Categories
पर्दाफाश

फसवणूक करणार्‍या भोंदू पती-पत्नीचा सातार्‍यात पर्दाफाश

ऑगस्ट - २०१५

मुलगा होईल, अशी आशा दाखवून महिलेची आर्थिक फसवणूक करणार्‍या भोंदू पती-पत्नी आणि त्यांना मदत करणार्‍या जावेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला. भोंदू दाम्पत्यावर फसवणूक केल्याप्रकरणी नरबळी, इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पीडितेच्या जावेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिन्यांपूर्वी नंदा विठ्ठल वायदंडे व विठ्ठल नारायण वायदंडे यांच्या घरी उपायासाठी गेले होते. त्यावेळी नंदाने अंगात आल्याचे सोंग केले. त्यानंतर सारिका यांनी नंदाला 4 हजार रूपये दिले. नंदाने सारिका यांना पांढर्‍या रंगाचे औषध प्यायला आणि थोडे औषध अंगाला चोळण्यास सांगितले. या औषधामुळे तू गर्भवती राहशील, असेही सांगितले. मात्र, या औषधाचा काहीही परिणाम झाला नाही.

काही दिवसांनी सारिका यांनी नंदाची पुन्हा भेट घेतली असता, तुमच्या जावेने, म्हणजेच शुभांगीने करणी केल्यामुळे तुम्हाला दिवस गेले नाहीत, असे नंदाने त्यांना सांगितले व पुन्हा उपाय करण्यासाठी 9 हजार रूपयांची मागणी केली. माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सारिका यांनी सांगितल्यानंतर नंदाने त्यांच्या कानातील सोन्याचे वेल मागितले, तेही सारिका यांनी दिले.

अखेर या सर्व प्रकाराला कंटाळून सारिका, सासरे व घरच्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सारिका यांनी सातारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडेही तक्रार दिली. पोलीस व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या भोंदू पती-पत्नीचा पर्दाफाश केला. कॉन्स्टेबल मोहन नाचण व अंनिसचे कार्यकर्तेप्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, शंकर कणसे, युवराज घाडगे, श्रीनिवास जांभळे, राजेंद्र दणाणे यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.