Categories
भाषण

मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद – डॉ. के. वीरमणी

वार्षिकांक - २०१९

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या त्रिदशकपूर्ती महोत्सवाच्या वेळी, 9 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित एकदिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. के. वीरमणी, अध्यक्ष, द्रविड कळघम यांचे बीजभाषण होणार होते; परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते परिषदेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी पाठवविलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद ‘अंनिवा’च्या वाचकांसाठी सादर करीत आहोत…

प्रिय विवेकी साथी आणि बांधवांनो,

पेरियार यांची भूमी असलेल्या तामिळनाडू येथून तुम्हाला आमच्या मनापासून सदिच्छा! सर्वप्रथम डॉ. नरेंद्र दाभोलकर या आपल्या महान व्यक्तिमत्त्वाला मी अभिवादन करतो, ज्यांनी विवेकवाद आणि विशेषतः अंधश्रद्धा निर्मूलन या मानवतावादी कार्याच्या प्रसारासाठी आपल्या जीवनाचे बलिदान दिले. असे दिग्गज मारले जाऊ शकतात; परंतु ते कधीही मरत नाहीत. ते सॉक्रेटिससारखे सदैव जिवंत राहतात. इतिहास त्यांना झळाळणार्‍या सोनेरी पानांवर स्थान देऊन अनंतकाळ अलंकृत करतो.

आपल्या विश्वातील समस्त मानवजातीचा मानवतावादात समावेश होतो. हे समाविष्ट होणे प्रदेश, भाषा, संस्कृती यांच्या सीमा ओलांडून पुढे जाते. मानवजात ही वर्तमान स्वरुपात उत्क्रांत झाल्यानंतर प्रदेश, भाषा, संस्कृती विकसित किंवा उत्क्रांत झाल्या आहेत. परंतु याउलट कोणतेही धार्मिक ग्रंथ हे मान्य मात्र करत नाहीत. हा मानवतावाद भोवतालच्या निसर्गामुळे विविध भौतिक वैशिष्ट्ये लाभलेल्या मानवांच्या एकत्रीकरणातून बनलेला आहे. मानव हा विशेष सजीव आहे, ज्याच्याकडे वेगळे आणि लक्षणीय असे तर्क (Reasoning) हे वैशिष्ट्य आहे; केवळ मानवच विवेकी व सामाजिक प्राणी आहे.

मानवजातीद्वारा केल्या जात असलेल्या संसाधनांच्या विधायक उपयोगाने विश्व पुढे जात आहे.

मानव शिकारी-टोळक्याने राहण्याच्या अवस्थेतून आजच्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक युगापर्यंत विकसित झाला आहे.

1) शिकारी – टोळक्याने राहण्याची स्थिती

2) कृषी क्रांती स्थिती

3) औद्योगिक क्रांती स्थिती

4) इलेक्ट्रॉनिक ज्ञानयुग (माहितीचे युग)

5) ज्ञानाचे युग

विवेकवाद हे मानवाच्या प्रगतीचे एकमात्र कारण आहे; अन्यथा आपण प्राचीन अंध:कार युगातच राहिलो असतो.

