प्रिय डॉक्टर,
2 वर्ष झालीत त्या काळ्या दिवसाला. तुमच्याशिवाय, लढतेय संघटना, एकाचवेळी मुर्दाड शासनाच्या विरोधात आणि अंधश्रद्धांच्या काळोखात, तुमच्याच बलिदानाच्या ज्वालांच्या मशाली हातात घेत चालतेय संघटना, एकजुटीने, त्याच तडफेने, दु:ख आणि वेदना उरात घेऊन, विवेकाच्या वाटेवर. कोलमडलो नाही, आणि तुटलोही नाही डॉक्टर! संयमाची दोरी मजबूत ठेवत, निराशेचा पराभव करीत उभे आहोत. गोळी झाडणार्याचे हात खालीच राहिले. डॉक्टर, तुमच्या देहाशिवाय त्याच्या हाती काहीसुद्धा लागले नाही, माणूस मारता येतो, विचार मरत नाही, हे पुन्हा एकवार सिद्ध झाले.
डॉक्टर, मी तुम्हाला या दोन वर्षांत संघटना कशी आणि का उभी राहू शकली, याबाबत काही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
डॉक्टर, तुमच्यानंतर संघटनेपुढील आव्हान होते जादूटोणाविरोधी कायद्याचे. कायद्यासाठी तुम्ही 18 वर्षे संघर्ष केला. जनक्षोभाच्या दबावापुढे झुकत शासनाने वटहुकूम काढला होताच. पण त्याचे कायद्यात रूपांतर होणे आवश्यक होते. आम्हा काही कार्यकर्त्यांच्या मनात शंका होत्या. पण तुमच्याच तालमीत तयार झालेले आणि अनेक वर्षं हा पाठपुरावा करण्याचा अनभुव असलेले अविनाश पाटील यांनी अचूक योजना आखली होती. त्याच्या अंमलबजावणीसाठी माधव बावगे, संजय बनसोडे, हमीद, मुक्ता यांच्यासह सर्व प्रमुख कार्यकर्ते, आपली नागपूरची टीम, संपर्क, संवाद आंदोलन करीत होते. तेथेही अनेक चढउतार आम्ही सर्वांनी अनुभवले. आणि डॉक्टर ‘कायदा झाला’. तो क्षण आम्ही अजूनही विसरलो नाहीत, विधानपरिषदेच्या सभापतींनी पुकारा केला, मतदान झाले आणि कायदा पारीत झाला आम्ही तेथेच प्रेक्षक गॅलरीत होतो. हृदयाचे ठोके अचानकच वाढले होते. आम्ही तेथेच एकमेकांना शुभेच्छा देत, आलिंगन देत बाहेर पडलो. कोणालाही नजरेला नजर भिडवण्याची इच्छा होत नव्हती. डोळे पाणावलेले होते. ज्या कायद्यासाठी तुम्ही सातत्याने सर्व प्रकारचा सनदशीर संघर्ष केला, तो कायदा पारीत झाला डॉक्टर. त्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागली. कायदा संमत झाला आणि संघटनेवरील सर्वांचा विश्वास अधिकच दृढ झाला. तेथे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण ही झाले. विधानमंडळाच्या कामकाजासोबतच राजकीय संधी साधू वृत्ती काय व कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तुमच्या जाण्याने एक अनुकूलता होती, डॉक्टर; पण विश्वास ठेवून निश्चिंत राहण्यासारखीही स्थिती नव्हती. आम्ही सजग राहिलो आणि किल्ला यशस्वीपणे लढविला.
आता या कायद्याने महाराष्ट्रभर सुमारे पावणेदोनशे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील एक निकाल लागून आरोपींना शिक्षाही झालेली आहे. कायद्याचा प्रसार आता शासनच करतेय. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटर, पुणे(बार्टी)च्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही जादूटोणा विरोधी कायद्याची दर्जेदार प्रशिक्षणे घेतली, त्यापूर्वी जादूटोणाविरोधी कायद्याची जनसंवाद यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरली. प्रशांत पोतदारने त्याचे चांगले नियोजन केले. नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, विठ्ठलदास, वंदनाताई शिंदे या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला.
