पेरियार ई. व्ही. रामसामी नायकर यांचा जन्म 1879 साली एका श्रीमंत धार्मिक व्यापारी कुटुंबात तमिळ नाडू येथील इरोड या शहरी झाला. (‘पेरियार’ हे ‘महात्मा’सारखे सन्मान करण्यासाठी वापरलेले पद आहे.) पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते वडिलांच्या व्यापारधंद्यात सहभागी झाले. वडील धार्मिक (व श्रीमंत) असल्यामुळे त्यांच्या घरी धार्मिक गुरूंची ये-जा होती. हे गुरू-महागुरू संध्याकाळच्या सुमारास धर्माविषयी प्रवचन-कीर्तन करत असत. रामायण-महाभारतातील, वेद-पुराणातील कथा सांगत असत. अगदी लहानपणीसुद्धा रामसामी यांना या वेद-पुराणातील कथेमधील देव-देवतांच्या परस्परविरोधी वक्तव्य व वर्तनाबद्दल अनेक प्रश्न विचारावेसे वाटत होते. त्यामुळे या देव-देवतांच्या आर्य वंशाबद्दल व विशेषकरून काळ्या वर्णाच्या द्रविडांचा सतत द्वेष करणार्या ब्राह्मण जातीबद्दल त्यांच्या मनात कळत-नकळत घृणा उत्पन्न झाली. अशा प्रकारे तरुण वयातच त्यांना नास्तिकतेचे व पुरोगामी विचारांचे आकर्षण वाटू लागले.
काशीतील ‘संन्यासी’ जीवन
वयाच्या 19 व्या वर्षी रामसामी यांचा विवाह पारंपरिक घरात वाढलेल्या 13 वर्षांच्या नागम्मलबरोबर झाला. ते तिला आपले विचार शिकवू लागले. पुढील दोन वर्षांत त्यांना मुलगी झाली व पाच महिन्यांची असताना ती मुलगी मरण पावली. त्यामुळे पेरियार यांना संन्यासी व्हावेसे वाटले. वडिलांची परवानगी घेऊन ते हैदराबाद, विजयवाडा, कलकत्ता अशा अनेक ठिकाणी भटकंती केली. नंतर त्यांनी हिंदू धर्माचे पवित्र ठिकाण म्हणवून घेत असलेल्या काशीत मुक्काम केला. संन्यस्त वृत्तीने राहत असल्यामुळे ते नेहमीच उपाशीपोटी राहायचे. परंतु काही वेळा त्यांना सणकून भूक लागत असे. त्या काळात शहरभर भरपूर धर्मशाळा होत्या व तेथे मोफत जेवण मिळते, असे त्यांना ऐकून माहीत होते. एका धर्मशाळेत ते जेवणासाठी गेले. परंतु त्यांना तेथील पहारेकर्यांनी हाकलून दिले. कारण ती धर्मशाळा फक्त ब्राह्मणांनाच जेवण घालणारी होती. उपाशीपोटी पुन्हा एकदा जेवणासाठी जाताना अंग उघडे ठेवून त्यावर सर्वांना दिसेल, असे जानवे घालून धर्मशाळेच्या दरवाजापाशी उभे राहिले. परंतु त्यांच्या ओठावरील मिशांनी ते ब्राह्मण नसल्याचे उघडकीस आणले. चौकीदाराने त्यांना धक्काबुक्की करून हाकलून दिले. नंतर काही दिवस ते अक्षरशः उष्टे अन्न खाऊन जगले. त्या धर्मशाळेच्या पाटीवर त्यांची एकदा नजर गेली. त्यावर तमिळ नाडू येथील एका द्रविड व्यापार्याने ब्राह्मणासाठी बांधलेली ‘धर्मशाळा’ असे ठळक अक्षरात लिहिले होते. या तरुणाच्या डोक्यात अनेक प्रश्न पडले. उत्तरेकडील हे ब्राह्मण द्रविडांचा एवढा द्वेष का करतात? द्रविड दानशूराने बांधलेल्या धर्मशाळेत द्रविडांनाच जेवण का मिळत नाही? ब्राह्मण एवढे क्रूरपणे का वागतात? उपाशीपोटी आलेल्यांना कसे काय हाकलून देतात? इतक्या अमानुषपणाने जातिव्यवस्था का पाळली जाते?