विश्वाची प्रगती ही सर्व सजीवांसाठी आहे आणि अशा प्रगतीचे प्रमुख लाभार्थी हे मानव आहेत. अर्थातच, कारण त्यांचे प्रगतीतील योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘होमोसेपियन्स’ हा वर्तमान स्वरुपातला मानव अनेक सहस्त्रकांपासून अस्तित्वात आहे. प्राचीन मानवाचे जीवन कसे असेल, याची कल्पना करणे अवघड नाही. सुरुवातीला आपल्या स्वयंस्फूर्त कृतीने, खाणे व अन्य गरजांची पूर्तता करणे असे जीवन तो जगत होता. प्रचंड अज्ञानामुळे अनेक भ्रामक व खर्‍या वस्तू त्यांच्या दृष्टीने त्यांच्या अस्तित्वासाठी धोकादायक वाटत असल्याने त्यांच्या आधीन राहून त्यांच्या तालावर चालणे त्यांना भाग पडत होते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रकार तेव्हा अत्यंत कमी किंवा जवळपास शून्यच असल्याने प्राचीन मानवाची स्थिती तशी होती. मानवाबाबत व अन्य आव्हानात्मक गोष्टींबाबत उत्तरे शोधण्याची उत्कट इच्छा मानवामध्ये नव्हती. एक वेळ तर अशी होती की, मुख्य कारण शोधण्याऐवजी या अशक्य बाबींना खोट्या समजुतीचे स्थायी स्वरूप दिले. त्यांना देवत्व चिकटवून अंधश्रद्धेचे स्वरूप दिले. मानवाचा इतिहास हे दुसरे-तिसरे काही नसून पर्यावरणातील अशा नैसर्गिक मर्यादांवर मात करणे, आक्षेपार्ह कृत्य म्हणून लादले गेलेले व अंधश्रद्धांच्या मदतीने टिकवून ठेवलेले अडथळे मोडून काढून अशक्य असेल ते शक्य करणे, हा आहे. मानवाच्या विकासातील हा सर्वांत मोठा अडथळा ठरलेला आहे. मानवाच्या संपूर्ण ‘क्षमता तर्का‘वर आधारित पाठबळासह मानवजातीच्या प्रगतीसाठी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. अशा मानवाची स्थिती आणि तिचा या जगात सामान्यत: प्रभाव आहे. परंतु मानव संशयास्पद आचरण करीत आहे, हे दुःखद आहे.

जसजशी वर्षे-शतके जात राहिली, आपल्या ज्ञानापलिकडे असलेल्या अज्ञाताला जाणून घेण्याच्या मार्गातील मर्यादांचा अडथळा हा महाशक्ती (super power) म्हणून पूजला गेला आणि नंतर देव आणि धर्म म्हणून त्याला संस्थात्मक स्वरूप प्राप्त झाले.

विवेकवाद हा केवळ ज्याचे संशोधन करावे, असा सिद्धांत नाही. तो जगण्याची एक पद्धत आहे. ती समस्त समाजाची प्रगती आणि विकास पाहण्याची दृष्टी आहे. परंतु विज्ञान आणि अंधश्रद्धा या अगदी वैज्ञानिक पद्धतीने सह-अस्तित्वात आहेत. आधुनिक वैज्ञानिक अंधश्रद्धांचा प्रचार अत्यंत वैज्ञानिक मार्गाने करीत आहे.

ज्येष्ठ वैज्ञानिक प्रा. वाय. नायडुम्मा हे विज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या मधील फरक पुढीलप्रमाणे विषद करतात :