डॉक्टर, असेच यश आपल्याला जातपंचायतीच्या लढाईतही मिळाले. वैदू समाजाच्या सर्वोच्च नेत्यांनी समाजाची जातपंचायत रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मढी येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने होणार्या जातपंचायतीच्या बैठका यावर्षी झाल्याच नाहीत. कृष्णा चांदगुडे, रंजना गवांदे, मुक्ताताई, नितीन राऊत, प्रशांत पोतदार अशी अनेक प्रमुख मंडळी आपल्या सहकार्यांसह या विषयात कृतीशील आहेत. फार मोठे काम यातून उभे राहू शकते. डॉक्टर, अनेक भटक्या जमातीतील कार्यकर्ते आपल्या सोबत जोडले जात आहेत. संघटनेला एक नवे दालन या विषयाने उघडले. तुम्ही नाशिकच्या पहिल्या ‘जातपंचायतीला मुठमाती’ परिषदेला हजर होतात. डॉक्टर, त्यानंतर जळगाव, लातूर, महाड, मुंबई अशा परिषदा झाल्यात. जातपंचायतीच्या निर्णयाचं दु:ख भोगत असलेल्या पीडित कुटुंबियांनी आपल्या कैफियती मांडल्या या प्रश्नाचे अनेक पैलू उलगडू लागले.

डॉक्टर, तुम्ही गेल्याचं केवळ दु:ख धरून बसले नाहीत कार्यकर्ते. त्या वेदनेने अनेक अविष्कारांना जन्म दिला. त्यातीलच एक ‘रिंगणनाटक’. अतुल पेठे हे असंच तुमच्या प्रेमात अखंडपणे बुडालेले व्यक्तिमत्व. नाट्यकलेच्या क्षेत्रातील एक प्रयोगशील नाव. त्यांनी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत “अंनिस लोकरंग मंच निर्मित रिंगणनाट्य” ही संकल्पना मांडली. सर्वांनाच ही संकल्पना आवडली. पण ती किती यशस्वी होणार? संघटनेच्या अन्य कामावर त्याचा कसा परिणाम होणार? याबद्दल मनात शंका होत्या डॉक्टर. पण या रिंगणनाट्याने अंनिसच्या सांस्कृतिक विभागालाच केवळ समृद्ध केले नाही तर कार्यकर्त्यांना आपला विरोध, निषेध व वेदना व्यक्त करण्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम संघटनेला मिळाले.
डॉक्टर, पहिल्या वर्षी 10 गट तयार झाले. अतुल पेठे, राजू इनामदार, योगेश कुदळे यांनी प्रचंड मेहनत घेतली. यातील इस्लामपूर गटाच्या ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ या नाटकाने तर कमालच केली डॉक्टर. अंगावर काटे, डोळ्यात अश्रू आणि अखेरीस हाताची आपोआप वज्रमूठ आणि ‘विचार संपूही देणार नाही’ असा ठामपणे निर्धार करणारं मन अशीच भावना सर्वांचीच होते. महाराष्ट्रभर हे नाटक गाजत आहे. दिल्लीतही या नाटकाचे प्रयोग झालेत. तुम्हाला गांधी अनेक संदर्भात प्रिय आणि प्रभावित करणारे वाटायचे ना डॉक्टर. गांधी स्मृती स्थळावर हे रिंगणनाट्य सादर करून तो सांधा जोडला गेला. ते नातं अधोरेखित झालं आणखी.
अनेक तरूण-तरूणी या रिंगणनाट्याच्या निमित्ताने चळवळीला जोडले गेले. यालाही ‘त्याच प्रवृत्ती’ विरोध करीत आहेत. डॉक्टर, म्हणजे आपण अगदी योग्य कृती करतोय याची पावती मिळाली. इस्लामपूर गटाच्या मेहनत आणि समर्पित भावनेलाही तोड नाही. डॉक्टर, हे तुम्हालाही मान्य होते. अशाच तडफेनं काम करणारे दुसरे दोन तीन गट आहेत डॉक्टर. पुणे, पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर. या तिन्ही गटांनीही रिंगणनाट्य सातत्याने सुरू ठेवले.