यातील एकाही प्रश्नाला त्यांना समर्पक उत्तर मिळाले नाही. काशीतील या कटु अनुभवाने पेरियार यांच्या मनावर फार मोठा परिणाम केला. ज्या काशी शहराचे ‘पवित्र’ शहर म्हणून यच्चयावत ब्राह्मण वर्णन करत होते, त्या शहरातील बोकाळलेली अनैतिकता, वेश्या व्यवसाय, लूटमार, फसवणूक, ठिकठिकाणी पसरलेल्या भिकार्यांच्या टोळ्या, ‘पवित्र’ गंगा नदीतील प्रेतांची रास इत्यादीमुळे ब्राह्मणांच्या दुटप्पी वर्तणुकीबद्दल त्यांना भयंकर संताप आला. आपल्या या संन्यस्त वृत्तीचा राग त्यांना आला व ते पुन्हा आपल्या कुटुंबाकडे,आपल्या शहराकडे परतले.
सामाजिक कार्य
इरोड येथील आपल्या घरी परतल्यानंतर रामसामीच्या वडिलांनी व्यापाराची सर्व सूत्रे त्यांच्या हाती सोपवली. सामाजिक कार्याकडे ओढ असल्यामुळे शहरातील अनेक संघ-संस्थांचे पदभार ते सांभाळू लागले. त्या शहरात प्लेगची साथ पसरली. शेकडो जण मृत्युमुखी पडले. व्यापार्यांसकट हजारो जण गाव सोडून जाऊ लागले. परंतु रामसामी तेथेच तळ ठोकून लोकांना मदत करू लागले. प्लेगमुळे मृत झालेल्या स्वतःच्या नातेवाईकांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाला स्पर्श करण्याइतके धैर्यही लोकांत नव्हते. अशा प्रसंगी रामसामी स्वतःच्या खांद्यावर मृतदेह घेऊन अंत्यसंस्कार करत होते. त्यांच्यातील न्यायबुद्धीमुळे लोक स्वतःची भांडणं-तक्रारी, तंटे-बखेडे घेऊन त्यांच्याकडे येत होते. रामसामी अशा प्रकारची भांडणं सहजपणे मिटवत होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा दरारा त्या शहरात होता.
आपल्या तरुण वयात रामसामी यांनी अनेक तमिळ विद्वानांच्या ग्रंथांचे वाचन केले होते. या विद्वानांनी लिहिलेल्या जातिव्यवस्था, बौद्ध धर्म, विवेकवाद इत्यादी विषयांचा त्यांच्यावर प्रभाव होता. पी. एम. पिल्लाई यांच्या पुस्तकातील हिंदू धर्माचे विश्लेषण, जातिव्यवस्थेतून होत असलेले शोषण, हिंदू पुराण व धर्मग्रंथातील ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वाची वर्णने वाचून त्यांना मागासवर्गीय, महिला यांच्यासाठी काम करण्याची ऊर्मी मिळाली. ते स्वतः कट्टर विवेकवादी झाले. संत कैवल्यम् यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या बहिणीची एक मुलगी वयाच्या नवव्या वर्षी विधवा झाली होती. रामसामी यांनी तिचा पुनर्विवाह करण्यासाठी पुढाकार घेतला व तिचे लग्न लावून दिले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभाग
1918 च्या सुमारास ते स्वातंत्र्य चळवळीत सक्रियपणे भाग घेऊ लागले. राजगोपालाचारींबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते. त्यांच्या आग्रहामुळे पेरियार काँग्रेस पक्षात सामील झाले. गांधीजींच्या असहकार आंदोलनात त्यांनी हिरिरीने भाग घेतला. गांधीजींच्या भाषणाने प्रभावित झाले व त्यांच्या हाकेला ‘ओ’ देत त्यांनी सुमारे तीसेक पदांचा राजीनामा दिला. 10 रुपये तोळा सोने असलेल्या त्या काळात वार्षिक 20,000 रुपये उत्पन्न देणार्या व्यापारी व्यवसायातून ते स्वेच्छेने बाहेर पडले. इरोड येथे ब्रिटिशांनी लागू केलेल्या 144 कलमाचा भंग करून स्वतःस अटक करवून घेतली. गांधीजींच्या स्वदेशी मंत्राला प्रतिसाद देत ते खादीचे कपडे वापरू लागले. आतापर्यंतच्या श्रीमंत जीवनशैलीचा त्याग करून साधेपणाने राहू लागले.