विज्ञान व अंधश्रद्धा एकत्र नांदतात, हे खरे असले तरी ते एकमेकांना पूरक नाहीत. वैज्ञानिक ज्ञान ही एक विवेकी पद्धती आहे, ज्यामध्ये दुराग्रह, ताठरपणा, साक्षात्कार, कर्मकांड, गूढ विश्वास आणि चमत्कार यांना स्थान मिळू शकत नाही. अंधश्रद्धांनी केलेले सर्वांत मोठे नुकसान हे आहे की, त्या मुख्य कारणाकडून लक्ष दुसरीकडे वळवतात आणि अगतिकता स्वीकारण्याच्या पराभूत मनोवृत्तीकडे घेऊन जातात. मूळ कारण उखडून काढण्याच्या व पुरेसे उपाय शोधण्याच्या मार्गात आडवे येतात. या अंधश्रद्धांच्या बाबतीत सर्वांत वाईट हे आहे की, त्या निर्माण व्हायला सोप्या व नष्ट करायला अवघड असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन हा सिद्धांत आणि प्रत्यक्ष वास्तव यांच्यामध्ये, एखाद्या इंद्रियगोचर घटनेचे उघड दिसणारे आणि खरे कारण यांच्यामध्ये मुक्त आणि सकारात्मक विचाराने, प्रयोगाने आणि वस्तुनिष्ठ विश्लेषणाने सुसंगतता शोधतो. विज्ञानात आपल्याच चुका दुरुस्त करण्याची अंगभूत प्रणाली असते. ते आकलनाची कुवत असलेले व आनुमानिक असे दोन्हीही असते म्हणून त्यात निर्मितीचा आणि नाशाचा घटक असतो. विज्ञानाने कौशल्य, दृष्टिकोन व वर्तणुकीचा आकृतिबंध यावर परिणाम होतो, ज्याला परंपरा व अंधश्रद्धा कडवा विरोध करतात. अशा परिवर्तनाला अडथळा निर्माण करणार्‍या शक्तींना दुर्बल करण्यासाठी व अनुकूल असलेल्यांना सशक्त करण्यासाठी डावपेच विकसित केले गेले पाहिजेत. ताठरपणाला विरोध करून बदलांच्या बाबतीत लवचिकता बाळगून, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकी वृत्ती हे जगण्याची पद्धती झाल्या पाहिजेत.

विवेकवादाचा प्रसार करणारी आमची समविचारी संघटना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आम्ही अभिनंदन करतो. आपले संविधान प्रत्येक नागरिकाने पुढील मूलभूत कर्तव्य पार पाडावे, ही अपेक्षा करते :

अनुच्छेद 51 ए (एच) वैज्ञानिक दृष्टिकोन, सुधारणा, चिकित्सक वृत्ती आणि मानवता याचा विकास करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. परंतु हे मूलभूत कर्तव्य पार पाडण्यासाठी सामाजिक परिस्थिती अत्यंत अवघड आहे.

अनेक अंधश्रद्धा या बुद्धीचा वापर न केल्याने व चिकित्सक वृत्तीच्या अभावामुळे दुर्लक्षित राहिल्या जातात आणि याचा परिणाम म्हणून त्या अंधश्रद्धा जीवनमार्गच बनून जातात.

फलज्योतिषावर आधारित भविष्यवाणीला वैज्ञानिक संकल्पना म्हणून प्रस्तुत केले जात आहे. फलज्योतिष आणि खगोलशास्त्र यांच्या मध्ये सहेतुक गोंधळ निर्माण केला जात आहे. खगोलशास्त्र हे विज्ञान आहे. फलज्योतिष व त्यावर आधारित भविष्यवाणी यावरील श्रद्धा कायम टिकून राहावी म्हणून ते विज्ञान आहे, असे सांगितले जाते; परंतु फलज्योतिष हे छद्म विज्ञान आहे.

प्रसिद्ध विश्व-उत्पत्ती शास्त्रज्ञ कार्ल सेगन यांनी आपल्या ‘सायन्स अ‍ॅज अ कँडल इन द डार्क’ या पुस्तकात छद्म विज्ञान म्हणजे काय हे विस्तृतपणे दाखवून दिले आहे. ते असे :

विज्ञानापेक्षा छद्मविज्ञानाची शक्कल लढवणे सोपे असते. कारण वास्तवाशी होणारे लक्ष विचलित करणारे संघर्ष – जिथे तुलनेनंतर येणारी निष्पत्ती आपण नियंत्रित करू शकत नाही – अधिक तत्परतेने टाळले जातात. पुरावा सिद्ध करणारी युक्तिवादाची परिमाणे अधिकाधिक शिथिल केलेली असतात. या कारणांमुळेच सामान्य जनतेसमोर छद्म-विज्ञान प्रस्तुत करणे विज्ञानापेक्षा खूप सोपे जाते. परंतु त्याची लोकप्रियता सिद्ध करण्यासाठी हे पुरेसे नाही.