तुमचं आणखी एक स्वप्न होतं ना डॉक्टर? ‘डिजीटल प्लॅनोटोरियम’चे. मला माहितीय, तुम्ही एकदा त्या डिजीटल प्लॅनेटोरियमचा शो बघितला आणि भारावून गेला होतात. आपण हे मिळवायलाच हवे, अशीच तुमची भावना होती पण त्याची किंमत काही लाखांच्या घरात जात होती म्हणून ते आपल्या आवाक्याबाहेरचे आहे, आर्थिकदृष्ट्या आपल्याला जमणार नाही, असे तुम्ही म्हणायचे. डॉक्टर, सांगायला अतिशय आनंद होतोय, की तुमचं स्वप्न प्रत्यक्ष साकार झालंय. अतिश दाभोलकरांच्या संपर्कातून ज्येष्ठ संशोधक डॉ.अशोक सेन यांच्याकडून आपल्या डिजीटल प्लॅनेटोरियम खरेदीसाठी देणगी मिळालीय. आणि सध्या त्याचे प्रायोगिक शो सुरू झाले आहेत. खगोलाची अनोखी सहल नव्या तंत्रज्ञानाने घडत आहे. नवी पिढी ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची वारसदार व्हावी यासाठीचा हा प्रयत्न. प्रा.संजय बनसोडे व डॉ.नितीन शिंदे हे काम अत्यंत नेटाने आणि सूक्ष्म नियोजनाने संयोजित करीत आहेत. संघटनेत अंतर्गत होणारे शाखा संघटना उत्सव, राज्यबैठका, जिल्हा बैठका अत्यंत नियमितपणे होत आहेत. अन्य उपक्रम, निर्धार मेळावे, परिषदादेखील सातत्याने सुरू आहेत. प्रत्येक कार्यकर्ता धावतोय. कामात कसलीच कसूर राहणार नाही यासाठी दक्ष राहतोय. कोणत्याही आघाडीवर संघटना मागे पडणार नाही याची काळजी वाहतोय. कधी कधी क्षमतेपेक्षा अधिक वेगाने धावण्याचेही प्रसंग येत आहेत. पण ऊर्जा तसूभरही कमी झालेली नाही.
डॉक्टर, वर सांगितलेलं केवळ ठळक व प्रातिनिधीक आहे. भरपूर कामं झालीत. सर्वच तपशीलात सांगणं कठीण आहे. आता अनेकांना प्रश्न पडलाय डॉक्टर, की तुमच्या शिवाय संघटनेनं हे कसं घडवलं? तुम्हालाही लोक विचारायचे ना डॉक्टर, तुमचं सगळं कसं व्यवस्थित चाललंय? यावर उत्तर म्हणून तुम्ही एक लेख आपल्या याच वार्तापत्राच्या दिवाळी अंकात लिहिला होता, ‘हे सारे कुठून येते?’ या शिर्षकाखाली. तो लेख खूप वाचकप्रिय ही झाला होता.
त्यात तुम्ही म्हटलंय, ‘झरा मुळचाच खरा’ तुम्हा कार्यकर्त्यांच्यात एक सामाजिक चांगुलपणाची भावना आहे. तुमच्या विचारांच्या गणितांची तार संघटनेच्या उपक्रमाने जोडली जाते. असं तुम्ही विश्लेषण करायचे. ते खरंही असेल डॉक्टर. पण तुम्ही स्वत:च्या वागण्या-बोलण्यातून, कृतीतून जी कार्य संस्कृती निर्माण केली, त्यालाही हे श्रेय जातं. तुमच्यातला साधेपणा, काटकसर, अभ्यासूवृत्ती, नम्रता, कृतिशिलता, सातत्य या असंख्य गुणांचा प्रभाव संघटनेच्या कार्यशैलीवर पडलेला आहे. यातून तुम्ही संघटनेचा एक ‘स्वभाव’ निर्माण केला, जो स्वभाव विचारांची कर्मठता नाकारतो, कृतीला प्राधान्य देतो आणि उदारमतवादी विवेकी भान देतो, डॉक्टर, तोच स्वभाव अबाधित ठेवण्यात संघटना यशस्वी ठरली. प्रामाणिकतेच्या कसोटीवर संघटना तावून सुलाखून सिद्ध झालीय. संघटनेचं काय होणार? अशी शंका घेणार्या सर्वांनाच आता उत्तर मिळालंय.
डॉक्टर, तुमची चर्चा करताना “तुमच्याच हत्तीचं बळ होतं” असं म्हटलं गेलं, ते खरंही होतं. आता एवढं बळ कदाचित एका कार्यकर्त्यात आढळणार नाही, पण सर्व कार्यकर्ते मिळून ते बळ निश्चितपणे निर्माण करू शकतात, हा विश्वास या दोन वर्षांनी दिला डॉक्टर.