दारूबंदी चळवळीचे ‘जनक’ म्हणून पेरियार यांचे नाव घेता येईल. पेरियार यांची पत्नी व बहिणीने दारूमुळे कुटुंबाची काय दुरवस्था होऊ शकते, याची इत्थंभूत माहिती पेरियार यांना दिली व त्यासाठी आंदोलन उभारण्याची विनंती केली. पेरियार यांच्या या सूचनेला गांधीजींनी तात्काळ होकार दर्शविला. काँग्रेसचे कार्यकर्ते पक्षाचा उपक्रम म्हणून देशभर ठिकठिकाणी ताडीच्या गुत्त्यासमोर अहिंसकरित्या निदर्शने करू लागले. ब्रिटीश सरकारला दारूबंदीचा कायदा करावा म्हणून पाठपुरावा करू लागले. पेरियार यांनी इरोडच्या परिसरातील पाचशेपेक्षा जास्त ताडीची झाडे तोडून दारूबंदीविषयीची बांधिलकी व्यक्त केली. इरोड शहरातील दारूबंदीच्या निदर्शनात पेरियार यांची पत्नी व बहिणीने पुढाकार घेतला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा गांधीजींना निदर्शने थांबविण्याची विनंती केली, “तेव्हा ते माझ्या हातात नाही, पेरियार यांच्या पत्नीने व बहिणीने होकार दिल्यास माझी हरकत नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
तमिळ नाडू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. अस्पृश्यता निर्मूलन चळवळ जोर धरू लागली. अस्पृश्यांना मंदिराच्या गर्भगृहातही प्रवेश मिळावा, या पेरियार यांनी मांडलेल्या ठरावाला काँग्रेसच्या काही ब्राह्मण सदस्यांनीच विरोध दर्शविला. चातुर्वर्ण्य धर्माचा धिक्कार करत असताना त्यांनी ‘मनुस्मृती’ व ‘रामायणा’च्या पुस्तकांच्या प्रतींची जाहीर होळी केली. कारण द्रविडांना विरोध करणारे ब्राह्मण या ग्रंथांचा आधार घेत जनसामान्यांची दिशाभूल करत होते. या ब्राह्मणांच्या मते, द्रविड वंश अंधश्रद्धांनी बरबटलेला आहे, त्यांना संस्कृती नाही, त्यांना अक्कल नाही. मद्रास राज्याच्या कायदे मंडळात सत्तेत असलेल्या जस्टिस पार्टीने हिंदू एंडोमेंट बोर्ड स्थापनेसंबंधीचा कायदा पारित करून घेतला. हा कायदा हिंदू मंदिरांमध्ये ब्राह्मण अर्चकाकडून होत असलेल्या शोषणाच्या विरोधात होता. जरी रामसामी काँग्रेस पक्षाचे सदस्य असले, तरी जस्टिस पार्टीने मांडलेल्या या कायद्याला त्यांचा संपूर्ण पाठिंबा होता. शैक्षणिक, आर्थिक व रोजगार इत्यादी क्षेत्रात सामाजिक न्याय मिळवण्यासाठी व हिंदू उच्चवर्णियांकडून द्रविड वंशजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी ते सदैव तयार असत.