छद्म-विज्ञान प्रबळ अशा भावनिक गरजांविषयी बोलते; पण विज्ञान त्या गरजा पूर्ण करीत नाही.

मानवी जीवनात अंधश्रद्धांचा प्रसार करण्यासाठी आणि त्या टिकवून ठेवण्यासाठी धर्माचे भरपूर पाठबळ लाभते. अंधश्रद्धांचे पालन केल्याने मानवातील अफाट क्षमता वाया जात आहेत.

कार्ल सेगन यांनी ‘धर्म’ विषयावर अत्यंत योग्य प्रकारे व प्रभावीपणे सांगितले आहे ते असे :

‘धर्म’ या सरकारद्वारा संरक्षित छद्म-विज्ञानाच्या बालवाड्याच आहेत. खरे तर ही भूमिका धर्माने पार का पाडावी, हा प्रश्नच आहे. एक प्रकारे हा जुन्या काळातला सत्याभास आहे. काही देशांमध्ये जवळजवळ प्रत्येक जण, अगदी सरकारी नेतेसुद्धा फलज्योतिष आणि भविष्य-अनुमान यावर विश्वास ठेवतात.

देशातील सामान्य जनता पेरियार चळवळीला विवेकी चळवळ म्हणून ओळखते. चळवळीला हा ठाम विश्वास आहे की, लोकांना हे समजेल व जाणीव होईल की शतकानुशतके त्यांचा स्वाभिमान त्यांना जातीयतेतून नाकारला गेला आहे. त्यांच्यावर ‘मनुस्मृती’ या धार्मिक संहितेने लादलेल्या बेड्यांमधून त्यांची मुक्तता करणे अत्यंत आवश्यक होते. अस्तित्वात नसलेल्या देवाला नाकारून विवेकी आवेशाच्या माध्यमातून स्वाभिमानाची जाणीव करून घेणे हे पेरियार यांचे तत्त्वज्ञान आहे. गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी अस्तित्वात नसलेल्या देवाला विरोध केलाच पाहिजे. देवावरील श्रद्धेने अनेक कर्मकांड व अंधश्रद्धा निर्माण केल्या आहेत, ज्या मानवाच्या प्रगतीत अडथळा होऊन बसलेल्या आहेत.

पेरियार यांचे तत्त्वज्ञान हे सुसंबद्ध आणि विश्वस्तरावर लागू आहे आणि त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात या भूमीत समाजाच्या क्रांतिकारक स्थित्यंतरामार्फत झाली.

पेरियार चळवळ धर्मरहित विवाहाचा पुरस्कार करते, ज्यामध्ये कर्मकांड नसते व संस्कृत भाषेतील मंत्रघोष नसतो, जो त्या विवाहातील जोडप्याला किंवा निमंत्रित लोकांना समजत नाही आणि ज्यात मानवाच्या सन्मानाला नाकारलेले असते. अशी लग्ने ‘स्वाभिमान लग्ने’ म्हणून प्रसिद्ध झाली.

या भूमीतील धार्मिक लग्ने वर आणि वधू यांना समान दर्जा देत नाहीत. त्यांच्या अनुसार वधू ही हस्तांतरणीय वस्तू असते, जी ‘कन्यादान’ म्हणून वधूच्या परिवाराने वरास अशा ध्वनित प्रतिज्ञापनाद्वारे द्यायची असते की, या परिवाराचा वधूवर आता कसलाही अधिकार राहिलेला नाही. ‘स्वाभिमान लग्ना’चे तत्त्व पुरुष आणि स्त्री समानता-अभिमुख असे आहे आणि ते दोघेही मानवाचा अविभाज्य भाग असतात हे आहे. एका विभागाचे म्हणजे स्त्रियांचे महत्त्व नाकारून आणि त्यांना आधीन ठेवून मानवतेचा विकास कसा होऊ शकेल? पेरियार चळवळीचे तत्त्व यामध्येच आहे की, जे काही मानवांमध्ये विषमतेला प्रोत्साहन देते, त्याच्या ठिकर्‍या उडवणे, मग ती तथाकथित सर्वशक्तिमान देव आणि धर्म यांच्या पाठबळावर चाललेली कर्मकांडे का असेनात.

