरा विवाह करण्याची कायदेशीर परवानगी तेथे नाही. त्यांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कुटुंबनियोजनाचे धोरण स्वीकारले आहे. धर्माचा आधार घेऊन राजकीय धोरण म्हणून मुस्लिम देशांनी कुटुंब नियोजनाचे तत्त्व अमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
मुस्लिम कार्यकर्त्यांची वेदना
आपण मुस्लिम महिला आणि मुस्लिम समाजाचा एकमेव प्रश्न म्हणजे त्यांचा कर्मठपणा आणि व्यक्तिगत कायदा इतकाच मानत आलोत. वर्षानुवर्षे बघतो ते मुस्लिम समाजाचे दारिद्य्र, निरक्षरता, असुरक्षितता हे प्रश्न आमच्या कार्यक्रम पत्रिकेवरचे मुद्दे बनले नाहीत. हिंदुत्ववाद्यांनी मुसलमानांची जी प्रतिमा समोर ठेवली, त्याला आम्हीही बळी पडलो.
धर्मांधतेच्या उद्रेकानंतर गोंधळा उडाला. त्या गोंधळात कित्येकजण मुस्लिम आणि हिंदू समाजातील धर्मांध संघटनेच्याही व्यासपीठावर गेले. तेव्हा चळवळीतलं एकाकीपण वाढलं. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारांवर काम करणारे आणि जन्माने मुस्लिम म्हणून वेदना भोगणारे असे दोन घाव मुस्लिम कार्यकर्त्यांच्या वेदनेला प्राप्त झाले.