जस्टिस पार्टीने मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचा कायदा पारित करून घेतला. त्यालाही पेरियार यांचा पाठिंबा होता. द्रविडांना गुलामाप्रमाणे राबविले जात आहे, याबद्दल त्यांच्या मनात तीळमात्र संशय नव्हता. त्यामुळे केरळमधील आंदोलनाला पाठिंबा दर्शवित त्यांनी जमावबंदी कायद्याचा भंग केला. वायकोम शहरातील मंदिरासमोर उग्र निदर्शने केली. सत्याग्रहाचे नेतृत्व केले. परदेशी कपड्यांविरुद्धच्या आंदोलनात खादीचा पुरस्कार केल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
स्वाभिमानी (Self Respect) पक्षाची स्थापना
नॅशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या हॉस्टेलमध्ये (त्यांना ‘गुरुकुल’ असे म्हणत होते) द्रविड वंशातील विद्यार्थ्यांना फार वाईट रीतीची वागणूक मिळत होती. इतर जातीच्या विद्यार्थ्यांच्या पंगतीत जेवण करण्यास मनाई होती. निकृष्ट प्रकारचे जेवण दिले जात होते. पेरियार यांना या गोष्टी कळल्यानंतर त्यांनी तीव्र लढा उभा केला. स्वाभिमानी (Self Respect) पक्षाची स्थापना केली. ‘कुडी अरसु’ या त्यांच्या साप्ताहिकातून द्रविड वंशाच्या श्रेष्ठतेविषयीचे लेखन करू लागले. द्रविड वंशजांना सर्व क्षेत्रांत 50 टक्के आरक्षण असावे, अशी मागणी लेखांतून ते करत होते. त्यांच्या या पक्षविरोधी कारवायामुळे त्यांना काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागला.
स्वाभिमानी पक्षाच्या अनेक उपक्रमांमध्ये पेरियार उत्स्फूर्तपणे भाग घेत होते. बेंगलोर येथे गांधीजींचा मुक्काम असताना पेरियार त्यांना भेटून भारताच्या राजकीय स्वातंत्र्यापेक्षा ब्राह्मणांचे वर्चस्व असलेल्या हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेविरुद्ध लढण्याची गरज आहे, असे त्यांना सांगितले. काँग्रेस पक्षातील ब्राह्मण पदाधिकार्यांचे वर्चस्व, हिंदू धर्मातील जातिव्यवस्था, इतर प्रत्येक क्षेत्रातील ब्राह्मणांचा अरेरावीपणा व त्यांचे प्रभुत्व या गोष्टी स्वातंत्र्य लढ्यात अडचणीचे ठरतील, असे भाकीत त्यांनी केले.
सत्यशोधक विवाह पद्धतीचे अनुकरण
नागपट्टणम् येथील रेल्वे कामगारांच्या अभूतपूर्व संपाला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. पेरियार ‘रिव्होल्ट’ नावाचे इंग्रजी नियतकालिक प्रसिद्ध करू लागले. पेरियार यांनी महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विवाह पद्धतीप्रमाणे स्वाभिमानी विवाह पद्धतीची सुरुवात केली. या पद्धतीत ब्राह्मण व ब्राह्मणांच्या संस्कृतमधील मंत्रांची हकालपट्टी करण्यात आली व तमिळमध्ये वधू-वरांनी शपथ घेऊन कमीत कमी खर्चात विवाह विधी संपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या नवीन पद्धतीत जात, धर्म वा आर्थिक देवाणघेवाण यांचा कुठल्याही प्रकारे बडेजाव नव्हता. खर्या अर्थाने ही ‘सेक्युलर’ विवाह पद्धत होती. त्याचप्रमाणे पेरियार यांनी विधवा विवाह व आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांनासुद्धा उत्तेजन दिले.
1930 साली पेरियार यांनी मलेशिया व सिंगापूरला भेट दिली. मलेशियातील काही शहरांमधील तमिळ भाषकांच्या समोर भाषण केले. तेथील तमिळ काँग्रेसच्या अधिवेशनात स्वाभिमानी चळवळीचे विचार मांडले.
पेरियार यांनी कुटुंबनियोजनाविषयी एक पुस्तक लिहून प्रसिद्ध केले. त्यात लहान कुटुंबाचे फायदे अधोरेखित केले होते. कदाचित या विषयावरील भारतामध्येच अशा प्रकारचे हे पहिले पुस्तक असावे. त्यांनी हे पुस्तक ब्रिटीश सरकारकडेसुद्धा पाठविले. पुण्याच्या डॉ. एम. आर. जयकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वाभिमानी संघटनेचे अधिवेशन पार पडले. याच अधिवेशनात त्यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याच मंडपामध्ये युवा परिषद, महिला परिषद व दारूबंदी परिषद इत्यादींचे अधिवेशनही भरविण्यात आले होते. देवदासी पद्धतीच्या निर्मूलनासाठी संबंधीच्या बिलला पेरियार यांचा पूर्ण पाठिंबा होता. हे बिल मुत्थुलक्ष्मी रेड्डी यांनी कायदे मंडळासमोर मांडले होते.