सामान्यत: धार्मिक लग्ने ही फलज्योतिष अनुमानावर आधारित शुभमुहुर्तावर पार पडली जातात. अशा प्रकारची शुभमुहुर्तावरच होणारी कर्मकांडे महिला आणि पुरुष या दोघांच्याही स्वातंत्र्यावर मर्यादा घालतात. मानवी शक्तीची अभिव्यक्ती अशा प्रकारे रोखणे आणि तिला वाया घालवणे, यामुळे मानवतेचे खूप मोठे नुकसान होते. ‘स्वाभिमान लग्ने’ ही विवाह करणार्‍या जोडप्याचे कुटुंबीय व निमंत्रित या दोहोंना सोयीस्कर अशा वेळी केली जातात. शुभमुहुर्तावरच लग्ने करण्याची संकल्पना मोडून काढण्यासाठी ‘स्वाभिमान लग्न’ चळवळीचे स्वयंसेवक त्यांची लग्ने ज्योतिष-पंचांग यानुसार असलेल्या अशुभ मुहुर्तावर म्हणजेच राहू काल, यम (मृत्यू) काल, यावेळी लावतात. पेरियार आणि ई. व्ही. आर. मणियम्मैयार यांनी माझे लग्न राहूकाल (जो सायंकाळी 4.30 ते 6.00 पर्यंत असतो.) चालू असतानाच लावले, ज्याचा सनातनी लोक स्वप्नात सुद्धा विचार करणार नाहीत. माझे वैवाहिक जीवन हे सुरळीतपणे आणि यशस्वीपणे पार पडले आहे आणि माझी मुलेसुद्धा त्यांच्या विवाहित जीवनात व्यवस्थित स्थिरस्थावर झालेली आहेत. ‘स्वाभिमान लग्ने’ ही लोकांना विवेकी मार्गावर चालायला लावणारी प्रात्यक्षिके आहेत, ज्यायोगे विवाहित जोडपे व समाजबांधव हे मानवतेच्या विकासात सनातन्यांपेक्षा अधिक रचनात्मक असतील. अशुभ मुहुर्ताच्या महत्त्वामुळे मानवतेचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

‘स्वाभिमान लग्नां’चा मंच हा विवेकी आदर्शांच्या प्रचारासाठी अन्य कोणत्याही सार्वजनिक मंचापेक्षा अधिक आदर्श आहे. कारण तिथे लग्नाला स्त्रियांची उपस्थिती मोठ्या संख्येने असते, ज्या एरव्ही श्रोते म्हणून सार्वजनिक ठिकाणी प्रचार ऐकून घेण्यासाठी सहसा येत नाहीत. ‘स्वाभिमान लग्ने’ ही नेहमी अप्रत्यक्षपणे अंधश्रद्धांच्या निर्मूलनाकडे निर्देश करतात आणि वर व वधू यांच्यामधील समानता अधोरेखित करीत असतात. आता आपण शुभमुहुर्ताची वेळ निवडण्या विरुद्ध केल्या जाणार्‍या प्रचाराचे विश्लेषण करू या. एका वर्षात 365 दिवस किंवा सुमारे 52 आठवडे असतात. प्रत्येक आठवड्यात राहू काळ किंवा यम (मृत्यू) काळ असतो. सामान्य भाषेत सांगायचे तर, ज्यामध्ये सनातनी लग्नेच नव्हे, तर काहीतरी चांगले निष्पन्न होऊ शकणारी कार्येसुद्धा केली जात नाहीत, अशा प्रकारची धार्मिक कार्ये आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणविल्या जाणार्‍या देशाच्या कार्यालयीन प्रशासनात सुद्धा प्रविष्ट झाल्या आहेत.