डॉक्टर, तुम्हाला अमेरिकेत 10 लाखांचा ‘उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार’ मिळाला होता. तुम्ही ती रक्कम संघटनेला दिली. त्यामुळं बुवाबाजी विरोधाचं आपलं आव्हान आपण 11 वरून 21 लाखांचं केलं. हीच समर्पणाची भावना आपल्या कार्यकर्त्यांत तशीच आहे डॉक्टर. 5 हजारापासून ते 50,000 पर्यंतच्या रकमेचे पुरस्कार या दोन वर्षांत कार्यकर्त्यांना मिळाले, त्या सर्वांनी कोणताही अभिनिवेष न आणता, शांतपणे सर्व रक्कम संघटनेला दिली.
डॉक्टर, माध्यमांनीही आपल्याला तशीच मोलाची साथ दिली. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमांनी आपले प्रश्न, मागण्या सातत्याने लावून धरल्या. संघटनेच्या धडपडीला जागा दिली.
डॉक्टर, तुम्ही गेल्यानंतर शैलाताईंनी संघटनेच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. त्याही सक्रियपणे आमच्या साथीला उभ्या राहिल्या. हमीद, मुक्ताताईने ज्या संयमाने आणि समर्थपणे सर्व घटनेला तोंड दिले, त्याला तोड नाही. डॉक्टर, दाभोलकर परिवार हा आता महाराष्ट्र अंनिस परिवार झालाय.
डॉक्टर, हे सर्व संघटना म्हणून समृद्ध करणारं आहे. संघटनेत विश्वास निर्माण करणारं आहे. आमच्या उभं राहण्यात या सर्व बाबींचा वाटा आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या आणि संधीसाधू वृत्तीच्या मार्गाला तुम्ही कधी गेला नाहीत, आणि आम्हीही संघटनेला कधी जाऊ देणार नाही. आमची जबाबदारी वाढलीय. याची खोल जाणीव आहे आम्हा सर्वांना. अविनाश भाईचं नेतृत्व हे एक सामुहिक नेतृत्व आहे. डॉक्टर, अनेक जबाबदार्या दिल्यात. विश्वासाच्या धाग्यांनी ही वीट घट्ट झालीय.
डॉक्टर, तो क्षण आम्ही कोणी विसरलो नाही. तुमच्या चितेच्या बाजूला उभे राहून एकमेकांच्या खांद्याचा आधार घेऊन रडणारे कार्यकर्ते. तेव्हाही केवळ आक्रंदन नव्हतं. डॉक्टर, कोणालाही शब्दाने व्यक्त होण्याची गरजच नव्हती. घडत होता संवाद तेव्हाही. अधिक निर्धाराने लढण्याचा, कोणत्याही परिस्थितीत मोडून न पडण्याचा, आणि डॉक्टर हा निर्धार तसूभरही कमी झालेला नाही, कमी होऊन देणार नाही, कमी होऊ देणार नाही!

मोडून पडणार नाही, घावानं घायाळ होणार नाही कारण जग बदलाचं हे युद्ध पुढं चालूच ठेवायला हवं. सामान्यांच्या प्रश्नांसाठी विचाराचं स्वातंत्र्य जपायलाच हवं. प्रबोधन आणि संघर्ष चालूच रहायला हवा! डॉक्टर तुम्हाला गोळ्या झाडणार्यांनी विचार स्वातंत्र्यासाठी लढणार्या कष्टकरी जनतेच्या नेत्याला कॉ.गोविंद पानसरे यांनाही गोळ्या घातल्या. तो ही घाव कष्टकरी जनतेसाठी लढणार्या कार्यकर्त्यांनी आणि अंधविश्वासांच्या विरोधी लढणार्या आम्ही सर्वांनी सोसला. कॉम्रेडांचे कार्यकर्ते आणि कुटुंबीय सशक्तपणे विचारांची लढाई पुढं चालू ठेवण्यासाठी आमच्या हातात हात घालून कृतीशील राहतील. तुमच्या दोघांच्या बलिदानानं हे जग बदलण्यासाठी आम्ही लढत राहू!
तुमच्या अनेक कार्यकर्त्यां पैकी एक – विनायक
विनायक सावळे
लेखक संपर्क : 9403259226