1931 मध्ये पेरियार युरोपच्या दौर्यावर गेले. इजिप्त, ग्रीस, तुर्की, सोव्हिएत रशिया, जर्मनी, इंग्लंड, इटली, स्पेन, फ्रान्स, पोर्तुगाल इत्यादी देशांचे दौरे केले. बर्लिन येथील समाजवादी संघटनांच्या व तेथील समाजवादी वृत्तपत्रांच्या कार्यालयांना त्यांनी भेट दिली. पेरियार तीन महिने रशियात राहिले. इंग्लंडमध्ये 50 हजार कामगारांच्या समुदायाला उद्देशून भाषण केले. कॉम्रेड सिंगारवेलू यांच्यासाठी समाजवादी कार्यक्रमांच्या नियोजनाविषयी पत्रिका प्रकाशित केली.
ब्रिटीश सरकारने ‘कुडी अरसु’ या मासिकातील आक्षेपार्ह लेखनाबद्दल पेरियार यांच्यावर खटला दाखल केला. मासिकावर बंदी आणली. पेरियार यांनी ‘पुराची’ (क्रांती) या नावाचे तमिळ मासिक काढून आपले विचार मांडू लागले. ‘कुडी अरसु’तील लेखनासाठी पेरियार व त्यांच्या बहिणीला शिक्षा झाली व त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. पेरियार यांनी नंतरच्या काळात ‘पुगुथरिवरू’ (विवेकवाद) या नावाचे साप्ताहिक सुरू केले. जयप्रकाश नारायण यांनी मद्रासच्या भेटीत पेरियार यांना समाजवादी पक्षात सामील होण्याचे आमंत्रण दिले. परंतु साम्यवादी विचारांचा त्यांच्यावर प्रभाव असल्यामुळे त्यांनी जयप्रकाश नारायण यांचा प्रस्ताव नाकारला. पेरियार यांनी तमिळ मूळाक्षरांच्या रचनेत बदल करून वृत्तपत्रं व पुस्तकं यांच्या मुद्रणाला अनुकूल होतील, अशा सुधारणा केल्या. काही काळ ‘विदुथलाई’ या नावाचे तमिळ दैनिकही त्यांनी प्रकाशित केले.
1937 च्या सुमारास सी. राजगोपालाचारी ब्रिटीश कारभारांतर्गत मद्रास प्रेसिडेन्सीचे काही काळ प्रधान मंत्री होते. त्यांनी शाळेत हिंदी भाषा शिकण्याचे सक्तीचे केले. तिरुचिरापल्ली येथील तमिळ अधिवेशनात पेरियार यांनी या सक्तीच्या विरोधात आवाज उठविला व तमिळ जनतेसाठी ‘तमिळ नाडू’ ही घोषणा दिली. पेरियार तमिळ नाडूभर प्रवास करून हिंदीच्या विरोधात आंदोलन करू लागले. त्याला जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळू लागला. यासाठी त्यांना दोन वर्षे तुरुंगाची हवा खावी लागली. परंतु आंदोलनाचे नेतृत्व अण्णा दुराई या त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या हातात सोपवून ते तुरुंगात गेले. याच सुमारास तमिळ नाडू महिला परिषदेने रामसामींना ‘पेरियार’ ही पदवी प्रदान केली. 1940 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मोहंमद अली जिन्ना यांना पेरियार मुंबईत भेटले.
द्रविड कळघम संघटना
जस्टिस पार्टीने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे सी. राजगोपालाचारी यांचे सरकार कोसळले. मद्रासच्या गव्हर्नरने पेरियार यांना पर्यायी सरकार स्थापण्यासाठी बोलविले. परंतु सामाजिक सुधारणा करण्यातच पेरियार यांना रुची असल्यामुळे त्यांनी गव्हर्नरच्या विनंतीला मान्यता दिली नाही. पुन्हा एकदा अखंड तमिळ नाडू, तमिळ अस्मिता, हिंदीच्या सक्तीला विरोध, उत्तरेतील हिंदी भाषकांच्या – हिंदी नेत्यांच्या वाढत्या प्रभावाला विरोध इत्यादी विषय घेऊन चळवळीत नव्या जोमाने उतरले. जनतेचा पाठिंबा मिळविला.