फलज्योतिषाने प्रारंभाची कार्ये, सण आदी कार्ये करण्यावर जी बंधने घातली आहेत, ती पुढील कोष्टकाप्रमाणे आहेत :

राहू काळ एका वर्षात : 540 तास

यम काळ एका वर्षात : 540 तास

अष्टमी (जेव्हा भगवान कृष्ण यांचा जन्म झाला)

नवमी (जेव्हा प्रभू राम यांचा जन्म झाला)

अष्टमी + नवमी प्रत्येक वर्षात : 1152 तास

मरण योग (मृत्यूची शक्यता असलेली वेळ) : 540 तास

करीनाल (तमिळ नाडू व केरळ येथील प्रथा) : 540 तास

प्रथम तिथी : 576 तास

सूर्यग्रहण: 24 तास

चंद्रग्रहण : 24 तास

धार्मिक सण : वर्षात 33 दिवस : 792 तास

सर्व अशुभ मुहुर्तांची बेरीज : 4728 तास

त्याचे दिवस किती होतात ते पाहण्यासाठी त्यास (4728 ला) 24 ने भागू या : उत्तर येते आहे 197 दिवस.

म्हणजेच जर वर्षाच्या 365 दिवसांपैकी 197 दिवस वाया जात असतील, तर हा किती मोठा अपराध आहे? मानवी जीवनावर धार्मिक व अंधश्रद्धायुक्त विश्वासाचा हा अत्यंत वाईट प्रभाव नाही काय? अशाने मानवी क्षमतांचा पूर्णपणे उपयोग केला जाऊ शकेल काय? अशाने मानवतेची विकासाच्या दिशेने प्रगती कशी होईल?

लग्नसंबंध जुळवताना ज्योतिष किंवा पत्रिका (व्यक्तीच्या जन्माच्या वेळी गृहीत धरलेल्या ग्रहस्थितीनुसार काढलेले फलज्योतिषीय अनुमान) आणि त्या प्रस्तावित वधू-वर यांच्याशी जुळवणे याने तर हाहाःकार माजविला आहे. वधूंच्या बाबतीत तिच्या वयात येण्याच्या वेळेला महत्त्व दिले जाते. काही वेळा तिच्या पत्रिकेत मंगळ दोष दिसून येतो (मंगळ ग्रहाच्या स्थितीवर आधारित) व तिच्यासाठी वर सुद्धा तसाच दोष असलेला वर योग्य मानला जातो.

अशा प्रकारची भविष्ये अनेक वधूंच्या विवाहांच्या विलंबास कारणीभूत ठरतात आणि त्यांचे विवाहयोग्य वय लांबले जाते, जे टाळता येणे शक्य असते. त्या मुली विवाहासाठी आवश्यक असलेल्या सर्व शारीरिक आणि ऐहिक आवश्यकता पूर्ण करीत असूनही त्यांनी त्यांच्या आयुष्यात अशी काय चूक केलेली असते? याचे कारण आहे ज्योतिष/पत्रिका, वर आणि वधू यांच्या अनुरूपतेत असलेल्या अन्य अनुकूल बाबींना निष्प्रभ करते.

असो. पेरियार यांच्या प्रचाराच्या प्रभावाने, ‘स्वाभिमान लग्ने’ 1928 सालापासून केली जात आहेत. सी. एन. अण्णादुराई, जे. पेरियार यांचे मुख्य अनुयायी होते आणि ज्यांना अण्णा म्हणून ओळखले जाते, ते तामिळ नाडूचे मुख्यमंत्री झाल्यावर ‘स्वाभिमान लग्नां’नी 1968 साली पूर्वलक्ष्यी प्रभावाने कायदेशीर मान्यता प्राप्त केली. अण्णा हे खंदे विवेकवादी होते. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यावर दि.18 नोव्हेंबर 1967 साली अण्णामलाई विश्वविद्यालय, चिदम्बरम येथे पदवीदान समारंभात भाषण करताना त्यांनी विवेकवादाची अगदी चपखल अशी व्याख्या सांगितली आहे, ती पुढील प्रमाणे :

विवेकवाद म्हणजे प्राथमिक आणि मूलभूत सत्ये आणि वचने यांना नाकारणे नव्हे; परंतु विचार आणि कृती यांच्या संशयास्पद पद्धतींचा निःपात करणे हे होय.

अण्णा यांनी अनेक विवेकवादी तत्त्वे प्रचलित केली. देवाचे किंवा देवतांचे फोटो सरकारी कार्यालयात लावू नयेत, असे सरकारी आदेश काढले. देशाच्या संविधानातील तरतुदीनुसार विणलेला धर्मनिरपेक्षतेचा पोत उचलून धरण्यासाठी हे आवश्यक होते.

मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवादाचा प्रचार पुढील दोन आधारावर होऊ शकतो.

पहिला, विकासामध्ये अधिक अडथळा आणणार्‍या अंधश्रद्धांचे निर्मूलन करण्याबद्दल जनमत संग्रह करणे. नंतर अंधश्रद्धेचा धंदा करणारे व त्यांना साथ देणारे यांना शिक्षा करणारा कायदा पुरोगामी सरकारद्वारा आणला जाणे. जनमत पुढे जाते आणि कायदा पाठीमागे लंगडत येतो, या म्हणीनुसार अशी घटना ‘स्वाभिमान लग्ना’च्या कार्याच्या बाबतीत घडलेली आहे.

दुसरा, प्रथम कायद्याची अंमलबजावणी केली जावी आणि पुढील टप्प्यावर अंधश्रद्धेच्या धंद्यावर बंदी आणि शिक्षा आणली जावी. याच पद्धतीने, महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम – 2013 हा कायदा पारित केला, ज्याच्या विधेयकाचे प्रारूप ज्येष्ठ विवेकवादी व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी तयार केले होते.

पाठोपाठ कर्नाटक राज्याने अशाच प्रकारचे विधेयक (कर्नाटक अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम – 2017) राज्य विधिमंडळात सादर केले आहे, जे कायदा होण्याच्या प्रतीक्षेत आहे. केरळ राज्य सरकारसुद्धा असेच अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक (केरळ अमानुष अघोरी प्रथा व चेटूक, जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम – 2019) आणण्याच्या तयारीत आहे.

या सर्व राज्यांत तिथल्या विविध विवेकवादी संघटनांनी सतत केलेला प्रचार व पाठपुरावा याचा परिणाम म्हणून त्या-त्या राज्यातील सरकारांनी ही पावले उचलली आहेत. या सर्व संघटना कौतुकास आणि प्रशंसेस पात्र आहेत. हे प्रयास एका प्रदीर्घ वाटचालीची सुरुवात आहेत. कारण मानवतेच्या विकासाला अडथळा ठरणार्‍या अंधश्रद्धा प्रदीर्घ काळापासून तग धरून अस्तित्वात आहेत. हा रोग समाजाला प्रदीर्घ काळापासून लागलेला आहे, म्हणून तो बरा करण्यासाठी उपचारसुद्धा दीर्घकाळ करावे लागणार आहेत; परंतु असे उपचार कायमस्वरूपी व शाश्वत असणार आहेत. मानवतावादाच्या विकासासाठी विवेकवाद ही आंतरराष्ट्रीय परिषद, संबंधित विवेकवादी संघटनांना मानवतावादाच्या विकासाची खडतर वाट चालण्यासाठी आणि संपूर्ण विश्वात सर्वांगीण प्रगती, शांती आणि आनंद साधण्यासाठी काही ठोस दिशा दाखवेल.

याचबरोबर मी माझे भाषण समाप्त करतो. परिषदेला यश चिंतितो. विवेकवाद चिरायु होवो! मानवतावाद चिरायु होवो!