1944 मध्ये पेरियार यांनी स्वाभिमानी चळवळ व जस्टीस पार्टी विसर्जित करून ‘द्रविड कळघम’ या संघटनेची स्थापना केली. या संघटनेने ‘ब्लॅक शर्ट’ परिषदेचे आयोजन केले. परंतु ही परिषद विरोधकांकडून उधळण्यात आली. भारताला स्वातंत्र्य मिळालेला 15 ऑगस्ट हा दिवस पेरियार यांनी शोक दिवस म्हणून साजरा केला. त्यांच्या मते, हे खरेखुरे सामान्य जनतेचे स्वातंत्र्य नसून ब्रिटिशांऐवजी शेटजी-भटजींचे राज्य असेल. स्वातंत्र्यानंतर या राज्यात काँग्रेस पक्षाला सत्ता मिळाली. द्रविड कळघम पक्षाचे चिन्ह असलेल्या काळ्या कपड्यावर सत्ताधार्यांनी बंदी घातली, तरीसुद्धा या पक्षाच्या अधिवेशनाला जनतेकडून उदंड प्रतिसाद मिळाला. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी या अधिवेशनाला हजेरी लावली. हिंदीविरोधी चळवळीला नवे बळ प्राप्त झाले.
महात्मा गांधींच्या खुनानंतर पेरियार यांनी या देशाचे भारत हे नाव बदलून ‘गांधी नाडू’ व या देशातील विवेकवादावर आधारित धर्माला ‘गांधी धर्म’ असे नाव देण्यात यावे, अशी सूचना मांडली. भारताचे पहिले गव्हर्नर म्हणून सी. राजगोपालाचारी मद्रासला आल्यादिवशी त्यांच्या हिंदी धोरणाच्या विरोधात पेरियार यांनी काळे झेंडे दाखवून निदर्शने केली.
याच सुमारास आपल्यापेक्षा 40 वर्षे लहान असलेल्या मणीअम्मांशी त्यांनी विवाह केला. द्रविड कळघमच्या कार्यकर्त्यांना हा विवाह मुळीच पसंत पडला नाही. हा विवाह द्रविड कळघमच्या ध्येय-धोरणाशी विसंगत होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध केला. त्यांची पुस्तकं जाळली. त्यांच्या पुतळ्यांची ठिकठिकाणी जाहीर होळी करण्यात आली. 1950 मध्ये त्यांच्या एका पुस्तकातील आक्षेपार्ह विधानामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले. 26 जानेवारी 1950 हा प्रजासत्ताक दिवससुद्धा त्यांनी दुःखद दिवस म्हणून पाळला. कारण त्यांच्या मते, यात प्रजाप्रभुत्व नसून ब्राह्मणप्रभुत्व आहे. उत्तरेकडील नेते आपल्यावर हिंदी भाषा बळजबरीने लादत आहेत. त्याविरुद्धचे आंदोलन तीव्र करण्याची गरज आहे, असे त्यांना वाटत होते. त्याच वेळी आरक्षणाची तरतूद असलेल्या यापूर्वीचा कायदा घटनाबाह्य आहे, असे न्यायालयाने निकाल दिल्यामुळे पेरियार यांनी न्यायालयाच्या विरोधातच ठिकठिकाणी राज्यभर सभा घेऊन आंदोलन केले. त्यांच्या या आक्रमकतेला घाबरून आरक्षणाची तरतूद फक्त मागासवर्गीयासाठी असे सीमित करणारा कायदा पारित करण्यात आला.
सामाजिक सुधाऱणा
मुख्यमंत्रिपदावरील राजाजी यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचा पिढीजात धंदा शिकवावा, असा फतवा काढला. परंतु पेरियार यांनी व्यवस्था कायम करणार्या ब्राह्मणी कारस्थानाला कडकडून विरोध केला. हा विरोध राज्यभर पसरला. तमिळ नाडूतील राज्यभरातील रेल्वे स्टेशनवरील फलकावरील हिंदी नावांना काळे फासण्यात आले. मूर्तिपूजेला विरोध दर्शविण्यासाठी ठिकठिकाणी देव-देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. या प्रकारच्या पेरियार यांच्या उग्र आंदोलनामुळे राजाजींना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. के. कामराज मुख्यमंत्री झाले. यापूर्वीचे सर्व आक्षेपार्ह कायदे मागे घेतल्यानंतर राज्यात शांतता पसरली.
पेरियार यांनी आपल्या शहरात बौद्ध धर्मीय अधिवेशन भरविले. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारू नये, अशी विनंती केली. कारण धर्मांतर केल्यास हिंदू धर्मावर जाहीर टीका करण्यास पात्र राहत नाही, असे त्यांना वाटत होते.
दक्षिणेतील प्रांतात हिंदी भाषेची सक्ती करण्याचे कारस्थान अजूनही केंद्र सरकारमध्ये शिजत होते. त्यामुळे पेरियार यांना पुन्हा एकदा त्याच्या विरोधात उग्र निदर्शने करावी लागली. केंद्र सरकारचा निषेध म्हणून ठिकठिकाणी तिरंगा ध्वजाची व हिंदी भाषक आर्यांना पूज्य असलेल्या रामाच्या चित्रांची जाहीरपणे होळी करण्यात आली. उच्च न्यायालयात ब्राह्मणांचा प्रभाव असल्यामुळे ब्राह्मणेतरांवर अन्याय होत आहे, असे जाहीरपणे वक्तव्य केल्यामुळे न्यायालयाची बेअदबी केल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवून त्यांना तुरुंगात रवाना करण्यात आले, तरीसुद्धा हिंदीविरोधी धगधग शांत झाली नाही. राज्यभर जाळपोळीचे सत्र चालू राहिले. 15-20 जण मृत्युमुखी पडले. ठिकठिकाणच्या हॉटेल्सच्या बोर्डवरील ब्राह्मण नावाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. एका ब्राह्मणाला मारझोड केली, म्हणून पेरियार यांच्यावर गुन्हा दाखल झाला, अटक करण्यात आली, त्यांना शिक्षा झाली व तुरुंगवास पत्करावा लागला. 1958 मध्ये उत्तरेकडील दौर्यात त्यांची राम मनोहर लोहियांबरोबर भेट झाली. सर्वोच्च न्यायालयाने तमिळ नाडूमधील लँड सीलिंग कायदा रद्द केल्यामुळे पेरियार यांनी पुन्हा एकदा निकालाच्या विरोधात आंदोलन छेडले.
1967 मध्ये अण्णा दुराई यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाने निवडणूक जिंकली व अण्णा दुराई मुख्यमंत्री झाले. अण्णा दुराई पेरियार यांचे पट्टशिष्य असल्यामुळे त्यांनी पेरियार यांची ध्येय-धोरणं राबविण्याचा संकल्प केला. राज्यात त्रिभाषा सूत्राऐवजी द्विभाषा सूत्र राबविले. यांच्या काळात स्वाभिमानी पक्षाला अपेक्षित असलेल्या अनेक धोरणांची अंमलबजावणी झाली. त्यांच्या नंतर आलेले एम. जी. रामचंद्रन यांनी सुद्धा पेरियार यांचे आशीर्वाद घेऊनच राज्य कारभार केला.
वृध्दापकाळातसुद्धा सामाजिक कामं करण्याची ऊर्मी त्यांच्यात होती. राज्यभरातील ठिकठिकाणच्या अधिवेशनात, परिषदेत त्यांची उपस्थिती असे. मंदिरातील अर्चक जात्यातीत असावा यासाठी कायदा करण्यास त्यांनी भाग पाडले. पेरियार यांच्या समाज सुधारणांची दखल घेत ‘युनेस्को’ या जागतिक संस्थेने त्यांचा गौरव केला. 20 डिसेंबर 1973 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या आदल्या दिवशीसुद्धा मद्रास येथील एका सभेच त्यांनी भाषण केले. तेच त्यांचे शेवटचे भाषण ठरले.